सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक ४१ ते ६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अहन्त्वाद्‌भिद्यतां स्वत्वं कूटस्थे तेन किं तव ।
स्वयं शब्दार्थ एवैष कूटस्थ इति मे भवेत् ॥ ४१ ॥
बरें, अहंपणा आणि स्वयंपणा यांमध्यें भेद ठरला; पणे त्याचा कूटस्थाशी काय संबंध ? तर येथें जो स्वयं शब्दाचा अर्थ तोच आमचा कूटस्थ. ॥ ४१ ॥

अन्यत्ववारकं स्वत्वमिति चेदन्यवारणम् ।
कूटस्थस्यात्मतां वक्तुरिष्टमेव हि तद्‌भवेत् ॥ ४२ ॥
आता कोणी म्हणेल, स्वयं शब्दाचा अर्थ “दुसरा नव्हे” असा होतो. तर त्याजवर आमचे असें म्हणणें आहे कीं, स्वयं शब्दाप्रमाणे आत्म्यालाही अन्यवारकत्व येतें. आतां कूटस्थ आणि आत्मा हे दोन्ही ज्याअर्थां आमच्या मते एकच आहेत, त्याअर्थां तो अर्थ आह्मांस इष्टच आहे. ॥ ४२ ॥

स्वयमात्मेति पर्यायस्तेन लोके तयोः सह ।
प्रयोगो नास्त्यतः स्वत्वमात्मत्वं चान्यवारकम् ॥ ४३ ॥
स्वयं आणि आत्मा हे दोन शब्द एकार्थक आहेत म्हणूनच लोकांमध्यें त्याचा एकत्र प्रयोग आढळत नाही. त्याकरिता “स्वयं” या शब्दाचा अर्थ जसा अन्यवारक होतो तसा आत्मशब्दाचाही होतो. ॥ ४३ ॥

घटः स्वयं न जानातीत्येवं स्वत्वं घटादिषु ।
अचेतनेषु दृष्टं चेद्दृश्यतामात्मसत्त्वतः ॥ ४४ ॥
“घट स्वतः जाणत नाहीं” इत्यादि प्रयोगावरून घटादिक अचेतन पदार्थास देखील स्वयं शब्द लागतो अशी शंका कोणी घेईल तर तीही आम्हाला विरुद्ध नाहीं. कारण आत्म्याची व्याप्ति स्फुरणरूपानें सर्वत्र असल्यामुळें स्वयं शब्द घटादिकांस लागणे हें योग्यच आहे. ॥ ४४ ॥

चेतनाचेतनभिदा कूटस्थात्मकृता न हि ।
किन्तु बुद्धिकृताभासकृतैवेत्यवगम्यताम् ॥ ४५ ॥
सचेतन आणि अचेतन हा भेद आत्म्यामुळें झालेला नाही. म्हणजे, अमुक पदार्थात आत्मा असला म्हणजे त्यास सचेतन म्हणावें, व अमुकांत तो नसला म्हणजे त्याला अचेतन म्हणावें असें कांहीं नाहीं. आत्मा सर्वव्यापक असल्यामुळें आत्म्याचे असणें नसणे हेंच मुळी अशक्य आहे. म्हणूनच वरील भेद बुद्धिप्रतिबिंबित चिदाभासामुळेंच झाला आहे. म्हणजे सजीव प्राण्याला अंतःकरण असतें. त्या अंतःकरणांत जे आत्म्याचे प्रतिबिंब तोच चिदाभास; तो जड पदार्थात नाहीं. म्हणून त्याचे असण्या नसण्यावर चेतनाचेतनभेद अवलंबून असतो. ॥ ४५ ॥

यथा चेतन आभासः कूटस्थे भ्रान्तिकल्पितः ।
अचेतनो घटादिश्च तथा तत्रैव कल्पितः ॥ ४६ ॥
आत्मा सचेतन आणि अचेतन या दोनही कल्पनांस आधार आहे. ज्याप्रमाणें चिदाभास कूटस्थावर भ्रांतीने कल्पिलेला आहे, त्याप्रमाणें घटादिक अचेतन पदार्थही कूटस्थावरच कल्पिलेले आहेत. दोन्हीचेही अधिष्ठान तोच आहे. ॥ ४६ ॥

तत्त्वेदन्तेऽपि स्वत्वमिव त्वमहमादिषु ।
सर्वत्रानुगते तेन तयोरप्यात्मतेति चेत् ॥ ४७ ॥
३ अशी एक शंका आहे कीं, तूं, मी, इत्यादिक पुरुषांमध्ये स्वशब्द जसा सामान्य आहे तसेंच तत्ता आणि इदंता हे शब्दही सामान्यत्वेकरून लागतात. तेव्हां स्वयं शब्दाप्रमाणें यालाही आत्मत्व येईल. ॥ ४७ ॥

ते आत्मत्वेऽप्यनुगते तत्त्वेदन्ते ततस्तयोः ।
आत्मत्वं नैव सम्भाव्यं सम्यक्त्वादेर्यथा तथा ॥ ४८ ॥
तर त्याचें समाधान हेच कीं, सत्ता वु इदंता हे शब्द अहमादिकांचीं जशी विशेषणे आहेत तशी आत्मत्वाचींही विशेषणे आहेत. म्हणून बरे, वाईट या विशेषणांस जसे आत्मत्व येत नाहीं, तसे यांसही येत नाहीं. ॥ ४८ ॥

तत्त्वेदन्ते स्वतान्यत्वे त्वन्ताअहन्ते परस्परम् ।
प्रतिद्वन्द्वितया लोके प्रसिद्धेनास्ति संशयः ॥ ४९ ॥
तूं, मी; तें, हें; आपण, दुसरा; ही शब्दयुग्में परस्पर विरुद्धार्थीं आहेत असे लोकांत प्रसिद्ध आहे यांत संशय नाहीं. ॥ ४९ ॥

अन्यतायाः प्रतिद्वन्द्वी स्वयं कूटस्थ इष्यताम् ।
त्वंतायाः प्रतियोग्येषोऽहमित्यात्मनि कल्पितः ॥ ५० ॥
अन्यतेचा प्रतियोगी जो “स्वयं” शब्द तो कूटस्थवाची असें समजावे. त्या कूटस्थ आत्म्यावर तूं या शब्दाचा प्र्तियोगी जो मी शब्द तो कल्पिलेला आहे. ॥ ५० ॥

अहंतास्वत्वयोर्भेदे रूप्यतेदन्तयोरिव ।
स्पष्टेऽपि मोहमापन्ना एकत्वं प्रतिपेदिरे ॥ ५१ ॥
इदंता आणि रूप्यता यामध्ये जसा भेद स्पष्ट आहे तसाच अहंता आणि स्वत्व यांमध्येही आहे. असें असूनही मनुष्य भ्रामामुळे ते एकच मानतो. ॥ ५१ ॥

तादात्म्याध्यास एवात्र पूर्वोक्ताविद्यया कृतः ।
अविद्यायां निवृत्तायां तत्कार्यं विनिवर्तते ॥ ५२ ॥
असें जें जीवकूटस्थांचे ऐक्य मानणें यालाच तादात्म्याध्यास म्हणतात. तो पूर्वोक्त अविद्येपासून होतो. त्या अविद्येची निवृत्ति झाली असता तिचे कार्यही नाहीसे होते. ॥ ५२ ॥

अविद्यावृतितादात्म्ये विद्ययैव विनश्यतः ।
विक्षेपस्य स्वरूपं तु प्रारब्धक्षयमीक्ष्यते ॥ ५३ ॥
अविद्येपासून होणारे आवरण आणि तादात्म्य ही विद्येचें योगानें नाश पावतात. परंतु विक्षेपाचे स्वरूप मात्र प्रारब्धक्षयापर्यंत असतें. ॥ ५३ ॥

उपादाने विनष्टेऽपि क्षणं कार्यं प्रतीक्ष्यते ।
इत्याहुस्तार्किकास्तद्वदस्माकं किं न सम्भवेत् ॥ ५४ ॥
उपादान कारणाचा नाश झाला तरी त्याचें कार्य क्षणभर रहाते असें नैय्यायिकांचे मत आहे, त्याचा स्वीकार आम्ही कां करूं नये ? ॥ ५४ ॥

तन्तूनां दिनसंख्यानां तैस्तादृक्क्षण ईरितः ।
भ्रमस्यासंख्यकल्पस्य योग्यः क्षण इहेष्यताम् ॥ ५५ ॥
आतां कोणी म्हणेल कीं, तार्किकांच्या मतीं कार्य क्षणभर रहातें असें आहे. परंतु विक्षेपरूप कार्य वर्षानुवर्ष रहा हें कसें ? तर ह्याचे उत्तर हेंच कीं, दिवसांच्या प्रमाणाने त्यांनीं क्षण सांगितला; परंतु आमची भ्रांति असंख्य कल्पांपासून चालत आल्यामुळें येथें वर्षानुवर्ष हाच क्षण आहे. ॥ ५५ ॥

विना क्षोदक्षमं मानं तैर्वृथा परिकल्प्यते ।
श्रुतियुक्त्यनुभूतिभ्यो वदतां किन्नु दुःशकम् ॥ ५६ ॥
येवढ्यावरून तार्किकांचें व आमचे मत एकच ! असें मात्र समजू नये. कारण तार्किक केवळ युक्तीवरच अवलंबून पाहिजे तसा तर्क करतात. तशी आमची गोष्ट नाहीं. श्रुति युक्ती आणि अनुभव ह्या तिन्हीविरून सिद्धांत करणारास काय भीति आहे ? ॥ ५६ ॥

आस्तां दुस्तार्किकैः साकं विवादः प्रकृतं ब्रुवे ।
स्वाहमोः सिद्धमेकत्वं कूटस्थपरिणामिनोः ॥ ५७ ॥
आता हा तार्किकाशीं वाद पुरे. एकंदरींत कूटस्थवाची स्वयंशब्द आणि त्याजवर दिसणारा जो अहं शब्द या दोन्हींचे एकत्व अज्ञानी मानतात असें ठरलें. ॥ ५७ ॥

भ्राम्यन्ते पण्डितंमन्याः सर्वे लौकिकतार्किकाः ।
अनादृत्य श्रुतिं मौर्ख्यात्केवलां युक्तिमाश्रिताः ॥ ५८ ॥
असें असून ही भ्रांति आहे, असें लोकांस कां समजत नाहीं ? असें जर म्हणाल तर याचे कारण हेंच कीं, मोठमोठे पंडित म्हणविणारे केवळ युक्ति लढवून मूर्खपणाने श्रुतीचा अनादर करून भ्रांतींत पडतात. ॥ ५८ ॥

पूर्वापरपरामर्शविकलास्तत्र केचन ।
वाक्याभासान्स्वस्वपक्षे योजयन्त्यप्यलज्जया ॥ ५९ ॥
ते, शास्त्राचा पूर्वापर संबंध मनांत न आणून वाक्याचे वरवर दिसणारे अर्थ आपापले पक्ष सिद्ध करण्याकरता निर्लज्जपणानें योजतात. ॥ ५९ ॥

कूटस्थादिशरीरान्तसंघातस्यात्मतां जगुः ।
लोकायताः पामराश्च प्रत्यक्षाभासमाश्रिताः ॥ ६० ॥
कूटस्थापासून स्थूल शरीरापर्यंत जो एक सगळा समुदाय त्यालाच लोकायत आणि पामर (अज्ञानी) हे आत्मा असें मानतात. कारण, प्रत्यक्ष तेवढे खरें असें त्यांना वाटतें. ॥ ६० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *