सार्थ पंचदशी मराठी चतुर्दशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे विद्यानन्दः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अथात्र विषयानन्दो ब्रह्मानन्दांशरूपभाक् ।
निरूप्यते द्वारभूतस्तदंशत्वं श्रुतिर्जगौ ॥ १ ॥

एषोऽस्य परमानन्दो योऽखण्डैकरसात्मकः ।
अन्यानि भूतान्येतस्य मात्रामेवोपभुञ्जते ॥ २ ॥
शान्ता घोरास्तथा मूढा मनसो वृत्तयस्त्रिधा ।
वैराग्यं क्षान्तिरौदार्यमित्याद्याः शान्तवृत्तयः ॥ ३ ॥
तृष्णा स्नेहो रागलोभावित्याद्या घोरवृत्तयः ।
संमोहोभयमित्याद्याः कथिता मूढवृत्तयः ॥ ४ ॥
वृत्तिष्वेतासु सर्वासु ब्रह्मणश्चित्स्वभावता ।
प्रतिबिम्बति शान्तासु सुखं च प्रतिबिम्बति ॥ ५ ॥
रूपं रूपं बभूवासौ प्रतिरूप इति श्रुतिः ।
उपमा सूर्यकेत्वादि सूत्रयामास सूत्रकृत् ॥ ६ ॥
एक एव हि भूतात्मा भूते भूते व्यवस्थितः ।
एकधा बहुधा चैव दृश्यते जलचन्द्रवत् ॥ ७ ॥
जले प्रविष्टश्चन्द्रोऽयमस्पष्टः कलुषे जले ।
विस्पष्टो निर्मले तद्वद् द्वेधा ब्रह्मापि वृत्तिषु ॥ ८ ॥
घोरमूढासु मालिन्यात्सुखांशस्य तिरोहितः ।
ईषन्नैर्मल्यतस्तत्र चिदंशप्रतिबिम्बनम् ॥ ९ ॥
यद्वापि निर्मले नीरे वह्नेरौष्ण्यस्य संक्रमः ।
न प्रकाशस्य तद्वत्स्याच्चिन्मात्रोद्‌भूतिरत्र च ॥ १० ॥

विषयानंद प्रापंचिक असल्यामुळे जरी तो मुमुक्षूस ग्राह्य झाला नाही तथापि तो ब्रह्मानंदाचा अंश असल्यामुळें त्यांचें निरुपण ब्रह्मज्ञान होण्यास फार उपयोगी आहे. म्हणून तें आम्ही या प्रकरणी करतो. हा विषयानंद मोक्षाचे द्वार आहे. तो ब्रह्मानंदाचा अंश आहे एतद्विषयीं श्रुतिप्रमाण असें, आहे कीं ॥ १ ॥
“हा जो ब्रह्मनिष्ठेचा अखंडैकरस परमानंद त्याच्याच अंशभूत आनंदाचा उपभोग इतर भूते घेतात.” असा श्रुत्यर्थ आहे ॥ २ ॥

आता विषयानंद ब्रह्मानंदाचाच अंश आहे हें नीट समजावे म्हणून तदुपाधिभूत अंतःकरणाच्या वृत्ति येथे सांगतो या मताच्या वृत्ति तीन प्रकारच्या आहेत. क्षांत, घोर आणि मूढ. वैराग्य क्षमा, औदार्य इत्यादि वृत्ति शांत होत. ॥ ३ ॥
तृष्णा, स्नेह, राग, लोभ इत्यादि घोर वृत्ति समजाव्या. आणि मोह भय इत्यादि मूढ वृत्ति होत. ॥ ४ ॥

या सर्व वृत्तीचे ठायी ब्रह्माचा चैतन्यस्वभाव प्रतिबिंबित असतो. परंतु त्याच्या आनंदस्वभावाचें प्रतिबिंब केवळ शांतवृत्तीमध्ये मात्र पडते. ॥ ५ ॥
यास “रूपं रूपं बभूवासौ प्रतिरूपः” ( एकच परमात्मा भिन्न भिन्न रूपाप्रत पावला.) असें -श्रुतिप्रमाण आहे. आणि उपमासूर्यक असे व्याससूत्राचे प्रमाण आहे ॥ ६ ॥
परमात्मा एकच, असून उपाधीच्या संपर्काने, भिन्न भिन्न भूतांचे ठायी व्यवस्थित होऊन जलप्रतिबिंबित चंद्राप्रमाणे बहुविध रूपांप्रत पावला. अशीही एक श्रुति आहे. ॥ ७ ॥
त्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब गढूळ पाण्यांत अस्पष्ट, व निर्मलोदकांत स्पष्ट दिसते, त्याप्रमाणें ब्रह्मही वृत्तीचेठायी दोन प्रकारे दिसते. ॥ ८ ॥
घोर व मूढ वृत्ति मलीन असल्यामुळे त्यांत ब्रह्माचा आनंदाश आच्छादित असतो व किंचित्र पारदर्शकता असल्यामुळे त्यांत चैतन्याचे मात्र प्रतिबिंब पडते. ॥ ९ ॥
अथवा यास दुसरा एक दृष्टांत आहे. प्रकाश आणि उष्णता असे अग्नीचे दोन स्वभाव असून तापविलेल्या स्वच्छ पाण्यांत त्याची उष्णता मात्र. उद्‌भूत होते. पण प्रकाशाचा प्रवेश होत नाहीं. तद्वत घोर, मूढ वृत्तीचे ठायीं चैतन्य मात्र प्रतिबिंबित होतें. ॥ १० ॥

काष्ठे त्वौष्ण्यप्रकाशौ द्वावुद्‌भवं गच्छतो यथा ।
शान्तासु सुखचैतन्ये तथैवोद्‌भूतिमाप्नुतः ॥ ११ ॥
वस्तुस्वरूपमाश्रित्य व्यवस्था तूभयोः समा ।
अनुभूत्यनुसारेण कल्प्यते हि नियामकम् ॥ १२ ॥
न घोरासु न मूढासु सुखानुभव ईक्ष्यते ।
शान्तास्वपि क्वचित्कश्चित्सुखातिशय ईक्ष्यताम् ॥ १३ ॥
गृहक्षेत्रादिविषये यदा कामो भवेत्तदा ।
राजसस्यास्य कामस्य घोरत्वात्तत्र नो सुखम् ॥ १४ ॥
सिद्ध्येन्न वेत्यस्ति दुःखमसिद्धौ तद्विवर्धते ।
प्रतिबन्धे भवेत्क्रोधो द्वेषो वा प्रतिकूलतः ॥ १५ ॥
अशक्यश्चेत्प्रतीकारो विषदः स्यात्स तानसः ।
क्रोधादिषु महादुःखं सुखशङ्कापि दूरतः ॥ १६ ॥
काम्यलाभे हर्षवृत्तिः शान्ता तत्र महत्सुखम् ।
भोगे महत्तरं लाभप्रसक्तावीषदेव हि ॥ १७ ॥
महत्तमं विरक्तौ तु विद्यानन्दे तदीरितम् ।
एवं क्षान्तौ तथौदार्ये क्रोधलोभनिवारणात् ॥ १८ ॥
यद्यत्सुखं भवेत्तत्तद्‌ब्रह्मैव प्रतिबिम्बनात् ।
वृत्तिष्वन्तर्मुखा स्वस्य निर्विघ्नं प्रतिबिम्बनम् ॥ १९ ॥
सत्ता चितिः सुखं चेति स्वभावा ब्रह्मणस्त्रयः ।
मृच्छिलादिषु सत्तैव व्यज्यते नेतरद् द्वयम् ॥ २० ॥

परंतु लाकडामध्ये उष्णता व प्रकाश असे दोनही धर्मे उद्भव पावतात, त्याप्रमाणें शांतवृत्तीमध्ये सुख आणि चैतन्य दोनही ब्रह्माचेस्वभाव अनुभवास येतात. ॥ ११ ॥
ही व्यवस्था कशी केली ह्मणाल तर पदार्थाचे स्वभाव पाहून आम्ही ती केली. कारण कोणताही नियम बांधणे झाल्यास अनुभवास अनुसरून तो कल्पिला पाहिजे. ॥ १२ ॥
घोर आणि मूढ वृत्तीचे ठायीं सुखानुभव होत नाही. शांतवृत्तीमध्यें देखील सुखातिशयाचा अनुभव केव्हा तरी होतो. ॥ १३ ॥

घरदार शेतभात इत्यादिकांविषयीं जेव्हां इच्छा होते, तेव्हां ती रजोगुणापासून उत्पन्न झाली असल्यामुळें ती घोर वृत्ति होय. म्हणून तेये सुख नाहीं. ॥ १४ ॥
याचे कारण असें आहे कीं, सुख मिळेल किंवा नाहीं असा संशय असल्यामुळें दुःख होतें. न मिळाले असतां ते वाढतें. प्रतिबंध झाला असतां क्रोध होतो. किंवा प्रतिकूलतेनें द्वेष उत्पन्न होतो. ॥ १५ ॥
त्याचा परिहार करणे अशक्य झाल्यास विषाद होतो. याचें कारण तमोगुण होय. क्रोधादिकांचे ठायी महादुःख असल्यामुळे सुखाची शंका देखील नाही ॥ १६ ॥
इच्छिल्या विषयाचा लाभ झाला असतां हर्षवृत्ति होते. ही शांतवृत्ति असल्यामुळें त्यांत महत्सुख आहे. भोगामध्यें महत्तर सुख आहे. लाभ होण्याचा प्रसंग दिसल्यास किंचित् सुख होतें. ॥ १७ ॥
विरक्तीचे ठायीं इच्छेचाच अभाव असल्यानें सर्वात मोठे सुख आहे. हें सुख विद्यानंद प्रकरणांत सांगितले आहे. याप्रमाणेंच क्षांतीचेठायी क्रोधाचा व औदार्याचे ठायी लोभाचा अभाव असल्यामुळें तेथेही सुख आहे. ॥ १८ ॥
जें जें म्हणून सुख होतें तें तें सर्व ब्रह्माचे प्रतिबिंब असल्यामुळें ब्रह्मच समजले पाहिजे. हें प्रतिबिंब जेव्हां वृत्ति अंतर्मुख असते तेव्हां निर्विघ्नपणें पडते. ॥ १९ ॥
सत्ता, चैतन्य, आणि सुख हे तीन ब्रह्माचें स्वभाव आहेत. दगड माती इत्यादि जड पदार्थांत ब्रह्माचा सत्तास्वभाव मात्र व्यक्त होतो. इतर दोन स्वभाव आच्छादित असतात. ॥ २० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *