सार्थ पंचदशी मराठी त्रयोदशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे अद्वैतानन्दः श्लोक ४१ ते ६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

निस्तत्त्वं भासमानं च व्यक्तमुत्पत्तिनाशभाक् ।
तदुत्पत्तौ तस्य नाम वाचा निष्पाद्यते नृभिः ॥ ४१ ॥
व्यक्ते नष्टेऽपि नामैतन्नृवक्त्रेष्वनुवर्तते ।
तेन नाम्ना निरूप्यत्वाद्‌व्यक्तं तद्‌रूपमुच्यते ॥ ४२ ॥
निस्तत्त्वत्वाद्विनाशित्वाद्वाचारम्भणनामतः ।
व्यक्तस्य न तु तद्‌रूपं सत्यं किञ्चिन्मृदादिवत् ॥ ४३ ॥
व्यक्तकाले ततः पूर्वमूर्ध्वमप्येकरूपभाक् ।
स तत्त्वमविनाशं च सत्यं मृद्वस्तु कथ्यते ॥ ४४ ॥

व्यक्तं घटो विकारश्चेत्येतैर्नामभिरीरितः ।
अर्थश्चेदनृतः कस्मान्न मृद्बोधे निवर्तते ॥ ४५ ॥

निवृत्त एव यस्मात्ते तत्सत्यत्वमतिर्गता ।
ईदृङ्निवृत्तिरेवात्र बोधजा न त्वभासनम् ॥ ४६ ॥

पुमानधोमुखो नीरे भातोऽप्यस्ति न वस्तुतः ।
तटस्थमर्त्यवत्तस्मिन्नैवास्था कस्यचित्क्वचित् ॥ ४७ ॥

ईदृग्बोधे पुमर्थत्वं मतमद्वैतवादिनाम् ।
मृद्‌रूपस्य परित्यागाद्विवर्तत्वं घटे स्थितम् ॥ ४८ ॥

परिणामे पूर्वरूपं त्यजेत्तत्क्षीररूपवत् ।
मृत्सुवर्णे निवर्तेते घटकुण्डलयोर्न हि ॥ ४९ ॥

घटे भग्ने न मृद्‌भावः कपालानामवेक्षणात् ।
मैवं चूर्णेऽस्ति मृद्‌रूपं स्वर्णरूपं त्वतिस्फुटम् ॥ ५० ॥

शि० -मग एकून घट खोटाच तर ? गु० -यांत संशय काय ? जो पदार्थ स्वतः निस्तत्त्व असून व्यक्त झाल्यावर मात्र भासणारा, ज्याला उत्पत्ति व नाश आहेत व ज्याला कांहीं एका नावाने ओळखावयाचा, असा जो घट त्याला सत्य कोण म्हणेल ? ॥ ४१ ॥
घट शब्दान घटाचा व्यवहार असल्यामुळे घटाच स्वरूप शब्दात्मकच आहे, कारण व्यक्त कार्य नष्ट झाल्यावरही घट हें नांव मनुष्याचे तोंडांत तसेंच असतें. ॥ ४२ ॥
घटरूप कार्य निस्तत्त्व आहे, नाशवंत आहे आणि केवळ शब्दात्मक आहे. म्हणून हें घटाचे स्वरूप मृत्तिकेप्रमाणे सत्य म्हणतां येत नाहीं. ॥ ४३ ॥
शिं०-मग मृत्तिकेमध्यें तरी सत्यत्वाचे गूण कुठे आहेंत ? गु० -खर्‍याचें लक्षण म्हणजे हेंच कीं, त्यांत कांहीं तत्त्व असून कालत्रयीही त्याचा नाश होऊं नये. माती तशीच आहे. घट व्यक्त असतांनाही तीच आहे, घटापूर्वीही तीच आहे आणि घट फुटल्यानंतरही तीच आहे. म्हणून ती येथें सत्यच म्हटली पाहिजे. ॥ ४४ ॥
शि -व्यक्त, घट आणि विकार या तीन शब्दांनी दर्शविलेला जो घटपदार्थ, तो जर खोटा तुम्ही खोटां म्हणतां, तर शुक्तिकाज्ञानानें जसे रजत नाहीसे होते तसा मृत्तीकेच्या ज्ञानाने तोही कां नष्ट होत नाही ? गु० -अरे, ज्या अर्थीं घटाविषयीची सत्यत्वबुद्धि नष्ट झाली त्या अर्थीं तो घट नष्ट झाला असेंच समजले पाहिजे. ॥ ४५ ॥
शिष० -पण शुक्तिज्ञानानें रजत अगदीच नाहीसे होतें. गु० -त्याचें कारण हेंच कीं, तो रजतभ्रम निरुपाधिक आहे; परंतु येथें तसें नाहीं, येथील भ्रम सोपाधिक आहे. म्हणून अधिष्ठानज्ञानापासून होणारी जी निवृत्ति तिचा अर्थ त्या वस्तूचे आभान असें समजू नये. ती खोटी आहे असें समजले म्हणजे झाले. ॥ ४६॥
शि० -मला तुमचे म्हणणें नीट समजले नाहीं. गु० -याविषयी तुला एक दृष्टांत देतो म्हणजे समजेल कल्पना कर कीं, नदीतीरीं एक मनुष्य उभा असून त्याचें अधोमुख प्रतिबिंब आत पडलें आहे, ते जरी डोळ्याला दिसलें तरी त्या उम्या असलेल्या मनुष्याप्रमाणे पाण्यांत दिसलेल्या मनुष्याविषयी कोणाला कधीं तरी खरेपणा वाटेल काय ? ॥ ४७ ॥
शि ० – होय, मग एवढ्या ज्ञानाने पुरुषार्थसिद्धि झाली काय ? गु० -आमच्या अद्वैतवाद्यांचे मत असेंच आहे. अशा प्रकारच्या ज्ञानानेंच मोक्षप्राति होते. शि० -पण मृत्तिकेवर घट हा केवळ भासमात्र. आहे असें जर मानले तर तिच्या ज्ञानाने घटाविषयींची सत्यत्वबुद्धि नाहीशी व्हावी ती कोठे होते ? गु० -घटातील माती वजा केली असतां घटाचे स्वरूप काय राहिलें सांग. अशा विचाराने तो खोटा ठरतो ॥ ४८ ॥
शि० -पण घट हा विवर्ताचे उदाहरण नाहीं. तें परिणामाचे आहे. गु० -तें परिणामाचे नव्हे. कारण, परिणामांत पूर्वरूप जाऊन दुसरे रूप येते. जसें दुधाचे दही. परंतु कुंडलाची व सुवर्णांची गोष्ट तशी नाही. कुंडलातील सुवर्ण व घटांतील माती यांचें रूपांतर होत नाही. ॥ ४९ ॥
शि ० -पण घट फुटला असतां माती कोठे दिसते ? केवळ खापऱ्या मात्र दिसतात. गु० -नुसत्या फोडण्याने जरी माती दिसली नाहीं तरी पूड केली असतां ती दिसते. कुंडलाविषयी तर सांगावयास नको, सुवर्ण त्यांत स्पष्ट आहेच ॥ ५० ॥

क्षीरादौ परिणामोऽस्तु पुनस्तद्‌भाववर्जनात् ।
एतावता मृदादीनां दृष्टान्तत्वं न हीयते ॥ ५१ ॥

आरम्भवादिनः कार्ये मृदो द्वैगुण्यमापतेत् ।
रूपस्पर्शादयः प्रोक्ताः कार्य कारणयोः पृथक् ॥ ५२ ॥
मृत्सुवर्णमयश्चेति दृष्टान्तत्रयमारूणिः ।
प्राहातो वासयेत्कार्यानृतत्वं सर्ववस्तुषु ॥ ५३ ॥
कारणज्ञानतः कार्यविज्ञानं चापि सो वदत् ।
सत्यज्ञानेऽनृतज्ञां कथमत्रोपपद्यते ॥ ५४ ॥
समृत्कस्य विकारस्य कार्यता लोकदृष्टितः ।
वास्तवोऽत्र मृदंशोऽस्य बोधः कारणबोधतः ॥ ५५ ॥
अनृतांशो न बोद्धव्यस्तद्बोधानुपयोगतः ।
तत्त्वज्ञानं पुमर्थं स्यान्नानृतांशावबोधनम् ॥ ५६ ॥
तर्हि कारणविज्ञानात्कार्यज्ञामितीरिते ।
मृद्बोधान्मृत्तिका बुद्धेत्युक्तं स्यात्कोऽत्र विस्मयः ॥ ५७ ॥
सत्यं कार्येषु वस्त्वंशः कारणात्मेति जानतः ।
विस्मयो मास्त्विहाज्ञस्य विस्मयः केन वार्यते ॥ ५८ ॥
आरम्भी परिणामी च लौकिकश्चैककारणे ।
ज्ञाते सर्वमतिं श्रुत्वा प्राप्नुवन्त्येव विस्मयम् ॥ ५९ ॥
अद्वैतेऽभिमुखीकर्तुमेवात्रैकस्य बोधतः ।
सर्वबोधः श्रुतौ नैव नानात्वस्य विवक्षया ॥ ६० ॥

शि ० -तुम्ही परिणामाविषयी दूध, दही, कृतिका, घट आणि सुवर्णकुंडलें असे तीन दृष्टांत दिलेत, त्यापैकीं घट आणि कुंडले यांस जर विवर्तवाद लागू होतो, तर तो दूध, दह्याही कां लागू पडू नये ? गु० -दह्यास पुनः दुधाचे स्वरूप येत नाहीं, तशी घट कुंडलाची गोष्ट नाही कारण त्यांना पुनः पूर्वरूप येतें यावरून आम्ही जे दृष्टांत दिले ते बरोबर आहेत. ॥ ५१ ॥
शि ० -मृत्तिका आणि सुवर्ण यांस जसे परिणाम आणि विवर्त लागू पडतात तसा आरंभवादही कां न लागू पडावा ? गु० -आरंभवाद्यांचें मत असें आहे कीं, कार्याचे आणि कारणाचे स्पर्शादि गुण अगदीं पृथक् असतात; पण तसें द्वैगुण्य मृत्तिकेचे ठायीं दिसत नाही. ॥ ५२ ॥
वेदांमध्ये उद्दालकऋषींनी विवर्ताविषयी मृत्तिका, सुवर्ण आणि लोखंड असे तीन दृष्टांत दिले आहेत, त्यावरून कार्य खोटे आहे असा सिद्धांत होतो. तोच सर्व चराचर वस्तूंचे ठायीं लावून चांगला ठसवावा. ॥ ५३ ॥
शि० -कार्याचा खोटेपणा ठसवावा असें तरी कां सांगितले ? गु० -कारणाचे ज्ञान झालें म्हणजे कार्याचेंही ज्ञान होतें. शि० -कारण हें सत्य आहे आणि कार्य हें मिथ्या असें असून सत्याच्या ज्ञानाने मिथ्या ज्ञान होतें. असें म्हणण्यांत विरोध नाहीं काय ? ॥ ५४ ॥
गु० -विचारदृष्टीने पाहशील तर विरोध मुळींच नाही. मृत्तिकेसहित जो घटरूप विकार त्याला कार्य असें लोक म्हणतात. या कार्यात एक सत्यांश आहे आणि एक असत्यांश आहे. येथें मृत्तिका सत्यांश आहे, त्या अंशाचे ज्ञानकारण ज्ञानाने होतें. मग विरोध कसचा ? ॥ ५५
शि० -सत्यांश जसा समजतो तसा मिथ्यांशही समजेल. गु० -मिथ्यांशाचा मुळीच उपयोग नसल्यामुळे तो समजण्यास योग्य नाहीं. खऱ्या तत्त्वाचे जें ज्ञान तोच पुरुषार्थ. असत्यांश जाणून फळ काय ? ॥ ५६ ॥
शि० -तर कारणज्ञानापासून कार्यज्ञान होतें कसें म्हणणे म्हणजे मृत्तिकाज्ञानापासून मृत्तिकाज्ञान होतें असें म्हटल्याप्रमाणें आहे. यांत अधिक काय सांगितल्यासारखे झालें ? ॥ ५७ ॥
गु० -खरें, नवल नाहींच; पण तें कोणाला नाहीं ? कार्याचे ठायीं जो सत्यांश आहे, तो कारणस्वरूपीच आहे असें ज्यांना समजले, त्यांना कांहीं नवल नाहीं; पण अज्ञान्यांचे नवल कोठे जाईल ? ॥ ५८ ॥
कारणापासून कार्य भिन्न मानणारे जे आरंभवादी, पर्वूरूपाचा त्याग होऊन रूपांतर होतें असें मानणारे जे परिणामवादी आणि शास्त्र न जाणणारे सर्व लोक यांना कारणज्ञानापासून कार्यज्ञान होतें असें ऐकून विस्मय झालाच पाहिजे. ॥ ५९ ॥
शि० – एका कारणाच्या ज्ञानाने अनेक कार्यांचें ज्ञान हाते असा श्रुतीने सांगितलेला अर्थ एकीकडे ठेवून एवढ्या लांबलचक व्याख्यानाचे कारण काय ? गु० -श्रुतीचे अद्वैतपर तात्पर्य लोकांस समजत नाहीं म्हणन व्याख्यान केलें पाहिजे. अद्वैतमताचे ज्ञान शिष्यास व्हावें म्हणन छांदोग्य श्रुतींत कारणाच्या ज्ञानानें कार्याचें ज्ञान होते असें सांगितलें. अनेक कार्यांचे ज्ञान व्हावें हा कांहीं तिचा हेतु नाहीं. ॥ ६०

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *