सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

26-17
तैसी शास्त्रांची मोकळी । यां कैं कोण पां वेंटाळी । एकवाक्यतेच्या फळीं । पैसिजे कैं? ॥ 26 ॥
त्याप्रमाणे अनेक शास्त्रे एकत्र आणून तीं वाचावीं कोणीं? व वाचली तरी त्यांची एकवाक्यता कशी करणार? 26
27-17
जालयाही एकवाक्यता । कां लाभें वेळु अनुष्ठितां । कैंचा पैसारु जीविता । येतुलालिया ॥ 27 ॥
कदाचित् एकवाक्यता होऊ शकली तरी, अनुष्ठानाला वेळ कोणाला आहे? आणि जीवाच्या आयुष्याचा तरी तस काय नेम सांगावा? 27
28-17
आणि शास्त्रें अर्थें देशें काळें । या चहूंही जें एकफळे । तो उपावो कें मिळे । आघवयांसी? ॥ 28 ॥
आणि समजा, शास्त्र, द्रव्य, देश, काल, ह्या सर्वांचा जरी क्वचित् एकत्र योग आला, तरी सर्वांना तो उपाय कसा साध्य व्हावा? 28
29-17
म्हणौनि शास्त्राचें घडतें । नोहें प्रकारें बहुतें । तरी मुर्खा मुमुक्षां येथें । काय गति पां? ॥ 29 ॥
अशा अनेक प्रकाराने शास्त्रवचन पाळून कर्म करणे अशक्य ठरतें, मग अज्ञ जे मुमुक्षुजन ह्यांना काय तरणोपाय आहे? 29
30-17
हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो । तो सतराविया ठावो । अध्याया येथ ॥ 30 ॥
अर्जुनानें मनांतील हा अभिप्राय विचारण्यासाठी प्रस्तावना केली तोंच ह्या सतराव्या अध्यायाचा मूळ विषय होय. 30

31-17
तरी सर्वविषयीं वितृष्णु । जो सकळकळीं प्रवीणु । कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वें जो ॥ 31 ॥
तरी सर्व विषयांविषयीं निरिच्छ असून सकलकलानिपुण असणारा व देवांना आनंद देणारा असा अर्जुनरूपाने अवतरलेला जो दुसरा कृष्णच असा. 31
32-17
शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा शृंगारु । सुखादि उपकारु । जयाची लीला ॥ 32 ॥
जो शौर्याचा आधार जो सोमवंशाचे भूषण, ज्याची लीला म्हणजे सुखालाही उपचाररूप होय. (सुख रूप) 32
33-17
जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु । सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ॥ 33 ॥
जो बुद्धिमंतांमध्ये बुद्धिमंत असा प्रज्ञेचा लाडका, ब्रह्मविद्येचे विश्रांतिस्थान, व देवांच्या चित्तांत नित्य असणारा सहचर असा जो अर्जुन, 33
अर्जुन उवाच
। ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ 17.1॥

34-17
तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रियां फांवलिया ब्रह्मा । तुझां बोलु आम्हा । साकांक्षु पैं जी ॥ 34 ॥
तो अर्जुन म्हणतो, हे तमालश्यामप्रभो, हे इंद्रियविषय ब्रह्ममूर्ते, आपण सांगितले खरे, पण त्यावर एक शंका येते ती अशी. 34
35-17
जें शास्त्रेंवांचूनि आणिकें । प्राणिया स्वमोक्षु न देखे । ऐसें कां कैंपखें । बोलिलासी ॥ 35 ॥
प्राणिमात्राला शास्त्रज्ञानावांचून मोक्षाचा अनुभव अन्य कशानेही येणारच नाहीं असें आपण कैपक्षानें म्हणजे ” अन्यकशानेही नव्हे” असे सांगितलें तें कां? 35

36-17
तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु । जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी ॥ 36 ॥
समजा; शास्त्राध्ययनाला अनुकूल असा देश लाभला नाही, आयुष्यही भरपूर नाही, असेल अध्यापक. 36
37-17
आणि अभ्यासीं विरजिया । होती जिया सामुग्रिया । त्याही नाहीं आपैतिया । तिये वेळीं ॥ 37 ॥
व अभ्यासाला आवश्यक सामुग्रीही प्राप्त अशी होण्यासारखी नसेल अशा वेळी. 37
38-17
उजू नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन । ऐसें ठेलें आपादन । शास्त्राचें जया ॥ 38 ॥
किंवा अदृष्ट अनुकूल नाहीं, बुद्धीचीही तेवढी धारणा नाही अशी शास्त्राविषयीं ज्याची स्थितिअसेल, 38
39-17
किंबहुना शास्त्रविखीं । एकही न लाहातीचि नखी । म्हणौनि उखिविखी । सांडिली जिहीं ॥ 39 ॥
किंबहुना, शास्त्राचे अमुक एक निश्चित प्रमेय आहे ह्याचा निर्णय न झाल्यामुळे ज्यांनी त्याचा विचारच सोडून दिला आहे. 39
40-17
परी निर्धारूनि शास्त्रें । अर्थानुष्ठानें पवित्रें । नांदताति परत्रें । साचारें जे ॥ 40 ॥
पण, ज्यांनी त्यांचा अभ्यास करून, यथाविधि पवित्र अनुष्ठानाने परलोक गांठून तेथे जे खरोखर नांदत आहेत. 40

41-17
तयां{ऐ}सें आम्हीं होआवें । ऐसी चाड बांधोनि जीवें । घेती तयांचें मागावे । आचरावया ॥ 41 ॥
त्याप्रमाणे आपणही व्हावें अशी इच्छा मनांत बाळगून जे जीवेभावे त्यांच्या मार्गाचे अवलंबन करतात. 41
42-17
धड्याचिया आखरां । तळीं बाळ लिहे दातारा । कां पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ॥ 42 ॥
म्हणजे प्रभो, धडयांतील अक्षरें पाहून बाल जसा तशीं अक्षरें खाली काढितो, किंवा डोळस मनुष्य पुढे घेऊन त्याच्या आधाराने जसा स्वतः असमर्थ अंधही चालतो 42
43-17
तैसें सर्वशास्त्रनिपुण । तयाचें जें आचरण । तेंचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ॥ 43 ॥
त्याप्रमाणे, सर्वशास्त्रनिपुण अशा लोकांचे जे आचरण हे प्रमाण मानून, त्यावर जे श्रद्धा ठेवितात. 43
44-17
मग शिवादिकें पूजनें । भूम्यादिकें महादानें । आग्निहोत्रादि यजनें । करिती जे श्रद्धा ॥ 44 ॥
आणि शिवादि देवतांचे पूजन, भूमीसारखें महादान देणे, अग्निहोत्रादि यज्ञयाग करणे इयदि कर्म जे श्रद्धेनें आचरतात. 44
45-17
तयां सत्त्वरजतमां-/ । माजीं कोण पुरुषोत्तमा । गति होय ते आम्हां । सांगिजो जी ॥ 45 ॥
त्यांना, हे प्रभो, सत्व, रज, तमापैकी कोणत्या कर्माची गति प्राप्त होते ते कृपा करून सांगावें होय. 45

46-17
तंव वैकुंठपीठींचें लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ॥ 46 ॥
तेव्हां, जो वैकुंठाधिपति असून वेदरूपी कमलाचा जणु परागच, व अंगाचा आधार जसा छायेला असतो तसें ज्याच्या सत्तेवर हे सर्वं जग जगतें; 46
47-17
काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढु । आद्वितीय गूढु । आनंदघनु ॥ 47 ॥
व जो प्रत्यक्ष कालरूपच असून सहजच मोठा प्रौढ, लोकोत्तर, अद्वितीय, गूढ आणि आनंदघन आहे. 47
48-17
इयें श्लाघिजती जेणें बिकें । तें जयाचें आंगीं असिकें । तो श्रीकृष्ण स्वमुखें । बोलत असे ॥ 48 ॥
आणि हे सर्व गुण जिच्या आधारावर वर्णिता येतात अशी जी शक्ति, तीही ज्यांच्या सत्तेवर नांदते, असा जो श्रीकृष्णश्रीकृष्ण भगवान तो स्वमुखातें सांगतां झाला. 48
श्री भगवानुवाच
। त्रिविध भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥17. 2॥

49-17
म्हणे पार्था तुझा अतिसो । हेंही आम्ही जाणतसों । जे शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि कीं ॥ 49 ॥
श्रीभगवान म्हणतात पार्था, शास्त्राभ्यासाला अनेक अडचणी असणे शक्य आहे असा तुझ्या शंकेचा भाव आम्ही जाणतों. 49
50-7
नुसधियाची श्रद्धा । झोंबों पाहसी परमपदा । तरी तैसें हें प्रबुद्धा । सोहोपें नोहे ॥ 50 ॥
केवल श्रद्धेच्या जोरावर मोक्षप्राप्ति व्हावी असें तुला वाटते, पण ही गोष्ट कांहीं इतकी सोपी नाही. 50

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *