376-16
एऱ्हवीं यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया । परी विफळती आचरोनियां । नाटकी जैसी ॥ 376 ॥
अर्जुना, एऱ्हवी पाहू गेले असतां, त्या यागादिक क्रिया खऱ्या, पण दंभानं नांटक्यासारख्या आचरल्या गेल्यामुळे त्या व्यर्थ होतात. 76
377-16
वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसियां । अहेवपणें ॥ 377 ॥
आपल्या यजमानाच्या आश्रयावर, वेश्या ज्याप्रमाणे स्वतःस सौभाग्यवती समजून समाधान मानीत असतात, तसेच हें होय. 77
आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥16. 17॥
378-16
तैसें आपणयां आपण । मानितां महंतपण । फुगती असाधारण । गर्वें तेणें ॥ 378 ॥
आपली प्रतिष्ठा आपणच मानितां मानितां जे असामान्य गर्वाने फुगून जातात. 78
379-16
मग लवों नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे । कां उधवले आकाशें । शिळाराशी ॥ 379 ॥
मग ओतीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ते कोणापुढेही नम्र न होतां सदा ताठ असतात किंवा आकाशांत उंच गेलेले पर्वत जसे सदा ताठ असतात तसेच हे होत. 79
380-16
तैसें आपुलिये बरवे । आपणचि रिझतां जीवें । तृणाहीहूनि आघवें । मानिती नीच ॥ 380 ॥
त्याचप्रमाणे, आपल्या मोठेपणाचे आपणच मनांत कौतुक करून रमतां रमतां त्यास आजूबाजूचे जग तृणापेक्षांही हलके वाहू लागले. 380
381-16
वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा । कृत्याकृत्यविचारा । सवतें केलें ॥ 381 ॥
मग अर्जुना, संपत्तिमदानें माजून जाऊन कर्तव्य अकर्तव्य वगैरे विवेकास पार फांटा देतात. 81
382-16
जया आंगीं आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी । तरी काय काय पिसीं । न करिती गा? ॥ 382 ॥
अरे, ज्याची वृत्ति अशी बनलेली आहे त्याला यज्ञाची काय प्रतिष्ठा वाटणार आहे? पण, पिसाट लोक काय करतील किंवा न करितील कोणी सांगावें? 82
383-16
म्हणौनि कोणे एके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळें । यागाचींही टवाळें । आदरिती ॥ 383 ॥
म्हणून, लहरीखातर एखादे वेळीं मूर्खपणाच्या मदिरेच्या भरांत यज्ञादिक सोंगेंही आरंभितात. 83
384-16
ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी । आणि तयांसी तंव विधी । द्वंद्वचि सदा ॥ 384 ॥
त्यांत त्यांना कुंड, मंडप, वेदी आणि तदनुषंगाने लागणारी अन्यसामग्री कांहीं लागत नाही, आणि विधिविषयी बोलावें तर त्यांचे त्याच्याशीं सदैवच वैर असतें. 84
385-16
देवां ब्राह्मणांचेनि नांवें । आडवारेनहि नोहावें । ऐसें आथी तेथ यावें । लागे कवणा? ॥ 385 ॥
देव, ब्राह्मण इत्यादिकांच्या नुसत्या नांवाचाही वारा त्यांना सोसत नाही, मग त्यांच्या येण्याची गोष्टच कशाला? 85
386-16
पैं वासरुवाचा भोकसा । गाईपुढें ठेवूनि जैसा । उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ॥ 386 ॥
परंतु धूर्तलोक गाईपुढे मेलेल्या वासराची पेंढा वगैरे भरून रक्षण केलेली आकृति ठेवून जसे तिचे दूध काढून घेतात. 86
387-16
तैसें यागाचेनि नांवें । जग वाऊनि हांवें । नागविती आघवें । अहेरावारी ॥ 387 ॥
त्याप्रमाणे यज्ञाचा आव घालून तन्निमित्त इतरांना आमंत्रणे देऊन, त्यांच्याकडून सांपडेल तो आहेर घेऊन त्यांना फसवितात.87
388-16
ऐशा कांहीं आपुलिया । होमिती जे उजरिया । तेणें कामिती प्राणिया । सर्वनाशु ॥ 388 ॥
त्याप्रमाणे यज्ञाचा दंभ माजवून ते प्राण्यांच्या सर्वनाशाची इच्छा करितात. 88
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधम् च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ 16.18॥
389-16
मग पुढां भेरी निशाण । लाउनी ते दीक्षितपण । जगीं फोकारिती आण । वावो वावो ॥ 389 ॥
मग स्वत:पुढे डंका, ध्वज वगैरे लाऊन आपल्या यज्ञदीक्षिततेची लोकांत व्यर्थ प्रसिद्धि करितात. 89
390-16
तेव्हां महत्त्वें तेणें अधमा । गर्वा चढे महिमा । जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे ॥ 390 ॥
अशा वृथा महत्त्वाने, त्या नीच जनांस अधिकच गर्व चढतो, व जणू कांहीं अंधकाराला काजळाचीं पुटं द्यावीं त्या प्रमाणे 390
391-16
तैसें मौढ्य घणावे । औद्धत्य उंचावे । अहंकारु दुणावे । अविवेकुही ॥ 391 ॥
त्यांचा मूर्खपणा अधिकच घट्ट होतो, उद्धटपणा वाढतो, आणि अहंकार व अविवेकही दुणावतो. 91
392-16
मग दुजयाची भाष । नुरवावया निःशेष । बळीयेपणा अधिक । होय बळ ॥ 392 ॥
मग आपल्यापेक्षा दुसरा कोणी अधिक बलवान् आहे अशी कोणी भाषाही काढू नये असे त्याला बळ चढते.92
393-16
ऐसा अहंकार बळा । जालिया एकवळा । दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते ॥ 393 ॥
ह्याप्रमाणे सामर्थ्य व अहंकार ह्यांचे ऐक्य झाल्यावर दर्परूपी समुद्राच्या लाह्या मर्यादा सोडून उचंबळू लागतात. 93
394-16
मग वोसंडिलेनि दर्पें । कामाही पित्त कुरुपे । तया धगीं सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो ॥ 394 ॥
वर्षाची अशी वाढ झाली म्हणजे कामाचेही पित्त खवळते व त्या धगीने क्रोधाग्नीही भडकतो. 94
395-16
तेथ उन्हाळा आगी खरमरा । तेलातुपाचिया कोठारा । लागला आणि वारा । सुटला जैसा ॥ 395 ॥
मग उन्हाळघांत प्रखर अग्नि तेलातुपाच्या कोठारास लागून त्यांतच आणखी जसा वारा सुटावा. 95
396-16
तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधीं गूढला । या दोहींचा मेळु जाला । जयांच्या ठायीं ॥ 396 ॥
त्याप्रमाणे, बलवान असा अहंकार व कामक्रोध ह्यांनी गुफुटून गेलेला उन्मतपणा ह्या दोघांचे ऐक्य ज्यांच्या ठायीं होतें. 96
397-16
ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा । या प्राणियांते वीरेशा । न साधती गा? ॥ 397 ॥
ते आपल्या इच्छेखातर किंवा इच्छेप्रमाणे कोणत्या प्राण्यांची हिंसा करणार नाहीत? 97
398-16
पहिलें तंव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा । वेंचु करिती अभिचारा- । लागोनियां ॥ 398 ॥
अर्जुना, अभिचारमंत्रसिद्धीकरितां हे प्रथम आपल्या अंगांतील रक्तमांस खर्च करितात. 98
399-16
तेथ जाळिती जियें देहें । यामाजीं जो मी आहें । तया आत्मया मज घाये । वाजती ते ॥ 399 ॥
असा ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात, त्यामध्यें आत्मरूपानें वास करणारा जो मी यालाच हे चटके बसतात. 99
400-16
आणि अभिचारकीं तिहीं । उपद्रविजे जेतुलें कांहीं । तेथ चैतन्य मी पाहीं । सीणु पावे ॥ 400 ॥
आणि त्या अभिचारक मंत्रांनी ज्यांना ज्यांना उपद्रव द्यावयाचा असतो त्यांच्या ठिकाणीं जीवचैतन्यरूपानें वास करणारा जो मी, त्या मलाच ते चटके बसतील; 400
Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण