सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

351-17
का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे ॥ 351 ॥
किंवा तेल, वात व अग्नि वगैरे सामग्री असली तरी त्यांचे एकत्रीकरण करण्याची पद्धति माहीत नसेल तर, जशी प्रकाशाची प्राप्ति होत नाही. 51
352-17
तैसे वेळे कृत्य पावे । तेथिंचा मंत्रुही आठवे । परी व्यर्थ तें आघवें । विनियोगेंवीण ॥ 352 ॥
त्याप्रमाणे, योग्य वेळी कर्म घडून त्यावेळचे मंत्रही जरी स्मरले तरी त्याच्या विनियोगाचे वर्म माहीत नसेल तर ते सर्व व्यर्थ होतें. 52
353-17
म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हें परब्रह्मनाम एक । विनियोगु तूं आइक । आतां याचा ॥ 353 ॥
म्हणून, ह्या परब्रह्माचे जे वर्णत्रयात्मक एक नाम आहे त्याचा विनियोग (उपयोग) कसा करावा तें तूं आतां श्रवण कर. 53
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥17. 24॥

354-17
तरी या नामींचीं अक्षरें तिन्हीं । कर्मा आदिमध्यनिदानीं । प्रयोजावीं पैं स्थानीं । इहीं तिन्हीं ॥ 354 ॥
तरी ह्या ब्रह्मनामाचीं तिन्ही अक्षरें “ॐ तत् सत्” ह्यांची कर्मारंभाच्या आधी मध्ये व अंतीं योजना करावी. 54
355-17
हेंचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी । आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ॥ 355 ॥
हेंच विनियोगाचे वर्म जाणून, ब्रह्मवेत्ते (ब्राह्मण) ब्रह्मरूप झाले. 55

356-17
ब्रह्मेंसीं होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकीं । जे चावळलें वोळखीं । शास्त्रांचिया ॥ 356 ॥
ब्रह्मरूप होण्याची ज्यांना इच्छा आहे ते, ज्यांचे यथार्थ स्वरूप शास्त्रांत सांगितले आहे अशा, यज्ञादिक क्रियांचा त्याग करीत नाहीत. 56
357-17
तो आदि तंव ओंकारु । ध्यानें करिती गोचरु । पाठीं आणिती उच्चारु । वाचेही तो ॥ 357 ॥
ते प्रथम ॐकाराची ध्यानाने सिद्धि करून नंतर त्याचा वाणीने उच्चार करतात. 57
358-17
तेणें ध्यानें प्रकटें । प्रणवोच्चारें स्पष्टें । लागती मग वाटे । क्रियांचिये ॥ 358 ॥
असे ध्यान करून नंतर प्रकट प्रणवोच्चार करून मग सर्व कर्माना आरंभितात.58
359-17
आंधारीं अभंगु दिवा । आडवीं समर्थु बोळावा । तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभीं ॥ 359 ॥
अंधारांत दिव्याचा, अरण्यांत शूर सोबत्याचा जसा आधार असतो तसा ‘प्रणवाचा’ कर्मारंभांत रक्षक म्हणून उपयोग असतो. 59
360-17
उचितदेवोद्देशे । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें । द्विजद्वारां हन हुताशें । यजिती पैं ते ॥ 360 ॥
योग्य देवतांच्या उद्देशानें धर्माजित पुष्कळ द्रव्याने ते ब्राह्मणद्वारा अग्नींत यजन करतात. 360

361-17
आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपीं हवनीं । यजिती पैं विधानीं । फुडे हौनी ॥ 361 ॥
आहवनीय, गार्हपत्य व दक्षिण ह्या तीन अग्नींत, हवनीय आज्यादि (तूप वगैरे) द्रव्यांनी ते हवन करतात. 61
362-17
किंबहुना नाना याग । निष्पत्तीचे घेउनि अंग । करिती नावडतेया त्याग । उपाधीचा ॥ 362 ॥
किंबहुना अनेक यज्ञ करण्याच्या संकल्पाने आपल्यास न आवडणाच्या इतर उपाधींचा त्याग करितात (सांसारिक उपाधि) 62
363-17
कां न्यायें जोडला पवित्रीं । भूम्यादिकीं स्वतंत्रीं । देशकाळशुद्ध पात्रीं । देती दानें ॥ 363 ॥
आणि न्यायाजित पवित्र द्रव्य व भूमि वगैरे दाने शुद्ध देशकाल पाहून सत्पात्र ब्राह्मणास देतात. 63
364-17
अथवा एकांतरां कृच्छ्रीं । चांद्रायणें मासोपवासीं । शोषोनि गा धातुराशी । करिती तपें ॥ 364 ॥
अथवा एक दिवस आड भोजन करून किंवा कृच्छचांद्रायणादि मासिक उपवासाने शरिरांतील सप्त धातूचे शोषण करून जे तप करितात.64
365-17
एवं यज्ञदानतपें । जियें गाजती बंधरूपें । तिहींच होय सोपें । मोक्षाचें तयां ॥ 365 ॥
याप्रमाणे, जी यज्ञ, दान, तपें बंधरूप आहेत, अशी प्रसिद्धि आहे त्यांनीच, आरंभाला केलेल्या प्रणवोच्चाराच्या हातवटीने, त्यांना मोक्ष सुलभ होते. 65

366-17
स्थळीं नावा जिया दाटिजे । जळीं तियांचि जेवीं तरीजे । तेवीं बंधकीं कर्मीं सुटिजे । नामें येणें ॥ 366 ॥
जमिनीवर जी नाव मोठे ओझे अशी वाटते तीच पाण्यांत लोटल्यावर हलकी वाटून तरणोपाय होते. त्याप्रमाणे कर्म बंधनकारक खरी, पण प्रणवोच्चाराने ती बंधनकारक होत नाहीत. 66
367-17
परी हें असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया । ओंकारें सावायिलिया । प्रवर्तती ॥ 367 ॥
परंतु हे राहो; ह्या यज्ञदानादि क्रिया ॐकाराच्या सहाय्याने मोठ्या योग्यतेस चढतात. 67
368-17
तिया मोटकिया जेथ फळीं । रिगों पाहाती निहाळीं । प्रयोजिती तिये काळीं । तच्छब्दु तो ॥ 368 ॥
ती कर्मे फलीभूत होण्याच्या वेळेस “तत” शब्दाचा ते प्रयोग करितात. 68
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥17. 25॥

369-17
जें सर्वांही जगापरौतें । जें एक सर्वही देखतें । तें तच्छब्दें बोलिजे तें । पैल वस्तु ॥ 369 ॥
जें सर्व जगाच्या पलीकडले असून सर्वसाक्षी आहे व ज्याचा ‘तत्’ ह्या । शब्दाने निर्देश करितात ते सर्वश्रेष्ठ परब्रह्म होय. 69
370-17
तें सर्वादिकत्वें चित्तीं । तद्रूप ध्यावूनियां सुमती । उच्चारेंही व्यक्ती । आणिती पुढती ॥ 370 ॥
अर्जुना, ते सर्वांच्याही आधींचे असे त्याच्या रूपाचे चित्तांत ध्यान करून नंतर त्याचा ‘तत्’ शब्द में स्पष्ट निर्देश करितात. 370

371-17
म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेंसीं क्रिया इयां । तेंचि होतु आम्हां भोगावया । कांहींचि नुरो ॥ 371 ॥
आणि म्हणतात तत् शब्दवाच्य जे ब्रह्म त्याला ह्या सर्व क्रिया त्यांच्या फलांसह अर्पण असोत, व त्या तद्रूपच होवोत; त्यांचा अगर त्यांच्या फळांचा आम्हांस कोणत्याही प्रकारें भोग न घडो. 71
372-17
ऐसेनि तदात्मकें ब्रह्में । तेथ उगाणूनि कर्में । आंग झाडिती न ममें । येणें बोलें ॥ 372 ॥
ह्याप्रमाणे तद्रूप जे ब्रह्म त्याला सर्व कर्मे समधून “न मम” (माझे कांहीही नव्हे) असा उच्चार करून अंग झाडून मोकळे होतात. 72
373-17
आतां ओंकारें आदरिलें । तत्कारें समर्पिलें । इया रिती जया आलें । ब्रह्मत्व कर्मा ॥ 373 ॥
आतां प्रणब म्हणजे ॐ काराच्या उच्चाराने आरंभून जे कर्म ‘तत्’ शब्दाच्या उच्चाराने ब्रह्मसमर्पण करून त्याला ब्रह्मत्व आणिलें.73
374-17
तें कर्म कीर ब्रह्माकारें । जालें तेणेंही न सरे । जे करी तेणेंसी दुसरें । आहे म्हणौनि ॥ 374 ॥
पण तें कर्म ब्रह्माकार झाले, एवढयानेच केवल भागत नाही. कारण त्यांचा कर्ता म्हणून एक दुसरेपणाने शिल्लक आहेच. 74
375-17
मीठ आंगें जळीं विरे । परी क्षारता वेगळी उरे । तैसें कर्म ब्रह्माकारें । गमे तें द्वैत ॥ 375 ॥
मीठ पाण्यांत विरून जरी रूपाने नष्ट झाले तरी क्षार ह्या स्वभावाने त्याचे पृथकत्व उरतेच, त्याप्रमाणे कर्म ब्रह्मरूप आहे किंवा झालें असे म्हणण्यांतच त्याचे द्वितीयत्व सिद्ध होते. 75

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *