सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

226-17
नाना कळावैषम्यें चंद्रु । कां सांडिला आधीं नरेंद्रु । नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळें ॥ 226 ॥
किंवा कलाहीन चंद्र, चिंतारहित राजा अथवा मंदर पर्वतावांचून समुद्र. 26
227-17
तैसीं नाना विकल्पजाळें । सांडुनि गेलिया सकळें । मन राहे का केवळें । स्वरूपें जें ॥ 227 ॥
ह्याप्रमाणे सर्व दूषने अथवा विकल्परहित अशी जी मनाची केवलस्थिति. 27
228-17
तपनेंवीण प्रकाशु । जाड्येंवीण रसीं रसु । पोकळीवीण अवकाशु । होय जैसा ॥ 228 ॥
उष्णतेवांचून प्रकाश, जडत्वावांचून अन्न किंवा पोकळीवांचून आकाश, अशी जी स्थिति. 28
229-17
तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके । हिंवली जैसी आंगिकें । हिवों नेदी निजांग ॥ 229 ॥
तसे आपण आहों असें जाणून जे मन आपला स्वभाव टाकतें (चंचलता, संकल्प, विकल्प) म्हणजे थंडीलाच जशी थंडीची बाधा होत नाही, तसें तें स्वरूपस्थितीला पावले. 29
230-17
तैसें न चलतें कळंकेंवीण । शशिबिंब जैसें परीपूर्ण । तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें ॥ 230 ॥ बु
अचल, कलंकरहित परिपूर्ण चंद्रबिंब जसे असावें त्याप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपीं मनाची जी विश्रांति किंवा स्थापना. 230

231-17
जाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप । तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ॥ 231 ॥
या स्थितींत वैराग्याची इच्छा नाहीशी होऊन, मनाचे चांचल्य मोडून आमबोधाचें अंकुर यावे असा वाफसा त्या मनाच्या ठिकाणी तयार असतो. ( तें आत्मबोधाचे अधिकारी होतें ) 31
232-17
म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावें जें वक्त्र । तें वाचेचेंही सूत्र । हातीं न धरी ॥ 232 ॥
म्हणून, अशा स्थितीत ज्या वाणीनें शास्त्राध्ययन व विचार करावयाचा ती एक शब्दही उच्चारण्यास प्रवृत्त होत नाही. 32
233-17
तें स्वलाभ लाभलेपणें । मन मनपणाही धरूं नेणें । शिवतलें जैसें लवणें । आपुलें निज ॥ 233 ॥
व मिठाने आपलें मूल तत्त्व जे पाणी त्याला पावून जसें निजस्वरूप टाकावें, त्याप्रमाणे, आत्मलाभाच्या लाभलेपणाने संतुष्ट होणाऱ्या त्या मनाला मनपणाही उरत नाही इत्यर्थः 33
234-17
तेथ कें उठिती ते भाव । जिहीं इंद्रियमार्गीं धांव । घेऊनि ठाकावे गांव । विषयांचे ते ॥ 234 ॥
अशा स्थितींत, इंद्रियद्वारा धांव घेऊन विषयग्राम गांठावें, इत्यादि विकार तेथे उत्पन्न होण्याला अवसरच कोठला? 34
235-17
म्हणौनि तिये मानसीं । भावशुद्धिचि असे अपैसी । रोमशुचि जैसी । तळहातासी ॥ 235 ॥
म्हणून तळहात जसा रोमरहित सहजच असतो, त्याप्रमाणे अशा स्थितींतील मन सहजच शुद्ध किंवा विकल्प रहित असते. 35

236-17
काय बहु बोलों अर्जुना । जैं हे दशा ये मना । तैं मनोतपाभिधाना । पात्र होय ती ॥ 236 ॥
अर्जुना, फार काय सांगावें? मनाची जेव्हां अशी स्थिति होते तेव्हां ते मानसतप ह्या संज्ञेला पात्र होतें. 36
237-17
परी ते असो हें जाण । मानस तपाचें लक्षण । देवो म्हणे संपूर्ण । सांगितलें ॥ 237 ॥
पण, तें असो; हें सांगितलें तें मानसतपाचे संपूर्ण लक्षण असें जाण. 37
238-17
एवं देहवाचाचित्तें । जें पातलें त्रिविधत्वातें । तें सामान्य तप तूतें । परीसविलें गा ॥ 238 ॥
असें कायिक, वाचिक व मानसिक अशा तीन रूपांचे तप म्हणजे काय हें तुला सामान्यत्वें ऐकविले. 38
239-17
आतां गुणत्रयसंगें । हेंचि विशेषीं त्रिविधीं रिगे । तेंही आइक चांगें । प्रज्ञाबळें ॥ 239 ॥
आतां तीन गुणांच्या संगाने हेच तप तीन प्रकारचे कसें होतें तेंही लक्ष्य देऊन ऐक. 39
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥17. 17॥

240-17
तरी हेंचि तप त्रिविधा । जें दाविलें तुज प्रबुद्धा । तेंचि करीं पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ ॥ 240 ॥
तरी, अर्जुना, जें हें तीन प्रकारचे कायिक, वाचिक व मानसिक तप तुला सांगितले त्याचेच फलशारहित पूर्ण श्रद्धेने आचरण कर. 240
241-17
जैं पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी । तैं तयातेंचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे ॥ 241 ॥
अरे, पूर्ण शुद्ध मनाने ज्या वेळी ह्या तपाचें श्रद्धायुक्त आचरण केले जाते, तेव्हां, त्याला ज्ञाते सात्विक तप असे म्हणतात. 41
सत्कारमानपूजार्थं तपो दंभेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं ॥ 17.18॥

242-17
नातरी तपस्थापनेलागीं । दुजेपण मांडूनि जगीं । महत्त्वाच्या शृंगीं । बैसावया ॥ 242 ॥
किंवा तपाच्या निमित्ताने, इतरांपेक्षा आपले वैशिष्टय दाखविण्याची व मोठेपणा मिरविण्याची व मिळविण्याची जे महत्त्वाकांक्षा धरितात. 42
243-17
त्रिभुवनींचिया सन्माना । न वचावें ठाया आना । धुरेचिया आसना । भोजनालागीं ॥ 243 ॥
जगांतील सर्व मानमान्यता अन्य कोणाच्या वाट्यास न जातां आपल्याच वाट्यास यावी व भोजनादि समारंभांत आपल्यालाच अग्रस्थान असावें. 43
244-17
विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा । विश्वें आपलिया यात्रा । कराविया यावें ॥ 244 ॥
साऱ्या जगानें आपली स्तुति करावी अशी आपली पात्रता दाखवितो व सर्वांनी आपल्या भेटीस यावें अशी जो इच्छा करितो. 44
245-17
लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा । भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया ॥ 245 ॥
लोकांनी नानाप्रकारे आपलीच स्तुति करावी, इतरांचा आश्रय करू नये, व सर्व महत्त्वाचे भोग आपल्यासच घडावे असे जो इच्छितो. 45

246-17
अंग बोल माखूनि तपें । विकावया आपणपें । अंगहीन पडपे । जियापरी ॥ 246 ॥
अंगहीनता म्हणजे कुरूपता झांकण्यासाठी ज्याप्रमाणे एखादा मनुष्य भांगपट्टा थाटमाट करितो, त्याप्रमाणे खरे स्वरूप झांकून आपली लोकांत तपी म्हणून प्रसिद्धि व्हावी ह्यासाठी वरून तपाचा खूप आव आणतो. 46
247-17
हें असो धनमानीं आस । वाढौनी तप कीजे सायास । तैं तेंचि तप राजस । बोलिजे गा ॥ 247 ॥
हें असो, द्रव्य व मानमान्यतेसाठीं सायासानें जें तप केले जातें तें राजस तप होय असे म्हणतात. 47
248-17
परी पहुरणी जें दुहिलें । तैं तें गुरूं न दुभेचि व्यालें । का उभें शेत चारिलें । पिकावया नुरे ॥ 248 ॥
किंवा पहुरणी नामक रोगाने ज्या गाईचे दूध आटतें ती गाय व्याली तरीही तिला दूध येत नाही किंवा शेतांत उभे असलेले पीक जर गुरांकडून खावविले तर पीक कसें येणार? 48
249-17
तैसें फोकारितां तप । कीजे जें साक्षेप । तें फळीं तंव सोप । निःशेष जाय ॥ 249 ॥
त्याप्रमाणे, केवल प्रसिद्धीसाठीं जें तप केले जाते त्याचें कांहीही फल मिळत नसतें. 49
250-17
ऐसें निर्फळ देखोनि करितां । माझारीं सांडी पंडुसुता । म्हणौनि नाहीं स्थिरता । तपा तया ॥ 250 ॥
शिवाय तप फळाला येत नाहीं असे दिसतांच तें मध्येच सोडून देतो ह्यामुळे त्याला स्थिरताही नसते. 250

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *