सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

401-17
पाहें पां ॐतत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे । जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात ॥ 401 ॥
अरे, असे पहा, ‘ॐ तत्सत’ हा उच्चार तो करणाराला त्या स्थलाप्रत नेतो कीं जेथून किंवा ज्यायोगे ह्या दृश्यजाताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त होते. 1
402-17
तें तंव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट । तयाचें हें आंतुवट । व्यंजक नाम ॥ 402 ॥
सर्व विशेषभावरहित जें केवल शुद्ध परब्रह्म त्यांचे ‘ॐ तत्सत्’ हें अखेरच्या खुणेचे वाचक नांव आहे. 2
403-17
परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा । या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे ॥ 403 ॥
परंतु, आकाश अन्य कोणाच्या आधारावर नसून जसें स्वतःच्याच आधारावर स्थित आहे तसे ॐ तत्सत् नाम व नामी परब्रह्म हीं अभेदत्वाने स्वरूपतः स्वाश्रयावरच किंवा आश्रयरहित स्थित आहेत. 3
404-17
उदयिला आकाशीं । रवीचि रवीतें प्रकाशी । हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मचि करी ॥ 404 ॥
आकाशांत सूर्योदय झाला हें सूर्यप्रकाशानेंच जाणले जाते; तसें हें नाम व नामी परब्रह्म हे स्वप्रकाशत्वाने अभेदरूपाने प्रकाशित आहे. 4
405-17
म्हणौनि त्र्यक्षर हें नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म । ययालागीं कर्म । जें जें कीजे ॥ 405 ॥
म्हणून ॐ तत्सत् हे तीन अक्षरीं नाम नांव नसून शुद्ध ब्रह्मच होय, म्हणून जें जें कर्म करिशील,5
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥17. 27॥

406-17
तें याग अथवा दानें । तपादिकेंही गहनें । तियें निफजतु कां न्यूनें । होऊनि ठातु ॥ 406 ॥
ते यज्ञकर्म असो, दान असो, अथवा तपादिकासारखे गहन कर्म असो; व हीं सर्व कर्मे यथाविधि पार पडोत किंवा विकल होवोत. 6
407-17
परी परीसाचा वरकली । नाहीं चोखाकिडाची बोली । तैसी ब्रह्मीं अर्पितां केलीं । ब्रह्मचि होती ॥ 407 ॥
परंतु परिसाच्या स्पर्शानें जें लोह सुवर्णत्व पावतें त्या सोन्यांत चांगलावाईटपणा कसून पाहाण्याचे कारण नसते, त्याप्रमाणे ॐ तत्सत् मंत्राणे ब्रह्मार्पण केलेलीं कर्मे ब्रह्मरूपच होतात. 7
408-17
उणिया पुरियाची परी । नुरेचि तेथ अवधारीं । निवडूं न येती सागरीं । जैसिया नदी ॥ 408 ॥
लक्ष्यांत असावें कीं, त्या कर्मात उणे पुरें असें कांहीं राहातच नाही. उदा. नद्या एकदां समुद्रास मिळाल्यावर जसा त्यांचा चांगलेवाईटपणा अथवा पवित्र अपवित्रपणा वेगळा नसतो. 8
409-17
एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती । सांगितली उपपत्ती । डोळसा गा ॥ 409 ॥
त्याप्रमाणे हे बुद्धिमंत पार्था, ब्रह्मनामाच्या अंगीं असलेली शक्ति तुला दृष्टांतपूर्वक सांगितली. 9
410-17
आणि येकेकाही अक्षरा । वेगळवेगळा वीरा । विनियोगु नागरा । बोलिलों रीती ॥ 410 ॥
आणि त्र्यक्षरी मंत्रांतील प्रत्येक अक्षराचा वेगवेगळयास्थलीं कसा विनियोग करावा ती रीतही सांगितली. 410

411-17
एवं ऐसें सुमहिम । म्हणौनि हें ब्रह्मनाम । आतां जाणितलें कीं सुवर्म । राया तुवां? ॥ 411 ॥
अर्जुना, तुझ्या आतां वर्म ध्यानात आलें असेल कीं, अशी सर्वश्रेष्ठ व सुप्रसिद्ध जी वस्तु, त्याला बृहत् (मोठे) ह्या धातूच्या अर्थानुसार “ ब्रह्म ” हें नांव प्राप्त झाले. 11
412-17
तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा । जयाचें जालें बंधा । उरों नेदी ॥ 412 ॥
तरी अर्जुना, इतःपर ह्या नामावर नित्य श्रद्धा ठेवून तू कर्म केलीं असतां तीं जन्मबंधास कारणीभूत होणार नाहीत. (तू मुक्त होशील) 12
413-17
जिये कर्मीं हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु । तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि तो ॥ 413 ॥
ज्या कर्मामध्ये ह्या मंत्राचा (प्रयोगाचा) यथाविधि विनियोग केला जातो तेथे सर्व वेदाचेच अनुष्ठान घडल्याचे श्रेय जोडले. 13
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥17.28॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥17॥
अर्थ : ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रयविभागयोग नावाचा हा सतरावा अध्याय समाप्त झाला. ॥17॥
414-17
ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे । दुराग्रहाची त्राये । वाढऊनियां ॥ 414 ॥
नाहीतर, हा मार्ग सोडून, श्रद्धेचा त्याग करून, दुराग्रहाच्या भरी भरून 14
415-17
मग अश्वमेध कोडी कीजे । रत्नें भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठींही तपिजे । तपसाहस्रीं ॥ 415 ॥
मग जरी करोडो अश्वमेध केले, रत्नपूर्ण पृथ्वी दान केले, किंवा एका अंगठयावर उभे राहून हजारों वर्षे कैक तपे केलीं. 15

416-17
जळाशयाचेनि नांवें । समुद्रही कीजती नवे । परी किंबहुना आघवें । वृथाचि तें ॥ 416 ॥
किंवा परोपकारार्थं समुद्रासारखे महान तलावादि (जलाशय) बांधिले तरी ते जणू सर्व व्यर्थ होय. 16
417-17
खडकावरी वर्षले । जैसें भस्मीं हवन केलें । कां खेंव दिधलें । साउलिये ॥ 417 ॥
खडकावर वृष्टि व्हाव, भस्मांत हवन करावें अथवा सावलीला आलिगन देण्यास जावें, 17
418-17
नातरी जैसें चडकणा । गगना हाणितलें अर्जुना । तैसा समारंभु सुना । गेलाचि तो ॥ 418 ॥
किंवा, अर्जुना, आकाशाला ठोंसे मारावे त्याप्रमाणे ही सर्व कमें वृथा होतात. 18
419-17
घाणां गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । तैसें दरिद्र तेवढें । ठेलेंचि आंगीं ॥ 419 ॥
घाण्यांत पाषाणगोटे घालून गाळू गेले असतां जसे तेल किंवा पेड (पेंड) कांहींच मिळत नाही; त्याप्रमाणे ह्या कर्माची स्थिति होऊन व्यर्थ श्रम द्रव्यादि हानि मात्र होऊन दरिद्र जोडले जातें 19
420-17
गांठीं बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरीं । न सरोनि जैसी मारी । उपवासीं गा ॥ 420 ॥
पदरात खापऱ्या बांधून ह्या किंवा अन्य देशांत गेले तरी त्यांचा द्रव्य म्हणून कोठेही स्वीकार न होऊन जशी उपाशी मरण्याची पाळी येते. 420

421-17
तैसें कर्मजातें तेणें । नाहीं ऐहिकीचें भोगणें । तेथ परत्र तें कवणें । अपेक्षावें ॥ 421 ॥
त्याप्रमाणे त्या सर्वही कर्मापासून ऐहिक भोगप्राप्तीही होणार नाहीं, तर तेथे पारलौकिक भोगांची कोणी आशा करावी? 21
422-17
म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा । हें असो सिणु नुसधा । दृष्टादृष्टीं तो ॥ 422 ॥
म्हणून ब्रह्मनामवर श्रद्धा न ठेवितां जें जें कर्म करावें ते दुष्टफलाला किंवा अदृष्टफलालाही कारण न होतां केवळ शीणमात्र होय. 22
423-17
ऐसें कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी । श्रीवर वीर नरहरी । बोलिलें तेणें ॥ 423 ॥
ह्याप्रमाणे, पातकरूप हत्तीचा अंतक सिंहरूप, त्रिविध तापरूपी अंधकारनाशक सूर्य, लक्ष्मीचा पति, वीर नरहरी जे भगवान् श्रीकृष्ण त्यांनी कथन केले. 23
424-17
तेथ निजानंदा बहुवसा-/। माजीं अर्जुन तो सहसा । हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि ॥ 424 ॥
पौणिमेला शुद्ध चांदण्यांत चंद्रापेक्षां चांदणेच आकर्षक होऊन, चंद्र जसा काही हरपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या भरतींत अर्जुन हरपल्याप्रमाणे म्हणजे देहभानविवर्जित झाला. 24
425-17
अहो संग्रामु हा वाणिया । मापें नाराचांचिया आणिया । सूनि माप घे मवणिया । जीवितेंसी ॥ 425 ॥
अहो ! युद्धप्रसंग ही एक हिशेब घेणारी वाण्याची पेढी आहे. तेथे बाणांच्या अग्रांनीं प्राणांतापर्यंत माप घेतेले जाते. 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *