सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ६१ ते ८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अवास्तवी वेद्यता चेदुपास्यत्वं तथा न किम् ।
वृत्तिव्याप्तिर्वेद्यता चेदुपास्यत्वेऽपि तत्समम् ॥ ६१ ॥
शि० -ब्रह्माची वेद्यता कांहीं खरी नव्हे. गु० ब्रह्माची उपास्यता तरी कुठे आम्ही खरी म्हणतो. शि० – ज्ञान होण्यास वृत्तीची व्याप्ति लागते. गु० -उपासनेला ही शब्दबलाने वृत्तीची व्याप्ति लागते. ॥ ६१ ॥

का ते भक्तिरुपास्तौ चेत्कस्ते द्वेषस्तदीरय ।
मानाभावो न वाच्योऽस्यां बहुश्रुतिषु दर्शनात् ॥ ६२ ॥
शि० – गुरु महाराज, उपासनेविषयी आपला इतका आग्रह कां ? गु० -तुझा तरी तिजविषयीं इतका द्वेष कां ? शि० – तिजविषयीं प्रमाण कोठे दिसत नाहीं हो. गु० -हत्‌तिच्या. प्रमाणाला काय तोटा. पुष्कळ श्रुतीची प्रमाणें आहेत. ॥ ६२ ॥

उत्तरस्मिंस्तापनीये शैब्यप्रश्नेऽथ काठके ।
माण्डुक्यादौ च सर्वत्र निर्गुणोपास्तिरीरिता ॥ ६३ ॥
उत्तरतापनीय उपनिषदांत, शैब्य प्रश्नोपनिषदांत, तसेंच काठक मांडुक्य इत्यादिक उपनिषदांमध्यें निर्गुण उपासना सांगितली आहे. ॥ ६३॥

अनुष्ठानप्रकारोऽस्याः पञ्चीकरण ईरितः ।
ज्ञानसाधनमेतच्चेन्नेति केनात्र वर्णितम् ॥ ६४ ॥
शि० -उपासना कशी करावी ? गु. -पंचीकरण ग्रंथांत सांगितली आहे. शि० -मग हें ज्ञानाला साधन तर त्यापासून साक्षात् कांहीं मुक्ति होत नाहीं. गु० -तसें आमचे तरी कोठे म्हणणें आहे, उपासना ही ज्ञानालाच साधन आहे. ॥ ६४ ॥

नानुतिष्ठति कोऽप्येतदिति चेन्नानुतिष्ठतु ।
पुरुषस्यापराधेन किमुपास्तिः प्रदुष्यति ॥ ६५ ॥
शि० -जगामध्ये ही उपासना कोणीच करीत नाहीत. गु० -न करीतना बापडे. कोणी ती न केल्यामुळें उपासनेला दोष येतो काय ? ॥ ६५ ॥

इतोऽप्यतिशयं मत्वा मन्त्रान्वश्याअदिकारिणः ।
मूढा जपन्तु तेभ्योऽतिमूढाः कृषिमुपासताम् ॥ ६६ ॥
मनुष्याची सद्यःफलाकडे नेहमी दृष्टि असते तूं म्हणतोस निर्गुण उपासना करीत नाहींत. पण सगुण उपासना तरी सर्व कुठे करतात ? तिचेही फल मिळण्याला पुष्कळ काळ लागतो. म्हणून सद्यःफलदायी वशीकरणादिकांचे मंत्र जपणारेही मूढ आहेतच. इतकेच नव्हे, यातही नियम पाळण्याचा श्रम ज्यास वाटतो ते त्याहीपेक्षां सद्यःफलदायी जी कृष्यादि कर्मे त्यांचा आश्रय घेतात. म्हणून कोणचेंही कृत्य लोक करीत नाहींत येवढ्याच कारणानें तें त्याज्य होतें असें नाहीं. ॥ ६६ ॥

तिष्ठन्तु मूढाः प्रकृता निर्गुणोपास्तिरीर्यते ।
विद्यैक्यात्सर्वशाखास्थान्गुणानत्रोपसंहरेत् ॥ ६७ ॥
सांसारिक फलाची ज्यास इच्छा आहे ते निर्गुण उपासनेचे अनुष्ठान करीत नाहीत म्हणून मुमुक्षूंनीही त्याचा त्याग करावा कीं काय ? ही मुर्खांची गोष्ट असो. तूर्त आम्ही आमच्या विषयाकडे वळूं. वेदांच्या सर्व शाखांमध्यें विधेय आणि निषेध्य असे जे ब्रह्मावर आरोपित गुण त्या सर्वांचा एकत्र उपसंहार करून एथे निर्गुण उपासना सांगतो. ॥ ६७ ॥

आनन्दादेर्विधेयस्य गुणसङ्घस्य संहृतिः ।
आनन्दादय इत्यस्मिन्सूत्रे व्यासेन वर्णिता ॥ ६८ ॥
ते गुण व्यासांनी आपल्या सूत्रांत संग्रह केले आहेत. त्यापैकी आनंदादिक विधेय गुण “आनंदादय प्रधानस्य” या सूत्रांत सांगितले आहेत. ॥ ६८ ॥

अस्थूलादेर्निषेध्यस्य गुणसङ्घस्य संहृतिः ।
तथा व्यासेन सूत्रेऽस्मिनुक्ताक्षरधियान्त्विति ॥ ६९ ॥
आणि त्याचे अस्थूलादिक निषेध गुण. “अक्षरधियां त्ववरोध सामान्यतद्‌भावाभ्यामौपसदनवदुक्तं” या सूत्रांत एकत्र केले आहेत. ॥ ६९ ॥

निर्गुणब्रह्मतत्त्वस्य विद्यायां गुणसंहृतिः ।
न युज्येतेत्युपालम्भो व्यासं प्रत्येव मां तु न ॥ ७० ॥
शि: -निर्गुण ब्रह्मविद्येचेठायीं गुणांचा उपसंहार कसा केला ? गु० -वर जें आम्ही तुला सांगितलें तें कांहीं आमचे पदरचे नव्हे. व्यासांनी जे गुण आपल्या सूत्रांत दर्शविले तेच तुला आम्ही एथे सांगितले. तेव्हां वरील प्रश्न आम्हाला करूं नको. पाहिजे तर त्यांना जाऊन विचार. ॥ ७० ॥

हिरण्यस्मश्रुसूर्यादिमूर्तीनामनुदाहृतेः ।
अविरुद्धं निर्गुणत्वमिति चेत्तुष्यतां त्वया ॥ ७१ ॥
शि० -आपला अभिप्राय मला समजला. व्यासावर हवाला देण्यांचे कारण मला हे दिसते कीं, ‘हिरण्यश्मश्रु’ इत्यादि गुणविशिष्ट ज्या सूर्यादि मूर्ति त्यांचें वर्णन तेथे नाही. तेव्हां ती निर्गुण उपासनाच असावी. गु० -असें एकूण तूं समजतोसना ? बरेंच झालें. ॥ ७१ ॥

गुणानां लक्षकत्वेन न तत्त्वेऽन्तःप्रवेशनम् ।
इति चेदस्त्वेवमेव ब्रह्मतत्त्वमुपास्यताम् ॥ ७२ ॥
शि० -पण ते गुण ब्रह्मतत्त्वाला दाखवून देणारे आहेत. त्यांचा त्यांत कांहीं प्रवेश होत नाहीं. ते गुण त्यास लाग पडल्यांवांचून त्याची उपासना कशी करावी ? गु० -उपासनेला ते गुण लागलेच पाहिजेत असें कांही नाहीं. त्या गुणांनी लक्षित जें ब्रह्म त्याची उपासना खचित करतां येते. ॥ ७२ ॥

आनन्दादिभिरस्थूलादिभिःस्वात्मात्र लक्षितः ।
अखण्डैकरसः सोऽहमस्मीत्येवमुपासते ॥ ७३ ॥
शि:- तिचा प्रकार कसा तो सांगावा. गु० -आनंदादिक विधेय गुण आणि अस्थूलादिक निषेध्य गुण यांही या श्रुतीत आत्मा दर्शविला आहे. तो अखंडैकरस मी आहे असें समजून मुमुक्षू उपासना करतात. ॥ ७३ ॥

बोधोपास्त्योर्विशेषः क इति चेदुच्यते शृणु ।
वस्तुतत्न्त्रो भवेद्बोधः कर्तृतन्त्रमुपासनम् ॥ ७४ ॥
शि० -तर मग ज्ञान आणि उपासना यामध्ये भेद कोणचा ? गु० -ज्ञान हे वस्तुतंत्र आहे आणि उपासना ही कर्तृतंत्र आहे. म्हणजे जशाची तशी स्थिति जाणणे यास ज्ञान म्हणतात. आणि उपासना ही ती करणाराच्या भावनेवर अवलंबून आहे. ॥ ७४ ॥

विचाराज्जायते बोधोऽनिच्छा यं न निवर्तयेत् ।
स्वोत्पत्तिमात्रात्संसारे दहत्यखिलसत्यताम् ॥ ७५ ॥
ज्ञान हें विचारापासून होतें. आणखी एक याची अशी मौज आहे कीं, तें एकदा झाल्यावर तें जावे असें जरी मनुष्याच्या मनांत आलें तरी तें जात नाहीं. तें उत्पन्न होतांचा संसाराविषयींची सत्यबुद्धि तत्काल नाहीशी होते. ॥ ७५ ॥

तावता कृतकृत्यः सन्नित्यतृप्तिमुपागतः ।
जीवन्मुक्तिमनुप्राप्य प्रारब्धक्षयमीक्षते ॥ ७६ ॥
एवढ्या तत्त्वज्ञानाने मनुष्य कृतकृत्य होऊन निरंतर तृप्त असतो. मग जीवन्मुक्त होऊन प्रारब्धक्षयाची वाट पहात बसतो. ॥ ७६ ॥

आप्तोपदेशं विश्वस्य श्रद्धालुरविचारयन् ।
चिन्तयेत्प्रत्ययैरन्यैरनन्तरितवृत्तिभिः ॥ ७७ ॥
शि० -हा ज्ञानाचा प्रकार झाला. ज्ञानास जसा विचार पाहिजे तसा उपासनेलाही नको काय ? गु० -उपासनेस त्याची गरज नाहीं. गुरूपदेशावर श्रद्धालु मुमुक्षूने घटपटादिक वृत्तीचे विघ्न मध्ये न येऊ देता एकसारखे विचार न करतां ब्रह्मचिंतन करावे. ॥ ७७ ॥

यावच्चिन्त्यस्वरूपत्वाभिमानः स्वस्य जायते ।
तावद्विचिन्त्य पश्चाच्च तथैवामृति धारयेत् ॥ ७८ ॥
शि० -असें ब्रह्मचिंतन किती दिवसपर्यंत करावे ? गु० -देहाविषतींची अहंबुद्धि जाऊन चिंतनीय ब्रह्माविषयीं अहंबुद्धि उत्पन्न होईपर्यंत तसेंच चिंतन केलें पाहिजे. आणि ती स्थिति मरणकालपर्यत तशीच राखावी. ॥ ७८ ॥

ब्रह्मचारी भिक्षमाणो युतः संवर्गविद्यया ।
संवर्गरूपतां चित्ते धारयित्वा ह्यभिक्षता ॥ ७९ ॥
याच्या उदाहरणार्थ छांदोग्य श्रुतींत एक कथाआहे- कोणी एक ब्रह्मचारी संवर्गविद्या या नांवाची प्राणोपासना करीत होता. त्यानें भिक्षेकरितां राजाकडे जाऊन भिक्षेच्या वेळेस “महात्मनश्चतुरो देव एक: “” हा मंत्र म्हणून आपल्या चित्तांतील संवर्गरूप प्रगट केलें. ॥ ७९ ॥

पुरुषस्वेच्छया कर्तुमकर्तुं कर्तुमन्यथा ।
शक्योपास्तिरतो नित्यं कुर्यात्प्रत्ययसन्ततिम् ॥ ८० ॥
शि० -आपण म्हटले की, तत्त्वज्ञान झाल्यावर तें जावे असें कोणी इच्छिले तरी तें जात नाही हा नियम उपासनेस लागू आहे कीं नाहीं ? गु० -तो उपासनेस लागू नाहीं. म्हणूनच ती कर्तृतंत्र असें आम्ही म्हटलें. कारण मनुष्याच्या इच्छेने उपासना करणें, न करणें, किंवा अन्यथा करणें शक्य आहे. म्हणून तो प्रत्यय नेहमी तसाच ठसवावा. ॥ ८० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *