भोजनविधी’ म्हणजे काय? त्यात धार्मिक व शास्त्रीय अर्थ आहे काय ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

संकलन – सदानंद पाटील, रत्नागिरी.

शास्त्र असे सांगते
——————————————————
—————————————————–

‘भोजनविधी’ म्हणजे काय? त्यात धार्मिक व शास्त्रीय अर्थ आहे काय ?

           भोजनाच्या वेळी विशिष्ट कृती केल्या जातात. त्यांचा क्रमही अगदी ठरलेला आहे. कृती अनेक असल्या तरी त्या फारच अल्पकाळात म्हणजे सुमारे अर्ध्या मिनिटात करता येतात. भोजनाचे पात्र नेहमी बसण्याच्या आसनाहून उंच ठिकाणी ठेवावे. कारण अन्न हे परब्रम्ह मानले गेल्यामुळे त्याचे स्थान आपल्या स्थानाहून उच्च असणे स्वाभाविक आहे.

            पाटाखाली पाण्याने एक चौकोनी छोटे मंडल करावे. पात्र पाटावर ठेवले नसल्यास पात्राखाली मंडल करावे. मंडल करण्यामागे शास्त्रीय भूमिका म्हणजे मंडलामुळे पात्रस्थान निश्चित होते. इमारत बांधण्यापूर्वी ज्याप्रमाणे खडूच्या भुकटीने रेखा आखतात, त्याप्रमाणे भोजनपात्र ठेवण्यापूर्वी मंडल काढतात. धार्मिक दृष्ट्या मंडलावर विविध देवांचा अधिवास असतो.

त्यामुळे त्या पात्रातील अन्न सुसंस्कृत होण्यास मदत होते. व्यावहारिक दृष्ट्या मंडलाच्या आकारावरून भोजनप्रसंगाचे आकलन होते. गोल, नवांकित, चौकोनी इत्यादी प्रकारची मंडले पितृकर्म, देवकर्म इत्यादी कर्मांचे निदर्शक होत. मंडलानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे अन्नावर संस्कार घडविणे होय. गायत्रीने किंवा रामनामाने थोडेसे पाणी अन्नावर शिंपडावे. याला अभिमंत्रण असे म्हणतात. अभिमंत्रणामुळे अन्नातील तामस गुण कमी होतात. त्यानंतर अन्नावर अधांतरी हात ठेवून “अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।।” हा गीताश्लोक म्हणावा.

काही लोक याच वेळी “वदनी कवळ घेता…” इत्यादी श्लोक म्हणतात. त्यानंतर पात्राभिषेचन करताना दिवसा “सत्यं त्वा ऋतेन परिषिञ्चामि ।” व रात्री “ऋतं त्वा सत्येन परिषिंञ्चामि” असे  म्हणून पाणी फिरवतात. ऋत म्हणजे ‘रहाटी’ किंवा ‘पध्दती’ व सत्य म्हणजे ‘वास्तवता.’

             ‘जगातील व्यवहार करताना सत्य हेच एकमेव ध्येय राहील, अनीती, असत्य यांचा लवलेशही असणार नाही’ ही मनोधारणा होऊन अन्नभक्षण केले तर ते निश्चित सद्विचारी, सदाचारी व सुसंस्कृत बनविते. पात्राभिषेचनानंतर चित्राहुती दिल्या जातात. शाखाभेदानुसार चित्राहुतींची संख्या व नांवे बदलतात. पण सामान्यपणे ‘चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्वेभ्यो भूतेभ्यो स्वाहा’ या पाच आहुती देण्याची प्रथा आहे.

ताटाभोवती वावरणारे कृमिकीटक त्या आहुती खाण्यात गुंतल्यामुळे त्यांनी ताटात प्रवेश करू नये, ही त्यामागची व्यावहारिक भूमिका आहे. चित्र व चित्रगुप्त हे आपल्या कर्मांची नोंद करणारे, आणि यम व यमधर्म हे मानवी जगरहाटीवर नियंत्रण ठेवणारे असल्यामुळे त्यांना आहुती देऊन आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.

           चित्राहुतीनंतर आपोशन हा विधी येतो. ज्याप्रमाणे पूर्वी संबळीत देव ठेवत, त्याप्रमाणे दोन आपोशनानंतर अन्न ठेवत्याची कल्पना आहे. खाली एक पात्र ठेवून त्यात धान्य भरून जर झाकण लावल्यास ते धान्य सुरक्षित रहाते, असा अनुभव आहे. म्हणून पोटातील अन्नावर इतर कोणताही बाह्य कुसंस्कार होऊ नये म्हणून प्रथम “अमृतोपस्तरणमस्ति” (अमृता तू उपस्तरण किंवा खालचे पात्र आहेस) व शेवटी “अमृताधिपानमसि” (अमृता तू अधिपान किंवा झाकण आहेस) अशी आपोशणे घेतली जातात.

आपोशन म्हणजे उजव्या हातात थोडे पाणी घेऊन वरील मंत्र म्हणून ग्रहण करणे. आपोशणाचा शास्त्रीय अर्थ म्हणजे पोटातील जठरात एकदम अन्न सोडणे प्रकृतीला अनिष्ट असते. म्हणून प्रथम थोडे पाणी सोडून जठर आर्द्र करावे. नंतर प्राणाहुती घ्याव्यात.

           शरीरधारणेसाठी आवश्यक असे पंचप्राण असून त्यांच्या नावांनी दिलेल्या आहुती म्हणजे प्राणाहुती होत. “प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रम्हणे स्वाहा” या प्राणाहुतींचे शास्त्रीय कारण म्हणजे थोडे थोडे अन्न पोटात गेल्यामुळे धारणशक्ती वाढते, व पुढील अन्न घेताना तिडका लागत नाही. पोते भरताना देखील सुरुवातीला थोडे हलवून मग भरले जाते.

           हा मुख्य भोजनविधी आहे. हल्ली हा भोजनविधी पाळण्यापेक्षा तो टाळण्याची प्रवृत्ती होत चालली आहे. पण काही वर्षांनी त्याचे महत्व कळून येताच त्या विधीचे निश्चित पुनरुज्जीवन होईल असे वाटते.

, , , , , ,

संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.

भोजनविधी’ म्हणजे काय? त्यात धार्मिक व शास्त्रीय अर्थ आहे काय ?

भोजनविधी’ व आरोग्य या विषयी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *