धर्मशास्त्र १ आश्विनमासातील कृत्ये

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

धर्मशास्र* आश्विनमासातील कृत्ये

तुलासंक्रांति व मेषसंक्रांति यांना विषुव अशी संज्ञा आहे. विषुवसंक्रांतीच्या पहिल्या व अखेरच्या पंधरा पंधरा घटका पुण्यकाल असतो. आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो. नवरात्र या शब्दाने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आरंभ होऊन महानवमीपर्यंत करायचे जे कर्म ते होय. या कर्मात पूजा प्रधान आहे. उपवासादिक, स्तोत्रपाठ, जप वगैरे ही त्याची अंगे होत.

उपवास एकभुक्त, नक्त, अयाचित यांपैकी जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे एखादे व्रत आणि सप्तशती, लक्ष्मीह्रदयादि स्तोत्रे वगैरेचे पाठ व जप यांचा जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ तिथींचे दिवशी करायचे जे पूजाख्य कर्म- तो नवरात्र या शब्दाचा अर्थ जाणावा. यांत पूजेचे प्राधान्य सांगितले असल्याने क्वचित कुळात जप उपवास वगैरेंचा अभाव आढळतो.

नवरात्रकर्मात पूजेचा मात्र अभाव कोणच्याही कुळात आढळत नाही. ज्या कुळात मुळी नवरात्रच करीत नाहीत, त्यामध्ये पूजेचाही अभाव असल्यास नवल नाही. अशांची गोष्ट वेगळी. नवरात्राचा आरंभ सूर्योदयानंतर सहा घटिका व्यापणार्‍या प्रतिपदेला करावा. त्याच्या अभावी चार घटिकाव्यापिनी प्रतिपदाही घ्यावी. दोन घटिकाव्यापिनीही घेण्यास काही ग्रंथात सांगितले आहे.

अमावास्यायुक्त प्रतिपदेचे दिवशी मात्र आरंभ करू नये, असे बर्‍याच ग्रंथांना संमत आहे. दोन घटिकांहूनही जर व्याप्ति कमी असेल, अथवा सूर्योदयकाली जर प्रतिपदा नसेल, तर अमावास्यायुक्त देखील घ्यावी. पूर्व दिवशी साठ घटिका प्रतिपदा व दुसरे दिवशी चार घटिका इत्यादि जर वृद्धि असेल, तर पूर्ण आहे म्हणून पूर्व दिवसाचीच घ्यावी. या दोन्ही पक्षी द्वितीयावेधाचा निषेध योजावा.

पूर्व दिवशी आठ घटिकानंतर आरंभ झालेली व दुसर्‍या दिवशी चार घटिका इत्यादि परिमित अशी जर प्रतिपदा असेल, तर दुसरी क्षयाला जाणारी म्हणून तिचा निषेध आहे. यास्तव, पूर्व दिवसाची घ्यावी असे पुरुषार्थचिंतामणीत सांगितले आहे. त्या ठिकाणी सूर्योदयानंतर जर दहा घटिकांमध्ये, तसा संभव नसेल तर, मध्यान्हकाळी अभिजित मुहूर्तावर आरंभ करावा. अपराह्णकाळी आरंभ करू नये. याप्रमाणे प्रतिपदेच्या पहिल्या सोळा घटकांचा निषेध, चित्रा व वैधृति या दोहोंचा निषेध, हे उक्त काळाच्या अनुरोधाने संभव असेल तर पाळावेत. निषेधाच्या अनुरोधाने पूर्वाह्णकाळी प्रारंभ करू नये, अथवा प्रतिपदा तिथीचाही अतिक्रम करू नये.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

हंसराज महाराज मिसाळ संकलित

अशोक काका कुलकर्णी संकालित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *