सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

276-17
का जयाचें ठेविलें तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपें विडा राया । दिधला जैसा ॥ 276 ॥
किंवा, जशी कांही त्याची अ।पल्यापाशी असलेली ठेवच आपण परत करून त्याचे उतराई व्हावे अथवा राजसेवकाने जसा कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी भावना असवी. 76
277-17
तैसेनि निष्कामें जीवें । भूम्यादिक अर्पावें । किंबहुना हांवे । नेदावें उठों ॥ 277 ॥
अशा निष्कामबुद्दीनें भूमि आदिक दान ब्राह्मणास अर्पण करावें,पण त्याबद्दल मनांत मुळींच फलेच्छा नसवी 77
278-17
आणि दान जया द्यावें । तयातें ऐसेया पाहावें । जया घेतलें नुमचवे । कायसेंनही ॥ 278 ॥
आणि ज्याला दान द्यावयाचे तो असा असावा की त्याला आपल्या दानाची उलटफेड करण्याची कधीं संधि येणार नाही. 78
279-17
साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा । का पाहिला आरसा । येरीकडे ॥ 279 ॥
आकाशाकडे मुख करून हांक मारिली असतां जसें प्रत्युत्तर मिळत नाही, किंवा आरशाच्या मागील बाजूने पाहतां प्रतिबिंब दिसत नाही, 79
280-17
नातरी उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुकें । उधळौनि कवतिकें । न येईजे हाता ॥ 280 ॥
किंवा कौतुकाने पाण्यावर चेंडू आपटला असतां जसा तो प्रत्याघाताने परत आपल्या हात येत नाही. 280

281-17
नाना वसो घातला चारू । माथां तुरंबिला बुरू । न करी प्रत्युपकारू । जियापरी ॥ 281 ॥
किंवा चारलेला पोळ अथवा उपकार केलेला कृतघ्न मनुष्य हे जसे केव्हांही प्रत्युपकार करीत नाहींत. 81
282-17
तैसें दिधलें दातयाचें । जो कोणेही आंगें नुमचे । अर्पिलया साम्य तयाचें । कीजे पैं गा ॥ 282 ॥
त्याप्रमाणे दिलेलें दान कोणत्याही रीतीने परत होण्याचा संभव नाही, असे जे दान तेच श्रेयशसकर दान होय. 82
283-17
ऐसिया जें सामग्रिया । दान निफजे वीरराया । तें सात्त्विक दानवर्या । सर्वांही जाण ॥ 283 ॥
अशा तजवीजीने केलेलें जे दान ते, अर्जना, सात्विक सर्वश्रेष्ठ दान होय. 83
284-17
आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु । दानभागुही निर्मळु । न्यायगतु ॥ 284 ॥
आणि तो देश काल पात्र जसे योग्य असतात तसे दिले जाणारें द्रव्यही न्यायनिष्ठ व धामिक आचाराने मिळविलेले असावें. 84
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥17. 21॥

285-17
परी मनीं धरूनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें । का पेंव करूनि आइतें । पेरूं जाइजे ॥ 285 ॥
मनांत दुधाची आशा धरून गाईला चारतात किंवा आधीं पेवाची तयारी करून मग जसे शेत पेरतात. 85

286-17
नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतुं जाइजे सोयिरा । का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ॥ 286 ॥
किंवा आहेर मिळेल ही पोटांत आशा धरून मग जसें लग्नकार्यात सोयऱ्याला आमंत्रण देतात, किंवा जेथून वाण परत येईल अशाकडेच ते पाठवावयाचे.86
287-17
पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचें काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ॥ 287 ॥
किंवा लांच अगर मोबदला घेऊन दुसऱ्याचे काम करावें अथवा द्रव्य घेऊन आर्त औषध जनांस द्यावें. 87
288-17
तैसें जया जें दान देणें । तो तेणेंचि गा जीवनें । पुढती भुंजावा भावें येणें । दीजे जें का ॥ 288 ॥
तसें दान ज्याला द्यावयाचे, त्या दानाच्या आधारावरच स्वतः पुन्हा त्या मनुष्याचा फायदा घेतां येईल अशी बुद्धि आंत ठेवावयाची. 88
289-17
अथवा कोणी वाटे जातां । घेतलें उमचों न शकता । मिळे जैं पंडुसुता । द्विजोत्तमु ॥ 289 ॥
अथवा, सहज वाटेने जातांना एखादा पवित्र पण प्रत्युपकार न करणारा ब्राह्मण भेटला, 89
290-17
तरी कवड्या एकासाठीं । अशेषां गोत्रांचींच किरीटी । सर्व प्रायश्चित्तें सुयें मुठीं । तयाचिये ॥ 290 ॥

तर अधेल्या पैशाचे दानाकरितां त्याच्या हाता वर सर्व आप्तेष्टांच्या प्रायश्चित्तार्थ जें उदक सोडतात,290

291-17
तेवींचि पारलौकिकें । फळें वांछिजती अनेकें । आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे ॥ 291 ॥
त्याचप्रमाणे, अनेक पारलौकिक फळांची इच्छा बाळगून जे दान देतात व तेंही इतकें कीं त्याने एक वेळची भूकही भागू नये 91
292-17
तेंही ब्राह्मणु नेवो सरे । कीं हाणिचेनि शिणें झांसुरें । सर्वस्व जैसें चोरें । नागऊनि नेलें ॥ 292 ॥
आणि तें दान ब्राह्मण नेवू लगला की, चोरांनी नागविल्याप्रमाणे जणू आपली हानि झाली, असे मानून त्याबद्दल मनांत झुरतात. 92
293-17
बहु काय सांगों सुमती । जें दीजे या मनोवृत्ती । तें दान गा त्रिजगतीं । राजस पैं ॥ 293 ॥
अर्जुना, फार काय वर्णावे ! अशा मनोवृत्तीने जे दिले जातें तें दान सर्व जगांत राजसदान म्हणून प्रसिद्ध आहे 93
अदेशकाले यद्दनमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥17. 22॥

294-17
मग म्लेंच्छांचे वसौटें । दांगाणे हन कैकटे । का शिबिरें चोहटे । नगरींचे ते ॥ 294 ॥
मग म्लेच्छांच्या वस्तीची जागा, अथवा अरण्य किंवा अपवित्र स्थळ किंवा शिबिर, नगरांतले चव्हाटे,94
295-17
तेही ठाईं मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी । तेव्हां उदार होणें धनीं । चोरियेच्या ॥ 295 ॥
अशा ठिकाणीं बसून सायंकाळीं अथवा रात्रीं चोरीने मिळविलेले द्रव्य उदारपणानें दान करितात. 95

296-17
पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी । जिये मूर्तिमंते भुररीं । भुले तया ॥ 296 ॥
हें द्रव्य ज्यांना दिले जाते ते लोक म्हणजे भाट, तमासगीर,वेश्या, जुगारी, भुताटक्या, अथवा भूल घालणारे असे असतात. 96
297-17
रूपानृत्याची पुरवणी । ते पुढां डोळेभारणी । गीत भाटीव तो श्रवणीं । कर्णजपु ॥ 297 ॥
त्यांतील रूपवानांनी त्यांच्यापुढे नृत्यगानादि प्रकार करून त्यांस नेत्रकटाक्षाने वगैरे भुरळ पाडून त्याच्या कानांत जाईल असा स्तुतीचा जप केला; 97
298-17
तयाहीवरी अळुमाळु । जैं घे फुलागंधाचा गुगुळु । तंव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा ॥ 298 ॥
म्हणजे तल्लीन होऊन, अत्तर गुलाब वगैरे सुगंधी द्रव्यांचा चनीनें भोग घेऊन मूर्तीमंत वेताळच बनतात ! 98
299-17
तेथ विभांडूनियां जग । आणिले पदार्थ अनेग । तेणें घालूं लागे मातंग । गवादी जैसी ॥ 299 ॥
मग लोकांना लुटून आणलेल्या अनेक पदार्थानि तेथे मांग गारोडीसारख्यांना अन्नछत्र घालतात. 299
300-17
एवं ऐसेनि जें देणें । तें तामस दान मी म्हणें । आणि घडे दैवगुणें । आणिकही ऐक ॥ 300 ॥
एकूण असा जो द्रव्याचा व्यय होतो त्याला मी तामसदान म्हणतों; आणि त्यांतही एखादेवेळीं कसा प्रकार घडतो, तें ऐक. 300

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *