सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

51-17
श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहे? ॥ 51 ॥
केवल श्रद्धेने त्याची (मोक्षाची) प्राप्ति होणार नाही; हें पहा, ब्राह्मण खरा, पण अत्यंजाच्या संगतीने पतित होणार नाही काय? 51
52-17
गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें । तें घेऊं नये कांहीं केलें । विचारीं पां ॥ 52 ॥
विचार कर की, गंगोदक जरी असले तरी, ते मद्याच्या भांड्यांत भरलें असतां केव्हांही सेवनीय रहात नाही. 52
53-17
चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु । तैं हातीं धरितां जाळूं । न शके काई? ॥ 53 ॥
चंदन अंगाने शीतळ खरा, पण त्याच्या काष्ठाला अग्निसंबंध झाला तर, त्याने हात भाजणार नाही काय? 53
54-17
कां किडाचिये आटतिये पुटीं । पडिलें सोळें किरीटी । घेतलें चोखासाठीं । नागवीना? ॥ 54 ॥
किंवा हिणकस सोन्याच्या आटणीत उत्तम सोनें पडलें आणि, नंतर अर्जुना, ते सर्व चोख सोन्याच्या भावाने खरेदी केले तर नुकसान होणार नाही काय? 54
55-17
तैसें श्रद्धेचें दळवाडें । अंगें कीर चोखडें । परी प्राणियांच्या पडे । विभागीं जैं ॥ 55 ॥
त्याप्रमाणे, श्रद्धा ही स्वरूपतः चांगली खरी, पण ती जेव्हां कोणा जीवांच्या वांटयास येते. 55

56-17
ते प्राणिये तंव स्वभावें । आनादिमायाप्रभावें । त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥ 56 ॥
तेव्हां ते जीव स्वभावतःच अनादि मायेच्या शक्तीनें त्रिगुणांचेच बनलेले असल्यामुळे. 56
57-17
तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती । तैं तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया ॥ 57 ॥
व त्या त्रिगुणांतही नेहमी दोन गुण दबले जाऊन एकाच उन्नतगुणाचा प्रभाव सुरू असतो, तेव्हां जीवांची वृत्ति त्या गुणानुरोधाची असते. 57
58-17
वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥ 58 ॥
वृत्तिप्रमाणे मनाची घडण, मनाप्रमाणे क्रिया, आणि क्रियेप्रमाणे मेल्यावर पुन्हां देह असें चक्र सुरु असते. 58
59-17
बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये । ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ॥ 59 ॥
बीजाचे स्वरूप बदलून झाड होते आणि पुन्हा झाड नाश पावून त्याचा बीजांत अंतर्भाव होतो असे कल्पच्या कल्प गेले तरी, वृक्षत्वजातीचा कांहीं नाश होत नाही. 59
60-17
तियापरीं यियें अपारें । होत जात जन्मांतरें । परी त्रिगुणत्व न व्यभिचरें । प्राणियांचें ॥ 60 ॥
ह्या क्रमानें, कित्येक जन्मच्या जन्म जरी गेले, तरी प्राण्यांचे त्रिगुणत्व नष्ट होत नाही. 60

61-17
म्हणूनि प्राणियांच्या पैकीं । पडिली श्रद्धा अवलोकीं । ते होय गुणासारिखी । तिहीं ययां ॥ 61 ॥
म्हणून प्राण्यांच्या वांट्याला आलेली श्रद्धा ही ह्या तीन गुणांपैक, एका कोणत्या तरी एका उन्नतगुणाच्या अनुरोधाची असते. 61
62-17
विपायें वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद । परी एका दोघे वोखद । येर आहाती ॥ 62 ॥
कदाचित् शुद्ध सत्व गुणाचा जोर असेल तर त्याला ज्ञानाची इच्छा होते; पण त्याला दुसरे दोन गुण जे आहेत ते प्रतिबंधक आहेत. 62
63-17
सत्त्वाचेनि आंगलगें । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे । तंव रज तम उगे । कां पां राहाती? ॥ 63 ॥
सत्वाच्या आधारानें ती श्रद्धा मोक्षफलाचा मार्ग धरिते; पण त्यावेळीं रज व तम हे स्वस्थ कसे बसणार? 63
64-17
मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशें जाये । तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ॥ 64 ॥
सत्व गुणाचे रक्षण मोडून जेव्हां रजोगुण उंचावतो तेव्हां तीच श्रद्धा कर्ममार्गाला लागते. 64
65-17
मग तमाची उठी आगी । तेव्हां तेचि श्रद्धा भंगी । हों लागे भोगालागीं । भलतेया ॥ 65 ॥
मागून तमोगुणाची आग भडकली कीं, तीच श्रद्धा भंग पावून वाटेल ते भोग भोगण्यास प्रवृत्त होते. 65
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यछ्रद्धः स एव सः ॥ 17.3॥

66-17
एवं सत्त्वरजतमा-/ । वेगळी श्रद्धा सुवर्मा । नाहीं गा जीवग्रामा-/ । माजीं यया ॥ 66 ॥
ह्याप्रकारें, अर्जुना, ह्या अगत जीवांच्या वाट्यास आलेल्या श्रद्धेचे स्वरूप ह्या तीन गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणासारखे असतें; त्यावांचुन केवल श्रद्धा अशी असतच नाहीं. 66
67-17
म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक । असे पैं त्रिगुणात्मक । रजतमसात्त्विक । भेदीं इहीं ॥ 67 ॥
म्हणून श्रद्धा स्वभावतः सत्व, रज किंवा तम ह्या तीन गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणभेदाची असते. 67
68-17
जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक । कां मिरयामाजीं तीख । उंसीं गोड ॥ 68 ॥
जसें पाणी हें जीवन खरे, पण विषयुक्त झाले तर मारक होतें, मिरचींत किंवा मिऱ्यात तिखट व ऊसांत गोड होतें. 68
69-17
तैसा बहुवसें तमें । जो सदाचि होय निमे । तेथ श्रद्धा परीणमे । तेंचि होऊनि ॥ 69 ॥
त्याप्रमाणे ज्याचे मन नित्य तमोगुणा ग्रासलेले असते त्याच्या ठिकाणची श्रद्धाही तसाच परिणाम पावून तमोगुणरूपच असते. 69
70-17
मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । तेवीं श्रद्धा तामसी । सिनी नाहीं ॥ 70 ॥
मग, काजळ आणि मस ह्यांत जसः भेदाभेद करितां येत नाही, तसा तो तमोगुणी मनुष्य व त्याची तामसी श्रद्धा ह्यांत भेद नसतो. 70

71-17
तैसीच राजसीं जीवीं । रजोमय जाणावी । सात्त्विकीं आघवीं । सत्त्वाचीच ॥ 71 ॥
त्याचप्रमाणे राजस स्वभावाच्या प्राण्याच्या ठिकाणची श्रद्धा राजस व सात्विक पुरुषाच्या अंगची श्रद्धा सत्वरूप असते. 71
72-17
ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु । श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे ॥ 72 ॥
ह्याप्रमाणे हा सर्व जगद्रूपी पसारा केवळ श्रद्धेचाच ओतला आहे. 72
73-17
परी गुणत्रयवशें । त्रिविधपणाचें लासें । श्रद्धे जें उठिलें असे । तें वोळख तूं ॥ 73 ॥
परंतु, गुणत्रयवश असणाच्या या श्रद्धेवर तीन गुणांचे भिन्न भिन्न ठसे (चिन्हें) उठलेले तुला ओळखतां येतील. 73
74-17
तरी जाणिजे झाड फुलें । कां मानस जाणिजे बोलें । भोगें जाणिजे केलें । पूर्वजन्मींचें ॥ 74 ॥
कारण, झाड ही त्याच्या फुलावरून, मन हे त्यांच्या द्वारा होणाऱ्या भाषेवरून व पूर्वकर्मे कसे होते हे सांप्रतच्या भोगावरून ओळखतां येते. 74
75-17
तैसीं जिहीं चिन्हीं । श्रद्धेचीं रूपें तीन्हीं । देखिजती ते वानी । अवधारीं पां ॥ 75 ॥
त्याप्रमाणे ज्या चिन्हावरून श्रद्धेची तिन्ही रूपे ओळखतां येतात तो प्रकार कसा ते श्रवण कर. 75
यजन्ते सात्त्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥17. 4॥

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *