व्रतादिकांचा तिथिनिर्णय धर्मशास्त्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

व्रतादिकांचा तिथिनिर्णय

ज्या कर्मांना जो काल सांगितला असेल त्या कर्माकरिता तत्कालव्यापिनी तिथि घ्यावी. उदाहरणार्थ – विनायकव्रतामध्ये पूजन मध्यान्हकाळी सांगितले आहे; यास्तव, मध्यान्हकाळव्यापिनी तिथी घ्यावी. कर्मकाल जर दोन दिवसाम्चा असेल अथवा नसेल किंवा अंशतः असेल, तर युग्मवाक्याच्या अनुरोधाने पूर्वविद्धा किंवा परविद्धा तिथि घ्यावी. युग्मवाक्य हे द्वितीया तृतीया विद्धा घ्यावी, तृतीया द्वितीया विद्धा घ्यावी असे सांगते. यावरूनच -द्वितीयातृतीयांचे युग्म, चतुर्थीपंचमीचे युग्म, षष्ठीसप्तमीचे युग्म, अष्टमीनवमीचे युग्म, एकादशीद्वादशीचे युग्म, चतुर्दशीपौर्णिमांचे युग्म व अमावास्याप्रतिपदांचे युग्म- अशी युग्मे जाणावीत. गणपतीच्या व्रताविषयी चतुर्थी तिथि तृतीयेने विद्ध घ्यावी अशी जी विशेष वचने आहेत, त्यावरूनच तिथिनिर्णय ठरतो. विशेष वचनांनी सांगितलेल्या तिथीचा कर्मकाली जर अभाव असेल, तर सर्वसाधारण वचनाला अनुसरूनच तिथिनिर्णय करावा. ‘ज्या तिथिवर सूर्योदय होतो ती तिथि- स्नानदानजपादि कर्मांना पूर्ण आहे’ अशा प्रकारची सर्वसाधारण वचने आहेत. 

तिथिनिर्णयाची सामान्य परिभाषा
तिथीचे प्रकार दोन आहेत. एक पूर्णा तिथि व दुसरी सखंडा तिथि. सूर्योदयापासून आरंभ करून साठ घटका जिची व्याप्ति आहे ती पूर्णातिथि. याहून भिन्न ती सखंडा. शुद्धा व विद्धा असे तिचे (सखंडेचे) दोन प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणारी व शिवरात्र्यादिकांच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत राहणारी ती शुद्धा होय. याहून भिन्न ती विद्धा जाणावी. प्रातर्वेध व सायंवेध अशा दोन वेधांवरूनहि विद्धा तिथीचे दोन भेद होतात. सूर्योदयानंतर सहा घटकापर्यंत एका तिथीला दुसरी तिथि जर स्पर्श करीत असेल, तर तो प्रार्तर्वेध होय आणि सूर्यास्तापूर्वी सहा घटकांपर्यंत जर एका तिथीला दुसरी तिथि स्पर्श करिल तर तो सायंवेध होय. एकादशीव्रताचा वेध त्या प्रकरणात सांगितला आहे. काही तिथींना यापेक्षा अधिक वेध असतो. उदाहरणार्थ – पंचमी बारा घटकांनी षष्ठीला विद्ध करते, दशमी पंधरा घटकांनी एकादशीला विद्ध करते, चतुर्दशी अठरा घटकांनी पौर्णिमेला विद्ध करते. विद्ध तिथि काही कर्मांना साह्य आहेत व काहींना त्याज्य आहेत. संपूर्णा तिथि व शुद्धा तिथि यासंबंधाने संदेह नसल्यामुळे त्यांच्या निर्णयाची आवश्यकता नाही! त्याचप्रमाणे ज्या गोष्टींचा निषेध सांगितला आहे, त्या गोष्टी संबंधाने सखंडा तिथींचा देखील निर्णय सांगणे नलगे. कारण, ‘निषेध हा निवृत्ति स्वरूप असून, त्याला कालमात्राचीच केवळ अपेक्षा असते’ असे वचन आहे. या वचनालाच अनुसरून, अष्टम्यादि तिथींना नारळ वगैरे खाण्याचा जो निषेध सांगितला आहे, तो त्या तिथींच्या कालापुरताच लागू आहे, हे उघडच सिद्ध होते.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *