संत ज्ञानेश्वरांची संपूर्ण ग्रंथसंपदा संक्षिप्त विवेचन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🎄🔴🎄

३) ज्ञानदेवांची ग्रंथसंपदा

महाराष्ट्रात सारस्वताचे झाड लावणारे ज्ञानेश्वर हे सर्व महाराष्ट्रीय लोकांच्या मनात माउलीचे स्थान पटकावून बसले आहेत. ८०० वर्षे होत आली तरी त्यांचे हे जनमानसातील स्थान कायम आहे. अवघ्या २१ व्या वर्षी समाधी घेणार्‍या ज्ञानदेवांचे चार ग्रंथ लोकप्रिय व अवीट गोडीचे आहेत. संशोधक आणखीही ४०/४५ ग्रंथ माऊलींचे आहेत असे सांगतात. उदा. श्रीज्ञानदेव तेहेत्तीशी, योगवासिष्ठ, स्वात्मानुभव, प्राकृतगीता, शांभवीकल्प, पंचीकरण, आज्ञापत्र वगैरे. कारण ह्याही ग्रंथांच्या शेवटी माऊलींचीच मुद्रा आढळते. हेही ग्रंथ त्यांचेच आहेत का, याविषयी संशोधकात मतभेद आहेत. पण पहिले चार ग्रंथ माऊलींचेच म्हणून प्रसिद्ध आहेत वे ते त्याचेच आहेत याविषयी सर्वांच्यात एकवाक्यता आहे.

१) ज्ञानेश्वरी – हा मित्रसंवाद आहे.
२) अमृतानुभव – हा आत्मसंवाद आहे.
३) चांगदेवपासष्टी – हा पत्रसंवाद आहे.
४) अभंगगाथा – लोकसंवाद आहे.

१) ज्ञानेश्वरी –

पैठणला शुद्धिपत्र घेण्यासाठी ही चारही भावंडे गेली होती. तेथे रेड्यामुखी वेद बोलवल्यावर लोकांना त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आली. ते ज्ञानदेवांना विष्णूचा अवतार मानू लागले. आता वेगळ्या शुद्धिपत्राची आवश्यकताच राहिली नव्हती. लोक त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द झेलू लागले होते. शुद्धिपत्र मिळाल्यावर ही भावंडे नेवासे येथे आली. येथेच ज्ञानदेवांनी आपली गीतेवरील ज्ञानेश्वरी ही टीका लिहीली. साधुसंतांच्या मंडलाकृती सभेमधे निवृत्तिनाथ अग्रस्थानी बसले आहेत. त्यांच्या समोर बसून आपण गीतेवर व्याख्यान करत आहो असे कल्पून ज्ञानदेवांनी या ग्रंथाची उभारणी केली आहे. ज्ञानेश्वरांनी लिहीली म्हणून ती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमधे स्वत: ज्ञानदेवांनी आपल्या नावाचा उल्लेख ज्ञानदेव असा केला आहे. म्हणून ती ज्ञानदेवी आहे. या ग्रंथाला भावार्थदीपिका असे म्हणतात. कारण ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांचा भाव यातून व्यक्त केला आहे. वामन पंडितांनी गीतेवर लिहीलेली टीका ही यथार्थदीपिका आहे. नेवासे येथे मोहिनीराजाचे मंदिर ज्या स्थानी आहे त्या नेवासे या गावी देशी भाषेचा अलंकार असलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ सिद्धीस गेला आहे. आणि तोही वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी.

ज्ञानदेवांनी ७०० श्लोकांनी युक्त भगवद्गीतेवर ९००० ओव्यांची टीका लिहीली आहे. त्यात त्यांनी श्रीकृष्णांचे हृद्गत स्पष्ट केले आहे. जणु श्रीकृष्ण व अर्जुन यांचे आकाशभाषित त्यांनी ऐकले आहे, त्याच्याशी ते तन्मय झाले आहेत असे सतत आपल्याला ज्ञानेश्वरी वाचतांना जाणवत रहाते.

२) अमृतानुभव – ज्ञानदेवांनी आपला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सद्गुरूंच्या चरणी सादर केला. त्यावेळी निवृत्तिनाथांनी त्यांना आपला परमात्मप्राप्तीचा अनुभव शब्दबद्ध करण्याची आज्ञा केली. आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी हा आपला अनुभव अमृतानुभवात शब्दबद्ध केला आहे. ज्ञानदेवांनी स्वत: या ग्रंथाचे नाव अनुभावामृत असे दिले आहे. पण अमृतानुभव या नावाने याची प्रसिद्धी आहे.

ज्ञानेश्वरी व आमृतानुभव हे दोन ग्रंथ जरी ज्ञानेश्वरांनीच लिहिले असले तरी या दोन्ही ग्रंथांच्या भूमिका भिन्न आहेत. ज्ञानेश्वरीचा श्रोता हा सामान्य माणूस आहे. आत्मस्वरूपाचे अज्ञान हे मानवजातीच्या दु:खाचे मूळ आहे. ते अज्ञान ज्ञानाने नाहीसे करून स्वरूपाचे ज्ञान करून देणे यावर ज्ञानेश्वरीचा रोख आहे.
परंतु ज्ञान व अज्ञान या परस्पर सापेक्ष आहेत. या द्वन्द्वाच्या पलिकडे असणारी जी शुद्ध चित्स्वरूप अनुभूती आहे, ते अनुभवरूपी अमृत वाचकांना त्यांनी अमृतानुभवातून दिले आहे.

ज्ञानाच्या भूमिकेवरून लिहिलेला हा सिद्धानुवाद आहे. सदा सिद्ध अशी जी परब्रह्मवस्तु तिच्या विषयीचा ज्ञानी मनुष्याचा अद्वैतानुभव या ग्रंथात सांगितला आहे. ज्ञानदेवांनी स्वत:ही म्हटले आहे की ‘तर्‍ही सिद्धानुवाद । लाहों आवडी करूं’ (१०-१२) ते म्हणतात की ‘नित्यसिद्ध आत्मस्वरूपाचे वर्णन मी आवडीने प्रेमभराने केलेले आहे’. अर्थात एकमेवाद्वितीय परमात्मस्वरूप सर्वत्र ओतप्रोत भरलेले आहे, या परब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही, जीवही ब्रह्मस्वरूपच आहे. हा अनुभव त्यांनी या ग्रंथात वर्णिला आहे.

जीव हा नित्य ब्रह्मरूप आहे. हेच परब्रह्म लीलेसाठी स्फूर्तिरूप होऊन अनेकरूप व्हावे म्हणून आपणच शिवशक्ति अशी एकपणातीलच दोन रूपे होऊन जगताची निर्मिती करते. पण दिसणारे हे दोनपण वास्तविक नसून एकमेवाद्वितीय परब्रह्माचीच सत्ता आहे असा एकंदर ह्या ग्रंथाचा विषय आहे.

३) चांगदेव पासष्टी – ज्ञानदेवांच्या चरित्रात चांगदेवांचा बराच संबंध आहे. चांगदेव नावाचे अनेक पुरुष होऊन गेले. चांगा वटेश्वर हे ज्ञानदेवांचे समकालीन. १४०० वर्षाचे चांगदेव एक सिद्ध योगी होते. अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या अंगात अहंकाराचे भूत संचारले होते. ज्ञानदेवांनी पैठणला रेड्याकरवी वेद बोलवल्याची वार्ता चांगदेवांच्या कानावर गेली होती.

म्हणून चांगदेवांनी ज्ञानदेवांच्या भेटीला जाण्य़ाचा संकल्प सोडला व त्यांनी ज्ञानदेवांना आपल्या शिष्याहाती पत्र द्यावे असे ठरले. पण मायना लिहीतांनाच चांगदेव अडखळले. तीर्थरूप लिहावे की चिरंजीव लिहावे ? ज्ञानदेव वयाने लहान असल्यामुळे तीर्थरूप लिहीणे योग्य होणार नव्हते. तसेच पशूच्या मुखाने वेद बोलवण्याचे ज्यांचे सामर्थ्य आहे त्यांना चिरंजीव तरी कसे लिहावे ? शेवटी ज्ञानदेवांना देण्य़ासाठी चांगदेवांनी कोरा कागदच पत्र म्हणून पाठवला. चांगदेवांनी पाठवलेल्या कोर्‍या कागदाला उत्तर म्हणून ज्ञानदेवांनी त्यांना ६५ ओव्यांचे पत्र लिहीले. तेच चांगदेव पासष्टी म्हणून ओळखले जाते. या पत्रात त्यांनी चांगदेवांना ‘तत्वमसि’ ह्या महावाक्याचा बोध केला आहे. ज्ञानेश्वरीचा सारांश अमृतानुभवात व अमृतानुभवाचा सारांश चांगदेव पासष्टीत दिसून येतो.

आत्म्याचे ज्ञान नसले की जगदाभास दिसू लागतो, आत्म्याचे ज्ञान व अज्ञान हे जीवाच्या अपेक्षेने आहे. वास्तविक परमात्मा लपलेलाही नाही वा प्रगटही नाही. अनेकत्व ही भ्रांती आहे. जीव व शिव हे भिन्न नसून आपणच आपल्या स्वरूपात आपल्या भेटीला येतो अशा शब्दात त्यांनी जीव-परमात्मा यांच्या ऐक्याचा सिद्धांत सांगितला आहे. निरनिराळ्या सुंदर दृष्टांतांनी मी आणि तू यांचे ऐक्य यात प्रतिपादलेले आहे.

एकूण परमात्म्याची अनिर्वचनीयता, नामरूपातीतता, अजातवाद आणि परमात्मा, जीव व जगत् यांचे ऐक्य त्यांनी नाना दृष्टांतातून अन्वय-व्यतिरेक पद्धतीने वर्णन करून सांगितले आहे.

४) ज्ञानदेवांची अभंगगाथा –

ज्ञानदेवांनी तीर्थयात्रेच्या वेळी व इतर वेळीही अभंग रचलेले असावेत. सध्या त्यांची १००१ अभंगांनी युक्त अशी गाथा दिसून येते. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव व चांगदेव पासष्टी या ग्रंथांची भाषा साधारणपणे सारखीच आहे. पण अभंगांची भाषाशैली मात्र एकदम वेगळी आहे. पहिले तीन ग्रंथ ओवी वृत्तात रचलेले आहेत. पण अभंगगाथेचे निराळे वृत्त, भाषा थोडी अर्वाचीन, सगुणोपासनेवर भर व पूर्वीच्या ग्रंथात न आलेली विठ्ठलभक्ती या नवीनच गोष्टी अभंगगाथेत दिसून येतात. त्यामुळे ज्ञानेश्वर एक की दोन अशी शंका भरद्वाजांनी निर्माण केली. डॉ. शं दा. पेंडसे यांचे असे मत आहे की ज्ञानदेव दोन होते व त्यांच्या अभंगांची सरमिसळ गाथेत झालेली आहे. किंवा पूर्वीच्या तीन ग्रंथात नसलेली विठ्ठलभक्ती, सगुणोपासना, नामसाधना व पंढरपूरचा उल्लेख कदाचित उत्तरायुष्यात त्यांचा नामदेवांशी संबंध आल्यावर आलेला असावा. एरवी तत्वज्ञानाच्या दृष्टीने पहिले तीन ग्रंथ व गाथा यात एकवाक्यता आहे.

अशाप्रकारे ज्ञानदेवांचे हे चार महत्वाचे ग्रंथ आहेत.

सौ. मनीषा अभ्यंकर

संदर्भ ग्रंथ –
१) सार्थ ज्ञानेश्वरी – सोनोपंत दांडेकर.
२) ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र – ल. रा. पांगारकर.
३) ज्ञानेश्वर दर्शन – वाङ्मयोपासक मंडळ अहमदनगर
४) महाराष्ट्र सारस्वत – कै. वि. ल. भावे
५) महाकैवल्यतेजा – इ साहित्य प्रतिष्ठान
६) ज्ञानदेव व नामदेव – डॉ. शं. दा. पेंडसे
७) श्री ज्ञानेश्वर – तत्त्वदर्शी आणि कवी – स्वामी शिवतत्त्वानंद – रामकृष्ण मठाचे प्रकाशन
९) लघुग्रंथत्रयी – शिरीष शांताराम कवडे – वामनराज प्रकाशन
१०) लघुग्रंथसप्तक – शिरीष शांताराम कवडे – वामनराज प्रकाशन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *