सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २४१ ते २६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

यो ब्रह्म वेद ब्रह्मैव भवत्येव इति श्रुतिः ।
श्रुत्वा तदेकचित्तः सन् ब्रह्म वेत्ति न चेतरत् ॥ २४१ ॥
“ब्रह्मवित् ब्रह्मैव भवति” ही श्रुति ध्यानीं घेऊन तो ब्रह्माचेच चिंतन करतो, दुसरे करीत नाहीं. ॥ २४१ ॥

देवत्वकामा ह्यग्न्यादौ प्रविशन्ति यथा तथा ।
साक्षित्वेनावशेषाय स्वविनाशं स वाञ्छति ॥ २४२ ॥
ज्यांना देव व्हावें अशी इच्छा आहे, ते जसे गंगेत किवा अग्नींत प्रवेश करतात, त्याप्रमाणें चिदाभासही साक्षित्वेंकरून असण्याची पक्की खात्री असल्यानें, तो आपल्या नाशाची इच्छा करतो. ॥ २४२ ॥

यावत्स्वदेहदाहं स नरत्वं नैव मुञ्चति ।
तावदारब्धदेहः स्यान्नाभासत्वविमोचनम् ॥ २४३ ॥
ज्याप्रमाणें अग्निप्रवेश केलेल्या मनुष्याचा मनुष्यपणा, त्याचा देह जळेपर्यत नाहींसा होत नाही; त्याप्रमाणे, प्रारब्धकर्माचा क्षय होऊन देहपात होईपर्यंत जीवत्वव्यवहार जात नाहीं. ॥ २४३ ॥

रज्जुज्ञानेऽपि कम्पादिः शनैरेवोपशाम्यति ।
पुनर्मन्दान्धकारे सा रज्जुः क्षिप्तोरगी भवेत् ॥ २४४ ॥
एवमारब्धभोगोऽपि शनैः शाम्यति नो हठात् ।
भोगकाले कदाचित्तु मर्त्योऽहमिति भासते ॥ २४५ ॥
ज्याप्रमाणें “हा सर्प नव्हे ही दोरी आहे” असें ज्ञान झाल्यावर देखील, पूर्वीच्या भीतीपासून उत्पन्न झालेले कंपादिक, अगदी बंद होण्यास कांहीं वेळ लागतो, त्याप्रमाणें भोगादिक ही हळुहळू बंद होतात. आणि ज्याप्रमाणें ती दोरी पुन्हां अंधारांत टाकली असतां, पुन: सर्पासारखी भासते, तसें ज्ञान जाहल्यावर देखील चिदाभासास मी मनुष्य अशी विपरीत प्रतीति केव्हां केव्हां होते. ॥ २४४-२४५ ॥

नैतावतापराधेन तत्त्वज्ञानं विनश्यति ।
जीवन्मुक्तिव्रतं नेदं किन्तु वस्तुस्थितिः खलु ॥ २४६ ॥
तथापि तेवढ्या दोषामुळे तत्वज्ञानास धोका मुळींच नाहीं. कारण, जीवन्मुक्ति है कांहीं व्रत नव्हे. तर ती केवळ वस्तूची खरी स्थिति आहे. ॥ २४६ ॥

दशमोऽपि शिरस्ताडं रुदन्बुद्ध्वा न रोदिति ।
शिरोव्रणस्तु मासेन शनैः शाम्यति नो तदा ॥ २४७ ॥
पूर्वी जो दशमाचा दृष्टांत दिला आहे, तेथेंही ही गोष्ट अनुभवास येते. तो दशम “मी दशम आहे” असें समजतांच रडणे मात्र सोडून देतो. परंतु त्या दुःखानें कपाळ आपटून घेऊन, जी त्याने जखम करून घेतली ती तात्काळ बरी होत नाहीं. ती बरी होण्यास कांहीं दिवस पाहिजेत. ॥ २४७ ॥

दशमामृतिलाभेन जातो हर्षो व्रणव्यथाम् ।
तिरोधत्ते मुक्तिलाभस्तथा प्रारब्धदुःखिताम् ॥ २४८ ॥
आतां त्या व्रणाचें दुःख त्याला कांहीं दिवस भोगावे लागेल खरें; तथापि “मी दहावा सांपडलों” या ज्ञानाने जो त्याला हर्ष झाला त्या खाली तें सर्व दुःख गडप होतें. त्याप्रमाणे मुक्तिलाभ झाला असलं प्रारब्धानें होणारे दुःख त्या हर्षाखाली कांहींच वाटत नाहीं. ॥ २४८ ॥

व्रताभावाद्यदाध्यासस्तदा भूयो विविच्यताम् ।
रससेवी दिने भुङ्क्ते भूयो भूयो यथा तथा ॥ २४९ ॥
जीवन्मुक्ति ज्याअर्थी व्रत म्हणतो येत नाहीं, त्या अर्थीं भ्रम झाला कीं, पुन: पुन: विवेक करावा. जसा रस सेवन करणारा एकाच दिवशीं वरचेवर खाऊन क्षुधा घालवितो. ॥ २४९ ॥

शमयत्यौषधेनायं दशमः स्वव्रणं यथा ।
भोगेन शमयित्वैतत्प्रारब्धं मुच्यते तथा ॥ २५० ॥
त्या दशमाचे कपाळाची खोंक जशी औषधानेंच बरी होते; त्याप्रमाणे भोगानेंच प्रारब्धाचा क्षय होतो. ॥ २५० ॥

किमिच्छन्निति वाक्योक्तः शोकमोक्ष उदीरितः ।
आभासस्य ह्यवस्थैषा षष्ठी तृप्तिस्तु सप्तमि ॥ २५१ ॥
एथपर्यंत “किमिच्छन्” इत्यादिक वरील श्रुतीच्या उत्तरार्धाने शोकनिवृत्ति, जी चिदाभासाची सहावी अवस्था, ती आम्ही सांगितली. आतां सातवी अवस्था सांगतों. ॥ २५१ ॥

साङ्कुशा विषयैस्तृप्तिरियं तृप्तिर्निरङ्कुशा ।
कृतं कृत्यं प्रापणीयं प्राप्तमित्येव तृप्यति ॥ २५२ ॥
तृप्ति दोन प्रकारची. विषयलाभापासून जी तृप्ति होते तिला नाश आहे. म्हणजे तेथे आशेचा अंकूर पुनः राहतो; म्हणून तिला आम्ही सांकुश तृप्ति असे नांव ठेवतो. परंतु जीवन्मुक्ताची तृप्ति तशी नाहीं. ती एकदां झाली म्हणजे तिचा नाशच होत नाही. म्हणून तिला निरंकुश अशी संज्ञा आहे. आत्मज्ञानानें मनुष्यास असे वाटतें की, मी करावयाचे ते केले, आणि मिळवावयाचे ते मिळवले. ॥ २५२ ॥

ऐहिकामुष्मिकव्रातसिद्ध्यै मुक्तेश्च सिद्धये ।
बहु कृत्यं पुराऽस्याभूत्तत्सर्वमधुना कृतम् ॥ २५३ ॥
ज्ञात्याला तत्त्वज्ञान होण्यापूर्वी ऐहिक म्ह० यालोकीं सुखप्राप्ती आणि दुःखनिवृत्तिकरतां कृषि वाणिज्य इत्यादिक, व आमुष्मिक म्ह० स्वर्गलोकप्राप्तीकरतां यज्ञ व उपासनादिक व मोक्षसाधन जे ज्ञान त्याच्या प्राप्तीकरतां श्रवण मनन निदिध्यासनादिक; या प्रकारेंकरून बहुप्रकारचें कर्तव्य कर्म होतें. आणि आता तर त्यास संसारसुखाची इच्छा नाही म्हणून व ब्रह्मानंद साक्षात्काराचीही सिद्धी झाली आहे, म्हणून तें सर्व त्यानें केल्यासारखेंच आहे. आता त्याला काहीं कर्तव्य उरलें नाहीं. ॥ २५३ ॥

तदेतत्कृतकृत्यत्वं प्रतियोगिपुरःसरम् ।
अनुसन्दधदेवायमेवं तृप्यति नित्यशः ॥ २५४ ॥
याप्रमाणे पूर्वींची स्थिति आठवून आपले कृतकृत्यत्व नित्य मनांत आणून तो नित्य तृप्त राहतो. ॥ २५४ ॥

दुःखिनोऽज्ञाः संसरन्तु कामं पुत्राद्यपेक्षया ।
परमानन्दपूर्णोऽहं संसरामि किमिच्छया ॥ २५५ ॥
तो आपली धन्यता याप्रमाणें मानतो. अज्ञानी लोक दुःखी होत्साते पुत्रादिकांची अपेक्षा करून, संसार करणार तर करोत ना बापडे. मी परमानंदानें पूर्ण असल्यामुळे मला कोणतीच इच्छा नाहीं. मग मी संसार कशास करूं ? ॥ २५५ ॥

अनुतिष्ठन्तु कर्माणि परलोकायियासवः ।
सर्वलोकात्मकः कस्मादनुतिष्ठामि किं कथम् ॥ २५६ ॥
ज्यांना परलोकची इच्छा असेल ते यज्ञदानादिक कर्में खुशाल करोत. मी सर्वव्यापक असल्यामुळे मी नाहीं असा लोकच नाहीं; मग तीं कर्में घेऊन करावयाची काय? ॥ २५६ ॥

व्याचक्षतान्ते शास्त्राणि वेदानध्यापयन्तु वा ।
येऽत्राधिकारिणो मे तु नाधिकारोऽक्रियत्वतः ॥ २५७ ॥
जे अधिकारी असतील त्यांनी वेदशास्त्रें खुशाल पढावी व पढवावींत. मी मुळीच अक्रिय झालों मग मला अधिकार कुठला ? ॥ २५७ ॥

निद्राभिक्षे स्नानशौचे नेच्छामि न करोमि च ।
द्रष्टारश्चेत्कल्पयन्ति किं मे स्यादन्यकल्पनात् ॥ २५८ ॥
निद्रा, भिक्षा, स्नान, शौच इत्यादिक कमें मी इच्छितही नाहीं व करीतही नाहीं. जवळच्या पाहणारांना मी कर्में करतोसे वाटेल, तर वाटेना बापडें. त्यांस तसें वाटल्यानें मला काय होणार ? ॥ २५८ ॥

गुञ्जापुञ्जादि दह्येत नान्यारोपितवह्निना ।
नान्यारोपितसंसारधर्मानेवमहं भजे ॥ २५९ ॥
ज्याप्रमाणें गुंजांच्या राशीस दुसर्‍यांनी अग्नि म्हटल्यानें ती जाळू शकत नाहीं, त्याप्रमाणें मी संसार करतो असें दुसर्‍यांनी म्हटलें तरी त्याचा स्पर्श मला लागत नाहीं. ॥ २५९ ॥

शृण्वन्त्वज्ञाततत्त्वास्ते जानं कस्माच्छृणोम्यहम् ।
मन्यन्तां संशयापन्ना न मन्येऽहमसंशयः ॥ २६० ॥
ज्यांना ब्रह्मतत्त्व समजलें नाहीं ते खुशाल श्रवण करोत. मला तें तत्त्व पक्के समजल्यावर मीं तें कां करावें ? तसेंच आत्मस्वरूपाविषयीं ज्यांचे मनांत वारंवार संशय येतात, त्यांनीं मनन करावे. माझें ज्ञान निःसंशय झाल्यावर मला त्याचें काय प्रयोजन ? ॥ २६० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *