सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

151-17
तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखें ॥ 151 ॥
तसेच एकमेकांची स्पर्धा करीत सर्व रोग एकेच वेळीं उद्भवतात, असा राजस आहाराचा दुःखदायक परिणाम होतो. 51
152-17
एवं राजसा आहारा । रूप केलें धनुर्धरा । परीणामाचाहि विसुरा । सांगितला ॥ 152 ॥
याप्रमाणे राजस आहाराची लक्षणे सांगून त्यांचा परिणाम कसा होतो हेंही सांगितलें. 52
153-17
आतां तया तामसा । आवडे आहारु जैसा । तेंही सांगों चिळसा । झणें तुम्ही ॥ 153 ॥
आतां त्या तामसाला कोणता आहार प्रिय असतो तें सांगतों कीं, जो ऐकून तुम्हांस खंतीच वाटेल. 53
154-17
तरी कुहिलें उष्टें खातां । न मनिजे तेणें अनहिता । जैसें कां उपहिता । म्हैसी खाय ॥ 154 ॥
तरी सडलेलें अगर उष्टे अन्न खातांना हें अहितकर आहे अशी मुळीच शंका न येतां जशी म्हैस आंबलेलें आंबण तसा जो आहार आहे. 54
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ॥ 17.10॥
155-17
निपजलें अन्न तैसें । दुपाहरीं कां येरें दिवसें । अतिकरें तैं तामसें । घेईजे तें ॥ 155 ॥
त्याप्रमाणे सकाळचे अन्न दुपारी किंवा दुस-या दिवशीं शिळे करून खाणे तामसाला फार आवडतें. 55

156-17
नातरी अर्ध उकडिलें । कां निपट करपोनि गेलें । तैसेंही खाय चुकलें । रसा जें येवों ॥ 156 ॥
किंवा अर्धे कच्चे अथवा करपून निःसत्व झालेले अन्नही तो खातो. 56
157-17
जया कां आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती । तें अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाहीं ॥ 157 ॥
जे पुरें शिजलेले आहे किंवा रसपूर्ण आहे ते अन्न खरें, ’ ह्या तामसाला माहितही नसतें. 57
158-17
ऐसेनि कहीं विपायें । सदन्ना वरपडा होये । तरी घाणी सुटे तंव राहे । व्याघ्रु जैसा ॥ 158 ॥
एखादेवेळीं अकस्मात् अशा अन्नाची व त्याची गांठ पडलीच तर वाघाप्रमाणे तो त्याला ( त्या अन्नाला) घाण सुटेपर्यंत शिळे होऊ देतो. 58
159-17
कां बहुवें दिवशीं वोलांडिलें । स्वादपणें सांडिलें । शुष्क अथवा सडलें । गाभिणेंही हो ॥ 159 ॥
किंवा फार दिवसांचे शिळे, रुचि गेलेली, शुष्क किंवा सडलेले किंवा आंत जीव उत्पन्न झालेलें. 59
160-17
तेंही बाळाचे हातवरी । चिवडिलें जैसी राडी करी । का सवें बैसोनि नारी । गोतांबील करी ॥ 160 ॥
व तेही मुलांनी चिखल चिवडून राड करावी त्याप्रमाणे चिवडलेले व गोतांबील ( सर्व पदार्थाची एक रास) केलेले असे बायकांमुलांसह एकत्र खातो. 160

161-17
ऐसेनि कश्मळें जैं खाय । तैं तया सुखभोजन ऐसें होय । परी येणेंही न धाय । पापिया तो ॥ 161 ॥
अशी घाण जेव्हां तो भक्षण करील तेव्हां आज सुखभोजन झाले असे त्यास वाटते; पण त्या पाप्याचे एवढयानेच समाधान होत नाही. 61
162-17
मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा । जया का सदोखा । कुद्रव्यासी ॥ 162 ॥
चमत्कार असा की, जो घाणेरडे अन्न सदोष व शास्त्रदृष्टीने निषिद्ध अथवा त्याज्य आहे.62
163-17
तया अपेयांच्या पानीं । अखाद्यांच्या भोजनीं । वाढविजे उतान्ही । तामसें तेणें ॥ 163 ॥
तशा अपेय पदार्थाचे पान करण्याची व अभक्ष्य पदार्थांचे भक्षण करण्याची त्या तामसाला फार इच्छा होते. 63
164-17
एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा । तयाचें फल दुसरां । क्षणीं नाहीं ॥ 164 ॥
ह्याप्रमाणे तामसाचा आहार असतो; त्याचे फल मिळण्यास त्यास पुढला क्षण लागत नाही. 64
165-17
जे जेव्हांचि हें अपवित्र । शिवे तयाचें वक्त्र । तेव्हांचि पापा पात्र । जाला तो कीं ॥ 165 ॥
कारण ज्या क्षणीं हे अपवित्र अन्न तो तोंडांत घालतो तेव्हांच तो पापी ठरतो. 65

166-17
यावरतें जें जेवीं । ते जेविती वोज न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ते ॥ 166 ॥
याउपर जें जेवणें तें जेवण न म्हणतां पोटांत यातना भरण्यासारखेच होय असें जाणावें. 66
167-17
शिरच्छेदें काय होये । का आगीं रिघतां कैसें आहे । हें जाणावें काई पाहें । परी साहातुचि असे ॥ 167 ॥
शिरच्छेद केला तर कसे काय होतें, आगींत शिरले तर काय वाटतें, हें प्रत्यक्ष कां पहावयाचे असतें? पण त्यालाही याची तयारी असते. 67
168-17
म्हणौनि तामसा अन्ना । परीणामु गा सिनाना । न सांगोंचि गा अर्जुना । देवो म्हणे ॥ 168 ॥
म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण नाहीं असें देव म्हणाले. 68
169-17
आतां ययावरी । आहाराचिया परी । यज्ञुही अवधारीं । त्रिधा असे ॥ 169 ॥
असे आहाराचे प्रकार झाल्यावर यज्ञाचेही तीन प्रकार आहेत ते ऐक. 69
170-17
परी तिहींमाजीं प्रथम । सात्त्विक यज्ञाचें वर्म । आईक पां सुमहिम -। शिरोमणी ॥ 170 ॥
तर, ह्या तीन प्रकारांपैकीं प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म, हे कीर्तिमंत शिरोमणे, तू ऐक. 170
अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ॥
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥17. 11॥

171-17
तरी एकु प्रियोत्तमु-/ । वांचोनि वाढों नेदी कामु । जैसा का मनोधर्मु । पतिव्रतेचा ॥ 171 ॥
तरी, एक पति, किंवा पतीची इच्छा ह्यापलीकडे पतिव्रतेला जशी स्वतःची अशी इच्छाच नसते. 71
172-17
नाना सिंधूतें ठाकोनि गंगा । पुढारां न करीचि रिगा । का आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला ॥ 172 ॥
किंवा समुद्राला मिळाल्यावर गंगेचा आणखी पुढे प्रवेश असा नसतो, अथवा आत्मदर्शन होतांच वेद जसा मौनावतो. 72
173-17
तैसें जे आपुल्या स्वहितीं । वेंचूनियां चित्तवृत्ती । नुरवितीचि अहंकृती । फळालागीं ॥ 173 ॥
त्याप्रमाणे, जे स्वहितार्थ सर्व चित्तवृत्तींचा व्यय किंवा वेचं करून जे फलाशेने अहंकार बाळगीत नाहीत. 73
174-17
पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेंचि जळ । जिरालें गां केवळ । तयाच्याचि आंगीं ॥ 174 ॥
पाणी जसें झाडाचे मूळ गांठल्यावर परत न फिरतां त्याच्याच अंगांत जिरतें. 74
175-17
तैसें मनें देहीं । यजननिश्चयाच्या ठायीं । हारपोनि जें कांहीं । वांछितीना ॥ 175 ॥
त्या प्रमाणे मनाने व देहाने निश्चयपूर्वक यज्ञांत फलेच्छा न करितां निमग्न होतात. 75

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *