पितृपक्ष १ श्राद्ध कसे करावे ! तिथी माहिती नाही

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग १

भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास ‘श्राध्दपक्ष ‘ म्हटले जाते. यात अश्विन प्रतिपदेचा दिवस मिळवल्यात सोळा दिवसांचा होत असतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधार्या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असते. यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राध्द व तर्पण केल्याने सुख, समृध्दी व संततीची प्रार्थना केली जात असते.

जर तिथी लक्षात नसेल तर पितृपंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावास्या येते. तिला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी श्राध्द केले जाते. यादिवशी सूर्य, चंद्र यांची युती होते. सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो. श्राध्द पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्य करत असतात, असा उल्लेख मार्कण्डेय पुराणात आला आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवण, दान दिले जाते. श्राध्द पक्षात तिर्थस्थानी जाऊन त्रिपींड दान केले जाते. नारायण नागबलीची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात सुख- समुध्दी नांदावी म्हणून दानधर्म केले जात असतात.
देश काले च पात्रे च श्रद्धया विधिनाच यत।
पितनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम ।।

म्हणजे देश, काल आणि पात्र (योग्य स्थळ) यांना अनुलक्षून श्रद्धा आणि विधीयुक्त असे जे (अन्नादी) पितरांना उद्देशून ब्राह्मणांना दिले जाते त्याला ‘ श्राद्ध ‘ म्हणावे.


माता-पिता तसेच निकटवर्तीय हयात असताना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो. त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते, असे भारतीय संस्कृती सांगते. या कर्तव्यपूर्तीची सुसंधी आपल्याला श्राद्धाच्या निमित्ताने मिळते. आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्युतर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण. ही चार ऋण फेडणे होय.

देवांना यज्ञ भाग देवून देव ऋण फेडता येते. तर ऋषी मुनी संत यांच्या विचारांना आदर्शांना आत्मसात करत त्यांचा प्रचार प्रसार करत त्यानुसार जीवन घडवून ऋषी ऋण फेडता येते. तर पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. श्राद्धविधी हा हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे व धर्मशास्त्रात श्राद्ध हे गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.


हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेनुसार पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे. काही पितर त्यांच्या कुकर्मांमुळे पितृलोकात जात नाहीत त्यांना भूतयोनी लाभते.

अशा पितरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे. असे विविध हेतू श्राद्धविधी करण्यामागे आहेत. शास्त्रनियमाप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी श्राद्ध केले पाहिजे.
ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे. यजुर्वेद, ब्राह्मणे आणि श्रौत व गृह्यसूत्रांच्या काळात पिंडदान प्रचारात आले. गृह्यसूत्रे, श्रुती-स्मृती यांच्या पुढील काळात श्राद्धात ब्राह्मण भोजन आवश्यक मानले गेले आणि तो श्राद्धविधीतला एक प्रमुख भाग ठरला. सध्या आपण ज्याला श्राद्धविधी म्हणतो त्यामध्ये वरील तिन्ही अवस्था एकत्रित झाल्या आहेत.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी

पितृकार्य महत्वाची माहिती

अशोक काका कुलकर्णी संकलित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *