सार्थ पंचदशी मराठी द्वादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे आत्मानन्दः श्लोक ४१ ते ६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

भेदोऽस्ति पञ्चकोषेषु साक्षिणो न तु भात्यसौ ।
मिथ्यात्मताऽतः कोषाणां स्थाणोर्चौरात्मता यथा ॥ ४१ ॥
न भाति भेदो नाप्यस्ति साक्षिणोऽप्रतियोगिनः ।
सर्वान्तरत्वात् तस्यैव मुख्यमात्मत्वमिष्यते ॥ ४२ ॥

सत्येवं व्यवहारेषु येषु यस्यात्मतोचिता ।
तेषु तस्यैव शेषित्वं सर्वस्यान्यस्य शेषता ॥ ४३ ॥
मुमूर्षोर्गृहरक्षादौ गौणात्मैवोपयुज्यते ।
न मुख्यात्मा न मिथ्यात्मा पुत्रः शेषी भवत्यतः ॥ ४४ ॥

अध्येता वह्निरित्यत्र सन्नप्यग्निर्न गृह्यते ।
अयोग्यत्वेन योग्यत्वाद्बटुरेवात्र गृह्यते ॥ ४५ ॥
कृशोऽहं पुष्टिमाप्स्यामीत्यादौ देहात्मतोचिता ।
न पुत्रं विनियुङ्क्तेऽत्र पुष्टिहेत्वन्नभक्षणे ॥ ४६ ॥
तपसा स्वर्गमेष्यामीत्यादौ कर्त्रात्मतोचिता ।
अनपेक्ष्य वपुर्भोगं चरेत्कृच्छ्रादिकं ततः ॥ ४७ ॥

मोक्ष्येऽहमित्यत्र युक्तं चिदात्मत्वं तदा पुमान् ।
तद्वेत्ति गुरुशास्त्राभ्यां न तु किंचिच्चिकीर्षति ॥ ४८ ॥
विप्रक्षत्रादयो यद्वद्बृहस्पतिसवादिषु ।
व्यवस्थितास्तथा गौणमिथ्यामुख्या यथोचितम् ॥ ४९ ॥

तत्र तत्रोचितेप्रीतिरात्मन्येवातिशायिनी ।
अनात्मनि तु तच्छेषे प्रीतिरन्यत्र नोभयम् ॥ ५० ॥

साक्षी आणि पंचकोश यांत प्रत्यक्ष भेद असूनही तो भ्रमाने भासत नाहीं. स्थाणूवर जसा चोराचा भ्रम व्हावा तसा कोशांवर आत्म्याचा भ्रम होतो. म्हणून प्रत्येक कोश मिथ्यात्मा समजावा. ॥ ४१ ॥
आणि त्या सर्व कोशांचा जो साक्षी तोच मुख्यात्मा समजावा. कारण तेथें भेद मुळींच नाहीं व भासतही नाहीं. कारण भेद असण्यास व भासण्यास दुसरा कोणी एक प्रतियोगी पाहिजे. साक्षीस तसा प्रतियोगी कोणीच नाहीं. याला मुख्यात्मा म्हणण्याचें कारण हेंच कीं, तो सर्वांचेठायी आहे. ॥ ४२ ॥
या तीन आत्म्यांपैकी ज्या ज्या व्यवहारांत जो जो आत्मा योग्य असेल, त्या त्या व्यवहरात त्याला मुख्यत्व देऊन इतर गौण (उपसर्जन) असें समजावे. ॥ ४३ ॥
जेव्हां बाप मरणास टेकतो, तेव्हां आपलें घर शेत इत्यादिकांचें रक्षण व्हावें म्हणून आपल्या बायकामुलांनाच त्या कामी योजितो. म्हणन त्यांनाच येथें आत्मत्व दिलें पाहिजे. कारण साक्षी अविकारी असल्यामुळें मुख्यात्म्याचा येथें उपयोग नाहीं. आणि देह मरणोन्मुख असल्यामुळें मिथ्यात्माही निरुपयोगी आहे. ॥ ४४ ॥
यास दृष्टांत. “अध्येता ( अध्ययन करणारा) अग्नि आहे” या वाक्यांत खरा दहन करणारा अग्नि समजावयाचा नव्हे. कारण अध्ययन करण्याचा गुण त्यामध्ये नाहीं. म्हणून अध्ययन करणारा शिष्यच असा या ठिकाणी अग्नि शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. ॥ ४५ ॥
तसेंच “मी कृश झालो आहे. दुग्ध पिऊन मला लठ्ठ झालें पाहिजे.” अशा व्यवहारांत अन्नभक्षणाला योग्य अशा देहालाच आत्मत्व दिलें पाहिजे. कारण तेथें पुत्राचा उपयोग नाहीं. म्हणून येथें मिथ्यात्म्यालाच प्राधान्य दिलें पाहिजे. ॥ ४६ ॥
त्याचप्रमाणें तप करून स्वर्गास मी जाईन अशा इच्छनें जेव्हां मनुष्य तप करतो, तेव्हां तेथें कर्ता जो विज्ञानमय त्यालाच आत्मत्व दिलें पाहिजे. देहास देतां येत नाहीं. कारण तेव्हां तो शरीरास सुख देणारे सर्व भोग एकीकडे सारून कृच्छ्रचांद्रायणादि तपाचे अनुष्ठान करतो. ॥ ४७ ॥
तसेंच शमादि साधनाने मला मुक्ति व्हावी असें जेव्हां मनुष्य इच्छितो, तेव्हां गुरुशास्त्राचे साहाय्याने त्यास ज्ञान होतें. मग त्याला काहीच करण्याची इच्छा नसते. अशा प्रसंगीं मुख्यात्म्यालाच प्राधान्य दिलें पाहिजे. ॥ ४८ ॥
ब्राह्मणानें बृहस्पतिसवेकरून यज्ञ करावा, या वाक्यावरून तो यज्ञ करण्याचा अधिकार ब्राह्मणालाच आहे. राजाने राजसूययज्ञ करावा, या वाक्यावरून तो यज्ञ करण्याचा क्षत्रियासच अधिकार आहे. आणि वैश्याने स्तोमनामक यज्ञ करावा. या वाक्यांत तो यज्ञ करण्यास वैश्यालाच अधिकार आहे. त्याप्रमाणें गौण, मिथ्या व मुख्य हे तीनही आत्मे त्या त्या उचित व्यवहारांत प्रधान आहेत. ॥ ४९ ॥
ज्या ज्या व्यवहारी जो जो आत्मा प्रधान असेल त्या त्या व्यवहारांत त्या त्या आत्म्यावर अतिशय प्रीति असते. त्यावाचून त्याच्याकरितां जे दुसरे पदार्थ आहेत त्याजवर प्रीतिमात्र असते, पण तितकी नसते. आणि त्यावाचून इतर पदार्थांवर प्रीतीही नसते आणि अतिप्रीतिही नसते. ॥ ५० ॥

उपेक्ष्यं द्वेष्यमित्यन्यद् द्वेधा मार्गतृणादिकम् ।
उपेक्ष्यं व्याघ्रसर्पादि द्वेष्यमेवं चतुर्विधम् ॥ ५१ ॥

आत्मा शेष उपेक्ष्यं च द्वेष्यं चेति चतुर्ष्वपि ।
न व्यक्तिनियमः किन्तु तत्तत्कार्यात्तथा तथा ॥ ५२ ॥
स्याद्‌व्याघ्रः संमुखो द्वेष्यो ह्युपेक्ष्यस्तु पराङ्मुखः ।
लालनादनुकूलश्चेद्विनोदायेति शेषताम् ॥ ५३ ॥
व्यक्तीनां नियमो मा भूल्लक्षणात्तुव्यवस्थितिः ।
आनुकूल्यं प्रातिकूल्यं द्वयाभावश्च लक्षणम् ॥ ५४ ॥
आत्मा प्रेयान् प्रियः शेषो द्वेष्योपेक्ष्ये तदन्ययोः ।
इति व्यवस्थितो लोको याज्ञवल्क्यमतं च तत् ॥ ५५ ॥
अन्यत्रापि श्रुतिः प्राह पुत्राद्वित्तात्तथान्यतः ।
सर्वस्मादान्तरं तत्त्वं तदेतत्प्रेय इष्यताम् ॥ ५६ ॥
श्रौत्या विचारदृष्ट्यायं साक्ष्येवात्मा न चेतरः ।
कोषान्पञ्च विविच्यान्तर्वस्तुदृष्टिर्विचारणा ॥ ५७ ॥
जागरस्वप्नसुप्तीनामागमापायभासनम् ।
यतो भवत्यसावात्मा स्वप्रकाशचिदात्मकः ॥ ५८ ॥
शेषाः प्राणादिवित्तान्ता आसन्नास्तारतम्यतः ।
प्रीतिस्तथा तारतम्यात्तेषु सर्वेषु वीक्ष्यते ॥ ५९ ॥
वित्तात्पुत्रः प्रियः पुत्रात्पिण्डः पिण्डात्तथेन्द्रियम् ।
इन्द्रियाच्च प्रियः प्राणः प्राणादात्मा परः प्रियः ॥ ६० ॥

आतां इतर पदार्थ म्हणून जें वर म्हटले, त्याविषयीं मनुष्याच्या मनाची वृत्ति दोन प्रकारची असते. एक उपेक्षा आणि दुसरी द्वेषवृत्ति. या वृत्तिभेदाने पदार्थातही उपेक्ष्य आणि द्वेष्य असे दोन भेद झाले. मार्गावर पडलेले तृणादिक हे उपेक्ष्य आहेत आणि व्याघ्रसर्पादिक दुष्ट प्राणी द्वेष्य आहेत. याप्रमाणे मनोवृत्तीचे प्रकार चार झाले. ॥ ५१ ॥
आत्मा आत्मशेष उपेश्य आणि द्वेष्य या चारीमध्ये अमुकच आत्मा, अमुकच त्याचा शेष, अमुकच उपेक्ष्य आणि अमुकच द्वेष्य असें म्हणतां येत नाही. तर त्या त्या समयी त्या त्या कार्यापासून जशी जशी लाभहानीअसेल त्यात्याप्रमाणें तें समजावयाचें. ॥५२॥
येथें वाघाचेच उदाहरण घेतलें म्हणजे झालें. वाघ समोर आपल्या आंगावर आला असतांना तो द्वेष्य होतो. दूर डोंगरावर जात असतां उपेक्ष्य होतो. आणि तोच पालन करणाऱ्या दरवेशाला लाभदायक असल्यामुळें प्रिय होतो. म्हणजे, त्यास आत्मशेषता येते. ॥ ५३ ॥
या तिन्हींचें येथें लक्षण सांगितलें असतां समजण्यास बरें पडेल. कारण येथें व्यक्तीचा नेम नाहीं. तें लक्षण असें कीं, पदार्थ अनुकूल असतां प्रिय होतो, प्रतिकूल असतां द्वेप्य होतो आणि दो- न्हीही नसेल तर तो उपेक्ष्य समजावा. ॥ ५४ ॥
यावरून असें झालें कीं आत्मा हा सर्वांत प्रिय आणि त्याला उपकार करणारे पदार्थ त्याहून कमी प्रिय आणि त्यावांचून बाकीच्या पदार्थांत कांहीं द्वेष्य आणि उपेक्ष्य अशी व्यवस्था याज्ञवल्क्यांनी केली आहे. ॥ ५५ ॥
याप्रमाणें पुरुषविध ब्राह्मणांतही आत्म्याचा अतिप्रियपणा वर्णिला आहे. तेथें असें म्हटले कीं, “सर्वांच्या अंतरीं असणारा आत्मा पुत्र, वित्त व दुसऱ्या सर्व पदार्थापेक्षां फार प्रिय आहे.” ॥ ५६ ॥
आतां श्रुतीस अनुसरून विचारदृष्टीनें पाहिले असतां सर्वांचा जो साक्षी तोच आत्मा ठरतो. येथें विचार म्हणजे हाच कीं पंच कोशांचा विवेक करून आपल्या आंत दृष्टि लावावी. ॥ ५७ ॥
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांचे येणे जाणें ज्याला सहज समजते तोच स्वप्रकाश चिद्रूप आत्मा. ॥ ५८ ॥

या साक्षीवांचून बाकीचे प्राणापासून वित्तापर्यंत सर्व पदार्थ जितके जितके आत्म्याच्या जवळ जवळ असतील तितकी तितकी त्याविषयी अधिक अधिक प्रीति असलेली दृष्टीस पडते. ॥ ५९ ॥
जसे द्रव्यापेक्षा मनुष्यास पुत्र प्रिय आहे. कारण पुत्राच्या जीवावरील धोका निवारण्यास द्रव्य खर्च करतो. पुत्रापेक्षांही आपला देह प्रिय आहे. कारण स्वदेह रक्षणाकरिता पुत्रादिकाला दुसऱ्यास दिल्याची उदाहरणे पुष्कळ आहेत. तसेंच इंद्रियांचा नाश होण्याचा प्रसंग आला म्हणजे मनुष्य देहपीडा देखील सहन करतात. म्हणन देहापेकक्षाही इंद्रिये प्रिय म्हटली पाहिजेत. आणि प्राणावर संकट आलें म्हणजे तो वाचविण्याकरिता नाक डोळे गेलें तरी फारशी पर्वा नसते. म्हणून इंद्रियांपेक्षा प्राण प्रिय आहेत. याप्रमाणे उत्तरोत्तर एकाहून एक अधिक प्रिय असल्याचा अनुभव आबाल वृद्धास आहे. आणि प्राणापेक्षाही आत्मा प्रिय आहे. हा अनुभव मात्र तत्त्ववेत्त्यासच आहे. ॥ ६० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *