सार्थ पंचदशी मराठी चतुर्दशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे विद्यानन्दः श्लोक ४१ ते ६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

तदेतत्कृतकृत्यत्वं प्रतियोगिपुरःसरम् ।
अनुसन्दधदेवायमेवं तृप्यति नित्यशः ॥ ४१ ॥
दुःखिनोऽज्ञाः संसरन्तु कामं पुत्राद्यपेक्षया ।
परमानन्दपूर्णोऽहं संसरामि किमिच्छया ॥ ४२ ॥
अनुतिष्ठन्तु कर्माणि परलोकयियासवः ।
सर्वलोकात्मकः कस्मादनुतिष्ठामि किं कथम् ॥ ४३ ॥
व्याचक्षतां ते शास्त्राणि वेदानध्यापयन्तु वा ।
येऽत्राधिकारिणो मे तु नाधिकारोऽक्रियत्वतः ॥ ४४ ॥
निद्राभिक्षे स्नानशौचे नेच्छामि न करोमि च ।
द्रष्टारश्चेत्कल्पयन्ति किं मे स्यादन्यकल्पनात् ॥ ४५ ॥
गुञ्जापुञ्जादि दह्येत नान्यारोपितवह्निना ।
नान्यारोपितसंसारधर्मानेवमहं भजे ॥ ४६ ॥
शृण्वन्त्वज्ञाततत्त्वास्ते जानन् कस्माच्छृणोम्यहम् ।
मन्यन्तां संशयापन्ना न मन्येऽहमसंशयः ॥ ४७ ॥
विपर्यस्तो निदिध्यासेत्किं ध्यानमविपर्यये ।
देहात्मत्वविपर्यासं न कदाचिद्‌भजाम्यहम् ॥ ४८ ॥
अहं मनुष्य इत्यादिव्यवहारो विनाप्यमुम् ।
विपर्यासं चिराभ्यस्तवासनातोऽवकल्पते ॥ ४९ ॥
प्रारब्धकर्मणि क्षीणे व्यवहारो निवर्तते ।
कर्माक्षये त्वसौ नैव शाम्येद्ध्यानसहस्रतः ॥ ५० ॥

याप्रमाणे पूर्वींची स्थिति आठवून आपले कृतकृत्यत्व नित्य मनांत आणून तो नित्य तृप्त राहतो. ॥ ४१ ॥

तो आपली धन्यता याप्रमाणें मानतो. अज्ञानी लोक दुःखी होत्साते पुत्रादिकांची अपेक्षा करून, संसार करणार तर करोत ना बापडे. मी परमानंदानें पूर्ण असल्यामुळे मला कोणतीच इच्छा नाहीं. मग मी संसार कशास करूं ? ॥ ४२ ॥
ज्यांना परलोकची इच्छा असेल ते यज्ञदानादिक कर्में खुशाल करोत. मी सर्वव्यापक असल्यामुळे मी नाहीं असा लोकच नाहीं; मग तीं कर्में घेऊन करावयाची काय? ॥ ४३ ॥
जे अधिकारी असतील त्यांनी वेदशास्त्रें खुशाल पढावी व पढवावींत. मी मुळीच अक्रिय झालों मग मला अधिकार कुठला ? ॥ ४४ ॥

निद्रा, भिक्षा, स्नान, शौच इत्यादिक कमें मी इच्छितही नाहीं व करीतही नाहीं. जवळच्या पाहणारांना मी कर्में करतोसे वाटेल, तर वाटेना बापडें. त्यांस तसें वाटल्यानें मला काय होणार ? ॥ ४५ ॥
ज्याप्रमाणें गुंजांच्या राशीस दुसर्‍यांनी अग्नि म्हटल्यानें ती जाळू शकत नाहीं, त्याप्रमाणें मी संसार करतो असें दुसर्‍यांनी म्हटलें तरी त्याचा स्पर्श मला लागत नाहीं. ॥ ४६ ॥
ज्यांना ब्रह्मतत्त्व समजलें नाहीं ते खुशाल श्रवण करोत. मला तें तत्त्व पक्के समजल्यावर मीं तें कां करावें ? तसेंच आत्मस्वरूपाविषयीं ज्यांचे मनांत वारंवार संशय येतात, त्यांनीं मनन करावे. माझें ज्ञान निःसंशय झाल्यावर मला त्याचें काय प्रयोजन ? ॥ ४७ ॥
ज्याला देहात्मबुद्धि वारंवार होते त्यानें निदिध्यास करावा. मला तसा विपर्यय मुळींच होत नाही, मग निदिध्यासाची खटपट तरी कशाला ? ॥ ४८ ॥
आतां मी मनुष्य असा केव्हां केव्हां व्यवहार घडतो, परंतु तो विपर्यासामुळे नव्हे. त्याचें कारण अनेक जन्माचा संस्कारच होय. ॥ ४९ ॥

प्रारब्धकर्माचा क्षय झाला म्हणजे हा व्यवहार आपोआप नाहींसा होतो परंतु त्या कर्माचा क्षय न होतां आम्ही शेकडो वर्षें ध्यान केलें तरी तें व्यर्थ आहे. ॥ ५० ॥

विरलत्वं व्यवहृतेरिष्टं चेद्ध्यानमस्तु ते ।
अबाधिकां व्यवहृतिं पश्यन्ध्यायाम्यहं कुतः ॥ ५१ ॥
विक्षेपो नास्ति यस्मान्मे न समाधिस्ततो मम ।
विक्षेपो वा समाधिर्वा मनसः स्याद्विकारिणः ॥ ५२ ॥

नित्यानुभवरूपस्य को मेत्रानुभवः पृथक् ।
कृतं कृत्यं प्रापणीयं प्राप्तमित्येव निश्चयः ॥ ५३ ॥
व्यवहारो लौकिको वा शास्त्रीयो वाऽन्यथाऽपि वा ।
ममाकर्तुरलेपस्य यथाऽऽरब्धं प्रवर्तताम् ॥ ५४ ॥
अथवा कृतकृत्योऽपि लोकानुग्रहकामया ।
शास्त्रीयेणैव मार्गेण वर्तेऽहं का मम क्षतिः ॥ ५५ ॥
देवार्चनस्नानशौचभिक्षादौ वर्ततां वपुः ।
तारं जपतु वाक् तद्वत्पठत्वाम्नायमस्तकम् ॥ ५६ ॥
विष्णुं ध्यायतु धीर्यद्वा ब्रह्मानन्दे विलीयताम् ।
साक्ष्यहं किञ्चिदप्यत्र न कुर्वे नापि कारये ॥ ५७ ॥
कृतकृत्यतया तृप्तः प्राप्तप्राप्यतया पुनः ।
तृप्यन्नेवं स्वमनसा मन्यतेऽसौ निरन्तरम् ॥ ५८ ॥
धन्योऽहं धन्योऽहं नित्यं स्वात्मानमञ्जसा वेद्मि ।
धन्योऽहं धन्योऽहं ब्रह्मानन्दो विभाति मे स्पष्टम् ॥ ५९ ॥
धन्योऽहं धन्योऽहं दुःखं सांसारिकं न वीक्षेऽद्य ।
धन्योऽहं धन्योऽहं स्वस्याज्ञानं पलायितं क्वापि ॥ ६० ॥
धन्योऽहं धन्योऽहं कर्तव्यं मे न विद्यते किञ्चित् ।
धन्योऽहं धन्योऽहं प्राप्तव्यं सर्वमद्य सम्पन्नम् ॥ ६१ ॥
धन्योऽहं धन्योऽहं तृप्तेर्मे कोपमा भवेल्लोके ।
धन्योऽहं धन्योऽहं धन्यो धन्यः पुनः पुनर्धन्यः ॥ ६२ ॥
अहो पुण्यमहो पुण्यं फलितं फलितं दृढम् ।
अस्य पुण्यस्य सम्पत्तेरहो वयमहो वयम् ॥ ६३ ॥
अहो शास्त्रमहो शास्त्रमहो गुरुरहो गुरुः ।
अहो ज्ञानमहो ज्ञानमहो सुखमहो सुखम् ॥ ६४ ॥
ब्रह्मानन्दाभिधे ग्रन्थे चतुर्थोऽध्याय ईरितः ।
विद्यानन्दस्तदुत्पत्तिपर्यन्तोभ्यास इष्यताम् ॥ ६५ ॥
इति ब्रह्मानन्दे विद्यानन्दः समाप्तः ॥ १४ ॥

आतां, व्यवहाराचा अडथळा झाल्यामुळे तो कमी व्हावा अशी ज्याला इच्छा असेल त्यानें खुशाल ध्यान करावें. पण मला जर त्याचा मुळीच अडथळा वाटत नाही, तर त्याची मला काय गरज आहे ? ॥ ५१ ॥
मनांत मध्ये मध्ये विक्षेप येतो, तो न यावा म्हणून समाधि लावावयाची. तो विक्षेपच जर माझा गेला तर ती समाधि तरी कशाला पाहिजे. कारण, विक्षेप आणि समाधि हे दोन्ही मनाचेच धर्म आहेत. आणि मला तर तें मन मुळीच नाहीं, मग विक्षेप कोठून असणार ? ॥ ५२ ॥
आतां अनुभव येण्याकरितां समाधि करावा असें जर म्हणावें तर मीच अनुभवरूप आहें. मग मला दुसरा आणखी अनुभव तो कोठून व्हावा ? जें करावयाचें तें मीं केलें. आणि मिळवावयाचें तें मिळविले, असा माझा पक्का निश्चय झाला आहे. ॥ ५३ ॥
माझा व्यवहार प्रारब्धानुरूप कसा तरी चालों, मग तो लौकिकी असो किंवा शास्त्रीय असो, कसाही असो; मी स्वत: अकर्ता असून मला कर्माचा मुळीच लेप नाहीं. ॥ ५४ ॥
किंवा मी जरी कृतकृत्य झालों; तरी लोकांनी मला पाहून चांगल्या रीतीने आचरण करावे या हेतूने शस्त्रांत सांगितल्याप्रमाणे मी वागेन त्यांत तरी माझा काय तोटा होणार ? ॥ ५५ ॥
हे माझ शरीर देवाचा पूजा करो, स्नान करो; शौचभिक्षादि कर्में करो, ही माझी वाणी प्रणवाचा जप करो; किंवा उपनिषदाचे अध्ययन करो ॥ ५६ ॥
तशीच माझी बुद्धि विष्णूचें ध्यान करो; किंवा ब्रह्मानंदी लीन होवो; मी तर सर्वांचा साक्षी आहें. मी कांहीं करीत नाहीं व करवीतही नाहीं. ॥ ५७ ॥
याप्रमाणें आपली कृतकृत्यता व प्राप्यप्राप्यता स्मरून निरंतर मनांत तृप्त असतो. तो असें म्हणतो. ॥ ५८ ॥
आर्या-
मी धन्य धन्य झालों, आत्मा प्रत्यक्ष जाणिला म्यां कीं ॥
ब्रह्मानंद कसा हा भासे मज सम दुजा न या लोकीं ॥ १ ॥ ॥ ५९ ॥
मी धन्य धन्य मोठा, संसारिक दुःख मन दिसत नाहीं ॥
अज्ञान पळुनि गेलें, त्याचा गंधहि न राहिला कांहीं ॥ २ ॥ ॥ ६० ॥
मी धन्य धन्य मोठा, कांहीं कर्तव्य नाहिं मज उरलें ॥
प्राप्तव्य पदरीं आलें सद्‌गुरुचें चरण घट्ट मी धरिले ॥ ३ ॥ ॥ ६१ ॥
मी धन्य धन्य मोठा, माझ्या तृप्तीस नाहि हो उपमा ॥
कोठवरी वर्णावी, आतां मी पावलों स्वसुखधामा ॥ ४ ॥ ॥ ६२ ॥
बहु जन्मिं पुण्य केलें, त्याचें फळ पक्व आजिं मज मिळलें ॥
सद्‌गुरुराजकृपेनें, माझे आनंदरूप मज कळलें ॥ ५ ॥ ॥ ६३ ॥
सच्छास्त्र सद्‌गुरूचा, वर्णूं मी, या मुखें किती महिमा ॥
ज्ञान अमोलिक किति हें, आनंदाब्धीस या नसे सीमा ॥ ६ ॥ ॥ ६४ ॥
याप्रमाणे ब्रह्मानंद प्रकरणाच्या चौथ्या अध्यायांत विद्यानंदाचे निरूपण केलें. तो प्राप्त होईपर्यंत मुमुक्षूने त्याचा अभ्यास करावा. ॥ ६५ ॥
इति विद्यानंद समाप्त.

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *