सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

426-16
सर्व दुःखां आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती ॥ 426 ॥
ज्याला सर्व दुःखांचा अनुभव यावा असे वाटेल, अशा वाटेल त्याला हे जणू वाटाडेच आहेत, हें अर्जुना, ध्यानांत असावें. 26
427-16
कां पापियां नरकभोगीं । सुवावयालागीं जगीं । पातकांची दाटुगी । सभाचि हे ॥ 427 ॥
किंवा पापी लोकांस नरकभोग घडविण्यासाठीं पातकांची ही एक मोठी सभाच होय. 27
428-16
ते रौरव गा तंवचिवरी । आइकिजती पटांतरीं । जंव हे तिन्ही अंतरीं । उठती ना ॥ 428 ॥
जोपर्यंत काम, क्रोध व लोभ ह्या तीन दोषांचा चित्तांत उद्भव झाला नाही तोपर्यंतच पुराणांती वर्णलेल्या रौरव नरकादिकांच्या गोष्टी ऐकाव्या. 28
429-16
अपाय तिहीं आसलग । यातना इहीं सवंग । हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी ॥ 429 ॥
ह्यांनी अपाय प्राप्ति त्वरित होते,यातनाही सवंग होतात व ह्यांनी हानि होते असे म्हणण्यापेक्षा हे तिघे म्हणजेच “मूर्त हानि” होत. 29
430-16
काय बहु बोलों सुभटा । सांगितलिया निकृष्टा । नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा ॥ 430 ॥
अर्जुना, तुला फार काय सांगावें ! वर वर्णीलेल्या निकृष्टस्थितिरूप नरकाचे जें प्रवेशद्वार त्याच्या हे तीन दोष म्हणजे उंबरठाच होत.430

431-16
या कामक्रोधलोभां- । माजीं जीवें जो होय उभा । तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ॥ 431 ॥
ह्या कामक्रोधलोभांना जो जीवें वाहिला तो नरकपुरीच्या सभेत सन्मानाचे पद पावेल. 31
432-16
म्हणौनि पुढत पुढतीं किरीटी । हे कामादि दोष त्रिपुटी । त्यजावींचि गा वोखटी । आघवा विषयीं ॥ 432 ॥
म्हणून अर्जुना, सर्वप्रयत्ने करून ही कामादि दोषांची त्रिपुटी अत्यंत घातक म्हणून तिचा त्याग करच. 32
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् 16.22॥

433-16
धर्मादिकां चौंही आंतु । पुरुषार्थाची तैंचि मातु । करावी जैं संघातु । सांडील हा ॥ 433 ॥
पुरुषार्थाची सीमा जे धर्म, अर्थ, काम व मोक्ष त्यांची गोष्ट तेव्हांच बोलतां कीं येईल ज्यावेळीं हे दोषत्रय जीवांच्या पदरी नसेल. 33
434-16
हे तिन्ही जीवीं जंव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती । हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ॥ 434 ॥
हे तीन दोष जीवाच्या ठिकाणी जो वर जागे आहेत, तोपर्यंत या चार पुरुषार्थापैकी एकाची तरी प्राप्ति जीवास होईल हें ऐकण्यास माझे कान धजत नाहीत असें देवही म्हणाले. 34
435-16
जया आपणपें पढिये । आत्मनाशा जो बिहे । तेणें न धरावी हे सोये । सावधु होईजे ॥ 435 ॥
ज्याला आपल्या हिताची इच्छा आहे व जो आत्मनाशाला भितो त्याने ह्या त्रयीचा संग सोडावा; सावध असा बरें. 35

436-16
पोटीं बांधोनि पाषाण । समुद्रीं बाहीं आंगवण । कां जियावया जेवण । काळकूटाचें ॥ 436 ॥
पोटाशी पाषाण बांधून बाहुंनीं समुद्रतरण करू पहाणे किंवा जीवन जगविण्याकरितां काळकूट अन्न सेवन करणे. 36
437-16
इहीं कामक्रोधलोभेंसी । कार्यसिद्धि जाण तैसी । म्हणौनि ठावोचि पुसीं । ययांचा गा ॥ 437 ॥
ह्याप्रमाणे ह्या कामक्रोधलोभांनीं कार्यसिद्धि साधण्यासारखी आहे, म्हणून त्यांच्या वाटेलाही जाऊ नकोस हो ! 37
438-16
जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे । तैं सुखें आपुलिये वाटे । चालों लाभे ॥ 438 ॥
जेव्हां केव्हां अकस्मात् ही तीन दुव्यांची (पायांतील) सांखळी तुटेल, तेव्हां सुखाने आपले मार्गक्रमण करणे शक्य होईल. 38
439-16
त्रिदोषीं सांडिलें शरीर । त्रिकुटीं फिटलिया नगर । त्रिदाह निमालिया अंतर । जैसें होय ॥ 439 ॥
वात, पित्त, कफ, ह्या तीन दोषांपासून मुक्त असलेले शरीर, तीन कुटाळक्या ( चोरी, चहाडी, शिंदळकी? ) मुक्त असलेले नगर व त्रिविध तापांपासून (आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक) मुक्त असलेले अंतःकरण जसे सुखी असतें. 39
440-16
तैसा कामादिकीं तिघीं । सांडिला सुख पावोनि जगीं । संगु लाहे मोक्षमार्गीं । सज्जनांचा ॥ 440 ॥
त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ ह्या तिघांपासून मुक्त असलेला जगांत सुखी होऊन मोक्षमार्गदायी सज्जन संगतीचा त्यास लाभ होतो. 440

441-16
मग सत्संगें प्रबळें । सच्छास्त्राचेनि बळें । जन्ममृत्यूचीं निमाळें । निस्तरें रानें ॥ 441 ॥
मग सत्संगतीच्या जोरावर, सच्छास्त्राच्या सहाय्यानें जन्ममृत्युरूप अरण्याची बिकट वाट तो चुकवू शकतो. 41
442-16
ते वेळीं आत्मानंदें आघवें । जें सदा वसतें बरवें । तें तैसेंचि पाटण पावे । गुरुकृपेचें ॥ 442 ॥
अशा प्रकारें आत्मानंदाचे जे नित्य निजस्थान अशी जी गुरुकृपा, ती त्याला प्राप्त होते. 42
443-16
तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा । तयें खेवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥ 443 ॥
व तिच्या योगे परमानंदतेची अखेरची सीमा अशी जी आत्मराज माउली तिचे अपरोक्ष (आविर्भाव) होऊन त्याचक्षणीं “ आपण संसारी आहों” अशा असलेल्या त्याच्या भ्रमाचा निरास होतो. 43
444-16
ऐसा जो कामक्रोधलोभां । झाडी करूनि ठाके उभा । तो येवढिया लाभा । गोसावी होय ॥ 444 ॥
ह्याप्रमाणे, कामक्रोधलोभ झांची झाडणी करून जो सिद्ध होतो, तोच अशा लाभाचा धनी होत असतो, 44
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥16. 23॥

445-16
ना हें नावडोनि कांहीं । कामादिकांच्याचि ठायीं । दाटिली जेणें डोई । आत्मचोरें ॥ 445 ॥
किंवा हें न आवडून जो आत्मवंचक कामादिकांच्या ठिकाणी डोके देऊन व्यवहरतो; 45

446-16
जो जगीं समान सकृपु । हिताहित दाविता दीपु । तो अमान्यु केला बापु । वेदु जेणें ॥ 446 ॥
ज्याची सर्व जगावर समान कृपादृष्टि आहे, हित काय व अहित काय ह्यांचे मार्गदर्शन करणारा जो जणू दीपस्तंभ आहे असा जो वेद, तो ज्यांनी अप्रमाण केला. 46
447-16
न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड । वाढवीत गेला कोड । इंद्रियांचें ॥ 447 ॥
विधिनिषेधाची पर्वा न करिता, आपल्या हिताकडे दुर्लक्ष्य करून जो केवळ इंद्रियांचे लळे पुरे करितो. 47
448-16
कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष । स्वैराचाराचें असोस । वळघला रान ॥ 448 ॥
काम क्रोधादिकांची कास न सोडता जो त्यांच्या तंत्राप्रमाणे चालतो व स्वैराचाराच्या अरण्यांत संचार करितो. 48
449-16
तो सुटकेचिया वाहिणीं । मग पिवों न लाहे पाणी । स्वप्नींही ते कहाणी । दूरीचि तया ॥ 449 ॥
त्याला त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर आपण यावे अशी इच्छा होणे शक्य नाही, इतकेंच नव्हे, तर त्याला तसे नुसतें स्वप्न पडणेही शक्य नाही. 49
450-16
आणि परत्र तंव जाये । हें कीर तया आहे । परी ऐहिकही न लाहे । भोग भोगूं ॥ 450 ॥
आणि संसारबंध सुटून परलोकप्राप्ति होईल ही गोष्ट तर राहो; पण त्याला येथील भोगही सुखाने भोगत येत नाहीत. 450

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *