सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

301-17
विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे । तैसे तामसां पर्व जोडे । पुण्यदेशीं ॥ 301 ॥
भुंग्यानें कोरलेल्या लांकडावर कदाचित् अक्षरा कृति उठावी अथवा टाळी मारीत असतां त्यांत कावळा सहज सांपडावा, त्याप्रमाणे ह्या तामसदान करणारालां पुण्यक्षेत्रांत पर्वणीचा काळ लाभतो. 1
302-17
तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोंही आला । तोही दर्पा चढला । भांबावें जरी ॥ 302 ॥
तेथे ह्याचे ऐश्वर्य पाहून सहज सत्पात्र ब्राह्मण दान मांगूआला, तेव्हां हा गर्वाने फुगून त्यास कांहीं द्यावें असेंही त्यास वाटले. 2
303-17
तरी श्रद्धा न धरी जिवीं । तया माथाही न खालवी । स्वयें न करी ना करवी । अर्घ्यादिक ॥ 303 ॥
तरी त्याजबद्दल मनांत श्रद्धा न धरितां किंवा त्याला नमस्कार न करितां स्वतः किंवा अन्याकडूनही त्याच्या हातावर दानाचें उदक सोडीत नाही. 3
304-17
आलिया न घली बैसों । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो । हा अप्रसंगु कीर असो । तामसीं नरीं ॥ 304 ॥
त्याला आसनही देत नाही, मग गंधअक्षतादिकांची गोष्ट कशाला? असा तो त्याचा अपमान करितो 4
305-17
पैं बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु । तूं करणें याचा बहुतु । प्रयोगु तेथ ॥ 305 ॥
व एखाद्या ऋणकऱ्याची जशी बोळवण करावी त्याप्रमाणे, त्याच्या हातावर थोडेसें द्रव्य देतो व तेव्हांही त्याची ‘अरे तुरे” अशा भाषेनेच संभावना करितो. 5

306-17
आणि जया जें दे किरीटी । तयातें उमाणी तयासाठीं । मग कुबोलें कां लोटी । अवज्ञेच्या ॥ 306 ॥
आणि ज्याला जे थोडे बहुत देतो, तेवढयाच्या जोरावर त्याचा अपमान करून त्याला अपशब्द बोलण्यासही कमी करीत नाही. 6
307-17
हें बहु असो यापरी । मोल वेंचणें जें अवधारीं । तया नांव चराचरीं । तामस दान ॥ 307 ॥
हें पुरें; असें जें दान त्याला लोकांत तामस दान असे म्हणतात. 7
308-17
ऐशीं आपुलाला चिन्हीं । अळंकृतें तिन्हीं । दानें दाविलीं अभिधानीं । रजतमाचिया ॥ 308 ॥
ह्याप्रमाणे त्या त्या दानांचीं तिन्ही लक्षणे तुला सांगितलीं 8
309-17
तेथ मी जाणत असें । विपायें तूं गा ऐसें । कल्पिसील मानसें । विचक्षणा ॥ 309 ॥
अर्जुना, मी समजतों कीं तुझ्या मनांत ह्यावर अशी शंका येणें संभवनीय आहे कीं, 9
310-17
जें भवबंधमोचक । येकलें कर्म सात्त्विक । तरी कां वेखासी सदोख । येर बोलावीं? ॥ 310 ॥
संसारबंधापासून मुक्त करणारें जें एक सात्विक कर्म त्याचेच वर्णन मी करावयाचे होतें, अन्य सदोष कर्माचें कां केलें? 310

311-17
परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं निधीसी । का धूं न साहतां जैसी । वाती न लगे ॥ 311 ॥
परंतु भूतसमंधादिकांची अडचण दूर केल्याशिवाय जसे जुने ठेवने प्राप्त होत नाही, किंवा, धूर सोसल्याशिवाय जसा अग्नि पेटत नाही. 11
312-17
तैसें शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचें कवाड । तें भेदणे यातें कीड । म्हणावें कां? ॥ 312 ॥
त्याप्रमाणे शुद्ध सात्विक गुणाच्या आड रज व तम ह्यांचा प्रतिबंध आहे; अरे, त्यांचा नाश करणे चुकीचे ठरेल काय? 12
313-17
आम्ही श्रद्धादि दानांत । जें समस्तही क्रियाजात । सांगितलें कां व्याप्त । तिहीं गुणीं ॥ 313 ॥
श्रद्धे पासून दानापर्यंत जेवढया क्रिया सांगितल्या त्या सर्व ह्या तीन गुणांनी युक्त असतात.13
314-17
तेथ भरंवसेनि तिन्ही । न सांगोंचि ऐसें मानीं । परी सत्त्व दावावया दोन्ही । बोलिलों येरें ॥ 314 ॥
खरोखर त्या तीहीचे वर्णन आम्हीं केलेंच नसतें हें ध्यानांत ठेव; पण, सत्वगुणाची स्पष्ट कल्पना येण्यासाठी दुसऱ्या दोन गुणांची लक्षणे सांगणं प्राप्तच झाले. 14
315-17
जें दोहींमाजीं तिजें असे । तें दोन्ही सांडितांचि दिसे । अहोरात्रत्यागें जैसें । संध्यारूप ॥ 315 ॥
ज्याप्रमाणे दिवस नाहीं व रात्र नाही अशा दोहींच्या त्यागाने संध्याकाळचे स्पष्टरूप ध्यानांत येते; त्याप्रमाणे रज व तम ह्या दोहोंहून निराळा असा जो तिसरा गुण तो सत्व होय, हे स्पष्टपणे ध्यानांत येते. 15

316-17
तैसें रजतमविनाशें । तिजें जें उत्तम दिसे । तें सत्त्व हें आपैसें । फावासि ये ॥ 316 ॥
तसेच रज तम ह्यांच्या नाशानें (त्यागाने) तिसरा जो सत्वगुण तो आपोआप उत्तमपणे लक्ष्यांत येतो. 16
317-17
एवं दाखवावया सत्त्व तुज । निरूपिलें तम रज । तें सांडूनि सत्त्वें काज । साधीं आपुलें ॥ 317 ॥
ह्याप्रमाणे तुला सत्वाची स्पष्ट कल्पना यावी म्हणून रज व तम ह्यांचे निरूपण केलें; त्यांचा त्याग करून सत्वाने आपले कार्य साधून घे. 17
318-17
सत्त्वेंचि येणें चोखाळें । करीं यज्ञादिकें सकळें । पावसी तैं करतळें । आपुलें निज ॥ 318 ॥
या सत्वाच्याच सहाय्याने यज्ञादि सर्व क्रियाजात आचर. म्हणजे तुला आपल्या स्वरूपाची करतळावरील वस्तूप्रमाणे प्राप्ति होईल. 18
319-17
सूर्यें दाविलें सांतें । काय एक न दिसे तेथें । तेवीं सत्त्वें केलें फळातें । काय नेदी? ॥ 319 ॥
सूर्यच स्वतः सहाय झाल्यावर कोणती वस्तु दिसणार नाहीं? तसें सात्विक आचाराला कोणतें फल येणार नाहीं? 19
320-17
हे कीर आवडतांविखीं । शक्ति सत्त्वीं आथी निकी । परी मोक्षेंसी एकीं । मिसळणें जें ॥ 320 ॥
सत्वाच्या आंगीं असे वाटेल तितके सामर्थ्य असले तरी, मोक्षप्राप्ति म्हणून जो एक स्थिति आहे. 320

321-17
तें एक आनचि आहे । तयाचा सावावो जैं लाहे । तैं मोक्षाचाही होये । गांवीं सरतें ॥ 321 ॥
तिचे एक निराळेच तंत्र आहे; त्यांचे सहाय्य जेव्हां ह्या सत्वाला मिळेल तेव्हां त्या सत्वगुणाला मोक्षापर्यंत मजल मारितां येईल. 21
322-17
पैं भांगार जऱ्हीं पंधरें । तऱ्ही राजावळींचीं अक्षरें । लाहें तैंचि सरे । जियापरी ॥ 322 ॥
पंधरा दराचे उत्तम सुवर्ण असले तरी त्यावर जेव्हां राजसत्तेचा शिक्का पडेल तेव्हांच हे जसे चालते. 22
223-17
स्वच्छें शीतळें सुगंधें । जळें होती सुखप्रदें । परी पवित्रत्व संबंधें । तीर्थाचेनि ॥ 323 ॥
स्वच्छ, शीतळ व सुगंध असें आल्हादकारी उदक असले तरी, त्यास तीर्थासंबंधावांचून पवित्रता येत नाही. (आंत तीर्थ घालावें लागतं.) 23
324-17
नयी हो कां भलतैसी थोरी । परी गंगा जैं अंगीकारी । तैंचि तिये सागरीं । प्रवेशु गा ॥ 324 ॥
सामान्य ओढयाला स्वतः थोरवी नसो; पण गंगेला तो मिळाला म्हणजे त्याला समुद्र प्रवेशाची योग्यता येते. 24
325-17
तैसें सात्त्विका कर्मां किरीटी । येतां मोक्षाचिये भेटी । न पडे आडकाठी । तें वेगळें आहे ॥ 325 ॥
त्याप्रमाणे, अर्जुना, सात्विक कर्माचरणानें मोक्ष प्राप्तीकडे जात असता, ज्याचा प्रतिबंध होऊ नये तें एक वेगळेच आहे. 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *