पितृपक्ष भाग २ श्राद्धाचे प्रकार व कधी, कुणी करावे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पितृपक्ष भाग २

धर्मग्रंथांमध्ये श्राद्धचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त प्रकारे वर्णन केले आहेत. त्यातील मुख्य श्राद्ध विधींची माहिती पुढीलप्रमाणे –

औध्वर्देहिक विधी :-
यामध्ये अंत्येष्टी संस्कारात अंतर्भूत असलेली विविध श्राद्धे येतात. ही सर्व श्राद्धे मृत व्यक्तीला पितृत्व प्राप्त होईपयर्ंतची (सपिंडीकरण श्राद्ध) असून मृत्यूनंतर एका वर्षात करावयाची असतात. अधिक खुलाशासाठी अंत्येष्टी विधीबद्दल या संकेतस्थळवरील माहिती वाचावी.
उदकुंभ श्राद्ध :-
मृत व्यक्ती प्रीत्यर्थ निधनानंतर प्रत्येक महिन्यात हे श्राद्ध करावयाचे असते. परंतु आजकाल हे शक्य होत नसल्याने वर्षश्राद्धापूर्वी सांकेतिक विधी म्हणून एकदाच हा श्राद्धविधी केला जातो.
नित्य श्राध्द :-
पितरांप्रीत्यर्थ रोज केल्या जाणार्या श्राद्धाला पितृयज्ञ/नित्यश्राद्ध म्हणतात. हे केवळ उदकाने तर्पण करून किंवा तीलतर्पण करून करता येते.
वृद्धी श्राद्ध :-
प्रत्येक वर्षी मृत्यूतिथीला जे श्राद्ध करतात त्याला सांवत्सरिक किंवा वृद्धी श्राद्ध म्हणतात.

पार्वण श्राद्धे :-

तीर्थ श्राद्ध :-
काशी, प्रयाग, मातृगया, पितृगया इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्री सर्व पितरांप्रीत्यर्थ केल्या जाणार्या श्राद्धाला ‘तीर्थ श्राद्ध’ म्हणतात.
महालय श्राद्ध :-
भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपयर्ंतच्या हिंदू वर्षातील काळाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या काळात श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात. त्यामुळे प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.

हे श्राद्ध पितृत्रई म्हणजेच पिता, पितामह (आजोबा) व प्रपितामहा (पणजोबा); मातृत्रयी म्हणजे माता, पितामही, प्रपितामही; सापत्न माता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातूल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
नांदी श्राद्ध :-
पुत्रजन्म, उपनयन (मुंज), विवाह यांसारख्या संस्कारांच्या वेळी, तसेच विविध प्रकारची यज्ञकर्मे, गृहप्रवेश, वयाच्या पन्नासाव्या वर्षांपासून शंभर वर्ष वयापयर्ंत दर पाच वर्षांनी करण्याची शांती इत्यादी शुभ प्रसंगी पितरांचे आशीर्वाद लाभावे याकरिता ‘नांदी श्राद्ध’ करतात.


त्रिपिंडी श्राद्ध :-
सतत तीन वर्षे श्राद्धकर्म न केल्यास पितरांना प्रेतत्व प्राप्त होते. यामुळे लौकिक जीवनात त्रास होऊ शकतो, असे धर्मशास्त्र सांगते. या त्रासाच्या निवारणासाठी प्रेतत्व पावलेल्या पितरांना पुनश्च पितृत्व प्राप्त व्हावे म्हणून त्रिपिंडी श्राद्ध करतात. हे श्राद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीच केले जाते. त्रिपिंडी श्राद्ध केल्यानंतर देखील प्रतिवर्षी श्राद्ध विधी करणे अपेक्षित असते.

सामान्यत:- दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला श्राद्ध करावे. फक्त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे. मृत्युतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे. निश्चित मृत्युतिथी माहीत नसल्यास मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे.

हे श्राद्ध उदकाने म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावे. त्यामुळे नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावी. तेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील अमावास्येला (सर्व पितरी अमावास्येला) तरी श्राद्ध करावे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

अशोक काका कुलकर्णी संकलित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *