सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

376-17
आणि दुजे जंव जंव घडे । तंव तंव संसारभय जोडे । हें देवो आपुलेनि तोंडें । बोलती वेद ॥ 376 ॥
आणि जोपर्यंत द्वैत नांदत असेल तोपर्यंत संसारदुःख होणारच, हें देवानीं मुख्यतः सांगितलें व वेदवचनही तसेच आहे.76
377-17
म्हणौनि परत्वें ब्रह्म असे । तें आत्मत्वें परीयवसे । सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ॥ 377 ॥
म्हणून कर्मकर्त्याहून भिन्नत्वाने असणारें जें ब्रह्म त्याचे पर्यवसान कर्तृस्वरूपांत व्हावें (कर्त्याला स्वयंब्रह्मत्व यावें) ह्या उद्देशाने अंतीं “सत्” म्हणजे त्रिकालाबाध्यत्व म्हणजेच नित्यत्व व एकत्व दर्शविणाऱ्या शब्दाची योजना देवांनी केली आहे.77
378-17
तरी ओंकार तत्कारीं । कर्म केलें जें ब्रह्मशरीरीं । जें प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिलें ॥ 378 ॥
तरी “ॐ तत” ह्या दोन शब्दांनी आरंभिलेलें व ब्रह्मरूप झालेलें जें कर्म तेंच प्रशस्त (स्तुत्य) होय असे वाखाणिलें आहे. 78
379-17
प्रशस्तकर्मीं तिये । सच्छब्दा विनियोगु आहे । तोचि आइका होये । तैसा सांगों ॥ 379 ॥
असे जें प्रशस्त कर्म त्याचे ठिकाण “ सत्’’ शब्दाचा कसा विनियोग करावा तो ऐकण्यासारखा आहे, तोच आतां सांगतों. 79
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥17. 26॥

380-17
तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । सत्तेचें रूप ॥380॥
तरी ह्या अखेरच्या “ सत शब्दाने जगदादि सर्व असत् पसारा आटून म्हणजे बाध करून (तात्विक दृष्या त्रैकालिक अत्यंताभाव) अव्यंग म्हणजे शुद्ध, चोख, निर्भेळ सत्स्वरूप दर्शविलें. 380

381-17
जें सत् तेंचि काळें देशें । होऊं नेणेचि अनारिसे । आपणपां आपण असे । अखंडित ॥381॥
जी सद्वस्तु ती देशाचे व कलाने बाधित न होतां अखंड आपली आपण जशीच्या तशी असते. 81
382-17
हें दिसतें जेतुलें आहे । तें असतपणें जें नोहे । देखतां रूपीं सोये । लाभे जयाची ॥382॥
हे जेवढे म्हणून दृश्य आहे ते सर्वे असत् आहे म्हणून त्यासारखी जी सद्वस्तु नाही तर ज्या सद्रूपाचे दर्शन अथवा अपरोक्षत्व म्हणजे आत्मदर्शनच होय. 82
383-17
तेणेंसीं प्रशस्त तें कर्म । जें जालें सर्वात्मक ब्रह्म । देखिजे करूनि सम । ऐक्यबोधें ॥ 383 ॥
त्या सत् शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप होणारें जें प्रशस्त कर्म ते करूनही ऐक्यबोधदृष्टीने त्याजबद्दल समत्व म्हणजे ब्रह्मदृष्टि असावी. 83
384-17
तरी ओंकार तत्कारें । जें कर्म दाविलें ब्रह्माकारें । तें गिळूनि होईजे एकसरें । सन्मात्रचि ॥ 384 ॥
म्हणजे, ॐ कार व तत् ह्या शब्दोच्चाराने ब्रह्मरूप होते असे सांगितलेलें जें कर्म, त्याजविषयींही सन्मात्र ब्रह्मत्वदृष्टीच्या उदयाने कर्मत्वदृष्टि हारपून जावी (त्रिपुटी संभवत नाही अशी दृष्टि उगवावी) 84
385-17
ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणें हो ॥ 385 ॥
अखेरच्या सत् शब्दाचा अंतस्थ हेतु असा आहे, असें भगवान् श्रीरंगच म्हणतात; मी सांगतो असे समजू नका हो. 85

386-17
ना मीचि जरी हो म्हणें । तरी श्रीरंगीं दुजें हेंचि उणें । म्हणौनि हें बोलणें । देवाचेंचि ॥ 386 ॥
कारण, “ देव म्हणतात व मीही तसेच म्हणतों ” असे म्हणणे म्हणजे श्रीरंग आणि मी असें द्वैत उत्पन्न करणे होय, म्हणून हे सर्व भाषण देवांचेच होय. (यांत मी आलोंच) 86
387-17
आतां आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारीं । सात्त्विक कर्मा करी । उपकारु जो ॥ 387 ॥
आतां आणखी एक प्रकाराने, हा सत् शब्द सात्विक कर्मात कसा कामाला येतो तेंही ऐक. 87
388-17
तरी सत्कर्में चांगें । चालिलीं अधिकारबगें । परी एकाधें कां आंगें । हिणावती जैं ॥ 388 ॥
तरी सत्कर्मे यथाविधि व यथाधिकार उत्तम रीतीने चालू असतां कदाचित् एखाद्या गोष्टीचे त्यांत वैगुण्य उत्पन्न झालें,88
389-17
तैं उणें एकें अवयवें । शरीर ठाके आघवें । कां अंगहीन भांडावें । रथाची गती ॥ 389 ॥
एखाद्या अवयवाच्या व्यंगतेमुळे जसें सर्वं शरीर पंगु होतें किंवा रथाच्या एखाद्या अंगाच्या उणीवेने जसा त्याच्या गतीला प्रतिबंध होतो. 89
390-17
तैसें एकेंचि गुणेंवीण । सतचि परी असतपण । कर्म धरी गा जाण । जिये वेळे ॥ 390 ॥
तसे, सत्कर्मच खरे; पण एखाद्या गुणानें विकल झाले तरी त्याला जेव्हां असतत्व येऊ पहाते. 390

391-17
तेव्हां ओंकार तत्कारीं । सावायिला हा चांगी परी । सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु ॥ 391 ॥
तेव्हां “कार व तत् कार” ह्यांच्यासहवर्तमान उच्चारलेला सत् हा शब्द कर्माला आलेल्या वैगुण्याचा उद्धार करितो. 91
392-17
तें असतपण फेडी । आणी सद्भावाचिये रूढी । निजसत्त्वाचिये प्रौढी । सच्छब्दु हा ॥ 392 ॥
आणि सत् शब्द हा आपल्या ठिकाणच्या सामर्थ्याने कर्माच्या ठिकाणी आलेलें तें असंतपण फेडून त्याला सद्भावाला आणितो. 92
393-17
दिव्यौषध जैसें रोगिया । कां सावावो ये भंगलिया । सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण ॥ 393 ॥
एखाद्या रोग्याला दिव्यौषधाची जोड व्हावी किंवा पराभूताला सहाय मिळावें, त्याप्रमाणे व्यंग पावलेल्या कर्माला सत्कर्माचा अत्यंत उपयोग होतो. 93
394-17
अथवा कांहीं प्रमादें । कर्म आपुलिये मर्यादे । चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन ॥ 394 ॥
किंवा प्रमादाने कर्म मर्यादा चुकल्यामुळे त्याची निषिद्ध कर्मात गणना होण्याची पाळी आली; 94
395-17
चालतयाही मार्गु सांडे । पारखियाचि अखरें पडे । राहाटीमाजीं न घडे । काइ काइ? ॥ 395 ॥
नेहमीं जाणाराही रस्ता चुकतो, किंवा परीक्षकालाही क्वचित् भ्रम होतो; अहो, ह्या व्यवहारांत कोणती गोष्ट होणार नाही असें निश्चयानें म्हणवेल? 95

396-17
म्हणौनि तैसी कर्मा । राभस्यें सांडे सीमा । असाधुत्वाचिया दुर्नामा । येवों पाहे जें ॥ 396 ॥
तशी अविचाराने (अवधान न राहून) जर कर्माच्या विधीचे उल्लंघन केले गेले आणि त्याची निषिद्धत्वांत गणना होण्याची पाळी आली; 96
397-18
तेथ गा हा सच्छब्दु । येरां दोहींपरीस प्रबुद्धु । प्रयोजिला करी साधु । कर्मातें यया ॥ 397 ॥
अशावेळीं दुसऱ्या ॐ व तत् ह्या शब्दांपेक्षां प्रबुद्ध (सावध) असलेला हा सच्छब्द त्याची योजना केल्याने त्या कर्माला साधुता येते. 97
398-18
लोहा परीसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी । कां मृता जैसी वृष्टी । पीयूषाची ॥ 398 ॥
लोखंडाला परिसाची भेट व्हावी, ओहोळाला गंगेची भेट व्हावी किंवा मृतावर जसा अमृतवर्षाव व्हावा; 98
399-17
पैं असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा । हें असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया ॥ 399 ॥
त्याप्रमाणे, अर्जुना, विकल कर्माला ‘सत्’ ह्या शब्दप्रयोगाचा उपयोग होतो; हें असो; अरे, त्याच्या नामाची अशी प्रौढीच आहे. 99
400-17
घेऊनि येथिंचें वर्म । जैं विचारिसी हें नाम । तैं केवळ हेंचि ब्रह्म । जाणसी तूं ॥ 400 ॥
ह्यांचे वर्म जाणून त्या नामाचा विचार केला असतां तुला तेच ब्रह्मरूप आहे असे कळून चुकेल 400

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *