सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २२१ ते २४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

यदा स्वस्यापि भोक्तृत्वं मन्तुं जिह्रेत्ययं तदा ।
साक्षिण्यारोपयेदेतदिति कैव कथा वृथा ॥ २२१ ॥
जेव्हां आपलेंच भोक्तृत्व खरें मानण्यास याला लाज वाटते, तेव्हां साक्षीला भोक्तृत्व तो लावणार नाहीं हें कशास सांगितलें पाहिजे ? ॥ २२१ ॥

इत्यभिप्रेत्य भोक्तारमाक्षिपत्यविशङ्कया ।
कस्य कामायेति ततः शरीरानुज्वरो न हि ॥ २२२ ॥
असा अभिप्राय मनांत आणून “कस्य कामाय” या श्रुतींतील पदानें भोक्त्याचे निःशंकपणें निराकरण केलें. असें निराकरण झाल्यावर अर्थातच, शरीरांतील ज्वर (ताप) याला लागत नाहीं. तें कसें तें पुढें दाखवितों ॥ २२२ ॥

स्थूलं सूक्ष्मं कारणं च शरीरं त्रिविधं स्मृतम् ।
अवश्यं त्रिविधोऽस्त्येव तत्र तत्रोचितो ज्वरः ॥ २२३ ॥
स्थूल-सूक्ष्म आणि कारण अशी तीन शरीरे पूर्वी सांगितलींच आहेत. जेथें शरीर आहे तेथें ज्वर असलाच पाहिजे. म्हणून या तीन शरीरात या तीन प्रकारचे ज्वर आहेत ते हे कीं:- ॥ २२३ ॥

वातपित्तश्लेष्मजन्यव्याधयः कोटिशस्तनौ ।
दुर्गन्धित्वकुरूपत्वदाहभङ्गादयस्तथा ॥ २२४ ॥
वात पित्त कफापासून होणारे कोट्यवधि रोग, आणि दुर्गंधित्व,कुरूपित्व, अंगाचा दाह, हातांपायास दुखापत, हे स्थूल शरीरांतील ज्वर होत. ॥ २२४ ॥

कामक्रोधादयः शान्तिदान्त्याद्या लिङ्गदेहगाः ।
ज्वरा द्वयेऽपि बाधन्ते प्राप्त्याप्राप्त्या नरं क्रमात् ॥ २२५ ॥
कामकाधादिक असुरी संपत्ति व शमदमादि देवी संपत्ति, हे सूक्ष्म देहांतील ज्वर आहेत. पहिल्याच्या प्राप्तीनें आणि दुसर्‍याचे अप्रासीनें संताप होतो म्हणून शमदमादि देखील ज्वरच म्हटलें पाहिजेत. ॥ २२५ ॥

स्वं परं च न वेत्त्यात्मा विनष्ट इव कारणे ।
आगामिदुःखबीजं चेत्येतदिन्द्रेण दर्शितम् ॥ २२६ ॥
आतां कारण शरीरांतील ज्वर मात्र विचारावांचून समजणें कठिण आहेत. छांदोग्य श्रुतीत इंद्राने आपल्या गुरूस असें म्हटलें आहे कीं, “निद्रेमध्यें मला आपलेंही ज्ञान नाहीं, आणि जगाचेही ज्ञान नाहीं, अशीही पुढें येणार्‍या दुःखास कारणीभूत अवस्था मला फार दुःख देत आहे.” यावरून अज्ञान हा कारण शरीरातील एक ज्वरच म्हटला पाहिजे ॥ २२६ ॥

एते ज्वराः शरीरेषु त्रिषु स्वाभाविका मताः ।
वियोगे तु ज्वरैस्तानि शरीराण्येव नासते ॥ २२७ ॥
या तीन शरीरांचे ठायीं हे ज्वर इतके स्वाभाविक आहेत की त्यांचा वियोग झाला असतां तीं शरीरेच नाहींशीं होतात. ॥ २२७ ॥

तन्तोर्वियुज्येत पटो वालेभ्यः कम्बलो यथा ।
मृदो घटस्तथा देहो ज्वरेभ्योऽपीति दृश्यताम् ॥ २२८ ॥
यांस दृष्टांत तंतूच्या वियोगानें पट, लोकरीच्या वियोगानें कांबळें, आणि मृत्तिकेच्या वियोगाने घट, हे जसे नाहीसे होतात; त्याप्रमाणें त्या त्या ज्वराचा वियोग झाला असता तो तो देह नाहींसा होतो. ॥ २२८ ॥

चिदाभासे स्वतः कोऽपि ज्वरो नास्ति यतश्चितः ।
प्रकाशैकस्वभावत्वमेव दृष्टं न चेतरत् ॥ २२९ ॥
खुद्द चिदाभासांतच पाहिले असतो कोणाचाच ज्वर नाहीं. कारण, प्रकाश हाच त्याचा स्वभाव आहे ॥ २२९ ॥

चिदाभासेऽप्यसम्भाव्या ज्वराः साक्षिणि का कथा ।
एवमेवैकतां मेने चिदाभासो ह्यविद्यया ॥ २३० ॥
आतां चिदाभासांत जर ज्वराचा संबंध नाहीं, तर साक्षीमध्ये तो नाहीं हें बोलावयासच नको असे असून अविद्येमुळें मीच ती शरीरें असे तो मानतो ॥ २३० ॥

साक्षिसत्यत्वमध्यस्य स्वेनोपेते वपुस्त्रये ।
तत्सर्वं वास्तवं स्वस्य स्वरूपमिति मन्यते ॥ २३१ ॥
हा चिदाभास साक्षीचा खरेपणा, भ्रमाने आपल्यासहित तीन शरीरास लावून ते सर्व आपलेंच स्वरूप असें मानतो. ॥ २३१ ॥

एतस्मिन् भ्रान्तिकालेऽयं शरीरेषु ज्वरस्त्वथ ।
स्वयमेव ज्वरामीति मन्यते हि कुटुम्बिवत् ॥ २३२ ॥
अशा भ्रांतीच्या वेळेस केवळ शरीराला संताप होत असून तो मला होतो असे कुटुंबी मनुष्याप्रमाणे तो मानतो. ॥ २३२ ॥

पुत्रदारेषु तप्यत्सु तृप्यामीति यथा वृथा ।
मन्यते पुरुषस्तद्वदाभासोऽप्यभिमन्यते ॥ २३३ ॥
म्हणजे, पुत्रदारादिकांस काही रोगादिक होऊन संताप झाला असतां घरचा मुख्य यजमान तें दुःख मलाच होतें असें मानतो, त्याप्रमाणें या चिदाभासालाही वाटतें. ॥ २३३ ॥

विविच्य भ्रान्तिमुज्झित्वा स्वमप्यगणयन् सदा ।
चिन्तयन्साक्षिणं कस्माच्छरीरमनुसंज्वरेत् ॥ २३४ ॥
परंतु विवेकदशा आली म्हणजे तो चिदाभास देहात्म्याचें विवेचन करून भ्रांति टाकून देऊन, आपण खोटा आहे अशा बुद्धीनें, आपला देखील अनादर करून खरा जो साक्षी, त्याचें चिंतन करतो. मग तो शरीराचा संताप आपल्यावर कां घेईल ? ॥ २३४ ॥

अयथावस्तुसर्पादिज्ञानं हेतुः पलायने ।
रज्जुज्ञानेऽहिधीध्वस्तौ कृतमप्यनुशोचति ॥ २३५ ॥
भ्रांतिज्ञानापासून संताप होतो आणि तत्त्व समजलें असतां तो संताप नाहींसा होतो. यास दृष्टांत — दोरीचेठायीं “हा सर्प” असें जें मिथ्या ज्ञान तेंच मनुष्याच्या पळण्यास कारण आहे. आणि “ही दोरी” असें जेव्हां त्यास समजतें, तेव्हां मी उगाच कीं रे म्यालों असें म्हणन तो खेद करितो. ॥ २३५ ॥

मिथ्याभियोगदोषस्य प्रायश्चित्तप्रसिद्धये ।
क्षमापयन्निवात्मानं साक्षिणं शरणं गतः ॥ २३६ ॥
जसा एकादा पुरुष मिथ्यारोपाच्या पापाच्या प्रायश्वित्तार्थ, ज्यावर मिथ्यारोप केला, त्याची क्षमा मागतो, त्याप्रमाणें चिदाभासही साक्षीवर कर्तृत्वभोक्तृत्वाचा आरोप आणल्याबद्दल त्याचीच क्षमा मागून त्याला शरण जातो. ॥ २३६ ॥

आवृत्तपापनुत्यर्थं स्नानाद्यावर्तते यथा ।
आवर्तयन्निव ध्यानं सदा साक्षिपरायणः ॥ २३७ ॥
अथवा जसा एकदा पाप करणारा मनुष्य पूर्वीं पुष्कळदां पाप केल्याबद्दल त्याच्या प्रायश्वित्तार्थ, पुष्कळदां स्नानजपादि करतो. त्याप्रमाणें चिदाभास हा केवळ साक्षीपरायण होऊन, वारंवार त्याचेंच ध्यान करितो, ॥ २३७ ॥

उपस्थकुष्ठिनी वेश्या विलासेषु विलज्जते ।
जानतोऽग्रे तथा भासः स्वप्रख्यातौ विलज्जते ॥ २३८ ॥
मिथ्यारोपाबद्दल साक्षीचें ध्यान करतो इतकेंच नव्हे, तर जशी एकादी वेश्या गुप्त ठिकाणीं कुष्ठ झालें असतां, विलास करण्यास लाजतें, त्याप्रमाणें त्याला स्वतःच्या प्रख्यातीची लाज वाटतें. ॥ २३८ ॥

गृहीतो ब्राह्मणो म्लेच्छैः प्रायश्चित्तं चरन् पुनः ।
म्लेञ्छैः सङ्कीर्यते नैव तथा भासः शरीरकैः ॥ २३९ ॥
तसेंच ज्याप्रमाणें मुसलमानांनीं बाटविलेला ब्राह्मण, एकदां प्रायश्चित्त घेऊन पुन: त्याचे मंडळींत जात नाही, त्याप्रमाणे शरीराच्या अभिमानानें एकदां बाटलेला हा चिदाभास, पुन्हां त्यांचा अभिमान धरीत नाहीं. ॥ २३९ ॥

यौवराज्ये स्थितो राजपुत्रः साम्राज्यवाञ्छया ।
राजानुकारी भवति तथा साक्ष्यनुकार्ययम् ॥ २४० ॥
राजाचा वारस राजपुत्र, जसा आपणास राज्यपदवी मिळावी या इच्छेनें राजासारखेच आचरण करतो; तसाच हा चिदाभासही साक्षीप्रमाणे शांत असण्याविषयी प्रयत्‍न करतो. ॥ २४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *