सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अयमित्यपरोक्षत्वमुच्यते चेत्तदुच्यताम् ।
स्वयंप्रकाशचैतन्यमपरोक्षं सदा यतः ॥ २१ ॥
ज्याप्रमाणे “हा घट” असें म्हणून घटाची प्रत्यक्षता दर्शविली जाते, त्याप्रमाणें “अयं अस्मि” यांतही “अयं” शब्दाचा अर्थ प्रत्यक्षतादर्शक आहे. अशी जर कोणाला शंका असेल तर तोही अर्थ आम्हास मान्यच आहे. कारण आ-त्मचैतन्य स्वयंप्रकाश असल्यामुळें तें भासण्यास इतर साधनाची गरजच नाहीं. ॥ २१ ॥

परोक्षमपरोक्षं च ज्ञानमज्ञानमित्यदः ।
नित्यापरोक्षरूपेऽपि द्वयं स्याद्दशमे यथा ॥ २२ ॥
“अयं” या दर्शक सर्वनामाच्या प्रयोगावरून आत्म्यास परोक्षत्व प्रत्यक्षत्व तसेच ज्ञान आणि अज्ञान ही युग्मे संभवतात असें दिसतें. तर तुमचा आत्मा नित्य अपरोक्ष असून हें कसें ? या प्रश्राचें उत्तर पुढील दशमाच्या दृष्टांतावरून ध्यानांत येईल. ॥ २२ ॥

नवसंख्याहृतज्ञानो दशमो विभ्रमात्तदा ।
न वेत्ति दशमोऽस्मीति वीक्ष्यमाणोऽपि तान्नव ॥ २३ ॥
कल्पना करा कीं, दहा असामी मिळून नदी उतरून जात आहेत. नदी उतरल्यानंतर आपण सर्व सु-रक्षितपणें आलों कीं नाहीं, हें पाहण्याकरितां त्यांतील एक मनुष्य सर्वांस मोजून पाहतो तों आपली गणना न करतां बाकीच्यांस मात्र मोजल्यामुळे प्रत्यक्ष आपल्यापुढे नऊ असामींस पहात असूनही मी दहावा हें जाणत नाहीं. हे त्याचे दशमाविषयींचें अज्ञान झालें ॥ २३ ॥

न भाति नास्ति दशम इति स्वं दहमं तदा ।
मत्वा वक्ति तदज्ञानकृतमावरणं विदुः ॥ २४ ॥
दहावा आपण असून दहावा नाहीं आणि दिसतही नाहीं असें मानतो हे अज्ञानकृत आवरण झालें. ॥ २४ ॥

नद्यां ममार दशम इति शोचन्प्ररोदिति ।
अज्ञानकृतविक्षेपं रोदनादिं विदुर्बुधः ॥ २५ ॥
मग भ्रमाने दहावा नदींत वाहून गेलारे गेला असा शोक करून मोठ्यानें रडूं लागतो. या स्थितीस अज्ञानकृत विक्षेप म्हणतात. ॥ २५ ॥

न मृतो दशमोऽस्तीति श्रुत्वाप्तवचनं तदा ।
परोक्षत्वेन दशमं वेत्ति स्वर्गादिलोकवत् ॥ २६ ॥
इतक्यांत तेथें एक आप्त आला, त्याणें रडण्याचें कारण पुसून त्याला असें सांगितलें कीं, रडतोस कां दहावा जीवंत आहे. है त्याचें “स्वर्ग आहे” या श्रुतिवाक्याप्रमाणें, विश्वसनीय वाक्य ऐकून जे त्याला दशमाविषयींचें ज्ञान झालें ते परोक्षज्ञान. ॥ २६ ॥

त्वमेव दशमोऽसीति गणयित्वा प्रदर्शितः ।
अपरोक्षतया ज्ञात्वा हृष्यत्येव न रोदिति ॥ २७ ॥
मग त्याच आप्तानें त्याच्या देखत सर्वांस मोजून “हे नऊ आणि तूं दहावा” असें म्हणून डोक्यावर काठी मारून दाखविले तेव्हां मीच दशम असें जाणून रडणे बंद करून हर्षाने हंसतो हें अपरोक्षज्ञान. ॥ २७ ॥

अज्ञान अवृतिविक्षेप द्विविधा ज्ञान तृप्तयः ।
शोकापगम इत्येते योजनीयाश्चिदात्मनि ॥ २८ ॥
या दशमाच्या दृष्टांताप्रमाणें अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्षज्ञान; अपरोक्षज्ञान, शोकनिवृत्ति आणि तृप्ति या सात अवस्था चिदात्म्याच्याठायीं ताडून पहाव्या; ॥ २८ ॥

संसारासक्तचित्तः संश्चिदाभासः कदाचन ।
स्वयंप्रकाशकूटस्थं स्वतत्त्वं नैव वेत्त्ययम् ॥ २९ ॥
त्या अशा कीं, दृष्टांतांतील दशमाप्रमाणें हा चिदाभास संसारांत आसक्त होऊन गुरूची गांठ पडण्यापूर्वी आपलें स्वस्वरूप जो “कूटस्थ” त्याला मुळीच जाणत नाहीं. हे येथे अज्ञान ही पहिली अवस्था समजावी. ॥ २९ ॥

न भाति नास्ति कूटस्थ इति वक्ति प्रसङ्गतः ।
कर्ता भोक्ताहमस्मीति विक्षेपं प्रतिपद्यते ॥ ३० ॥
पुढें प्रसंगवशात् कूटस्थाविषयीं प्रश्न निघाला असतां कूटस्थ मला दिसत नाहीं व मुळींच नाहीं असें तो म्हणता, हे त्याचे अज्ञानकृत आवरण. आणि मी कर्ता आहें, मी भोक्ता आहें, असा जो पुढे बहकत सुटतो हा विक्षेप. ॥ ३० ॥

अस्ति कूटस्थ इत्यादौ परोक्षं वेत्ति वार्त्तया ।
पश्चात्कूटस्थ एवास्मीत्येवं वेत्ति विचारतः ॥ ३१ ॥
पुढें “कूटस्थ आहे” असें आप्तवचन ऐकून जें त्याला ज्ञान होते तें परोक्षज्ञान – आणि नंतर श्रवणमननादिकेकरून गुरुकृपा झाल्यावर “तो कूटस्थ मी आहें” असे जें निश्चयात्मक ज्ञान होते ते अपरोक्षज्ञान. ॥ ३१ ॥

कर्ता भोक्तेत्येवमादिशोकजातं प्रमुञ्चति ।
कृतं कृत्यं प्रापणीयं प्राप्तमित्येव तुष्यति ॥ ३२ ॥
हें ज्ञान झोल्यावर “मी कर्ता, मी भोक्ता” अशा भ्रांतीपासून होणारा त्याचा शोक नाहीसा होतो ही शोकनिवृत्ति, आणि शोकनिवृत्तीनंतर “करावयाचे ते मी केलें” व “मिळवावयाचे ते मी मिळविलें” अशी धन्यता वाटून तो तृप्त होतो ही सातवी अवस्था. ॥ ३२ ॥

अज्ञानमावृतिस्तद्वद्विक्षेपश्च परोक्षधीः ।
अपरोक्षमतिः शोकमोक्षस्तृप्तिर्निरङ्कुशा ॥ ३३ ॥
येणेंप्रमाणें अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्षज्ञान, अपरोक्षज्ञान, शोकनिवृत्ति आणि निरंकुश तृप्ति- ॥ ३३ ॥

सप्तावस्था इमाः सन्ति चिदाभासस्य तास्विमौ ।
बन्धमोक्षौ स्थितौ तत्र तिस्रो बन्धकृतः स्मृताः ॥ ३४ ॥
या सात अवस्था आत्म्याला आहेत असें समजू नये. त्या केवळ चिदाभासालाच आहेत. या सातांत, बंधमोक्ष दोन्हीही येतात. त्यापैकी पहिल्या तीन बंध करणार्‍या, आणि बाकीच्या चार मोक्ष देणार्‍या आहेत. ॥ ३४ ॥

न जानामीत्युदासीनव्यवहारस्य कारणम् ।
विचारप्रागभावेन युक्तमज्ञानमीरितम् ॥ ३५ ॥
पहिल्या तीन बंधकारक म्हणून सांगितले. त्यांतील पहिली अवस्था जे अज्ञान त्याचें स्वरूप आतां स्पष्ट करून दाखवू. आत्मतत्त्वाचा विचार मनांत येण्यापूर्वी मनुष्याचा जो सहज व्यवहार असतो त्याला कारणीभूत “मी जाणत नाहीं” अशी जी बुद्धि तेच अज्ञान. हे अज्ञान मनुष्याच्या जंगांत इतके भिनले गेलें आहे कीं, आपल्यास समजत नाहीं हे सुद्धां त्यांचे गांवीं नाहीं. ॥ ३५ ॥

अमार्गेण विचार्याथ नास्ति नो भाति चेत्यसौ ।
विपरीतव्यवहृतिरावृतेः कार्यमिष्यते ॥ ३६ ॥
आतां आवरणाचे स्वरूप आणि काये सांगतों. शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें विचार न करितां केवळ स्वतःचेच तर्क लढवून कूटस्थ नाहीं व तो दिसतही नाही असे विपरीत समजतो; हाच आवरणाचा परिणाम. ॥ ३६ ॥

देहद्वयचिदाभासरूपो विक्षेप ईरितः ।
कर्तृत्वाद्यखिलः शोकः संसाराख्योऽस्य बन्धकः ॥ ३७ ॥
आतां विक्षेपाचे स्वरूप आणि कार्य याचा विचार करूं. स्थूल, सूक्ष्म या देहद्वयानें युक्त जो चिदाभास तोच विक्षेप. तोच सर्व बंधास हेतु आणि त्यापासूनच कर्तृत्वादिक संसारदुःख होते. ॥ ३७ ॥

अज्ञानमावृतिश्चैते विक्षेपात्प्राक्प्रसिद्ध्यतः ।
यद्यप्यथाप्यवस्थेते विक्षेपस्यैव नात्मनः ॥ ३८ ॥
आतां अज्ञान आणि आवरण या दोन अवस्था विक्षेपाच्या पूर्वीच्या आहेत आणि विक्षेप तर चिदाभासाचेंच स्वरूप असे तुम्ही ह्मणतां, तर पूर्वोक्त अवस्था चिदाभासास आहेत ही गोष्ट कशी संभवेल अशी कोणी शंका घेईल, तर त्यास तूर्त आम्ही इतकेच सांगतो कीं असंग आत्म्यास त्या अवस्था लावण्यापेक्षां चिदाभासासच लावणें बरें. ॥ ३८ ॥

विक्षेपोत्पत्तितः पूर्वमपि विक्षेपसंस्कृतिः ।
अस्त्येव तदवस्थात्वमविरुद्धं ततस्तयोः ॥ ३९ ॥
कारण, त्या दोन अवस्था असण्याचे वेळी चिदाभासाचा जरी अभाव असला तथापि त्याचा संस्कार म्हणून त्या वेळी असतोच, म्हणून त्या अवस्था त्याच्याच आहेत असे मानण्याने कोणताच विरोध येत नाही. बीजाच्या वेळीं वृक्ष जरी नसला तरी वीज ही वृक्षाचीच अवस्था म्हणण्यास कोणची हरकत आहे ? ॥ ३९ ॥

ब्रह्मण्यारोपितत्वेन ब्रह्मावस्थे इमे इति ।
नशङ्कनीयं सर्वासां ब्रह्मण्येवाधिरोपणात् ॥ ४० ॥
आतां असा एक प्रश्न निघण्याजोगा आहे कीं, केवळ अनुमानगम्य संस्कार कल्पून या दोन अवस्था विक्षेपाला लावण्यापेक्षां त्या दोन्हींचें अधिष्ठान जे ब्रह्म त्यालाच लावण बरे नव्हे काय ? तर याजवर उत्तर असे कीं, ब्रह्म हें अधिष्ठान म्हणून जर त्या दोन अवस्था लावाव्या तर त्या दृष्टीने सातही अवस्था ब्रह्मालाच लागू होतील. असा अति प्रसंग करण्यापेक्षां त्या चिदाभासालाच लावणें योग्य आहे. ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *