सार्थ पंचदशी मराठी चतुर्दशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे विद्यानन्दः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

योगेनात्मविवेकेन द्वैतमिथ्यात्वचिन्तया ।
ब्रह्मानन्दं पश्यतोऽथ विद्यानन्दो निरूप्यते ॥ १ ॥
विषयानन्दवद्विद्यानन्दोधीवृत्तिरूपकः ।
दुःखाभावादिरूपेण प्रोक्त एष चतुर्विधः ॥ २ ॥
दुःखाभावश्च कामाप्तिः कृतकृत्योऽहमित्यसौ ।
प्राप्तप्राप्योऽहमित्येव चातुर्विध्यमुदाहृतम् ॥ ३ ॥
ऐहिकं च आमुष्मिकं चेत्येवं दुःखं द्विधेरितम् ।
निवृत्तिमैहिकस्याह बृहदारण्यकं वचः ॥ ४ ॥
आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति पूरुषः ।
किमिच्छन्कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत् ॥ ५ ॥
जीवात्मा परमात्मा चेत्यात्मा द्विविध ईरितः ।
चित्तादात्म्यात्त्रिभिर्देहैर्जीवः सन् भोक्तृतां व्रजेत् ॥ ६ ॥
परमात्मा सच्चिदानन्दस्तादात्म्यं नामरूपयोः ।
गत्वा भोग्यत्वमापन्नस्तद्विवेके तु नोभयम् ॥ ७ ॥
भोग्यमिच्छन् भोक्तुरर्थे शरीरमनुसंज्वरेत् ।
ज्वरास्त्रिषु शरीरेषु स्थिता न त्वात्मनो ज्वराः ॥ ८ ॥
व्याधयो धातुवैषम्ये स्थूलदेहे स्थिता ज्वराः ।
कामक्रोधादयः सूक्ष्मे द्वयोर्बीजं तु कारणे ॥ ९ ॥
अद्वैतानन्दमार्गेण परात्मनि विवेचिते ।
अपश्यन्वास्तवं भोग्यं किं नामेच्छेत्परात्मवित् ॥ १० ॥

मागील तीन आनंद प्रकरणांत योगाभ्यास, आत्मविवेक आणि द्वैतमिथ्यात्व यांच्या योगाने क्रमेंकरून ब्रह्मानंद अनुभवणाऱ्या पुरुषास जो एक प्रकारचा विद्यानंद होतो तो आधी या प्रकरणांत संवादरूपानें सांगतो. ॥ १ ॥
ग०-आतां तुला विद्यानंदाचे स्वरूप सांगतो. विषयानंदाप्रमाणें हा विद्यानंदही बुद्धिवृत्तीपासून होणारा आहे. त्याचे दुःखाभाव आदिकरून चार प्रकार आहेत. ॥ २ ॥
शि०-ते चार प्रकार कोणते ? गु०-दुःखभाव, सर्व इच्छेची तृप्ति, कृतकृत्यता आणि प्राप्तप्राप्यता. ॥ ३ ॥

दुःखाचेही दोन प्रकार आहेत. एक ऐहिक आणि दुसरें आमुष्मिक. ऐहिक दुःखाची निवृत्ति बृहदारण्यक श्रुतीत सांगितली आहे. ॥ ४ ॥

शि०-ती श्रुति कोणती ? गु०-”आत्मनं चेत्” याचा अभिप्राय असा कीं, आत्मा मी आहे असें जाणणाऱ्या पुरुषांस भोक्तृत्वच मुळीं खोटे ठरल्याने शरीराची दुःखे कशी होतील ? कारण इच्छा करणारा व इच्छिला विषय हे दोन्ही मिथ्या ठरतात. ॥ ५
शि०-आपल्याला शोकसंबंध कसा आला ? गु-आत्मे दोन प्रकारचे, जीवात्मा व परमात्मा तीन देहांच्या तादात्म्याने तो जीव होऊन भोक्ता झाला. ॥ ६ ॥
शि०-परमात्म्याचें स्वरूप सांगा. गु० परमात्मा मूळचा सच्चिदानंदरूप आहे. तो नामरूपाशीं तादात्म्य पावल्यामुळे भोग्य झाला. त्या नामरूपांचा विवेक केला असतां त्याचा भोक्तेपणा आणि भोग्यपणा ही दोन्हीही नाहीशी होतात. ॥ ७ ॥
शरीरास ज्वर म्हणजे संताप झाला असतां तो आपणावर घेण्याचे कारण हे कीं, भोक्त्याकरितां भोग्य विषयाची इच्छा होते. हे ज्वर तीन शरीरांस मात्र आहेत आत्म्याला मुळीच नाहींत. ॥ ८ ॥
शि०-कोणच्या शरीराला कोणचा ज्वर आहे. गु०-धातुवैषम्याने ज्या व्याधी होतात ते स्थूल शरीरातील ज्वर होत. कामक्रोधादिक सूक्ष्म शरीरातील ज्वर आणि त्या दोहींस कारण जें अज्ञान तें कारण शरीरातील ज्वर. ॥ ९ ॥
अद्वैतानंद प्रकरणांत जो आम्ही विवेचनाचा मार्ग सांगितला, तेणेंकरून आत्म्याचे विवेचन केलें असता वास्तविक भोग्य पदार्थ कोठेंच दिसत नाहीं. मग आत्मवेत्त्यास इच्छा कशाची व्हावी ? ॥ १० ॥

आत्मानन्दोक्तरीत्यास्मिन् जीवात्मन्यवधारिते ।
भोक्ता नैवास्ति कोऽप्यत्र शरीरे तु ज्वरः कुतः ॥ ११ ॥
पुण्यपापद्वये चिन्ता दुःखमामुष्मिकं भवेत् ।
प्रथमाध्याय एवोक्तं चिन्ता नैनं तपेदिति ॥ १२ ॥
यथा पुष्करपर्णेऽस्मिन्नपामश्लेषणं तथा ।
वेदनादूर्ध्वमागामिकर्मणोऽश्लेषणं बुधे ॥ १३ ॥
इषीकातृणतूलस्य वह्निदाहः क्षणाद्यथा ।
तथा सञ्चितकर्मास्य दग्धं भवति वेदनात् ॥ १४ ॥
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ १५ ॥
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥ १६ ॥
मातापित्रोर्वधः स्तेयं भ्रूणहत्यान्यदीदृशम् ।
न मुक्तिं नाशयेत्पापं मुखकान्तिर्न नश्यति ॥ १७ ॥

दुःखाभाववदेवास्य सर्वकामाप्तिरीरिता ।
सर्वान् कामानसावाप्त्वा ह्यमृतो भवदित्यतः ॥ १८ ॥
जक्षन्क्रीडन् रतिं प्राप्तः स्त्रीभिर्यानैस्तथेतरैः ।
शरीरं न स्मरेत्प्राणं कर्मणा जीवयेदमुम् ॥ १९ ॥
सर्वान्कामान्सहाप्नोति नान्यवज्जन्मकर्मभिः ।
वर्तन्ते श्रोत्रिये भोगा युगपत् क्रमवर्जिताः ॥ २० ॥

शि०-ते ज्वर आल्यास कसे लागत नाहींत ? गु०-आत्मानंद विवेचन करण्याची जी रीत आम्ही सांगितली त्या रीतीनें जीवात्म्याचा निश्चय झाला असतां भोक्ता मुळींच नाहीसा होतो. मग ज्वरांचा संबंध कसा लागेल ? ॥ ११ ॥
शि-हे ऐहिक दुःख झाले, आतां आमुष्मिक तें कोणतें ? गु० – पुण्यपापाची जी चिंता तेंच आमुष्मिक दुःख. ही चिंता ज्ञान्यास ताप देत नाहीं. अशा अर्थाची श्रुति आम्ही प्रथमाध्यायीं सांगितली आहे. ॥ १२ ॥
शि०-प्रारब्धकर्माची चिंता नसो, पण आगामी कर्माची तरी बाधा आहे कीं नाहीं ? गु०-तीही ज्ञान्यास नाहीं. ज्याप्रमाणें कमलपत्र पाण्यांत असून त्यांचा त्यास, स्पर्श होत नाहीं, त्याप्रमाणें ज्ञानोत्तर काळी आगामी कर्माचा संपर्क ज्ञान्यास लागत नाहीं. ॥ १३ ॥
शि० – मग संचित कर्माची व्यवस्था कशी ? ग० – ज्याप्रमाणें इषीका तृणांचा कापूस अग्नि लागतांच जळून जातो, त्याप्रमाणें ज्ञान होतांच संचित कर्म जळून जातें. ॥ १४ ॥
याविषयी गीतेंतही प्रमाण आहे. ज्याप्रमाणें पेटलेला अग्नि लाकडाची राख करून टाकतो, त्याप्रमाणें हा ज्ञानाग्नि सर्व कर्माचे भस्म करून टाकतो. ॥ १५ ॥
देहादिकांविषयीं ज्याचा अहंभाव अगदीं गेला, ज्याची बुद्धि कर्मामध्ये लिप्त होत नाहीं, त्याच्या हातून लोकांचा जरी मोठा घात झाला तरी तें पाप तो करतो असें होत नाहीं, व तो त्या कर्मांत बद्ध होत नाहीं. ॥ १६ ॥
शि ० -काय असें शास्त्रांत आहे काय ? शु ० -शास्त्र तर राहू द्या, अशाविषयीं श्रुतीतही प्रमाण आहे. तें असें कीं, एकदा निश्चयात्मक ज्ञान होऊन मुक्ति मिळाली असतां मातापितरांचे वध, चोरी, भ्रूणहत्या इत्यादि महा पातके जरी घडली तरी त्याच्या मोक्षास हानि येत नाहीं. इतकेंच नव्हे, तर त्याची मुखकांति जशाची तशीच असते. ॥ १७ ॥
शि ० – हा दुःखाभाव झाला, आतां सर्व कामाची प्राप्ति ती कशी ? गु० –तीही श्रुतीतच सांगितली आहे. ब्रह्मवेत्त्यास सर्व कामाची प्राप्ति होऊन तो अमृत होतो अशा अर्थीची श्रुति आहे. ॥ १८ ॥
ब्रह्मवेत्ता खावो, पिवो, खेळो, स्त्रियांबरोबर रममाण होवो, आबालवृद्धांबरोबर क्रीडा करो, त्यानें कांही केलें तरी देहाचे स्मरण नसतें. कुडींत प्राण असेपर्यंत पूर्व कर्माच्या योगाने त्याचें जीवन कसें तरी होतें ॥ १९ ॥
शि ० -कर्मफलाचा भोग आहे असें म्हटल्यावर ज्ञान्यास जन्म आहे असें म्हणावें लागेल. गु० -ज्ञानेंकरून संचितकर्म दग्ध झाल्यामुळे त्याला जन्म नसून सर्व कामाची प्राप्ति होते. श्रोत्रियाचेठायी जे भोग घडतात त्यांस क्रम म्हणून कांहींच नसतो. जसे प्राप्त होतील तसे तो भोगतो. ॥ २० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *