सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

351-16
ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरों नेदी ॥ 351 ॥
ह्याप्रमाणे जगांतील सर्व संपत्तीचा मीच स्वामी होईन; मग ज्याच्यावर माझी दृष्टि पडेल तो उरणारच नाही ! 51
असौ मया हतः शत्रुऱनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी ॥ 16.14॥

352-16
हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे । मग नांदेन पवाडें । येकलाचि मी ॥ 352 ॥
आतांपर्यंत मारले हे शत्रू कांहींच नाहीत, आणखी जे पराक्रमी आहेत त्यांनाही मारून मग एकटा मीच सर्व मालक अशा थाटानें राहीन. 52
353-16
मग माझी होतील कामारीं । तियेंवांचूनि येरें मारीं । किंबहुना चराचरीं । ईश्वरु तो मी ॥ 353 ॥
माझे दास होतील तेवढे ठेवीन; बाकी सर्वांचा नाश करीन; किंबहुना ह्या चराचराचा मालक ईश्वर म्हणून जो म्हणतात, तो मीच होय.अन्य कोणी नाही. 53
354-16
मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो । म्हणौनि इंद्रुही वावो । मातें पाहुनि ॥ 354 ॥
सर्व भोग्यसृष्टीचा मी राजा असून सर्व सुखांचाही मीच आधार व भोक्ता होय; म्हणून माझे ऐश्वर्य पाहून मनांत इंद्रही लज्जित होईल. 54
355-16
मी मनें वाचा देहें । करीं ते कैसें नोहे । कें मजवांचूनि आहे । आज्ञासिद्ध आन? ॥ 355 ॥
मग मी कायावाचा मनाने जें करीन ते कसे घडणार नाहीं? माझ्या आज्ञेवांचून दुसरी कोणती गोष्ट सिद्धीस जाणार आहे? 55

356-16
तंवचि बळिया काळु । जंव न दिसें मी अतुर्बळु । सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि ॥ 356 ॥
अतुल पराक्रमी जो मी, त्या मला पाहिले नाही तोंवरच काळाच्या सामर्थ्याची प्रतिष्ठा ! अरे, सर्व सुखांची मी केवळ रास आहे. 56
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥16. 15॥

357-16
कुबेरु आथिला होये । परी तो नेणें माझी सोये । संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही ॥ 357 ॥
कुबेर श्रीमंत असे म्हणतात खरे; पण त्याला माझी बरोबरी येणार नाही; श्रीविष्णू ही माझ्याइतका श्रीमंत नाहीं! 57
358-16
माझिया कुळाचा उजाळू । कां जातिगोतांचा मेळू । पाहतां ब्रह्माही हळू । उणाचि दिसे ॥ 358 ॥
माझ्या कुळाचा नांवलौकिक व आप्तेष्टांचा समुदाय पहातां, ब्रह्मदेवालाही ती सर येणार नाही; 58
359-16
म्हणौनि मिरविती नांवें । वायां ईश्वरादि आघवे । नाहीं मजसीं सरी पावे । ऐसें कोण्ही ॥ 359 ॥
म्हणून ईश्वरादिकांची थोरवी लोक गातात ती व्यर्थच होय; माझा बरोबरी करील असें कोणीही नाही. 59
360-16
आतां लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु । प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ॥ 360 ॥
सांप्रत अभिचार (जारणमारण) मंत्राचा लोप झाला आहे त्याचा मी जीर्णोद्धार करीन व लोकांचा उच्छेद करणारे याग त्यांचे अनुष्ठान करीन. 360

361-16
मातें गाती वानिती । नटनाचें रिझविती । तयां देईन मागती । ते ते वस्तु ॥ 361 ॥
माझे स्तुतिस्तोत्र गातील, माझे नटनाचादिकांनी रंजन करितील, त्यांचे इच्छित तें ते त्यांना देईन. 61
362-16
माजिरा अन्नपानीं । प्रमदांच्या आलिंगनीं । मी होईन त्रिभुवनीं । आनंदाकारु ॥ 362 ॥
अन्नपानादिकांनीं मत्त होऊन तरुणींच्या भोगालिंगनादिकांनीं मी जगतांत आनंदरूप होऊन राहीन. 62
363-16
काय बहु सांगों ऐसें । ते आसुरीप्रकृती पिसें । तुरंबिती असोसें । गगनौळें तियें ॥ 363 ॥
आसुरी संपत्तीनें पिसे झालेले ते लोक असे काय काय बरळतात म्हणून सांगावें? अरे, गगनकुसुमांचा वास घेण्यासारख्या गोष्टींचे मनोरे ते रचीत असतात.63
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ 16.16॥

364-16
ज्वराचेनि आटोपें । रोगी भलतैसें जल्पे । चावळती संकल्पें । जाण ते तैसें ॥ 364 ॥
तापाच्या भरात रोगी वाटेल ते जसे बरळतो, त्याप्रमाणे, हे लोक मुखाने वाटेल ते संकल्प बरळत असतात असे समज. 64
365-16
अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी । भोवंडीजती अंतराळीं । मनोरथांच्या ॥ 365 ॥
यांच्या आशेच्या वावटळीने (माट्या) चित्तांतील अज्ञानरूप धुळीचे मनोराज्यरूप स्तंभ आकाशांत गरगर फिरत असतात. 65

366-16
। कां समुद्रोर्मी अभंग । तैसे कामिती अनेग । अखंड काम ॥ 366 ॥
आषाढांत ढगांवर ढग यावे, किंवा समुद्राच्या लाटांना जसा खंड नसतो, त्याप्रमाणे त्यांच्या वैषयिक इच्छांची अखंड रांग चालू असते. 66
367-16
मग पैं कामनाचि तया । जीवीं जाल्या वेलरिया । वोरपिली कांटिया । कमळें जैसीं ॥ 367 ॥
मग मनोरथरूपी वेलींचे जाळे त्यांच्या चित्तांत पसरल्यावर, कांटयावरून जशीं कमळे ओढावीं. 67
368-16
कां पाषाणाचिया माथां । हांडी फुटली पार्था । जीवीं तैसें सर्वथा । कुटके जाले ॥ 368 ॥
किंवा दगडावर पडून मातीच्या हांडीचे शतशः तुकडे व्हावे, त्याप्रमाणे, अर्जुना, त्यांच्या मनोरथांची दशा होते, 68
369-16
तेव्हां चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी । तैसा मोहो अंतःकरणीं । वाढोंचि लागे ॥ 369 ॥
त्यायोगे, रात्रीच्या वाढीबरोबर जसा अंधकारही वाढतो, तसा, त्यांच्या अंतःकरणांत मोह वाढत जातो. 69
370-16
आणि वाढे जंव जंव मोहो । तंव तंव विषयीं रोहो । विषय तेथ ठावो । पातकासी ॥ 370 ॥
आणि जसा जसा मोह वाढेल तशी तशी वैषयिक इच्छा वाढत जाते; आणि विषय म्हटले कीं, पातकाचे मूळ कारणच होय.370

371-16
पापें आपलेनि थांवें । जंव करिती मेळावे । तंव जितांचि आघवे । येती नरकां ॥ 371 ॥
पापांचा जोर होत होत तीं जशी वाढतील तसा त्यांस (आसुरी लोकांस) जीवंतपणींच नरकयातनांचा भोग घडतो. 71
372-16
म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथां पाळिती । ते आसुर येती वस्ती । तया ठाया ॥ 372 ॥
म्हणून, अर्जुना, ज्यांच्या चित्तांत कुवासना नांदतात ते असुर लोक त्या ठिकाणीं जन्माला येतात. 72
373-16
जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर । तातला तेलीं सागर । उतताती ॥ 373 ॥
जेथील वृक्षांचीं तलवारी-प्रमाणे तीक्ष्ण धारेचे पाने असतात, खैराच्या इंगळांचे डोंगर व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत असतात.73
374-16
जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी । पडती तिये दारुणीं । नरकलोकीं ॥ 374 ॥
जेणें यातनांना खंड नसून नित्य नवी यमजाचणी असते अशा घोर नरकलोकींचा वास त्यांस घडतो. 74
375-16
ऐसे नरकाचिये शेले । भागीं जे जे जन्मले । तेही देखों भुलले । यजिती यागीं ॥ 375 ॥
असे शेलक्या नरक भोगाचे अधिकारी जे जे जन्माला येतात तेही, पाहू गेले असतां, यज्ञयागादिकांच्या भरीस भरतात. 75

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *