सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १७६ ते २०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

176-9
मग जें कांहीं ते पढिन्नले । तें मर्कटें नारळ तोडिले । कां आंधळ्या हातीं पडिलें । मोती जैसें ॥176॥
मग त्या मूर्खांनी जे काही शास्त्राध्ययन केले असेल, ते म्हणजे माकडाने नारळ तोडल्याप्रमाणे किंवा अंधळ्याला मोती सांपडावे त्याप्रमाणे होय.
177-9
किंबहुना तयांचीं शास्त्रें । जैशी कुमारींहाती दिधलीं शस्त्रें । कां अशौच्या मंत्रें । बीजें कथिलीं ॥177॥
किंबहुना त्यांनी म्हटलेली ती शास्त्रे लहान मुलीच्या हातांत दिलेल्या शस्त्राप्रमाणे, अथवा अशुचिर्भूताला बीजांसह शिकवलेल्या मंत्राप्रमाणे निरर्थक होत.
178-9
तैसें ज्ञानजात तयां । आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया । तें आघवेंचि गेलें वायां । जे चित्तहीन ॥178॥
धनंजया, त्याचप्रमाणे, ज्यांचे चित्त स्वाधीन नाही, त्यांचे सर्व ज्ञान व आचरण ही व्यर्थ होत.
179-9
पैं तमोगुणाची राक्षसी । जे सद्बुद्धीतें ग्रासी । विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी ॥179॥
याप्रमाणे तमोगुणरूप राक्षसी सद्बुद्धीला ग्रासून ज्ञानाचा ठाव-ठिकाण नाहींसा करणारी आहे..
180-9
तिये प्रकृती वरपडे जाले । म्हणऊनि चिंतेचेनि कपोलें गेले । वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजीं ॥180॥
त्या प्रकृतीने जे ग्रस्त होतात, ते सदोदित चिंताक्रांत असून शिवाय तामस प्रकृतीच्या आयतेच घशांत उतरतात.
181-9
जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे । तेवींचि संतोषाचे चाकळे । अखंड चघळी ॥181॥
जी राक्षसी प्रकृति आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळवून असंतोषरूप मांसाचे गोळे निरंतर चघळते;

182-9
जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें चाटीत निघे बाहेरी । जे प्रमादपर्वतींचि दरी । सदाचि मातली ॥182॥
जी अनर्थरूप कानापर्यंत ओठ चाटीत बाहेर निघते; जी प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे;
183-9
जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा । जेअगस्ती गवसणी मूढां । स्थूलबुद्धी ॥183॥
जिच्या द्वेषरूप दाढा खसखसा चावून ज्ञानाचा चुराडा करतात, व जी अगस्ति ऋषीला असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूलबुद्धि लोकांना आसुरी मायेची गवसणी आहे;
184-9
ऐसे आसुरिये प्रकृतीचां तोंडीं । जे जाले गा भूतोंडीं । ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाचां ॥184॥
अशा प्रकारच्या त्या आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे बळी होऊन पडतात, ते भ्रांतिरूप कुंडांत बुडून जातात.
185-9
एवं तमाचिये पडिले गर्ते । न पविजतीचि विचाराचेनि हातें । हें असो ते गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं ॥185॥
याप्रमाणे जे अज्ञानाच्या खळग्यांत पडतात, ते विचाररूपी हाताला सांपडत नाहीत; इतकेच नव्हें, तर ते कोठे जातात त्याचा देखील पत्ता लागत नाही.
186-9
म्हणोनि असोतु इयें वायाणीं । कायशीं मूर्खाचीं बोलणीं । वायां वाढवितां वाणी । शिणेल हन ॥186॥
म्हणून ही निष्फल कथा राहूं दे. कारण, मूर्खांचे व्यर्थ वर्णन केले असता वाणीला शीण मात्र होईल.
187-9
ऐसें बोलिले देवें । तेथ जी म्हणितलें पांडवें । आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥187॥
असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन ‘ हो हो !’ असे म्हणाला. नंतर भगवान फिरून म्हणतात :- जिचे वर्णन केले असतां सुख होते, ती साधूंची कथा ऐक
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्॥9.13॥
188-9
तरी जयांचिये चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जयां निजेलियांतें उपासी । वैराग्य गा 188॥
ज्या साधूंच्या निर्मळ अंतकरणांत मी क्षेत्रसंन्यासी होऊन वास करितो; व जे निजले असतांही वैराग्य हें ज्यांची सेवा करिते, म्हणून ज्यांना स्वप्नांत सुद्धां विषयवासना होत नाही;
189-9
जयांचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करि राणिवा । जयांचें मन ओलावा । विवेकासी ॥189॥
ज्यांच्या सद्वासनेंत धर्म राज्य करतो, (ज्यांना अधर्माची इच्छा सुद्धां होत नाही) व ज्यांचे मन नेहमीं सद्विचाराला पुष्टि देते;
190-9
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसि आले । पालव नवे ॥190॥
जे ज्ञानरूप गंगेत स्नान करुन अंतर्बाह्य शुद्ध झाले, पूर्णब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीने तृप्त झाले, व शांतीला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे शांत झाले,
191-9
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आंनदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥191॥
जे ब्रह्माच्या रूपांतराला कोंब निघाल्याप्रमाणे आहेत, व जे धैर्यरूप मंडलाचे खांबच होत; त्याचप्रमाणे, जे आनंदसमुद्रांत बुडवून काढलेल्या कुंभाप्रमाणे ओतप्रोत भरलेले असून,
192-9
जयां भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥192॥
ज्यांना भक्तीची इतकी योग्यता वाटते की, ते मोक्षालाही मागे सर असे म्हणतात, व ज्यांच्या सहज लीलेंत नीति जागृत दिसते,
193-9
जे आघवांचि करणीं । लेइले शांतीची लेणीं । जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ॥193॥
ज्यांनी आपल्या सर्व अवयवांत शांतिरूप अलंकार घातले आहेत (ज्यांच्या इंद्रियांची विषयावर कधीही वासना जात नाही), व ज्यांनी आपल्या चित्ताची मज सर्वव्यापकाला गवसणी केली आहे;
194-9
ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव । जे जाणोनियां सर्व । स्वरुप माझे ॥194॥
असे जे महात्मे, ते भगवद्भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्त्विक प्रकृतीचे भाग्यच होत. ते माझ्या सर्व स्वरूपाला जाणतात
195-9
मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाही ॥195॥
आणि मग वाढत्या प्रेमाने ते महात्मे मला भजतात पण त्यांच्या मनोधर्मानें द्वैताला स्पर्श सुद्धा केलेला नसतो.
196-9
ऐसें मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥196॥
अर्जुना, अशा प्रकारे जे मद्रूप होऊन माझी सेवा करतात, त्यांच्या सेवेची आश्चर्यकारक गोष्ट सांगावयाची राहिली आहे ती ऐक.
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता:॥
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते॥9.14॥
197-9
तरी कीर्तनाचेनि नटनाचें । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे । जे नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥197॥
तरी हरिकीर्तनाच्या प्रेमाने तें नाचतात, त्यामुळे प्रायश्चित्ताचे सर्व व्यापार नाश पावले आहेत, व त्या किर्तनाने पापाचें नाव देखील राहूं दिले नाही.
198-9
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरुनि उठविली । यमलोकीं खुंटिली । राहाटी आघवी ॥198॥
यम म्हणजे मनोनिग्रह व दम म्हणजे इंद्रियनिग्रह यांना निकृष्ट दशा आणिली, तीर्थे आपापल्या जाग्यांवरून उठवून लावली, व यमलोकचे सर्व व्यापार बंद पाडले!
199-9
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें । तीर्थें म्हणती काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥199॥
यम म्हणूं लागला की; कोणाचे नियमन करावे? दम म्हणाला कोणाला जिंकावे? व तीर्थे म्हणूं लागली, ” आम्ही कशाचे क्षालन करावे? कारण दोष औषधासही उरले नाहीत!”
200-9
ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दुःखें । अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥200॥
याप्रमाणे माझ्या नामघोषाने जगांतील सर्व प्राण्यांची दुःखे नाहींतशीं होतात, व सर्व जग ब्रह्मसुखाने दुमदुमून जाते.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *