सार्थ पंचदशी मराठी त्रयोदशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे अद्वैतानन्दः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

आदौ मनस्तदनुबन्धविमोक्षदृष्टीः
पश्चात्प्रपञ्चरचना भुवनाभिधाना ।
इत्यादिका स्थितिरियं हि गता प्रतिष्ठा-
माख्यायिका सुभगबालजनोदितेव ॥ २१ ॥
बालस्य हि विनोदाय धात्री शक्ति शुभां कथाम् ।
क्वचित्सन्ति महाबाहो राजपुत्रास्त्रयः शुभाः ॥ २२ ॥
द्वौ न जातौ तथैकस्तु गर्भ एव न च स्थितः ।
वसन्ति ते धर्मयुक्ता अत्यन्तासति पत्तने ॥ २३ ॥
स्वकीयाच्छून्यनगरान्निर्गत्य विमलाशयाः ।
गच्छन्तो गगने वृक्षान् ददृशुः फलशालिनः ॥ २४ ॥
भविष्यन्नगरे तत्र राजपुत्रास्त्रयोऽपि ते ।
सुखमद्य स्थिता पुत्र मृगयाव्यवहारिणः ॥ २५ ॥
धात्र्यैवं कथिता राम बालकाख्यायिका शुभा ।
निश्चयं स ययौ बालो निर्विचारणया धिया ॥ २६ ॥
इयं संसार रचना विचारोज्झितचेतसाम् ।
बालकाख्यायिकेवेत्थमवस्थितिमुपागता ॥ २७ ॥
इत्यादिभिरुपाख्यानैर्मायाशक्तेस्तु विस्तरम् ।
वसिष्ठः कथयामास सैव शक्तिर्निरूप्यते ॥ २८ ॥
कार्यादाश्रयतः सैषा भवेच्छक्तिर्विलक्षणा ।
स्फोटाङ्गारौ दृश्यमानौ शक्तिस्तत्रानुमीयते ॥ २९ ॥
पृथुबुध्नोदराकारो घटः कार्योऽत्र मृत्तिका ।
शब्दादिभिः पञ्चगुणैर्युक्ता शक्तिस्त्वतद्विधा ॥ ३० ॥

आधी मन झाले. त्यानंतर बंधमोक्षांची कल्पना; त्यानंतर त्रिभुवनात्मक प्रपंचरचना अशी ही जगस्थिति लहान मुलांस सांगितलेल्या कहाणीप्रमाणे खोटी असून खऱ्यामध्यें मोडूं लागली. ॥ २१ ॥

ती कहाणी तुला सांगतो. एक दाई बाळाला त्याच्या विनोदाकरितां अशी एक कहाणी सांगू लागली कीं बाळा, तीन राजपुत्र होते. ॥ २२ ॥
त्यांपैकीं दोन मुळीच झाले नाहींत आणि तिसरा तर गर्भातच नव्हता. ते धर्माचरणांत चांगले असून एका नसणाऱ्या शहरी राहत होते. ॥ २३ ॥
एके दिवशीं आपल्या शून्य नगरांतून निरिच्छ मनाने बाहेर जात असतां आकाशामध्यें त्यांना फळांनी भरलेले असे कांहीं वृक्ष दृष्टीस पडले. ॥ २४ ॥
तेथें पुढें होणाऱ्या नगरींत ते तीनही रात्र आज शिकार करीत मौजेने राहिले आहेत. ॥ २५ ॥

हे रामा, याप्रमाणे दायीने सांगितलेली कथा ऐकून घेऊन अज्ञानामुळे ती खरी आहे असें बाळास वाटलें ॥ २६ ॥

त्या कहाणीप्रमाणें ही संसाररचनाही अविचारी लोकांस खरी वाटली आहे. ॥ २७ ॥

अशाच आणखी दुसऱ्या कथा सांगून वसिष्ठांनीं रामास मायाशाक्तीचा विस्तार दर्शविला. तिचेच निरूपण आतां आम्ही करतो. ॥ २८ ॥
ही मायाशक्ति जगद्‌रूप कार्यापासून आणि आश्रयरूप ब्रह्मापासून विलक्षण आहे. यास दृष्टांत अग्नीची शक्ति भाजून आलेल्या प्रत्यक्ष फोडापासून व प्रत्यक्ष निखार्‍यापासून भिन्न आहे असें अनुमान होतें. ॥ २९ ॥
दुसरें उदाहरण घटाचें. मोठा आणि वाटोळ्या आकाराचा जो घट तद्‌रूप कार्य प्रत्यक्ष असतें, आणि शब्दादि पांच गुणांनी युक्त मृत्तिका ही प्रत्यक्षच आहे. परंतु ज्या शक्तीनें हा घट झाला ती शक्ति दोहोंपासून निराळीच आहे. ॥ ३० ॥

न पृथ्वादिर्न शब्दादिः शक्तावस्तु यथा तथा ।
अत एव ह्यचिन्त्यैषा न निर्वचनमर्हति ॥ ३१ ॥
कार्योत्पत्तेः पुरा शक्तिर्निगूढा मृद्यवस्थिता ।
कुलालादिसहाय्येन विकाराकारतां व्रजेत् ॥ ३२ ॥
पृथ्व्यादि विकारान्तं स्पर्शादिं चापि मृत्तिकाम् ।
एकीकृत्य घटं प्राहुर्विचारविकला जनाः ॥ ३३ ॥
कुलालव्यापृतेः पूर्वो यावानंशः स नो घटः ।
पश्चात्तु पृथुबुध्नादिमत्त्वे युक्ता हि कुम्भता ॥ ३४ ॥

स घटो न मृदो भिन्नो वियोगे सत्यनीक्षणात् ।
नाप्यभिन्नः पुरा पिण्डदशायामनवेक्षणात् ॥ ३५ ॥
अतोऽनिर्वचनीयोऽयं शक्तिवत्तेन शक्तिजः ।
अव्यक्तव्ये शक्तिरुक्ता व्यक्तत्ये घटनामभृत् ॥ ३६ ॥
ऐन्द्रजालिकनिष्ठापि माया न व्यज्यते पुरा ।
पश्चाद्‌गन्धर्वसेनादिरूपेण व्यक्तिमाप्नुयात् ॥ ३७ ॥
एवं मायामयत्वेन विकारस्यानृतात्मताम् ।
विकाराधारमृद्वस्तुसत्यत्वं चाब्रवीच्छ्रुतिः ॥ ३८ ॥
वाङ्निष्पाद्यं नाममात्रं विकारो नास्य सत्यता ।
स्पर्शादि गुणयुक्ता तु सत्या केवलमृत्तिका ॥ ३९ ॥
व्यक्ताव्यक्ते तदाधार इति त्रिष्वाद्ययोर्द्वयोः ।
पर्यायः कालभेदेन तृतीयस्त्वनुगच्छति ॥ ४० ॥

पृथ्वादिक जो घटाचा आकार तोही ती नव्हे, आणि शब्दादि गुणयुक्त मृत्तिका जी घटाचा आश्रय तीही ती नव्हे; म्हणून ती कशी आहे हें सांगतां येत नाही याकरिता ती अचिंत्य असून अनिर्वचनीय आहे. ॥ ३१ ॥
ही शक्ति घटरूप कार्य होण्यापूवी मृत्तिकेमध्ये गुप्त असते. मग पुढे कुंभार, त्याचें चक्र इत्यादिकांच्या साहाय्याने आकाराप्रत पावते. ॥ ३२ ॥
शि० -कारणापासून शक्तीचे कार्य अगदी निराळें असून तो कार्यकारणभेद लोकांस कां समजत नाहीं ? गु०-मोठा आणि वाटोळा असा आकार आणि स्पर्शादि गुणांनी युक्त मृत्तिका, हे दोन्हीही एकवट करून अविवेकी लोक त्यास घट असें म्हणतात. ॥ ३३ ॥
शि० -ते अविवेकी कसे ? गु० -अविवेकी नव्हे तर काय ? कुंभाराचा हात लागण्यापूर्वी जो मृत्तिकेचा अंश तोच हात लागल्यानंतरही असतो, असें असून केवळ मोठ्या वाटोळ्या पोटाचा जो आकार त्याला घट म्हणणे हें अज्ञान नव्हे काय ? पूर्वी घट नसून एकाएकी मागून कोठून आला ? ॥ ३४ ॥
शि० -घट प्रत्यक्ष खरा असून तो खाटा कसा म्हणावा ? गु० -खोटा नव्हे तर काय ? मृत्तिकेपासून तो जर भिन्न केला, तर मुळींच दिसत नाहीं; म्हणून मृत्तिकेहून निराळा नाहीं. बरें मृत्तिकाच घट म्हणावी, तर पूर्वीचे पिडदशेंत तो मुळींच दिसते नाहीं. ॥ ३५ ॥
याकरितां शक्तीप्रमाणें हा घटही अनिर्वचनीयच आहे. तो शक्तीचे कार्य आहे. घटाच्या अव्यक्त स्थितीला शक्ति म्हणतात, आणि व्यक्त स्थितीला घट असें म्हणतात. ॥ ३६ ॥
लोकांमध्ये जी ऐंद्रजालिक माया दृष्टीस पडते, तीही पूर्वी दृष्टीस पडत नाहीं. मणीमंत्राचा प्रयोग झाल्यानंतर गंधर्वसेनादिरूपानें ती स्पष्ट होते. ॥ ३७ ॥
याप्रमाणें छांदोग्यश्रुतीत “वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिकेत्येव सत्यं” या वाक्याने विकाराला मायामयत्वामुळें श्रुतींने खोटेपणा दिला, आणि विकाराला आधारभूत जी मृत्तिका ती खरी आहे असें सांगितले. ॥ ३८ ॥
वाणीनें उच्चार केलेला घट हा शब्द केवळ नाममात्र आहे. या नांवावाचून खरे स्वरूप कोणचेंच नाही; म्हणून घट असत्य झाला. परंतु स्पर्शादि गुणांनी युक्त अशी जी केवळ मृत्तिका ती मात्र सत्य आहे ॥ ३९ ॥
कारण शक्ति, तिचे कार्य घट आणि त्यास आधारभूत मृत्तिका या तिहींमध्ये पूर्वीची दोन, एकदा असणारी व एकदा नसणारी अशी कालभेदास पात्र आहेत. आणि तिसरी जी मृत्तिका ती कालत्रयीही नाश पावत नसल्यामुळें सत्य आहे ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *