पतिव्रतेची पूजा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पतिव्रतेची पूजा

अंगणातील आमचं तुळशीवृंदावन जरा भारीच उंच हं ! तर बाळपणी आमचा हात कुठला आलाय तिथं पोचायला. म्हणून सकाळी रोज ह्या तुळशीला पाणी घालायचं म्हणजे भारी कोडं वाटायचं. पण आमची आजी मोठी वस्ताद. दरवेळी या श्रावणात नवीन पायरी बांधू व मग तुमचा हात पोहोचेल असं म्हणायची. त्यामुळं त्या एका आशेवर बिनबोभाट तुळशीला पाणी घालणं भाग पडायचं. एक तर वडीलधार्‍या बायका अशा करण्यामुळं चांगला नवरा मिळेल म्हणायच्या व दुसरं म्हणजे एवढं काम केलं की कुणी रागवायचं नाही. दिवसभर हा मोठ्ठा फ़ायदा असायचा.
पण तुळशी सखे, त्या वेळी सारं अंगण झाडावं, सडासारवण करावं, रांगोळी घालावी, झाडाची फ़ुलं तोडून आणावीत, घरातल्या देवापुढं सारवून रांगोळी घालावी, देव घासून पुसून ठेवावेत ही कामं तुला अपणी घालायच्या आधी करायची म्हणजे थोडी का खटपट बाई ? थंडीच्या दिवसात तर गडे जीव नको नको व्हायचा बघ. भारी थंडी वाजायची. तुला घरात न्यावी म्हणून लाख वेळा मनात यायचं पण जमावं कसं ? उड्या मारून मारून तुला पाणी घालताना बेजमी व्हायची तर उचलून कशी नेणार मी तुला घरात ? तरी आमच्या बायकांनी तुला कितीदा एकटी बाहेर राहू नकोस, घरात ये म्हणून सांगितलंय ! नाही का ? पण तू ऐकणार होय ? मनाला येईल तेव्हा गोविंदानं येऊन तुझी गाठभेट घ्यायची. तर मग हे घरात कसं जमावं कुणादेखत ? तुझंही खरं आहे म्हणा. पण बाई आमची कोण ग ससेहोलपट ! छे बाई ! तुझी मंजिरी हालवून गोविंदानं मस्करी केली की सुखावतेस. आणि इकडे आमचा बरीक जीव वाराहुरा होतो तुझी जोपा करताना.


आमच्या घरच्या लोकांचं तर ठाम म्हणणं की, कृष्णदेवाला तू शोभावीस म्हणून तुझा अवतार झपाळा झालाच पाहिजे. तू म्हणे भरदार दिसली पाहिजेस. म्हणून आम्ही तुला पाणी घालून नमस्कार तर घालायचाच, पण त्या वेळी म्हणायचं की, “ गेलेवते तुळशीपाशी, तितं हुता ऋषीकेशी, आनीक माजा नमस्कार पोचू दे देवा पांडूरंगाशी. ” म्हणजे हे आणि वर ! कारण तू तिथं पांडुरंग, हे ठरलेलं ना !!
अग, तुळशीमाई, त्या संत बहिणाबाईनं देखील तुझी थोरवी सांगितलीय. तिचा अधिकार केवढा मोठा. स्वत: कविता लिहिणारी. संतमंडळीत तिच्या नावाचा गाजावाजा. पण ती देखील म्हणते की —
जेथं आहे तुलसीचे पान
तेथं वसे नारायण
तर मग इतर भोळ्याभाबड्या बायका तसं म्हणतीलच म्हणतील. नाही का ग ?
परवा एकदा थोरपणात मी तुझी पूजा करायला गेले हं ! प्रदक्षिणा घातली. हळदकुंकू, अक्षत तुला वाहिली. फ़ुलं वाहिली. तर आमच्या मामीनं पूजा करताना म्हटलं कसं, “ कुंकूवान, कुंकूपान; कुंकवाचं नेसणं, अर्धांगी बसणं; सून सभावती, लेक कमलावती; माझा नमस्कार ईश्वर पार्वती. ” अगबाई ! म्हणजे तुझ्या पूजेला हे पण सोपस्कार लागतात म्हणायचे.
म्हणून मग एक दिवस मी तुला संतांची सावली, पतिव्रता सौभाग्यवती, कृष्णदेवाची सखी असं काय काय म्हणत तुझ्या मंजिर्‍याचा हार गुंफ़ीत होते हं ! तर काय गंमत झाली की, तुझ्या वृंदावनाखाली पोथी वाचून रामराया निघून गेला. आमचे हाती सोन्याचा करंडा आला. आणिक तुझ्या झर्‍याचं पाणी प्यायला म्हणून कृष्णदेव आला तर कोण बाई धावपळ उडाली म्हणतेस !
त्या वेळी कुणी कुणी न् काय काय अशी त्या कृष्णदेवाची सेवाचाकरी केली. आणि मी मात्र ती तुळशीमंजिरींची माळा कृष्णदेवाला अर्पण करताना तुझ्या पायाशी बसून बोलले हं —
“ तुळशी ग बाळं, तुजं अमृताचं आळं. रामानं आणली. लक्ष्मणानं लावली. सीताबाईनं जोपा केली. सोन्याचा करंड. रुप्याचं झाकण. ईश्वर पार्वतीची राखण. आणिक माझी सेवा मी इथंच करते कृष्णदेवा तुला अर्पण. ” त्या सरशी कृष्णदेव तुला पोटाशी धरून असा हसला की काय सांगू ?  मला कळलं ते मी केलं त्यातच मला आनंद. बाकीच्यांचा विचार मी करूच कशाला ? नव्हे तूच सांग !

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *