सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ६१ ते ८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

सदेवेत्यादिवाक्येन ब्रह्मसत्त्वं परोक्षतः ।
गृहीत्वा तत्त्वमस्यादिवाक्याद्व्यक्तिं समुल्लिखेत् ॥ ६१ ॥
त्याप्रमाणें “सदेव” इत्यादिक श्रुतिवाक्यानें ब्रह्म आहे असें परोक्षज्ञान झाल्यावर तत्त्वमस्यादि महावाक्यांचा विचारपर्वक अर्थ केला ते ब्रह्म मी आहें असा साक्षात्कार होईल. ॥ ६१ ॥

आदि मध्यावसानेषु स्वस्य ब्रह्मत्वधीरियम् ।
नैव व्यभिचरेत्तस्मादापरोक्षं प्रतिष्ठितम् ॥ ६२ ॥
दृष्टांताप्रमाणें येथेही महावाक्यापासन झालेले “मी ब्रह्म” असें जें ज्ञान त्याला आदि मध्य अवसानीं कोणताही व्यभिचार येत नाही, म्हणून महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान होतें हे सिद्ध. ॥ ६२ ॥

जन्मादिकारणत्वाख्यलक्षणेन भृगुः पुरा ।
परोक्षेण गृहीत्वाथ विचारात् व्यक्तिमैक्षत ॥ ६३ ॥
याप्रमाण प्रथमत: परोक्षज्ञान हाऊन मग पुढे महावाक्याचा विचारपर्वूक अर्थ केल्यानें साक्षात्कार होतो. याचा अनुभव कोणाला आला असें कोणी विचारील. तर त्याविषयी श्रुतीतच सांगितलें आहे. कोणीएक भृगुनामक ऋषि होता. त्याने “यतो वा इमानि भूतानि जायन्ते” इत्यादिक बापानें सांगितलेली वाक्यें ऐकून ब्रह्म सर्व जगाचें कारण आहे असें परोक्ष जाणून पुढे पंचकोशविवेक केल्यानें “तें ब्रह्म मी आहें” असा साक्षात्कार त्यास झाला. ॥ ६३ ॥

यद्यपि त्वमसीत्यत्र वाक्यं नोचे भृगोः पिता ।
तथाप्यन्नं प्राणमिति विचार्यस्थलमुक्तवान् ॥ ६४ ॥
जरी येथें “तूं ब्रह्म आहेस” असा भृगूच्या बापाने त्याला उपदेश केला नाहीं, तरी अन्नमयादि कोशांच्या विवेकेंकरून विचार करण्यास योग्य असें स्थळ त्यानें दाखवून दिलें. ॥ ६४ ॥

अन्नप्राणादि कोषेषु सुविचार्य पुनः पुनः ।
आनन्दव्यक्तिमीक्षित्वा ब्रह्मलक्षाप्ययूयुजत् ॥ ६५ ॥
अन्नमयादि कोशांचा पुन: पुन: विचार करून शेवटच्या कोशीं आपण आनंदमय आहों, असें समजून, तो आपल्याठायीं ब्रह्माच्या लक्षणांची योजना करता झाला. ॥ ६५ ॥

सत्यं ज्ञानमनन्तं चेत्येवं ब्रह्मस्वलक्षणम् ।
उक्त्वा गुहाहितत्वेन कोशेष्वेतत् प्रदर्शितम् ॥ ६६ ॥
“सत्यं ज्ञानमनन्तं” असे ब्रह्माचे लक्षण पूर्वी सांगून कोशरूप गुहेंत असणारे ब्रह्म त्यानें शिष्यास दाखविलें. ॥ ६६ ॥

पारोक्ष्येण विबुध्येन्द्रो य आत्मेयादिलक्षणात् ।
अपरोक्षीकर्तुमिच्छंश्चतुर्वारं गुरुं ययौ ॥ ६७ ॥
त्याचप्रमाणें छांदोग्य श्रुतीत दुसरे एक उदाहरण आहे. इंद्राला जेव्हां मोक्षाची इच्छा झाली तेव्हां “य आत्मापहत” या श्रुतीने ब्रह्म परोक्षत्वेंकरून जाणून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरितां चारवेळां गुरूकडे तो गेला. ॥ ६७ ॥

आत्मा वा इअदमित्यादौ परोक्षं ब्रह्मलक्षितम् ।
अध्यारोपापवादाभ्यां प्रज्ञानं ब्रह्म दर्शितम् ॥ ६८ ॥
“आत्मा वा इदं” इत्यादि श्रुतीने परोक्ष ब्रह्म दाखवून, अध्यारोप आणि अपवाद या दोहोंचे योगानें “प्रज्ञानं बह्म” या महावाक्यद्वारा प्रज्ञानरूप जो आत्मा. तोच ब्रह्म असें दाखविले. ॥ ६८ ॥

अवान्तरेण वाक्येन परोक्षब्रह्मधीर्भवेत् ।
सर्वत्रैव महावाक्यविचारात्त्वपरोक्षधीः ॥ ६९ ॥
श्रुतीमध्ये जी महावाक्ये आहेत तीं मात्र अपरोक्ष ज्ञानाला कारण आहेत. बाकी सर्व ब्रह्माचे लक्षण सांगणारीं जी वाक्यें त्यांपासून परोक्षज्ञान मात्र होतें. ॥ ६९ ॥

ब्रह्मापारोक्ष्यसिद्ध्यर्थं महावाक्यमितीरितम् ।
वाक्यवृत्तावतो ब्रह्मापरोक्ष्ये विमतिर्नहि ॥ ७० ॥
महावाक्यापासून ब्रह्माचें अपरोक्षज्ञान होतें हें सांगणें आमचे पदरचें नव्हे. ही गोष्ट शंकराचार्यांनी वाक्यवृत्ति ग्रंथांत सांगितली आहे. म्हणून एतद्विषयीं संशय घेणे नको. ॥ ७० ॥

आलम्बनतया भाति योऽस्मत्प्रत्ययशब्दयोः ।
अन्तःकरणसम्भिन्न बोधः स त्त्वंपदाभिधः ॥ ७१ ॥
तेथें आचार्यांनी त्वंपदाचा असा अर्थ केला आहे कीं, जो “मी” या ज्ञानाला आणि “मी” या शब्दाला विषय होऊन प्रकाशणारा असा अंतःकरणाचा जो साक्षी बोधरूप आत्मा त्यालाच त्वं असे म्हणतात, ॥ ७१ ॥

मायोपाधिर्जगद्योनिः सर्वज्ञत्वादिलक्षणः ।
पारोक्ष्यशबलः सत्याद्यात्मकस्तत्पदाभिधः ॥ ७२ ॥
माया आहे उपाधि ज्याला जो जगाची योनि म्हणजे कारण, सर्वज्ञत्वादि कारणेंकरून जो युक्त, आणि जो परोक्षत्व धर्मयुक्त आणि सत्य-ज्ञानानंतरूप, जो कोणी आहे त्यास तत् असें म्हणतात. ॥ ७२ ॥

प्रत्यक्परोक्षतैकस्य सद्वितीयत्वपूर्णता ।
विरुद्ध्येते यतस्तस्माल्लक्षणा संप्रवर्तते ॥ ७३ ॥
एकाच वस्तूस परोक्षता आणि अपरोक्षता तसेच सद्वितीयता आणि पूर्णता ही असणें हें विरुद्ध आहे, याकरितां त्या विरोधाचे परिहारार्थ लक्षणावृत्ति म्हणोन जी वाक्यार्थ करण्याची रीत आहे ती येथें घेतली पाहिजे. ॥ ७३ ॥

तत्त्वमस्यादिवाक्येषु लक्षणा भागलक्षणा ।
सोऽयमित्यादिवाक्यस्यपदयोरिव नापरा ॥ ७४ ॥
तत्त्वमस्यादि वाक्यांचेठायीं जी लक्षणावृत्ति घ्यावयाची ती भागत्यागलक्षणा घेतली पाहिजे. दुसरी नाहीं. भागत्यागलक्षणा म्हणजे काय, तें येथें सांगितले पाहिजे लक्षणेचे प्रकार तीन आहेत जहत्, अजहत् आणि जहदजहत्. त्यापैकी तिसरी येथे घेतली पाहिजे. त्यास उदाहरण “सोऽयं देवदत्त:” याचा अर्थ काल पुण्यांत धोतर पांघरून आलेला जो देवदत्त भट तोच हा शालजोडी पांघरलेला आज येथें आला आहे. ॥ ७४ ॥

संसर्गो वा विशिष्टो वा वाक्यार्थो नात्र संमतः ।
अखण्डैकरसत्वेन वाक्यार्थो विदुषां मतः ॥ ७५ ॥
“गाय आण” या वाक्यांत लक्षणावृत्तीवांचून संबंधाने स्पष्टार्थ होतो. यास संसर्गार्थ म्हणतात. आणि “नीलोत्पलं” या वाक्यांतही निळे कमळ असा अर्थ स्पष्ट होतो. यास विशिष्टार्थ म्हणतात. तशी महावाक्याची गोष्ट नाही. त्याचा अर्थ करताना ब्रह्माचे अखंडैकरसत्व सिद्ध: झालें पाहिजे. असाच अर्थ सर्व विद्वानां समान्य आहे. ॥ ७५ ॥

प्रत्यग्बोधो य आभाति सोऽद्वयानन्दलक्षणः ।
अद्वयानन्दरूपश्च प्रत्यग्बोधैकलक्षणः ॥ ७६ ॥
बुद्ध्यादिकांचा साक्षी जो प्रत्यग्बोध अहंबुद्धीस विषय भासतो, तो अद्वयानंदरूप आहे. आणि जो अद्वयानंदरूप परमात्मा, तो प्रत्यग्भोधरूप साक्षी आहे. ॥ ७६ ॥

इत्थमन्योऽन्यतादात्म्यप्रतिपत्तिर्यदा भवेत् ।
अब्रह्मत्वं त्वमर्थस्य व्यवर्तेत तदैव हि ॥ ७७ ॥
असे एकमेकांचें ऐक्य जेव्हां सिद्ध होईल, तेव्हां त्वंपदवाच्य जीव ब्रह्म नव्हेंसें जे वाटते ते वाटणे नाहींसें होते. ॥ ७७ ॥

तदर्थस्य च पारोक्ष्यं यदेवं किं ततः शृणु ।
पूर्णानन्दैकरूपेण प्रत्यग्बोधोऽवतिष्ठते ॥ ७८ ॥
आणि तत् पदाची परोक्षता, ही तत्काल नाहींशी होते. असे झाले असतां पूर्णानंद स्वरूपी प्रत्यग्बोध साक्षीच केवळ रहातो. ॥ ७८ ॥

एवं सति महावाक्यात्परोक्षज्ञानमीर्यते ।
यैस्तेषां शास्त्रसिद्धान्तविज्ञानं शोभतेतराम् ॥ ७९ ॥
असे असून महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञानच होत नाहीं असे जे म्हणतात त्यांचे शास्त्रसिद्धांतज्ञान कोठवर वर्णावे. ॥ ७९ ॥

आस्तां शास्त्रस्य सिद्धान्तो युक्त्या वाक्यात्परोक्षधीः ।
स्वर्गादिवाक्यवन्नेवं दशमे व्यभिचारतः ॥ ८० ॥
तूर्त शास्त्रसिद्धांत असू दे. परंतु, युक्तीने जर पाहिले तर कोणत्याही वाक्यापासून परोक्षच ज्ञान होते असे ठरते. कारण, स्वर्गप्रतिपादक सर्व वाक्यें परोक्षज्ञानच देणारी आहेत, असे कोणी लणेल तर “तूं दशम आहेस” या वाक्यांत या नियमास व्यभिचार येतो. कारण, या वाक्याने अपरोक्षज्ञानही होते. ॥ ८० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *