सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १ ते २०

संवादिभ्रमवद्ब्रह्मतत्त्वोपास्त्यापि मुच्यते ।
उत्तरे तापनियेऽतः श्रुतोपास्तिरनेकधा ॥ १ ॥
गुरु – एथपर्यत मागील सर्व प्रकरणांत ज्ञान म्हणने काय, तें महावाक्यापासून कसें प्राप्त होतें व त्यापासून मुक्तीची सिद्धि कशी होते, याजविषयीं बरेंच प्रतिपादन केले. आतां या प्रकरणी मुमुक्षूस बुद्धिमांद्यादि प्रतिबंधामुळें ज्ञान न झाल्यास त्यानें तें होण्याविषयी कोणचें साधन करावे, हे आम्ही सांगणार. ते साधन खालीं लिहिलेल्या गुरूशिष्यांच्या संवादावरून लक्षांत येईल.

मणिप्रदीपप्रभयोर्मणिबुद्ध्याभिधावतोः ।
मिथ्याज्ञानाविशेषेऽपि विशेषोऽर्थक्रियां प्रति ॥ २ ॥
शिष्य – ते कृपा करून सांगाल तर मी फार आभारी होईन. गु० -म्हणतात. ज्याप्रमाणें संवादि भ्रमानेच प्रवृत्त झालेल्या पुरुषास इष्टार्थलाभ होतो, त्याप्रमाणें तत्त्वाची उपासना केली असतां जीवास ज्ञान होऊन मोक्षप्राप्ति होते. शि० -असें कोठे सांगितलें आहे. ॥ १ ॥

दीपोपवरकस्यान्तर्वर्तते तत्प्रभा बहिः ।
दृश्यते द्वार्यथान्यत्र तद्वद्दृष्टा मणेः प्रभा ॥ ३ ॥
गुरु -उत्तर तापनीय उपनिषदामध्यें उपासना अनेक प्रकारच्या सांगितल्या आहेत. शि० -संवादिभ्रम म्हणजे काय ? हें मला कृपा करून सांगा. गु० -त्याचें लक्षण आचार्यांचे वार्तिकांत चांगले सांगितलें आहे तेंच मी तुला सांगतो कल्पना कर कीं, ‘एक दीपाची प्रभा आणि एक मण्याची प्रभा अशा दोन प्रभा दूर पडलेल्या पाहून दोन पुरुष ते मणीच आहेत असें समजून घ्यावयास गेले. एथे दोघांचेही मिथ्याज्ञान सारखेच आहे. तथापि मणी असें समजून मण्याकडे धावणाऱ्या पुरुषास मात्र मणी मिळतो. व दुसऱ्यास मिळत नाहीं. म्हणून दोघांच्या फलप्राप्तीमध्यें अंतर पडते. ॥ २ ॥

दूरे प्रभाद्वयं दृष्ट्वा मणिबुद्ध्याभिधावतोः ।
प्रभायां मणिबुद्धिस्तु मिथ्याज्ञानं द्वयोरपि ॥ ४ ॥
शि० – हे आम्हाला स्पष्ट करून सांगा. गु० -एका मंदिराच्या एका खिडकीत दिवा असून त्याची प्रभा बाहेर पडली आहे. तसेंच दुसऱ्या खिडकीत मणी असून त्याचीही प्रभा बाहेर पडली आहे. ॥ ३ ॥

न लभ्यते मणिर्दीपप्रभां प्रत्यभिधावता ।
प्रभायां धावतावश्यं लभ्यतैव मणिर्मणेः ॥ ५ ॥
ह्या दोन्हीही प्रभा दुरून दोघां पुरुषांनी पाहिल्या आणि ते दोन्ही मणीच आहेत असें समजून दोघे दोहोंकडे धावले तर एथे दोघांसही झालेली जी मण्याची कल्पना ती मिथ्याज्ञानच आहे परंतु दीपप्रभेकडे धावणाऱ्या पुरुषास मणी मिळत नाहीं. आणि मणीप्रभेकडे धावणाराला तो मिळतो एवढेच काय तें अंतर ॥ ४-५ ॥

दीपप्रभामणिभ्रान्तिर्विसंवादिभ्रमः स्मृतः ।
मणिप्रभामणिभ्रान्तिः संवादिभ्रम उच्यते ॥ ६ ॥
एथें दीपप्रभेवर जी मण्याची कल्पना झाली त्यास विसंवादि भ्रम म्हणतात. आणि मणिप्रभेवर जी मण्याची कल्पना ती संवादिभ्रम होय. ॥ ६ ॥

बाष्पं धूमतया बुध्वा तत्राङ्गारानुमानतः ।
वह्निर्यदृच्छया लब्धः स संवादिभ्रमो मतः ॥ ७ ॥
हें प्रत्यक्ष ज्ञानाचे उदाहरण झालें. आतां अनुमान आणि आगम ह्या दोन्ही प्रमाणांविषयींचीं उदाहरणे ऐक. दूर वाफ उठलेली पाहून तो धूर असें समजून तेथें अग्नि. शोधायाला गेलेल्या मनुष्यास दैववशात् अग्नि मिळाला तर तो संवादभ्रमच ॥ ७ ॥

गोदावर्युदकं गङ्गोदकं मत्वा विशुद्धये ।
सम्प्रोक्ष्य शुद्धिमाप्नोति स संवादिभ्रमो मतः ॥ ८ ॥
तसेंच गोदावरीचे पाणी गंगोदक असें समजून आपली शुद्धि व्हावी असें समजून त्याच्या संप्रोक्षणानें शद्धि पावतो. ॥ ८ ॥

ज्वरेणाप्तः सन्निपातं भ्रान्त्या नारायणं स्मरन् ।
मृतः स्वर्गमवाप्नोति स संवादिभ्रमो मतः ॥ ९ ॥
आणि संनिपात ज्वर झालेला मनुष्य भ्रांतीने नारायणाचें स्मरण करून मरण पावला असतां स्वर्गास जातो. हाही संवादिभ्रमच आहे. ॥ ९ ॥

प्रत्यक्षस्यानुमानस्य तथा शास्त्रस्य गोचरे ।
उक्तन्यायेन संवादिभ्रमाः सन्तीह कोटिशः ॥ १० ॥
याप्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम विषयीं संवादि भ्रमाची उदाहरणे कोट्यवधी आहेत. ॥ १० ॥

अन्यथा मृत्तिकादारुशिलाः स्युर्देवताः कथम् ।
अग्नित्वादिधियोपास्याः कथं वा योषिदादयः ॥ ११ ॥
हा संवादिभ्रम सर्व उपासनांस लागू आहे. येरव्हीं मृत्तिका काष्ठ पाषाण या देवता कशा होतील व स्त्रियादिकांची अग्नित्व बुद्धीनें उपासना कशी घडेल ? ॥ ११ ॥

अयथावस्तुविज्ञानात्फलं लभ्यत ईप्सितम् ।
काकतालीयतः सोऽयं संवादिभ्रम उच्यते ॥ १२ ॥
या संवादिभ्रमाचे थोडक्यांत लक्षण सांगतो. विपरीत ज्ञानापासून काकतालीय न्यायाने जी ईप्सित फलप्राप्ति होते त्यास संवादिभ्रम असें म्हणतात. ॥ १२ ॥

स्वयं भ्रमोऽपि संवादी यथा सम्यक्फलप्रदः ।
ब्रह्मतत्त्वोपासनापि तथा मुक्तिफलप्रदा ॥ १३ ॥
शि० -हें संवादिभ्रमाचें लक्षण मला समजले. पण हें मोक्षप्राप्तीस कसें साधन होतें ? गुरु० हा जो वर संवादि भ्रम सांगितला तो जरी स्वतः भ्रम आहे तरी त्यापासून इष्टफलसिद्धि होते. याप्रमाणे ब्रह्मतत्त्वाची उपासनाही मोक्षरूप फल देते. ॥ १३ ॥

वेदान्तेभ्यो ब्रह्मतत्त्वमखण्डैकरसात्मकम् ।
परोक्षमवगम्यैतदहमस्मीत्युपासते ॥ १४ ॥
शि० -आपण म्हणतां कीं ब्रह्मतत्त्वाची उपासना करावी. ती काय ब्रह्म जाणून करावी कीं न जाणून करावी ? जाणून जर म्हणाल तर ज्ञान झाल्यावर उपासनेची गरज नाहीं, न जाणून जर म्हणाल. तर उपासना कशी होईल ? गु० -ब्रह्माचे जरी प्रत्यक्ष ज्ञान नाहीं तरी गुरुमुखापासून ब्रह्म अखंडैकरसात्मक आहे व तें तूं आहेस असा उपदेश श्रवण करून उत्पन्न होणाऱ्या परोक्ष ज्ञानानें ब्रह्माहमस्मि अशी उपासना करतां येते. ॥ १४ ॥

प्रत्यग्व्यक्तिमनुल्लिख्य शास्त्राद्विष्ण्वादिमूर्तिवत् ।
अस्ति ब्रह्मेति सामान्यज्ञानमत्रं परोक्षधीः ॥ १५ ॥
शि० -ज्या ब्रह्मतत्त्वाची उपासना करावयाची तद्विषयक जें परोक्ष ज्ञान त्याचें स्वरूप मला सांगा. गु० -विष्णू आदिमूर्तीचे प्रतिपादन ज्या शास्त्रांत केलें आहे, त्यापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाप्रमाणे या उपासनेंतही प्रत्यग्‌व्यक्तीचा जरी उल्लेख नाहीं तरी केवळ ब्रह्म आहे. असें जें सामान्य ज्ञान. तेंच येथें परोक्षज्ञान समजावे. ॥ १५ ॥

चतुर्भुजाद्यवगतावपि मूर्तिमनुल्लिखन् ।
अक्षैः परोक्षज्ञान्येव न तदा विष्णुमीक्षते ॥ १६ ॥
शि० -तुम्ही जो विष्णुमूर्तीचा दृष्टांत दिलात तें परोक्ष ज्ञान कसें होतें ? गु० -शास्त्रावरून विष्णूच्या मूर्तीचे चतुर्भुजत्वादिरूप प्रत्यक्ष नेत्रांस दिसत नाहीं, तेव्हां तें परोक्ष ज्ञानच म्हटलें पाहिजे. ॥ १६ ॥

परोक्षत्वापराधेन भवेन्नातत्त्ववेदनम् ।
प्रमाणेनैव शास्त्रेण सत्यमूर्तेर्विभासनात् ॥ १७ ॥
शि० -तर मग ते विष्णुमूर्तीचे ज्ञान भ्रांति कशावरून नव्हे ? कारण, तें प्रत्यक्ष झालें नाहीं. गु० – केवळ तें परोक्ष आहे एवढ्याच दोषामुळे तें भ्रांतिज्ञान होत नाहीं. भ्रांतिज्ञानास विषयाची असत्यता पाहिजे. पण येथें तर ज्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो अशा शास्त्रानें ती मूर्ति प्रत्यक्ष पाहून आम्हांस तसें वर्णन दिलें तेव्हां ती भ्रांति म्हणतां येत नाहीं. ॥ १७॥

सच्चिदानन्दरूपस्य शास्त्राद्‌भानेऽप्यनुल्लिखन् ।
प्रत्यंचं साक्षिणं तत्तु ब्रह्म साक्षान्न वीक्षते ॥ १८ ॥
एथेंही शास्त्रावरून सचिदानंदरूप ब्रह्माचें भान होऊनही प्रत्यक् साक्षींचे प्रत्यक्ष ज्ञान नसल्यामुळें तें ब्रह्म प्रत्यक्ष होत नाहीं. ॥ १८ ॥

शास्त्रोक्तेनैव मार्गेण सच्चिदानन्दनिर्णयात् ।
परोक्षमपि तज्ज्ञानं तत्त्वज्ञानं न तु भ्रमः ॥ १९ ॥
परंतु शास्त्राच्या सांगण्यावरून सच्चिदानंदरूपाचा निश्चय झाल्यामुळें तें परोक्ष ज्ञान तत्त्वज्ञानच समजले पाहिजे. तो भ्रम नव्हे. ॥ १९ ॥

ब्रह्म यद्यपि शास्त्रेषु प्रत्यक्त्वेनैव वर्णितम् ।
महावाक्यैस्तथाप्येतद्दुर्बोधमविचारिणः ॥ २० ॥
शि० – “सत्यं ज्ञानमनत ब्रह्म” इत्यादि वाक्यांपासून झालेल्र् ज्ञान असें परोक्ष होतें तसें महावाक्यापासून अपरोक्षही होतें. मग तुमची उपासना कशाला पाहिजे ? ॥ २० ॥

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

Leave a Reply