सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १ ते २५ पहा.
सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ अष्टमोऽध्यायः ॥ अध्याय आठवा ॥ अक्षरब्रह्मयोग ॥
अध्याय आठवा
अर्जुन उवाचः
किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥8.1॥
1-8
मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिले । जे म्यां पुसिले । ते निरूपिजो ॥1॥
मग अर्जुन म्हणाला, ” अहो देवा! ऐकले का? मी जे विचारले ते मला स्पष्ट करून सांगा.
2-8
सांगा कवण तें ब्रह्म । काइसया नाम कर्म । अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥2॥
ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव, अथवा अध्यात्म कशाला म्हणतात,
3-8
अधिभूत तें कैसे । एथ अधिदैव तें कवण असे । हें उघड मी परियेसें । तैसें बोला ॥3॥
अधिभूत कसे, आणी या जगात अधिदैवत कोण आहे, हे मला नीट समजेल असे सांगा.”
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ 8.2 ॥
4-8
देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देही । हें अनुमानासि कांही । दिठी न भरे ॥4॥
“देवा, अधियज्ञ तो काय, व तो या देहांत कोणता, हे अनुमानानें नीट लक्षात येत नाही.
5-8
आणि नियता अंतःकरणी । तूं जाणिजसी देहप्रयाणी । तें कैसेनि हें शारंगपाणी । परिसवा मातें ॥5॥
हे शांर्गपाणि, ज्यांनी अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे, त्यांना अंतकाली तुम्हांला कसे ओळखता येते, हे मला चांगल्या रीतीने समजवा.”
6-8
देखा धवळारी चिंतामणीचा । जरी पहुडला होय दैवाचा । तरी वोसणताही बोल तयाचा । परी सोपु न वचे ॥6॥
(ज्ञानोबाराय म्हणतात) पहा की, चिंतामणीच्या मंदिरात एखादा दैववान मनुष्य जर निजला, तर तो जरी झोपेंत बरळला तरी त्याचे बरळणे व्यर्थ जात नाही,
7-8
तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवे । परियेसें गा बरवे । जें पुसिले तुवां ॥7॥
त्याचप्रमाणे, अर्जुनाच्या मुखांतून जी वाक्ये आली त्याबरोबर देव म्हणाले, ” तूं जे कांही पुसलेस ते नीट ऐक.”
8-8
किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥8॥
किरीटी हा कामधेनूचा बछडा असुन कल्पतरूच्या मंडपांत बांधलेला आहे, अर्थात् त्याच्या मनांतील सर्व हेतु सिद्धींस जातात यांत नवल ते काय?
9-8
कृष्ण कोपोनि ज्यासि मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी । मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥9॥
श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात, तो देखील ब्रह्मस्वरूपाला पावतो, मग ज्याला कृपादृष्टीने उपदेश करतील त्याला काय प्राप्त होणार नाही?
10-8
जैं कृष्णाचेया होइजे आपण । तैं कृष्ण होय आपुले अंतःकरण । मग संकल्पाचे आंगण । वोळगती सिद्धी ॥10॥
ज्या वेळेस कृष्णाचे आपण भक्त व्हावे, त्या वेळी आपले अंतःकरण कृष्णरूप बनते; मग संकल्परूप अंगणांत (आपल्या मनांत जे जे संकल्प येतील, ते ते पूर्ण करण्याकरिता) ऋद्धिसिद्धि सहज हात जोडून उभ्या असतात.
11-8
परि ऐंसे जें प्रेम । अर्जुनींचि आथि निस्सीम । म्हणऊनि तयाचे काम । सदा सफळ ॥11॥
परंतु अशा प्रकारचे जें निस्सीम प्रेम, ते एक अर्जुनाच्या ठिकाणींच अमर्याद आहे, म्हणून त्याच्या मनकामना नेहमीं पूर्ण होतात.
12-8
या कारणे श्रीअनंते । तें मनोगत तयाचें पुसतें । होईल जाणूनि आइतें । वोगरूनि ठेविलें ॥12॥
म्हणूनच, अर्जुन हा आतां आपल्या मनांतील गोष्ट मला विचारील, असे जाणून श्रीकृष्णांनी आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेविले.
13-8
जें अपत्य थानी निगे । त्याची भूक ते मातेसीचि लागे । एऱ्हवीं तें शब्दें काय सांगे । मग स्तन्य दे येरी ॥13॥
स्तनपान करुन दुर खेळत असलेल्या बालकाला भूक लागली आहे, हे त्याच्या आईलाच समजते. नाही तर त्याने मागितल्यावर मग का ती त्याला दूध पाजते?
14-8
म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी । हे नवल नोहे कांही । परि तें असो आइका काई । जें देव बोलते जाहले ॥14॥
अर्थात् कृपाळू अशा सद्गुरूचे ठिकाणी (आपल्या शिष्यासंबंधी) असले हे प्रेम असणे म्हणजे कांही नवल नव्हे. पण हे असो; देव जे कांही बोलले तें ऐका
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित॥8.3॥
15-8
मग म्हणितले सर्वेश्वरें । जें आकारी इये खोंकरें । कोंदलें असत न खिरे । कवणे काळी ॥15॥
मग सर्वेश्वर म्हणाले – जे या फुटक्या आकारांत (देहांत) ओतप्रोत भरलेले असुन कोणत्याही वेळी नाश पावत नाही
16-8
एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरि शून्यचि नव्हे स्वभांवें । वरि गगनाचेनि पालवे । गाळूनि घेतलें ॥16॥
बरे, त्याचा सुक्ष्मपणा पहावा तर स्वभावतः ते शुन्य नव्हे, पण अति पातळ अशा आकाशाच्या पदरानें गाळून घेतलेले आहे;
17-8
जें ऐसेंही परि विरूळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ॥17॥
अशा प्रकारचे जें विरळ आहे व जें प्रापंचिक ज्ञानाच्या मोटेतून (शरीरांतून) हालवले असतांही गळत नाही, त्याला ‘ परब्रह्म ‘ असे म्हणतात.
18-8
आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणे । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥18॥
आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने त्याचे जे धर्म त्याला जे जाणत नाही, व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही,
19-8
ऐशिया आपुलियाची सहज स्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ॥19॥
हे सुभद्रापते, अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठिकाणी निरंतर सहज स्थिति असते, त्याला अध्यात्म असे म्हणतात.
20-8
मग गगनी जेविं निर्मळें । नेणों कैंची एक वेळे । उठती घनपटळे । नानावर्णे ॥20॥
मग, निर्मळ आकाशांत नाना रंगाचे ढग एकदम कसे उत्पन्न होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही
21-8
तैसे अमूर्तीं तिये विशुध्दे । महदादि भूतभेदें । ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ॥21॥
त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मांत प्रकृति – अहंकारादि भेदांनी ब्रह्मांडांचे आकार होऊं लागतात.
22-8
पैं निर्विकल्पाचिये बरडी । कीं आदिसंकल्पाची फुटे विरूढी । आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांची ॥22॥
परंतु कल्पनातीत शुद्धब्रह्माच्या माळ जमिनीत, मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर उत्पन्न होऊन, त्याला लागलीच ब्रह्मांडाचे धोंडे (आकार) उत्पन्न होऊन त्यांनी तो लवतो.
23-8
तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे । माजीं होतियां जातियां नेणिजे । लेख जीवां ॥23॥
आकारांत पाहूं लागले म्हणजे तो त्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेंच भरलेला आहे असे दिसते, आणि त्या प्रत्येकांत किती जीव होतात व जातात याची गणना करतां येत नाही.
24-8
मग तयागोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हें असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥24॥
मग त्या ब्रह्मांडांच्या गोलाचे प्रत्येक अंशापासून असंख्यात आदिसंकल्प उत्पन्न होतात. असो, अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो.
25-8
परि दुजेनविण एकला । परब्रह्मचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥25॥
परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेकरूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते.
