एका दुर्वेचि महिमा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दुर्वांकुर महिमा

दक्षिण देशात ‘जांब’ नावाचे एक प्रसिद्ध नगर होते. त्यात धर्मशील. गुणवान, बलवान असा ‘सुलभ’ नावाचा क्षत्रिय होता. त्याची ‘सुभद्रा’ नामक पत्नी अतिशय लावण्यवती व साध्वी होती. एकदा ती दोघे स्नान करून पुराण ऐकायला बसली असता तिथे सतत परमेश्वराचे चिंतन करणारा भिक्षाभिलाशी ‘मधुसूदन’ नावाचा ब्राह्मण आला. दारिद्र्यामुळे त्याचे वस्त्र ठिकठिकाणी फाटलेले असल्यामुळे तो जवळजवळ दिगंबरच झाला होता. त्याला पाहताच सुलभने त्याला नमस्कार केला पण मधेच त्याला एकदम हसू आले. सुलभ आपल्याला हसला याचा त्या मधुसुदनाला फार राग आला. त्याने शाप दिला की, “तू मला हसलास म्हणून शेतात नांगर ओढणारा बैल होशील.”
आपल्या पतीचा फारसा अपराध नसता त्याला हा भयंकर शाप दिला म्हणून सुभद्रेला फार दु:ख झाले. खवळलेल्या नागीनीप्रमाने फणफणत तिने त्या दिगंबर ब्राम्हणास शाप दिला की, “मुर्खा तू अविवेकाने माझ्या पतीस असा भयंकर शाप दिलास, म्हणून तुही सर्व प्राण्यात मूढ असा गर्दभ (गाढव) होशील.” आपल्याला असा शाप दिला हे सहन न होऊन त्या ब्राह्मणाने तिलाही शाप दिला की, “तू दरीन्द्री आणि अमंगल अशी चांडालीण होशील.”


शापानुसार सुलभ बैल झाला व नांगर ओढून बेजार झाला. मधुसूदन ब्राह्मण गर्दभाच्या जन्मास गेला आणि हरळी फुंकू लागला. सुभद्रेला चांडालयोनी प्राप्त झाली. दारीन्द्र्यामुळे ती अभक्ष भक्षण करू लागली. एकदा फिरत असता तिने नगराच्या दक्षिणेस गजाननाचे एक अद्भुत मंदिर पहिले. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी असल्यामुळे नगरात गणपतीचा मोठा उत्सव चाललेला होता. त्या वेळी फार मोठी पर्जन्यवृष्टी होऊ लागली त्यामुळे गाढव व बैल मंदिरात आश्रयाला आले व चांडालीण देखील भयभीत होऊन ज्या ज्या घरात आश्रयास जाई, त्या त्या घरातून तिला बाहेर घालवले जाई. तेव्हा हातात विस्तव घेउन ती मंदिरात आली तिथेही तिला कोणी बसू देईना. मग ती जवळच अग्नीच्या सहाय्याने गवत पेटवून शेक घेऊ लागली. इतक्यात असा चमत्कार झाला की, तिने आणलेल्या गवतातील एक दुर्वांकुर एकाएकी वायूच्या योगाने उडाला व दैवयोगाने गणपतीच्या मस्तकावर जाऊन पडला आणि त्यामुळे गजानन संतुष्ट झाले.
नंतर चांडालीण पूजेसाठी ठेवलेल्या पदार्थांचे भक्षण करू लागली, तेव्हा तिने मंदिरात शिरलेल्या गाढव व बैलाला पहिले व ती काठी घेऊन त्यांना मारण्यासाठी धावली. गाढव व बैल मंदिरात सैरावैरा धाऊ लागले व त्यांच्या खुरांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी त्या प्राण्यांना व चांडालीना चांगलाच मार दिला.


चांडालीनीच्या व गाढवाच्या स्पर्शाने देवाला विटाळ झाला असेल अश्या कल्पनेने लोकांनी, मंत्राविलेल्या तीर्थोदकाने गजाननास स्नान घातले. पुन्हा चिडून ते संतापाच्या भरात गाढव, बैल व चांडालीण यांना मारू लागले. मंदिराचे दार बंद असल्याने त्यांना बाहेर पळून जाताही येईना. ते मोठमोठ्याने ओरडू लागले व गजाननाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. गजाननाचे विचार केला की आज यांच्यामुळेच माझी दुर्वांकुराने पूजा झाली. दुष्ट असूनही मार खात त्यांनी मला प्रदक्षिणा घातली आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीस जो केवळ एक दुर्वा वाहून माझी पूजा करतो व मला प्रदक्षिणा घालतो, तो मला थोर वाटतो. त्यामुळे यांचा मला उद्धार केलाच पाहिजे. असा विचार करून गजाननाने आपल्या सेवकास आज्ञा केली की, त्या तिघांना विमानातून गणेशलोकी न्या. गणपतीचे सेवक आले व त्या तिघांना विमानातून गणेशलोकी घेऊन जाऊ लागले. गणपतीचे लोक या तिघांना विमानाने घेऊन जात आहेत हे पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटले. इतकंच नाही तर त्या तिघानाही पूर्ववत देह प्राप्त झाले, हे पाहून लोक विस्मित झाले. त्यांनी विचारले की या तिघानी कोणते पुण्या केले म्हणून त्यांना हे भाग्य प्राप्त झाले? आम्ही इतकी तपश्चर्या करीत आहोत, पण गजानन आम्हावर अजूनही संतुष्ट झाले नाहीत. आम्हीही त्यांच्यासारखे पुण्या करू व गजाननास संतुष्ट करून घेऊ. उपसाकांचा हा प्रश्न ऐकून गजाननाच्या सेवकांनी त्यांना गणपती पूजनात दुर्वाचे महात्म्य सांगितले व पुढे त्या तिघांना घेऊन गणेशलोकी मार्गस्थ झाले.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *