सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २६१ ते २९०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अहङ्कारचिदात्मानवेएकीकृत्याविवेकतः ।
इदं मे स्यादिदं मे स्यादितीच्छाः कामशब्दिताः ॥ २६१ ॥
अहंकार आणि चिदात्मा या दोहोंचे एकीकरण करून अविवेकाने हें मला असावें, हे मला असावें अशा ज्या इच्छा होतात त्यांसच काम असें म्हणतात. ॥ २६१ ॥

अप्रवेश्य चिदात्मानं पृथक्पश्यन्नहङ्कृतिम् ।
इच्छस्तु कोटिवस्तूनि न बाधो ग्रन्थिभेदतः ॥ २६२ ॥
अहंकाराचा संग चिदात्म्याला न लावतां अहंकारास पृथक् पाहिलें असतां कोटी वस्तूंची जरी इच्छा झाली तरी ग्रंथिभेद झाल्यामुळे त्या बाधक होत नाहींत. ॥ २६२ ॥

ग्रन्थिभेदेऽपि सम्भाव्या इच्छाः प्रारब्धदोषतः ।
बुध्वापि पापबाहुल्यादसन्तोषो यथा तव ॥ २६३ ॥
अध्यास गेल्यावर इच्छा मुळींच होऊं नयेत. परंतु त्या होतात त्यास कारण प्रारब्ध होय. याला उदाहरण दुसरें नको. तुझी आपणाकडे पहा म्हणजे झालें. इतकें जाणून बुजून तुमच्या पूर्व जन्मींच्या पातकामुळे तुमची खात्री होत नाहीं हेच याला प्रमाण. ॥ २६३ ॥

अहङ्कारगतेच्छाद्यैर्देहव्याधिदिभिस्तथा ।
वृक्षादिजन्मनाशैर्वा चिद्रूपात्मनि किं भवेत् ॥ २६४ ॥
वृक्षादिकांचा जन्मनाश झाला असतां त्यामुळें असें मला कांहींच होत नाहीं, त्याप्रमाणें देहामध्ये असणारे रोगादिक व अहंकारामध्यें असणारे इच्छादिक यांहींकरून मी जो चिद्‌रूपात्मा; त्याला काय होणार आहे ? असा ज्ञान्याचा अनुभव असतो. ॥ २६४ ॥

ग्रन्थिभेदात्पुराप्येवमिति चेत्तन्न विस्मर ।
अयमेव ग्रन्थिभेदस्तव तेन कृती भवान् ॥ २६५ ॥
ग्रंथिभेदाच्या पूर्वी देखील अशीच माझी स्थिति होती. असें जर कोणी म्हणेल तर हें मात्र विसरू नये. कारण, अशा प्रकारच्या समजुतीलाच आम्ही ग्रंथिभेद म्हणतो. आणि तो तर तुझ्या ठायी झालाच, म्हणून तूं कृतार्थ आहेस. ॥ २६५ ॥

नैवं जानन्ति मूढाश्चेत्सोऽयं ग्रन्थिर्नचापरः ।
ग्रन्थितद्‌भेदमात्रेण वैषम्यं मूढबुद्धयोः ॥ २६६ ॥
हें मृढाला समजत नाहीं. म्हणून हें न समजणेच ग्रंथि, दुसरा नाहीं. अज्ञानी आणि ज्ञानी यांमध्ये भेद म्हणून इतकाच कीं, पहिल्यामध्ये तो ग्रंथि असतो आणि दुसऱ्यामध्यें तो असत नाहीं. ॥ २६६ ॥

प्रवृत्तौ वा निवृत्तौ वा देहेन्द्रियमनोधियाम् ।
न किंचिदपि वैषम्यमस्त्यज्ञानिविबुद्धयोः ॥ २६७ ॥
व्रात्यश्रोत्रिययोर्वेदपाठापाठकृताभिदा ।
नाहारादवस्ति भेदः सोऽयं न्यायोऽत्र योज्यताम् ॥ २६८ ॥
ज्याप्रमाणें व्रात्य आणि श्रोत्रिय या दोघांमध्ये भेद इतकाच की, एकाला वेदाध्ययन आहे आणि दुसऱ्याला नाहीं; परंतु एरव्ही आहारविहारादिकांमध्यें दोघेही सारखेच; त्याप्रमाणें ज्ञानी आणि अज्ञानी यांची गोष्ट आहे. प्रवृत्ति असो किंवा निवृत्ति असो, उभयतांच्या देह, इंद्रिय, मन, बुद्धि इत्यादिकांमध्यें मुळींच अंतर नाहीं. ॥ २६७-२६८ ॥

न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ।
उदासीनवदासीन इति ग्रन्थिभिदोच्यते ॥ २६९ ॥
प्राप्त झालेल्या दुःखाचा द्वेष न करणें आणि अप्राप्त वस्तूची इच्छा न करणे व उदासीनाप्रमाणें असणें हें जे स्थितप्रज्ञाचे लक्षण गीतेत सांगितले आहे, त्यालाच ग्रंथिभेद म्हणतात. ॥ २६९ ॥

औदासीन्यं विधेयं चेद्वच्छशब्द व्यर्थता तदा ।
न शक्ता ह्यस्य देहाद्या इति चेद्रोग एव सः ॥ २७० ॥
औदासीन्य हें विधिपर आहे असें म्हणतां येत नाहीं; कारण, तसें मानल्यास “वत्” हा शब्द व्यर्थ होईल. आतां कोणी म्हणेल ज्ञान झाल्यावर देहादिक कर्मे करण्यास असमर्थच होतात, तर अशा लक्षणास ज्ञान म्हणण्यापेक्षां रोगच म्हणावें हें बरें ॥ २७० ॥

तत्त्वबोधं क्षयव्याधिं मन्यन्ते ये महाधियः ।
तेषं प्रज्ञातिविशदा किं तेषां दुःशकं वद ॥ २७१ ॥
तत्त्वबोध हा क्षयरोग आहे असें म्हणणारे जे बुद्धिमान त्यांच्या शहाणपणाची कमाल झाली. त्यांना असाध्य काय ? ॥ २७१ ॥

भरतादेरप्रवृत्तिः पुराणोक्तेति चेत्तदा ।
जक्षत्क्रीडन्रतिं विन्दन्नित्यश्रौषीर्न किं श्रुतिम् ॥ २७२ ॥
आतां कोणी म्हणेल कीं, भरतादिक साधुक्रिया न करितां केवळ जडाप्रमाणें रहात असत असें पुराणांत सांगितलेले आढळतें. म्हणून अक्रिय असणें हेंच ज्ञान्याचें लक्षण. परंतु ही शंका घेणारास पुढील श्रुति अवगत असती तर अशी शंका त्यानें घेतलीच नसती. “जक्षन् क्रीडन् रतिं विंदन्” अशी श्रुति आहे तिचे तात्पर्य – ज्ञान्यानें आहारविहारादि क्रीडा जरी केल्या, तरी त्या बाधक होत नाहींत. ह्या श्रुतिप्रमाणापुढें पुराणोक्तीची मातब्बरी. किती ? ॥ २७२ ॥

न ह्याहारादि सन्त्यज्य भरताद्याः स्थिताः क्वचित् ।
काष्ठपाषाणवत्किन्तु सङ्गभीता उदासते ॥ २७३ ॥
पुराणांत जें सांगितले त्याचें तरी तात्पर्य असे कीं, भरतादिक साधु जे एकांती अक्रिय होऊन बसले ते केवळ लोकसंगाच्या भीतीस्तव. ते म्हणजे आहारादि अवश्य क्रिया टाकून काष्ठपाषाणाप्रमाणे उगीच बसले असें नाही. ॥ २७३ ॥

सङ्गी हि बाध्यते लोके निःसङ्गः सुखमश्नुते ।
तेन सङ्गः परित्याज्यः सर्वदा सुखमिच्छता ॥ २७४ ॥
कारण, जगांत लोकसंसर्गाने फार दुःख होतें. निःसंग मनुष्यास सुख होतें. याकरिता सुखाची इच्छा करणाराने लोक-संसर्ग सोडून दिला पाहिजे. ॥ २७४ ॥

अज्ञात्वा शास्त्रहृदयं मूढो वक्त्यन्यथान्यथा ।
मूर्खाणां निर्णय स्वास्तामस्मत्सिद्धान्त उच्यते ॥ २७५ ॥
शास्त्राचे हृदय न जाणतां मूढ लोक पाहिजे तसें बहकतात. त्यांच्या मताशी आम्हांस काय करावयाचें आहे ? आमचा जो सिद्धांत तो आम्ही येथें सांगतो म्हणजे झाले.॥ २७५ ॥

वैराग्यबोधोपरमाः सहायास्ते परस्परम् ।
प्रायेण सह वर्तन्ते वियुज्यन्ते क्वचित्क्वचित् ॥ २७६ ॥
वैराग्य, ज्ञान आणि उपरति ही तीनही परस्परांस साहाय्यभूत आहेत. ती बहुतकरून एकत्र मिळून असतात; परंतु केव्हां केव्हां ह्यांचा वियोगही होतो. ॥ २७६ ॥

हेतुस्वरूपकार्याणि भिन्नान्येषामसंकरः ।
यथावदवगन्तव्यः शास्त्रार्थप्रविविच्यता ॥ २७७ ॥
ह्यापैकीं प्रत्येकाचे हेतु, स्वरूप आणि कार्ये निरनिराळी आहेत. म्हणून शास्त्रार्थाचा चांगला विचार करून बुद्धींत त्याचा संकर होऊं देऊं नये. ॥ २७७ ॥

दोषदृष्टिर्जिहासा च पुनर्भोगेष्वदीनता ।
असाधारणहेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोऽप्यमी ॥ २७८ ॥
विषयाविषयीं जी दोषदृष्टि तीच वैराग्याला हेतु म्हणजे कारण होय., त्याविषयी जी त्यागबुद्धि तें त्याचें स्वरूप, आणि पुनः त्याच्या भोगाविषयीं जी अप्रवृत्ति तें त्याचें कार्य म्हणजे फळ होय. ॥ २७८ ॥

श्रवणादित्रयं तद्वत्तत्त्वमित्थाविवेचनम् ।
पुनर्ग्रन्थेरनुदयो बोधस्येते त्रयो मताः ॥ २७९ ॥
त्याचप्रमाणे ज्ञानालाही ही तीन आहेत. श्रवण, मनन आणि निदिध्यास ही तिन्ही मिळून ज्ञानास हेतु आहेत. तत्त्व-मिथ्या-विवेचन हें ज्ञानाचे स्वरूप, आणि एकदा ग्रंथिभेद झाल्यावर पुनः तिचा उदय न होणें हेंच त्याचे कार्य. ॥ ७९ ॥

यमादिर्धीनिरोधश्च व्यवहारस्य संक्षयः ।
स्युर्हेत्वाद्या उपरतेरित्यसंकर ईरितः ॥ २८० ॥
तशींच यमनियमादिक जी योगाची साधने तीं उपरतीचे हेतु. चित्ताचा निरोध म्हणजे कोंडणे हें तिचे स्वरूप आणि व्यवहाराचा लोप हें तिचे कार्य. ह्याप्रमाणें पृथक पृथक जाणावें ॥ २८० ॥

तत्त्वबोधः प्रधानं स्यात्साक्षान्मोक्ष प्रदत्वतः ।
बोधोपकारिणावेतौ वैराग्योपरमावुभौ ॥ २८१ ॥
या तिहींमध्यें तत्त्वज्ञानं हें मुख्य समजावे. कारण, त्यापासून प्रत्यक्ष मोक्ष प्राप्ति होते, आणि इतर दोन म्हणजे वैराग्य आणि उपरति ही केवळ तत्त्वज्ञानास साहाय्य करतात; म्हणून त्यांस प्राधान्य देता येत नाहीं. ॥ ८१ ॥

त्रयोऽप्यत्यन्तपक्वाश्चेन्महतस्तपसः फलम् ।
दुरितेन क्वचित्किंचित्कदाचित्प्रतिबध्यते ॥ २८२ ॥
कोणा पुरुषाचेठायीं हीं तीन्‌ही पूर्णपणें असतील, तर तें मोठ्या तपाचें फळ समजले पाहिजे. केव्हां केव्हां कित्येकांमध्ये ह्यांपैकी एका गोष्टीची उणीव असते त्याला पूर्वजन्मीचे पातकच कारण. ॥ ८२ ॥

वैराग्योपरती पूर्णे बोधस्तु प्रतिबध्यते ।
यस्य तस्य न मोक्षोऽस्ति पुण्यलोकस्तपोबलात् ॥ २८३ ॥
वैराग आणि उपरति ही दोन साधने ज्या पुरुषाचे ठायीं पर्णूपणें आहेत, परंतु ज्ञानाची मात्र उणीव आहे, अशा पुरुषाला मोक्षप्राप्ति होत नाहीं. त्याला तपोबलाने पुण्यलोकाची प्राप्ति मात्र होते. ॥ ८३ ॥

पूर्णे बोधे तदन्यौ द्वौ प्रतिबद्धौ यदा तदा ।
मोक्षो विनिश्चितः किन्तु दृष्टदुःखं न नश्यति ॥ २८४ ॥
आतां याच्या उलट ज्या पुरुषाचे ठायीं तत्त्वज्ञान मात्र पूर्ण आहे, परंतु दुसऱ्या दोन साधनांची उणीव आहे, त्याला मोक्षप्राप्ति खचित आहे. जीवमुक्तिसुख मात्र मिळत नाहीं. ॥ ८४ ॥

ब्रह्मलोकतृणीकारो वैराग्यस्यावधिर्मतः ।
देहात्मवत्परात्मत्वदार्ढ्ये बोधः समाप्यते ॥ २८५ ॥
आतां तिहींची पूर्णता सांगतो. ब्रह्मलोकही तुच्छ वाटावा म्हणजे वैराग्याची कमाल झाली. अज्ञातकाळीं मी देह ही बुद्धि जशी दृढ असते, तशीच मी ब्रह्म ही बुद्धि दृढ व्हावी म्हणजे ज्ञानाची पूर्णता झाली. ॥ ८५ ॥

सुप्तिवद्विस्मृतिः सीमा भवेदुपरमस्य हि ।
दिशानया विनिश्चेयं तारतम्यमवान्तरम् ॥ २८६ ॥
आणि निद्रे इतकी विस्मृति झाली म्हणजे उपरमाची सीमा झाली. या दिग्दर्शनावरून बाकीचे तारतम्य समजावे. ॥ २८६ ॥

आरब्धकर्मनानात्वाद्बुद्धानामन्यथान्यथा ।
वर्तनन्तेन शास्त्रार्थे भ्रमितव्यं न पण्डितैः ॥ २८७ ॥
प्रारब्ध कर्मे नानाप्रकारचीं असल्यामुळें तत्त्वज्ञान्याचीं आचरणेंही निरनिराळी दृष्टीस पडसात. म्हणून शास्त्रार्थ चांगला न जाणता पंडितांनी व्यर्थ भ्रमांत राहूं नये. ॥ २८७ ॥

स्वस्वकर्मानुसारेण वर्ततन्तां ते यथा तथा ।
अविशिष्टः सर्वबोधः समा मुक्तिरिति स्थितिः ॥ २८८ ॥
आपापल्या कर्मानुसारेंकरून ज्ञान्याचे वर्तन निराळें असलें, तरा त्या सर्वांमध्ये असणारें आत्मज्ञान एकच आहे. म्हणून सर्वांस मुक्ति ही सारखीच मिळते. ॥ २८८ ॥

जगच्चित्रं स्वचैतन्ये पटे चित्रमिवार्पितम् ।
मायया तदपेक्षैव चैतन्ये परिशिष्यताम् ॥ २८९ ॥
आपल्या स्वरूपाचेठायी पटावर चित्र काढल्याप्रमाणे हें जगद्‌रूप चित्र मायेने काढलें आहे, त्याची उपेक्षा करून बाकी राहिलेलें चैतन्य पहावे. ॥ २८९ ॥

चित्रदीपमिमं नित्यं येऽनुसन्दधते बुधाः ।
पश्यन्तोऽपि जगच्चित्रं ते मुह्यन्ति न पूर्ववत् ॥ २९० ॥
इति चित्रदीपोनाम षष्ठः परिच्छेदः ॥ ६ ॥
आतां या प्रकरणाची फलश्रुति सांगून हा विषय आटपतो. जो मनुष्य या चित्रदीपाचें नित्य अनुसंधान करील त्यास हे जगच्चित्र दिसत असूनही पहिल्याप्रमाणे तो भ्रमांत पडणार नाहीं ॥ २९० ॥
श्रीशंकरार्पणमस्तु ॥
चित्रदीपः समाप्त ।

सार्थ पंचदशी सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *