गोत्र-प्रवर भाग १

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गोत्र-प्रवरभाग १

गोत्र आणि प्रवर या शब्दांचा संबंध हिंदू धर्माच्या श्रौत व स्मार्त या दोन्ही अंगांशी आहे. गोत्र या शब्दाचा रूढार्थ भारतातील प्राचीन ऋषिकुल असा आहे. प्रवर म्हणजे गोत्रातील प्राचीन विशिष्ट ऋषीचे नाव होय. गोत्र आणि प्रवर यांचा श्रौत आणि स्मार्त कर्मांत बऱ्याच ठिकाणी एकत्र निर्देश येत असल्याने ‘गोत्र-प्रवर’ असा संयुक्त शब्द रूढ आहे.
गोत्र हा शब्द ऋग्वेदात, अन्य वैदिक ग्रंथांत आणि पुढील धार्मिक संस्कृत वाङ्‌मयात आढळतो. या शब्दाचा मूळचा अर्थ गाईंचा गोठा असा आहे. गोठ्यातील गाई एका कुळाच्या मालकीच्या असल्यामुळे गोत्र या शब्दाने एका कुळाचा आणि त्याच्या प्रमुखाचा बोध होऊ लागला. एखाद्या व्यक्तीचा इतरांच्याहून पृथक निर्देश करावयाचा असल्यास त्या व्यक्तीचे नाव, पित्याचे नाव आणि गोत्रनाम यांचा उच्चार करण्याची प्राचीन पद्धती होती. श्रौत व स्मार्त आचारांत याप्रमाणे व्यक्तीचा निर्देश होत असे. एका गोत्रातील स्त्रीपुरुषांचे बंधुभगिनीचे नाते प्रस्थापित होत असल्यामुळे, परगोत्रातील वधूशी विवाह करण्याचा प्राचीन परिपाठ आहे. सूत्रकाळात म्हणजे इ. स. पू. सहाव्या-पाचव्या शतकांत ही रुढी असल्याचे स्पष्टच दिसते.

याच्याही पूर्वी ब्राह्मणग्रंथांच्या काळात किंबहुना ऋग्वेदकाळीही ही प्रथा असावी. ऋग्वेदाच्या दहा मंडलांपैकी दोन ते सात मंडलांचे द्रष्टे ऋषी अनुक्रमे गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भरद्वाज आणि वसिष्ठ हे आहेत. आठव्या मंडलातील सूक्ते कण्व व अंगिरस् यांची आहेत. उरलेल्या तीन मंडलांतील सूक्तांचे ऋषीही निरनिराळ्या गोत्रांतील आहेत. या गोत्रांतील अनेक ऋषींनी आपापल्या काळात पाहिलेली सूक्ते ऋग्वेदात ग्रथित आहेत. गटागटाने राहिलेल्या या कुळांत स्वाभाविकच आपसांत विवाहसंबंध होत नसत. ऋग्वेदात ‘अरि’ हा शब्द ‘परका’ या अर्थाने वापरला आहे. ‘परका’ या शब्दाचेही तेथे दोन अर्थ आहेत. ‘परका’ म्हणजे ‘शत्रू’ हा एक अर्थ आणि परसमाजातील व्यक्तीला आदरपूर्वक बोलावून कन्या अर्पण करावयाची असता होणारा ‘सन्मान्य अतिथि’ हा दुसरा अर्थ. हे लक्षात घेतले म्हणजे ऋग्वेदकाळीही सगोत्र विवाह होत नसावेत, असे लक्षात येते. पुढे ब्राह्मणग्रंथांच्या काळीही ही प्रथा निश्चितपणे रुढ असली पाहिजे. ब्राह्मणग्रंथांत ‘जामि’ म्हणजे ‘बंधू’ आणि ‘अजामि’ म्हणजे ‘अबंधू’ या शब्दांचा वारंवार प्रयोग झालेला आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *