सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १००१ ते १०२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

1001-13
तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती । तया अकुळाची जाती- । गोत होय ॥13-1001॥
त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होते.
1002-13
तया अचर्चाचें चिन्ह । तया अपाराचें मान । तया अमनस्काचें मन । बुद्धीही होय ॥1002॥
ज्याच्या विषयी काही चर्चा करता येत नाही, अशा पुरुषाचे ही लक्षण होते, त्या अमर्याद पुरुषाचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धी ही प्रकृती होते.
1003-13
तया निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु । निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥1003॥
त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते, त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकाररहित पुरुषाचा अहंकार ही होऊन रहाते.
1004-13
तया अनामाचें नाम । तया अजाचें जन्म । आपण होय कर्म- । क्रिया तया ॥1004॥
त्या नामरहिताचे ही नाम होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते आणि त्याची क्रिया कर्म आपण होते.
1005-13
तया निर्गुणाचे गुण । तया अचरणाचे चरण । तया अश्रवणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षु ॥1005॥
त्या निर्गुणाचे गुण ही होते, त्या पायरहिताचे पाय ही होते. त्या कानरहिताचे कान ही होते व त्या नेत्ररहिताचे नेत्रही ही होते.

1006-13
तया भावातीताचे भाव । तया निरवयवाचे अवयव । किंबहुना होय सर्व । पुरुषाचें हे ॥1006॥
त्या भावातीताचे (जन्मादि सहा) भाव (विकार) ही होते व त्या अवयवरहित पुरुषाचे ही अवयव होते. फार काय सांगावे? ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते.
1007-13
ऐसेनि इया प्रकृती । आपुलिया सर्व व्याप्ती । तया अविकारातें विकृती- । माजीं कीजे ॥1007॥
याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्वव्यापकपणामुळे अविकार जो पुरुष त्याला विकारवान करते.
1008-13
तेथ पुरुषत्व जें असे । तें ये इये प्रकृतिदशे । चंद्रमा अंवसे । पडिला जैसा ॥1008॥
तेथे (त्या पुरुषाचे ठिकाणी) जो पुरुषपणा आलेले आहे, ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी सांगतात. ज्याप्रमाणे चंद्र अमवास्येस पडतो म्हणजे तेजोहीन होतो.
1009-13
विदळ बहु चोखा । मीनलिया वाला एका कसु होय पांचका । जयापरी ॥1009॥
अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो,
1010-13
कां साधूतें गोंधळी । संचारोनि सुये मैळी । नाना सुदिनाचा आभाळीं । दुर्दिनु कीजे ॥1010॥
अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात,

1011-13
जेवीं पय पशूच्या पोटीं । कां वन्हि जैसा काष्ठीं । गुंडूनि घेतला पटीं । रत्नदीपु ॥1011॥
गाईच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही अथवा लाकडात अग्नी असतांना जसा तो चकचकीत दिसत नाही.किंवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही.
1012-13
राजा पराधीनु जाहला । कां सिंहु रोगें रुंधला । तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ॥1012॥
राजा शत्रूच्या स्वाधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह जसा रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला की स्वत:च्या तेजाला मुकतो.
1013-13
जागता नरु सहसा । निद्रा पाडूनि जैसा । स्वप्नींचिया सोसा । वश्यु कीजे ॥1013॥
जागृत पुरुष जसा निद्रेने एकदम पडला असता म्हणजे झोपेच्या स्वाधीन झाला असता, तो स्वप्नातील हावेच्या भरीस पडून सुखदु:खभोगास पात्र केला जातो.
1014-13
तैसें प्रकृति जालेपणें । पुरुषा गुण भोगणें । उदास अंतुरीगुणें । आतुडे जेवीं ॥1014॥
त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याकारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने (सुखदु:खाच्या फेर्‍यात) सापडला जातो.
1015-13
तैसें अजा नित्या होये । आंगीं जन्ममृत्यूचे घाये । वाजती जैं लाहे । गुणसंगातें ॥1015॥
जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते, तेव्हा तो स्वभावत: जन्मशून्य व नित्य असूनही, त्याच्या अंगावर मृत्यूचे तडाखे बसतात.

1016-13
परि तें ऐसें पंडुसुता । तातलें लोह पिटितां । जेवीं वन्हीसीचि घाता । बोलती तया ॥1016॥
परंतु अर्जुना ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात,
1017-13
कां आंदोळलिया उदक । प्रतिभा होय अनेक । तें नानात्व म्हणती लोक । चंद्रीं जेवीं ॥1017॥
अथवा पाणी हलले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी (अज्ञानी) लोक चंद्राचे ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात,
1018-13
दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसें ये मुखा । कां कुंकुमें स्फटिका । लोहित्व ये ॥1018॥
आरशाच्या जवळपणामुळे पहाणार्‍याच्या मुखाला दुसरेपण येते अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो.
1019-13
तैसा गुणसंगमें । अजन्मा हा जन्मे । पावतु ऐसा गमे । एऱ्हवीं नाहीं ॥1019॥
त्याप्रमाणे हा पुरुष स्वत: अजन्मा असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी (गुणांचा संबंध टाकून पाहिले तर) तो जन्म पावत नाही.
1020-13
अधमोत्तमा योनी । यासि ऐसिया मानी । जैसा संन्यासी होय स्वप्नीं । अंत्यजादि जाती ॥1020॥
ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामधे अंत्यजादि होतो त्याप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज.

1021-13
म्हणौनि केवळा पुरुषा । नाहीं होणें भोगणें देखा । येथ गुणसंगुचि अशेखा- । लागीं मूळ ॥1021॥
म्हणून केवळ पुरुषाचा जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती ही होय.
उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥13.22॥

भावार्थ :-
प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृतीकार्याहून आपणास वेगळा पहाणारा, अनुमोदन देणारा (शास्ता) भर्ता, उपभोग घेणारा, महेश्वर, या शरीरामधे परमात्मा असे ज्याला म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडचा असा पुरुष अशी ज्यासंबंधी वदंता आहे (तो हाच). पुरुष हा प्रकृतीपेक्षा
वेगळा आहे.
1022-13
हा प्रकृतिमाजीं उभा । परी जुई जैसा वोथंबा । इया प्रकृति पृथ्वी नभा । तेतुला पा डु ॥1022॥
हा पुरुष प्रकृतीमधे उभा आहे खरा परंतु जुईच्या वेलास जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामधे जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामधे आहे.
1023-13
प्रकृतिसरितेच्या तटीं । मेरु होय हा किरीटी । माजीं बिंबे परी लोटीं । लोटों नेणे ॥1023॥
अर्जुना, प्रकृतीरूप नदीच्या तीरावर मेरुपर्वतासारखा हा असून तिच्यामधे याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वहात जात नाही.
1024-13
प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे । म्हणौनि आब्रह्माचें होये । शासन हा ॥1024॥
प्रकृती होते व जाते परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे.
1025-13
प्रकृति येणें जिये । याचिया सत्ता जग विये । इयालागीं इये । वरयेतु हा ॥1025॥
प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हिला हा नवरा आहे.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *