सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १०१ ते १२०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

वर्णाश्रमादयो देहे मायया परिकल्पिताः ।
नात्मनो बोधरूपस्येत्येवं तस्य विनिश्चयः ॥ १०१ ॥
कारण ज्याला मी अमुक वर्णातला, मी अमुक आश्रमी, मी तरुण, मी वृद्ध, असा अभिमान, त्यालाच काय ते विधिनिषेध.
पण तत्त्ववेत्त्याचा तर असा निश्चय असतो कीं, हे वर्णाभश्रमादिक देहाचे ठायीं मायेने कल्पित केले आहेत. त्याचा संपर्क बोधरूप आत्म्याला मुळीच लागत नाहीं. ॥ १००-१०१ ॥

समाधिमथ कर्माणि मा करोतु करोतु वा ।
हृदयेनास्तसर्वास्थो मुक्त एवोत्तमाशयः ॥ १०२ ॥
तो समाधी करो किंवा त्याच्या हृदयातील सर्व आस्थांचा नाश झाल्यामुळें त्याला कशाची गरज नाहीं. ॥ १०२ ॥

नैष्कर्म्येण न तस्यार्थस्तस्यार्थोऽस्ति न कर्मभिः ।
न समाधानजप्याभ्यां यस्य निर्वासनं मनः ॥ १०३ ॥
तो कर्मे करो किंवा संन्यास घेवो; तो समाधि करो, किंवा जप करो; त्याच्या मनांतील सर्व वासना समूळ नष्ट झाल्यामुळें तो कसाही राहिला तरी चालते. ॥ १०३ ॥

आत्मासङ्गस्ततोऽन्यत्स्यादिन्द्रजालं हि मायिकम् ।
इत्यचञ्चलनिर्णिते कुतो मनसि वासना ॥ १०४ ॥
खरेंच आहे कीं, आत्मा असंग आहे आणि त्यावाचून बाकी सर्व मायिक इंद्रजाल आहे, असा ज्या धन्य पुरुषाचा निश्चय झाला, त्याच्या मनांत वासनेचा अंकूर कसा राहील ? ॥ १०४ ॥

एवं नास्ति प्रसङ्गोऽपि कुतोऽस्यातिप्रसञ्जनम् ।
प्रसङ्गो यस्य तस्यैव शङ्क्येतातिप्रसञ्जनम् ॥ १०५ ॥
म्हणून ज्याला प्रसंगच नाहीं त्याला अति प्रसंग तरी कोठून असणार ? जेथें प्रसंग आहे तेथेंच अति प्रसंगाची शंका. ॥ १०५ ॥

विध्यभावान्न बालस्य दृश्यतेऽतिप्रसञ्जनम् ।
स्यात्कुतोऽतिप्रसङ्गोऽस्य विध्यभावे समे सति ॥ १०६ ॥
लहान मलाला कोणच्याही कर्माचा विधिनिषेध नसल्यामुळें अति प्रसंगाचा दोष लागत नाहीं. ॥ १०६ ॥

न किंचिद्वेत्ति बालश्चेत्सर्वं वेत्त्येव तत्त्ववित् ।
अल्पज्ञस्यैव विधयः सर्वे स्युर्नान्ययोर्द्वयोः ॥ १०७ ॥
शि० –बाळ अगदीं अज्ञ असतो म्हणून त्याला तो दोष लागत नाहीं. गु० -तत्त्ववेत्ता सर्वज्ञ असतो म्हणून त्यालाही तो दोष लागत नाहीं. शि० -मग विधिनिषेध कोणी बाळगावेत ? गु० -अल्पज्ञ लोकांनी. ते अज्ञान्यालाही नाहींत, व सर्वज्ञालाही नाहींत. ॥ १०७ ॥

शापानुग्रहसामर्थ्यं यस्यासौ तत्त्वविद्यदि ।
न तत् शापादिसामर्थ्यं फलं स्यात्तपसो यतः ॥ १०८ ॥
शि० -आम्ही असें ऐकतो कीं, शापानुग्रह सामर्थ्य असणें हैं तत्त्ववेत्त्याचे मुख्य लक्षण आहे. तें ज्याला नाहीं तो ज्ञानीच नव्हे. गु० -तसं समजणे ती अगदींच चूक आहे. तें सामर्थ्य ज्ञानाचे फळ नव्हे, तर केवळ तपाचें फळ आहे. ॥ १०८ ॥

व्यासादेरपि सामर्थ्यं दृश्यते तपसो बलात् ।
शापादिकारणादन्यत्तपोज्ञानस्य कारणम् ॥ ।१०९ ॥
शि० -व्यासादिक जे ज्ञानी होऊन गेले त्यांचे आंगी तें सामर्थ्य दिसत होते. गु० -त्याचें कारण असें कीं, ते ज्ञानी असून तपस्वीही होते म्हणून त्यांचे आगी तें सामर्थ्य होतें. पण तें कांहीं ज्ञानाचे फळ नव्हे. ज्ञान होण्यालाही एक प्रकारचे तपच पाहिजे. पण शापादि सामर्थ्यास कारणीभूत तपापासन तें ज्ञानजनक तप निराळे आहे. त्यापासून ज्ञानच होतें. ॥ १०९ ॥

द्वयं यस्यास्ति तस्यैव सामर्थ्यज्ञानयोर्जनिः ।
एकैकं तु तपः कुर्वन्नेकैकं लभते फलम् ॥ ११० ॥
तीं दोन्ही तपें ज्यानें केली असतील त्याला ज्ञान आणि सामर्थ्य ही दोनही फळें मिळतात आणि एकच करणाराला एकच फळ मिळते. ॥ ११० ॥

सामर्थ्यहीनो निन्द्यश्चेद्यतिभिर्विधिवर्जितः ।
निन्द्यन्ते यतयोऽप्यन्यैरनिशं भोगलंपटैः ॥ १११ ॥
शि -विधि-निषेध-रहित अशा तत्त्ववत्त्याच्या आंगी शापादि सामर्थ्य जर नसेल तर त्याची विधिपूर्वक कर्मानुष्ठान करणारे पुरुष निंदा करतात. गु० -करीतना बापडे ! असे निंदा करणारे पुरुष तरी निंदेतून कुठे सुटले आहेत ? त्यांचीही निंदा करण्यास विषयलंपट पुरुष तयार आहेतच ! ॥ १११ ॥

भिक्षावस्त्रादि रक्षेयुर्यद्येते भोगतुष्टये ।
अहो यतित्वमेतेषां वैराग्यभरमन्थरम् ॥ ११२ ॥
शि० -यतींनीं भोगतुष्टीकरितां भिक्षा मागितली व वस्त्रादिकांचें संरक्षण केले म्हणून दोष काय ? गु० -मग त्यांचें यतित्व काय विचारावें ! त्यांचें वैराग्य किती म्हणून वर्णावे . ॥ ११२ ॥

वर्णाश्रमपरान्मूर्खा निन्दन्त्वित्युच्यते यदि ।
देहात्ममतयो बुद्धं निन्दन्त्वाश्रममानिनः ॥ ११३ ॥
शि० -विषयलंपटांनीं केलेल्या निंदेनें वर्णाश्रम पाळणाऱ्या पुरुषाची मुळींच हानि नाहीं. गो० मग देहाला मी म्हणणाऱ्या कमर्ठ पुरुषाने ज्ञान्याची निदा केली असतां त्याचा तरी काय तोटाआहे ? ॥ ११३ ॥

तदित्थं तत्त्वविज्ञाने साधनानुपमर्दनात् ।
ज्ञानिनाचरितुं शक्यं सम्यग्राज्यादि लौकिकम् ॥ ११४ ॥
शि० – तर तुमचे म्हणणें काय तें तरी सांगा ? गु० -आमचें म्हणणें इतकेंच कीं, तत्त्वज्ञान झाल्याने व्यवहाराची देहेंद्रियादिक साधने ज्या अर्थी नष्ट होत नाहींत त्या अर्थीं राज्यादिक व्यवहार करण्यास त्याला कोणची नड आहे असें कांहीं नाही. ॥ ११४ ॥

मिथ्यात्वबुद्ध्या तत्रेच्छा नास्ति चेत्तर्हि मास्तु तत् ।
ध्यायन्वाथ व्यवहरन्यथारब्धं वसत्वयम् ॥ ११५ ॥
शि० -तत्त्ववेत्त्याला सर्व प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय झाल्यामुळें त्याविषयी त्याची इच्छा कशी राहील ? गु० -राहते असें आमचे तरी कोठे म्हणणें आहे ? तो कांहीं वेळ ध्यानांत व कांहीं वेळ व्यवहारांत अशा रीतीनें प्रारब्धानुसार कालक्षेप करतो. ॥ ११५ ॥

उपासकस्तु सततं ध्यायन्नेव वसेदिति ।
ध्यानेनैव कृतं तस्य ब्रह्मत्वं विष्णुतादिवत् ॥ ११६ ॥
शि० -तर तत्त्ववेत्ता आणि उपासक यामध्ये भेद काय ? गु० -भेद इतकाच कीं, तत्त्ववेत्त्याला जसें पाहिजे तसें राहता येतें तसें उपासकास राहता येत नाहीं. ज्या अर्थी विष्णू आदि दैवतांप्रमाणे त्याचा ब्रह्मपणा ध्यानानेंच केला आहे, त्या अर्थी त्यानें सदा सर्वदा ध्यानातच असलें पाहिजे. ॥ ११६ ॥

ध्यानोपादानकं यत्तद्ध्यानाभावे विलीयते ।
वास्तवी ब्रह्मता नैव ज्ञानाभावे विलीयते ॥ ११७ ॥
शि० -मग त्या ध्यानाने झालेल्या ब्रह्मतेला हानी कोणची ? गु० -ध्यान जोपर्यंत आहे तोपर्यंत कांहीं त्याला हानी नाहीं. ध्यान नष्ट झालें कीं, ती नष्ट झाली. कारण, ती ध्यानाचीच बनलेली आहे. ॥ ११७ ॥

ततोऽभिज्ञापकं ज्ञानं न नित्यं जनयत्यदः ।
ज्ञापकाभावमात्रेण न हि सत्यं विलीयते ॥ ११८ ॥
शि० -ध्यान गेलें असतां जशी ब्रह्मता नाहीशी होते, तशी ज्ञान गेल्यानेंही ती नाहीशी होईल ? गु० -तसे कधींही होणार नाहीं. कारण, ज्ञान्याची ब्रह्मता ज्ञानाने नवीन झाली असें नाही; ती मुळचीच सिद्ध आहे. केवळ ती ज्ञानाने प्रकाशित मात्र केली; म्हणून प्रकाशित करणारे ज्ञान जरी नष्ट झालें, तरी ती जशाची तशीच असते. याकरितां ब्रह्मास दाखविणारे जे ज्ञान तें त्यास नवीन बनवीत नाही. म्हणून तें गेल्याने सत्य ब्रह्मस्वरूप नष्ट होत नाहीं हे उघड आहे. ॥ ११८ ॥

अस्त्येव उपासकस्यापि वास्तवी ब्रह्मतेति चेत् ।
पामराणां तिरश्चां च वास्तवी ब्रह्मता न किम् ॥ ११९ ॥
शि० -ज्ञान्याप्रमाणे उपासकाचीही ब्रह्मता खरीच आहे. गु० -त्या दृष्टीने पाहिले असतां ज्ञानी मनुष्यांची व पशुपक्ष्यादिकांचीही ब्रह्मता खरी आहे. ॥ ११९ ॥

अज्ञानादपुमर्थत्वमुभयत्रापि तत्समम् ।
उपवासाद्यथा भिक्षा वरं ध्यानं तथान्यथः ॥ १२० ॥
शि० -पण त्यांच्या अज्ञानामुळे ती असून नसल्यासारखी आहे. मग त्यांत पुरुषार्थ कोणता ? गु० -ही गोष्ट उपासकासही लागू आहे. कारण, त्यालाही ज्ञान नसतें. शि० -मग उपासना कशास सांगतां ? गु० -आम्ही जी उपासना सांगतो ती केवळ “उपवासात् वरं भिक्षा” या न्यायाने सांगतो उपाशी मरण्यापेक्षा जशी भिक्षा बरी, तसें इतर अनुष्ठामापेक्षा ध्यान बरें. ॥ १२० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *