विशिष्ट संकेत, 30 महत्वाचे संकेत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌹 *विशिष्ट संकेत* 🌹 *संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

1 *सामाजिक संकेत*

१. स्त्रीच्या तोंडांत कुठलेंहि गुपित राहात नाहीं.

२. समाजामध्यें स्त्रीपुरुषांनीं परस्परांचा सन्मान करणें झाल्यास पुष्यमाला हातांत द्यावी. गळ्यांत घालूं नये.

३. वर ज्येष्ठ, वधूहि ज्येष्ठ आणि मासहि ज्येष्ठ असा त्रिवेणी संगम विवाहास वर्ज्य मानला आहे.

४. अग्निशामक दलाचा घंटानाद ऐकला असतां साहाय्यासाठीं सर्वांनीं अविलंबें यावें असा मानव्याचा संकेत.

५. गाढ झोपलेल्या माणसास उठवणें झाल्यास त्याला सावकाशपणेंच जागृत करावें.

६. नवराबायकोचीं बोलणीं चोरून ऐकणारांस वटवाघळाचा जन्म येतो म्हणतात.

७. विवाह कंकण सुटेपर्यंत वधूवरांनीं मातापिता, गुरु, विप्र व देव यांखेरीज कोणासही वंदन करूं नये. कारण तोंपर्यंत ते लक्ष्मीनारायण स्वरूपी असतात.

८. मंगल कार्याचे प्रसंगीं स्वागताचें चिन्ह म्हणून मातीचा घडा भरून ठेवतात. याला पूर्णकुंभ म्हणतात. स्वागतासाठीं ह्रदय प्रेमानें भरलेलें आहे असा संकेत.

९. श्रेष्ठ पुरुष जसें वागतात तसेच इतर लोकही आचरण करतात. ” यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरोजन. । ” ( भ. गी.

१०. स्त्रीवर सहसा हत्यार चालवूं नये.

११. आवड आणि लाज, व्यसन आणि शीण, वेड आणि समंजसपणा यांचे साहचर्य असत नाहीं. ( ज्ञा. )

१२. गृहप्रवेशाच्या वेळीं धान्यानें भरलेलें मापटें वधूनें आपल्या उजव्या पायानें लवंडावयाचे असते.

१३. मानवी आयुष्य १०० वर्षें श्रुतींत सांगितलें असलें तरी साधारण मर्यादा साठच कल्पिली असल्यामुळें षष्ठयद्धिपूर्तीचा समारंभ करण्याचा प्रघात आहे.

१४. चंद्राच्या एकापासून बारा पावलांपर्यंत प्राणी सृष्टीची गर्भावस्था कल्पिली आहे. ( ऋतुचक्र )

१५. तरुण स्त्रीची ओढणी ( पदर ) डोक्यावर असली पाहिजे असा संकेत आहे. तशी तो डोक्यावर असणें विनयलक्षण मानलें आहे. ( कला आणि कलास्वाद )

2 *आध्यात्मिक संकेत*

१. सर्वांभूतीं परमेश्वर आहे.

२. राधा म्हणजे जीवात्मा व श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा.

३. तीर्थ यात्रेस वाहनांत बसून गेल्यानें तीर्थ यात्रेचें फल मिळत नाहीं.

४. पौराणिक व प्रासादिक ग्रंथ वाचतांना अशुभ कथानक आल्यास तेथें वाचनास खंड न पाडतां त्या कथानकाच्या पुढील शुम भाग वाचूनच ग्रंथ खालीं ठेवावा असा संकेत आहे.

५. ज्या ग्रंथाच्या आदि, मध्य आणि अंती ईशस्तवने वा गुरुस्तवन असतें तो ग्रंथ परमेश्वरास तसेंच जनताजनार्दनास प्रिय व हितैषी ठरतो.

६. गुरुगुह्य म्हणून जें असतें तें नेहमी अवगुंठनांत असावें. त्याचा स्पष्टार्थ गुरु प्रसादावांचून प्रतीत होऊं नये असा पूर्वापार संकेत आहे.

3 *ईश्वरी संकेत*

१. समय म्हणजे ईश्वरी संकेत ( धवलगिरि ).

२. ज्यानें त्यानें अंग झिजवावें व खावें हा ईश्वरी संकेत आहे.

३. दुष्ट प्रयत्नांत अखेर दुष्टांचाच नाश होतो.

४. लग्न हा एक योगायोग आहे तें जुळवून जुळत नाहीं. ज्याचा संबंध जडावयाचा विधिसंकेत असेल तेथेंच तो जडत असतो.

4 *धार्मिक संकेत*

१. पिंडाला काकस्पर्श झाल्याविना मृतात्म्याला सद्नति नाहीं असा संकेत आहे.

२. तुळशीच्या शापाचा पाषाण म्हणजे शालिग्राम व त्याच्या पूजेला तुळशीदळ अवश्य असा धार्मिक संकेत आहे.

३. संतति होत नसल्यास हरिवंशाचें पारायण करावें.

४. गंगा म्हणजे पावन करणारी.

५. बल हवें असेल तर बलभीमाची उपासना करावी.

६. सवत्स धेनूला अतिभक्तीनें तीन प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लागतें.

७. धर्मांला अविरोधी असाच अर्थागम असावा.

८. महादेवास वहावयाचें बिल्वपत्र वर डेख करून उभे वहावें असा संकेत आहे. ( नासदीय सूक्तभाष्या )

९. बारा वर्षानंतर भेटीचा योग आल्यास मग ते पिता – पुत्र, पति – पत्नि वा बंधु – बंधु कोणीही असोत त्यांनीं देवालयांत जाऊन कास्यपात्रांतील जलांत प्रथम परस्पर मुखावलोकन करावें असा संकेत आहे. ( ऋग्वेदी – ब्रह्मकर्म ) अशाप्रकारे पुराण काली राज चंद्रांगद व त्याची पत्नी इंदुमती यांची सविधि भेट झाली होती अशी कथा आहे. ( ग. पु. उपासना. अ. ५५ )

१०. आरण्यकें घरीं वाचावयाचीं नसतात.

११. योगभ्रष्ट पुरुष, जन्मतः ज्ञानी असतो. उपजत प्रज्ञा असते.

१२. ॐ मधील अ, उ, म, हीं अक्षरें जागृति, स्वप्न व सुषुप्ति यांची वाचक आहेत. ( मांडुकय )

१३. मोक्षद्वारापासून निवृत्त झालेले जीवात्मे इतरांच्या मुक्तीसाठीं परत फिरतात ही निवृत्तीची यात्रा ते स्वेच्छेनें निवडतात. ( धवलगिरि )

१४. सत्यशोधकाला शून्यावस्थेंतून जावें लागतें.

१५. मायेपासून उत्पन्न होणारें जें अज्ञान त्यास मायीयमल असें म्हणण्याचा शैवागमाचा संकेत आहे.

१६. वटवृक्ष, पिंपळ व औदुंबर या वृक्षांवर देवतांचा अधिवास असतो.

१७. पिंपळाचे झाडावर मुंजा तसेंच चिंचेचें झाड हडळीचें निवासस्थान मानतात.

१८. कवट हें फळ शंकरास प्रिय म्हणून तें शिवरात्रीस अवश्य खावें असा संकेत.

१९. कार्यकारण भाव हा एक मानवी संकेत आहे. 

5 *नैर्बधिक संकेत*

१. शंभर अपराधी सुटले तरी हरकत नाहीं, पण एका निरपराध्यास शिक्षा होऊं नये.

२. न्यायासनासमोर आलेला आरोपी आरोप शाबीत होईपर्यंत गुन्हेगार म्हणून गृहीत धरूं नयें.

३. न्यायदेवतेची तसबीर डोळे मिटलेली व हातांत सरळ दांडीचा तराजू असलेली दाखवलेली असते याचा अर्थ १ निःक्षपातीपणा, २ दयालुत्व व ३ चोखपणा हे गुण दर्शवावयाचे असतात.

४. फांशीची शिक्षा ज्या टांकानें लिहिली जाते तो टांक तत्काळ मोडून टाकावयाचा असतो.

6 *नृत्य संकेत*

१. नृत्यांत शरीराचे सर्व अवयव उघडे करून दाखवृं नयेत असा भारतीय नाटयशास्त्राचा कलासंकेत आहे. ( नासदीय सूक्तभाष्य )

२. नृत्य व वादन एकाच वेळेला एकाच ठिकाणीं चालू असावें असा संकेत आहे. ( कला आणि कलास्वाद )

7 *नामकरण संकेत*

कन्येचें बारावे दिवशीं तर पुत्राचें तेरावे दिवशीं नामकरण करावयाचें असतें.

8 *पौराणिक संकेत*

१. पृथ्वी ही विष्णुपत्नी असा संकेत.

२. शंखध्वनि ऐकला कीं सर्व कामें स्थगित करावींत असा देवलोकींचा संकेत आहे.

9 *मूर्तिशास्त्र संकेत*

१. श्रीविष्णूच्या हातांतील आयुधांच्या अदलाबद्लीनें श्रीविष्णूची नानारूपें मूर्तिबद्ध केलें जाऊं शकतात

२. बुद्धमूर्ती कान लोंबलेले दाखवावेत असा परंपरेचा संकेत आहे. ( कला आणि कलास्वाद )

10 *मंत्रशास्त्र संकेत*

१. मंत्रांची जितकीं अक्षरें असतात. तितके कोटी जप केला असतां मंत्र सिद्ध होतो.

11 *युद्धसंकेत*

१. शत्रूचा निरोप घेऊन आलेला दूत अवध्य असतो.

२. युद्धसमयी तहाची सूचना करणें झाल्यास श्वेतध्वज वापरावयाचा असतो.

३. युद्धांत वानरांनीं मानवी वेषांत बावरायाचें नाहीं असा राम – रावण युद्धांत संकेत होता. ( वा. रा. युद्धा ३७ – ३३ )

४. बेंबीच्या खालच्या बाजूस प्रहार करूं नये असा प्राचीनकालीं गदायुद्धांत संकेत असे.

५. युद्धाखेरीज इतरत्र क्षत्रियानें हत्तीचा वध करू नये. ( रघुवंश – सर्ग )

12 *योगशास्त्र संकेत*

ज्योतीष्मती तथा कांगोणी नामक वनस्पतीचा तैलकल्प विशेषतः सूर्योदयापूर्वी केला असतां ब्रह्मांड भ्रमणाचा आवाज ऐकूं येऊं लागतो. ( राधामाधवविलास चंपू प्रस्तावना )

13 *रंगभूमि संकेत*

१. मृत्यू, वध, युद्ध, रक्तपात व रतिचेष्टितांचे वगैरे प्रसंग रंगभूमीवर सहसा दाखवावयाचे नसतात.

२. नाटकांतील तीन पडदे म्हणजे घर ( रसग्रहण )

14 *राजनैतिक संकेत*

१. राज्याची दंडशक्ति ही मुलकी सत्तेच्या कह्यांत वागविण्यांत यावी.

२. राजकारणांत गुप्तता राखली पाहिजे व त्याचा कांहीं पुरावाहि ठेवूं नये.

15 *लोकशाही संकेत*

१. पक्षांतर करावयाचें असेल तर त्यानें नुसत्या पूर्वीच्या पक्षाचा राजीनामा देऊन भागणार नाहीं. तर लोकसमेमधील आपल्या जागेचाहि राजीनामा देऊन तो नव्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आला पाहिजे असा लोकशाहीचा एक संकेत आहे.

२. मंत्रिमंडळ कोणत्याही एका पक्षाचें असलें तरी त्यानें संपूर्ण विधिमंडळाचें प्रतिनिधित्व निवेदनावर चर्चा होत नाहीं आणि प्रश्नोत्तरांनाहि निर्बंघ घातला जातो असा संसदीय संकेत आहे.

३. मंत्र्यांच्या निवेदनावा चर्चा होत नाही आणि प्रश्नोत्तरांनाहि निर्बंध घातला जातो असा संसदीय संकेत आहे.

४. एकाद्या प्रश्नावर धोरण ठरवावयाचें तर त्याबाबत पुन्हां एकदां लोकमताचा कौल घेतला पाहिजे.

५. मंत्रिमंडळाची जबाबदारी सामुदायिक असते.

16 *वारकरी संकेत*

१. आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यांपैकीं एका तरी शुद्ध एकादशीस गळ्यांत तुळशीची माळ घालून नियमित पंढरीची वारी करणें.

२. वारकरी म्हटला म्हणजे तो कोणत्याहि वयाचा व जातीचा असो एकमेकांस दोन्ही पायांवर हात व मस्तक ठेवृन नमस्कार करावयाचा असा सांप्रदायिक संकेत आहे.

३. वारकरी भजनाचा प्रारंभ ” रूप पहातां लोचनीं ” याच अभंगानें करावयाचा असतो.

४. नामसप्ताहांत वीणा खालीं ठेवावयाचा नसतो.

17 *वैदिक संकेत*

१. वेद हे अपौरुषेय आहेत.

२. गुरूजवळ अध्ययन केल्याविना विद्या प्राप्त होत नाहीं.

३. महिन्यांतल्या दोन अष्टम्या, दोन चतुर्दशा, पौर्णिमा व अमावास्या असे सहा दिवस वेदाध्ययनास वर्ज्य मानिले आहेत.

४. मृत्यूनंतर पूर्व जन्म घेण्याच्या आधींच्या काळांत जीवात्मा ज्याचा आश्रय करतो त्यास लिंग देह म्हणतात.

५. वेदाक्षरांचा उच्चार हाहि एक प्रकाराचा वायु आहे. त्याला बाह्म वायुपासून पीडा होऊं नये म्हणून वेदवेत्ते ब्राह्मण वारा सुटला असता वेदाध्ययन करीत नाहींत. ( म. भा. शांति अ. ३२८ )

६. सर्वशक्तींची योग्य तर्‍हेनें जोपासना करून मनुष्यानें त्याचा लय यज्ञमध्यें करावा असा रुद्रांचा संकेत आहे. ( माऊली मासिक )

७. वेदाध्ययन इतिहास व पुराण ह्यांच्या साह्यानें करावें. ” इतिहासपुणाम्यां वेदं समुपबृंहयेत् ” ( म. भा. आदि १ – ६७ )

८. ग्रंथारंभी कार्यसिद्धि व्हावी म्हणून श्रीगणेशाचे मंगलरूप आठबावे व यास तसेच गुरु व माता पिता यांस नमन करावे असा वैदिक संप्रदायाचा संकेत आहे.

18 *सांप्रदायिक संकेत*

१. सिद्धगुरु करतील तोच आचारधर्म असा संकेत त्या त्या पंथांत मानला जातो.

18 *सामुद्रिक शास्त्र संकेत*

१. ज्याच्या पोटर्‍या मोठ्या त्याला भटकावें लागतें. असा सामुद्रिक शास्त्राचा एक संकेत आहे. ( व्यासपर्व )

20 *सौजन्य संकेत*

१. पंक्तींत भोजनसमयीं सर्वांचें जेवण झाल्याविना पंक्तींतून उठूं नये.

२. रस्त्यानें जातांना पुढील माणसाचें कांहीं रस्त्यावर सांडलें तर त्याचें लक्ष वेधावे.

३. एखाद्याविषयीं मरणोत्तर अनुदार उद्नार काढूं नयेत.

21 *संगीत शास्त्रांतील संकेत*

१. दीप राग गायिल्यानें दिवे लागतात.

२. हिंदोल राग गायिल्यानें झोंपाळा आपोआप हालत राहतो.

३. बागेश्री रागाच्या ध्वनिमुद्रिका रोज ऐकणारीं झाडें अधिक बहरतात.

४. दीपक रागाच्या गायनाला गवई वर्ज्य मानतात.

५. संगीतानें नाग मंत्रमुग्ध होतात.

६. हरणें पक्षी वगैरे आकर्षित होतात.

७. मेघांतून जलधारा सुरू होतात.

८. धार काढण्याचे वेळीं गाईंना मंजुळ स्वर ऐकवले तर त्या अधिक दूध देतात. ( मनोहर डिसेंबर १९५९ )

९. मेघ मल्हार राग आळवला म्हणजे पाऊस पडतो.

१०. साधना हीं कांहींतरी अघोरीच असलीं पाहिजे असा एक मूर्ख संकेत रूढ आहे. ( संगीताचीं घराणीं )

22 *हस्तसामुद्रिक*

१. हातांवरील रेषांनुसार परिस्थिती घडावी असा हस्तसामुद्रिक शास्त्राचा संकेत आहे.

23 *वैद्यकीय संकेत*

१, वैद्यानें शत्रुमित्र यांचा विचार न करितां रोगचिकित्सा व उपाय करावा.

24 *व्यावहारिक संकेत*

१. वरिष्ठ न्यायालयाचा निवाडा, वैद्याचें प्रमाणपत्र व स्थापत्य विशारदांचा अंदाज या तीन गोष्टींत पुनर्विचार नाहीं.

२. जिज्ञासूवृत्तीनें व निरहंकारपणें विचारल्याविना कोणी कोणास उपदेश करूं नये.

३. लिलावांत एकाद्या वस्तूंचे मूल्य तीन म्हणून पुकारलें म्हणजे तो लिलाव पूर्ण झाला असें समजावयाचे म्हणजे एखाद्या गोष्टींचा त्रिवार उच्चार ही पूर्णतादर्शक निश्चिति.

५. अतृप्ति हा मानवी सुखाला मिळालेला अतिकर्कश निर्दय शाप आहे.

६. आपण विचारलेल्या प्रश्नाचें उत्तर त्वरित पाहिजे असल्यास जोडकार्ड लिहावें.

25 *वृत्तपत्रीय संकेत*

१. विश्वासानें मिळविलेल्या गुप्त बातम्यांचें उगमस्थान प्रकट करावायचें नसतें.

२. एक परमेश्वर आणि दुसरा वृत्तपत्र संपादक कधींच चुकत नाहींत.

26 *व्याकरणशास्त्र*

१. कोणत्याही वस्तूंचा निर्देश करावयाचा झाल्यास प्रथमा विभक्ति योजावी असा वैयाकरणांचा संकेत आहे. ” निर्देशे प्रथमा प्रोक्ता “

27 *शिष्ट संकेत*

१. आपली गुरुभक्ति इतरांवर लादावयाची नसते.

२. बैठकींत गप्पा गोष्टींत उपस्थितांस अनुलक्षून कांहीं अप्रिय बोलावयाचें नसतें अथवा ओरखाडे घ्यावयाचे नसतात.

28 *शास्त्रसंकेत*

१. पंचमहाभूतांच्या अन्योन्य मिश्रणानें द्दश्य जगत् निर्माण होतें तेव्हां ज्यांत जें महाभूत आधिक्यानें असेल त्याच्या नांवानें तें द्वव्य संबोधावयाचें असा शास्त्र संकेत आहे. उदा. पार्थिव आग्नेय इ.

29 *शिकार संकेत*

१. शिकारींत नर मारावा पण मादी मारूं नये. माकड वा वानर या प्राण्यांची हत्त्या करावयाची नसते.

30 *शैक्षणिक संकेत*

१. प्रादेशिक भाषा हीच राजभाषा असली तरी जनतेला प्राथमिक शिक्षण तिच्या मातृभाषेंतूनच दिलें गेलें पाहिजे असा शैक्षणिक संकेत आहे. ( केसरी ८ जुलै १९६० )

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

अशोक काका कुलकर्णी संकलित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

  1. धन्यवाद काका आपण देत असलेल्या माहितीबद्दल। आता आपण ईश्वराच्या दर्शनाविषयी स्वप्नसंकेत हे देखिल लिहावेत, अशी प्रार्थना🙏🙏🙏🌷

    • साक्षी ताई सप्रेम जयहरि

      शक्य तितक्या लवकर मी आपली सूचना पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. मी किर्तन, भागवत इत्यादी कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर असतो त्यामुळे कदाचित अधिक कालावधी लागेल.

      वारकरी साहित्य सेवक
      धनंजय महाराज मोरे
      ९४२२९३८१९९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *