सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ८१ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

वेदाध्यायी ह्यप्रमत्तोऽधीते स्वप्नेऽपि वासितः ।
जपिता तु जपत्येव तथा ध्यातापि वासयेत् ॥ ८१ ॥
ज्याप्रमाणें वेदाचे अध्ययन करणारा किंवा जप करणारा सदा सर्वदा त्यांतच गढून जाऊन स्वप्नांत सुद्धा आपला अभ्यास करतो, त्याप्रमाणें ब्रह्मोपासकानेंही त्यांतच सदा सर्वदा असावे. ॥ ८१ ॥

विरोधिप्रत्ययं त्यक्त्वा नैरन्तर्येण भावयन् ।
लभते वासनावेशात्स्वप्नादावपि भावनाम् ॥ ८२ ॥
शि० -स्वप्रांत देखील ती भावना कशी होते ? गु० -दुसऱ्या विरोधी विषयाचे चिंतन मध्ये न आणता एक सारखी त्याचीच भावना केली म्हणजे ती भावना स्वप्नांत देखील राहते. ह४ याचा अनुभव सर्वत्रांना आहे. ॥ ८२ ॥

भुञ्जानोऽपि निज आरब्धमास्थातिशयतोऽनिशम् ।
ध्यातुं शक्तो न सन्देहो विषयव्यसनी यथा ॥ ८३ ॥
शि० – निरंतर भावनेस प्रारब्ध आड येत नाहीं काय ? गु० -ज्या मनुष्यास मोक्षाची आस्था अत्यंत आहे, त्यास प्रारब्धाचा भोग न सुटतांही ब्रह्मचिंतन करणें शक्य आहे यांत संशय नाहीं. यास दृष्टांत व्यसनी पुरुषाचा. ॥ ८३ ॥

परव्यसनिनी नारी व्यग्रापि गृहकर्मणि ।
तदेवास्वादयत्यन्तः परसङ्गरसायनम् ॥ ८४ ॥
ज्या व्यभिचारिणीचें चित्त परपुरुषावर जडलें, ती घरचा कामधंदा करीत असूनही तें परसंगरसायन आंतून एकसारखी चाखीत असते. ॥ ८४॥

परसङ्गं स्वादयन्त्या अपि नो गृहकर्म तत् ।
कुण्ठी भवेदपि त्वेतदापातेनैव वर्तते ॥ ८५ ॥
शि० -मग तिचे घरचे काम कसें होतें ? गु० -त्या आस्वादनांत घरचे काम कांहीं रहात नाहीं; पण सरासरी चालते. ॥ ८५ ॥

गृहकृत्यव्यसनिनी यथा सम्यक्करोति तत् ।
परव्यसनिनी तद्वन्न करोत्येव सर्वथा ॥ ८६ ॥
आतां कुलीन स्त्री जशी घरच्या कामांत लक्ष ठेवून काम करते तसें मात्र तिला करतां यावयाचे नाहीं. ॥ ८६ ॥

एवं ध्यानैकनिष्ठोऽपि लेशाल्लौकिकमाचरेत् ।
तत्त्ववित्त्वविरोधित्वाल्लौकिकं सम्यगाचरेत् ॥ ८७ ॥
त्याप्रमाणें ध्यानैकनिष्ठ पुरुषाचा संसार सरासरी वेठीनें चालतो. पण तत्त्ववेत्त्याची गोष्ट तशी नाहीं. व्यवहारास आणि ज्ञानास विरोध मुळीच नसल्यामुळे त्याचा व्यवहार यथास्थित चालतो. ॥ ८७ ॥

मायामयः प्रपञ्चोऽयमात्मा चैतन्यरूपधृक् ।
इति बोधे विरोधः को लौकिकव्यवहारिणः ॥ ८८ ॥
कारणसर्व प्रपंच मायामयआहे. आणि चैतन्यरूपीआत्मा खराआहे, असा बोध झाल्यावर त्याला व्यवहाराचा अडथळा मुळींच नाहीं. ॥ ८८ ॥

अपेक्षते व्यवहृतिर्न प्रपञ्चस्य वस्तुताम् ।
नाप्यात्मजाड्यं किंत्वेषा साधनान्येव काङ्क्षति ॥ ८९ ॥
शि० -ज्ञान्यास हा प्रसंग अगदी खोटा आहे असा निश्चय झाल्यावर व्यवहार कसा घडावा ? गु० -व्यवहार करण्याला त्याची जी मुख्य साधने आहेत तीं असली म्हणजे झालें. त्याला म्हणजे प्रपंच खरा आहे, आत्मा जड आहे ही भ्रांतीच असली पाहिजे असें नाहीं. ॥ ८९ ॥

मनोवाक्कायतद्बाह्यपदार्थाः साधनानि तान् ।
तत्त्वविन्नोपमृद्नाति व्यवहारोऽस्य नो कुतः ॥ ९० ॥
शि० -तीं मुख्य साधने कोणती ? गु० -मन, वाणी, शरीर आणि दुसरे बाह्य विषय हीच व्यवहाराचीं मुख्य साधने. तीं म्हणजे ज्ञान होतांच तत्त्वज्ञ पुरुषांची नाहीशी होतात असें कांहीं नाहीं. मग व्यवहाराला हरकत कोणची ? ॥ ९० ॥

उपमृद्नाति चित्तं चेद्ध्यातासौ न तु तत्त्ववित् ।
न बुद्धिं मर्द्दयन्दृष्टो घटतत्त्वस्य वेदिता ॥ ९१ ॥
शि० -तत्त्ववेत्त्याला मनाचा निरोध करावा लागतो. मग त्याचा व्यवहार कसा चालावा ? गु० -ही तुझी गैरसमजूत आहे. तैसा जो निरोध करणारा आहे तो तत्त्ववेत्ताच नव्हे. तो ध्याता असें म्हटलें पाहिजे. अरे घट जाणाराला बुद्धीचें मर्दन केलें पाहिजे काय ? तसें करणारा आम्हाला तर कोठे आढळत नाही. ॥ ९१ ॥

सकृत्प्रत्ययमात्रेण घटश्चेद्‌भासते तदा ।
स्वप्रकाशोऽयमात्मा किं घटवच्च न भासते ॥ ९२ ॥
एकदा प्रत्यय आल्याने जर घट समजतो तर एकदा प्रत्यय आल्याने स्वप्रकाश आत्माही तसाच समजला पाहिजे. ॥ ९२ ॥

स्वप्रकाशतया किं ते तद्बुद्धिस्तत्त्ववेदनम् ।
बुद्धिश्च क्षणनाश्येति चोद्यं तुल्यं घटादिषु ॥ ९३ ॥
शि० -एथे आत्मा स्वप्रकाश म्हणून जें म्हटलें, त्याचें प्रयोजन कांहीं दिसत नाहीं. कारण तो जरी स्वप्रकाश असला, तरी त्यास बुद्धीने व्यापल्यावांचून त्याचें ज्ञानच होणे नाहीं. आणि बुद्धि तर क्षणोक्षणीं नाश पावणारी आहे. म्हणून तिची पुनः पुनः ब्रह्माचे ठायीं स्थापना केलीच पाहिजे. व ती स्थापना निरोधावाचून होत नाहीं. गु० -ही सर्व शंका घटज्ञानालाही लागू आहे ॥ ९३ ॥

घटादौ निश्चिते बुद्धिर्नश्यत्येव यदा घटः ।
इष्टो नेतुं तदा शक्य इति चेत्सममात्मनि ॥ ९४ ॥
शिं० -ती घटज्ञानाला कशी लागू होईल ? कारण घटज्ञान जरी क्षणिक असलें तरी एकदा हा घट असा निश्चय झाल्यावर त्या ज्ञानाचा पाहिजे तेव्हां व्यवहार करतां येतो. म्हणून तेथें चित्तस्थैर्याची गरज नाहीं. गु० -जशी घटपक्षी त्याची गरज नाहीं तशी आत्मज्ञान झाल्यावरही चित्तस्थैर्याची गरज नाहीं. ॥ ९४ ॥

निश्चित्य सकृदात्मानं यदापेक्षा तदैव तत् ।
वक्तुं मन्तुं तथा ध्यातुं शक्नोत्येव हि तत्त्ववित् ॥ ९५ ॥
कारण, एकदा आत्मा असा आहे असा निश्चय झाल्यावर पाहिजे तेव्हां त्याचें ध्यान करण्याला, मनन करण्याला, व वर्णन करण्याला तत्त्ववेत्त्याला येतें. ॥ ९५ ॥

उपासक इव ध्यायं लौकिकं विस्मरेत् यदि ।
विस्मरत्येव सा ध्यानाद्विस्मृतिर्न तु वेदनात् ॥ ९६ ॥
शि० -तत्ववेत्ताही उपासकाप्रमाणें आत्मज्ञानांत निमग्न असतां त्याला जगाची विस्मृति पडण्याचा संभव आहे. गु० -विस्मृति पडेना बापडी. पडली तरी ती ध्यानापाऊन पडते, ज्ञानापासून पडत नाहीं, इतकेंच आमचे म्हणणें आहे. ॥ ९६ ॥

ध्यानं त्वैच्छिकमेतस्य वेदनान्मुक्तिसिद्धितः ।
ज्ञानादेव तु कैवल्यमिति शास्त्रेषु डिण्डिमः ॥ ९७ ॥
शि० -एकूण तर तत्त्ववेत्त्वालाही ब्रह्मध्यान करावे लागतें ? गु० -त्यानें तें केलेंच पाहिजे असें कांहीं नाही तें त्यानें पाहिजे असल्यास करावे. कारण मोक्षप्राति ज्ञानापासूनच होते असा वेदाचा डंका वाजत आहे. ॥ ९७ ॥

तत्त्वविद्यदि न ध्यायेत्प्रवर्तेत तदा बहिः ।
प्रवर्ततां सुखेनायं को बाधोऽस्य प्रवर्तने ॥ ९८ ॥
शितत्त्ववेत्ता जर ब्रह्मध्यान सोडील तर त्याची प्रवृत्ति बाहेर प्रपंचाकडे होईल. गु० -होइना बापडी. तशा प्रवृत्तीनें तत्त्ववेत्त्याचे काय जातें ? ॥ ९८ ॥

अतिप्रसङ्ग इति चेत्प्रसङ्गं तावदीरय ।
प्रसङ्गो विधिशास्त्रं चेन्न तत्तत्त्वविदं प्रति ॥ ९९ ॥
शि० -तशी प्रवृत्ति झाल्यास अति प्रसंगाची ज्ञान्यास भीति आहे. गु० -त्याला प्रसंग असेल तर अतिप्रसंग. प्रथम तूं प्रसंग म्हणजे काय हें मला सांग. शि० -शास्त्राप्रमाणें वागणे गु० -ते तत्त्ववेत्त्याला मुळीच लागू नाहीं. ॥ ९९ ॥

वर्णाश्रमवयोवस्थाभिमानो यस्य विद्यते ।
तस्यैव हि निषेधाश्च विधयः सकला अपि ॥ १०० ॥
कारण ज्याला मी अमुक वर्णातला, मी अमुक आश्रमी, मी तरुण, मी वृद्ध, असा अभिमान, त्यालाच काय ते विधिनिषेध.
पण तत्त्ववेत्त्याचा तर असा निश्चय असतो कीं, हे वर्णाभश्रमादिक देहाचे ठायीं मायेने कल्पित केले आहेत. त्याचा संपर्क बोधरूप आत्म्याला मुळीच लागत नाहीं. ॥ १००-१०१ ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *