सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २६१ ते २८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

विपर्यस्तो निदिध्यासेत्किं ध्यानमविपर्ययात् ।
देहात्मत्वविपर्यासं न कदाचिद्‌भजाम्यहम् ॥ २६१ ॥
ज्याला देहात्मबुद्धि वारंवार होते त्यानें निदिध्यास करावा. मला तसा विपर्यय मुळींच होत नाही, मग निदिध्यासाची खटपट तरी कशाला ? ॥ २६१ ॥

अहं मनुष्य इत्यादिव्यवहारो विनाऽप्यमुम् ।
विपर्यासं चिराभ्यस्तवासनातोऽवकल्पते ॥ २६२ ॥
आतां मी मनुष्य असा केव्हां केव्हां व्यवहार घडतो, परंतु तो विपर्यासामुळे नव्हे. त्याचें कारण अनेक जन्माचा संस्कारच होय. ॥ २६२ ॥

प्रारब्धकर्मणि क्षीणे व्यवहारो निवर्तते ।
कर्माक्षये त्वसौ नैव शाम्येद्ध्यानसहस्रतः ॥ २६३ ॥
प्रारब्धकर्माचा क्षय झाला म्हणजे हा व्यवहार आपोआप नाहींसा होतो परंतु त्या कर्माचा क्षय न होतां आम्ही शेकडो वर्षें ध्यान केलें तरी तें व्यर्थ आहे. ॥ २६३ ॥

विरलत्वं व्यवहृतेरिष्टं चेद्ध्यानमस्तु ते ।
अबाधिकां व्यवहृतिं पश्य ध्यायाम्यहं कुतः ॥ २६४ ॥
आतां, व्यवहाराचा अडथळा झाल्यामुळे तो कमी व्हावा अशी ज्याला इच्छा असेल त्यानें खुशाल ध्यान करावें. पण मला जर त्याचा मुळीच अडथळा वाटत नाही, तर त्याची मला काय गरज आहे ? ॥ २६४ ॥

विक्षेपो नास्ति यस्मान्मे न समाधिस्ततो मम ।
विक्षेपो वा समाधिर्वा मनसः स्याद्विकारिणः ॥ २६५ ॥
मनांत मध्ये मध्ये विक्षेप येतो, तो न यावा म्हणून समाधि लावावयाची. तो विक्षेपच जर माझा गेला तर ती समाधि तरी कशाला पाहिजे. कारण, विक्षेप आणि समाधि हे दोन्ही मनाचेच धर्म आहेत. आणि मला तर तें मन मुळीच नाहीं, मग विक्षेप कोठून असणार ? ॥ २६५ ॥

नित्यानुभवरूपस्य को मेऽत्रानुभवः पृथक् ।
कृतं कृत्यं प्रापणीयं प्राप्तमित्येव निश्चयः ॥ २६६ ॥
आतां अनुभव येण्याकरितां समाधि करावा असें जर म्हणावें तर मीच अनुभवरूप आहें. मग मला दुसरा आणखी अनुभव तो कोठून व्हावा ? जें करावयाचें तें मीं केलें. आणि मिळवावयाचें तें मिळविले, असा माझा पक्का निश्चय झाला आहे. ॥ २६६ ॥

व्यवहारो लौकिको वा शास्त्रीयो वाऽन्यथापि वा ।
ममाकर्तुरलेपस्य यथारब्धं प्रवर्तताम् ॥ २६७ ॥
माझा व्यवहार प्रारब्धानुरूप कसा तरी चालों, मग तो लौकिकी असो किंवा शास्त्रीय असो, कसाही असो; मी स्वत: अकर्ता असून मला कर्माचा मुळीच लेप नाहीं. ॥ २६७ ॥

अथवा कृतकृत्योऽपि लोकानुग्रहकाम्यया ।
शास्त्रीयेणैव मार्गेण वर्तेऽहं का मम क्षतिः ॥ २६८ ॥
किंवा मी जरी कृतकृत्य झालों; तरी लोकांनी मला पाहून चांगल्या रीतीने आचरण करावे या हेतूने शस्त्रांत सांगितल्याप्रमाणे मी वागेन त्यांत तरी माझा काय तोटा होणार ? ॥ २६८ ॥

देवार्चनस्नानशौचभिक्षादौ वर्ततां वपुः ।
तारं जपतु वाक् तद्वत्पठत्वाम्नायमस्तकम् ॥ २६९ ॥
हे माझ शरीर देवाचा पूजा करो, स्नान करो; शौचभिक्षादि कर्में करो, ही माझी वाणी प्रणवाचा जप करो; किंवा उपनिषदाचे अध्ययन करो ॥ २६९ ॥

विष्णुं ध्यायतु धीर्यद्वा ब्रह्मानन्दे विलीयताम् ।
साक्ष्यहं किंचिदप्यत्र न कुर्वे नापि कारये ॥ २७० ॥
तशीच माझी बुद्धि विष्णूचें ध्यान करो; किंवा ब्रह्मानंदी लीन होवो; मी तर सर्वांचा साक्षी आहें. मी कांहीं करीत नाहीं व करवीतही नाहीं. ॥ २७० ॥

एवं च कलहः कुत्र सम्भवेत्कर्मिणो मम ।
विभिन्नविषयत्वेन पूर्वापरसमुद्रवत् ॥ २७१ ॥
याप्रमाणें कर्मठ व ज्ञानी यांचें विषय पूर्वोपार समुद्राप्रमाणे एकमेकांपासून अगदी भिन्न असल्यामुळे, त्या दोघांच्या कलहास कारणच उरलें नाहीं. ॥ २७१ ॥

वपुर्वाग्धीषु निर्बन्धः कर्मिणो न तु साक्षिणि ।
ज्ञानिनः साक्ष्यलेपत्वे निर्बन्धो नेतरत्र हि ॥ २७२ ॥
कर्मठाचा विषय देह, वाणी आणि बुद्धि या तिहींमध्यें काय तो आहे. साक्षीकडे त्याचा कांहीं संबंध नाहीं. आणि ज्ञान्याचा विषय साक्षीचे अलेपत्व हाच होय. त्यांना देहादिकांकडे जाण्याची गरज नाहीं. ॥ २७२ ॥

एवं चान्योन्यवृत्तान्तानभिज्ञौ बधिराविव ।
विवदेतां बुद्धिमन्तो हसन्त्येव विलोक्य तौ ॥ २७३ ॥
असें असून परस्परांविषयी गैर समजूत होऊन बहिर्‍याप्रमाणे ते व्यर्थ कलह करतात. शहाणा जो आहे तो त्या कलहांत शिरत नाहीं. उगीच पाहून त्याचे वेडेपणास हंसतो. ॥ २७३ ॥

यं कर्मी न विजानाति साक्षिणं तस्य तत्त्ववित् ।
ब्रह्मत्वं बुध्यतां तत्र कर्मिणः किं विहीयते ॥ २७४ ॥
ज्या साक्षीचे ज्ञान कर्मठ पुरुषास मुळींच नाहीं तो साक्षी ब्रह्म आहे असें तत्त्ववेत्ता समजत असेल, तर त्यांत कर्मठाचे काय गाठोडे जातें ? ॥ २७४ ॥

देहवाग्बुद्धयस्त्यक्ता ज्ञानिनानृतबुद्धितः ।
कर्मी प्रवर्तयत्वाभिर्ज्ञानिनो हीयतेऽत्र किम् ॥ २७५ ॥
तसेंच ज्ञान्याने जी देह आणि बुद्धि इत्यादि ही सर्वे खोटी म्हणून मुळींच सोडून दिली, त्यांच्या साहाय्यानें कर्मठ पुरुष कर्म करील तर त्यांत ज्ञान्याचे तरी काय जातें ? ॥ २७५ ॥

प्रवृत्तिर्नोपयुक्ता चेन्निवृत्तिः कोपयुज्यते ।
बोधे हेतुर्निवृत्तिश्चेद्बुभुत्सायां तथेतरा ॥ २७६ ॥
आतां ज्ञान्याला कर्माचे प्रयोजनच नाही: तर त्याची कर्माविषयी वृत्ति कां असावी ? असें कोणी पुसेल तर त्याला आम्ही उलट पुसतों कीं त्याचे ठायीं त्याला निवृत्ति तरी कां असावी ? ज्ञानाकरितां निवृत्ति पाहिजे असें तो म्हणेल तर जिज्ञासेकरितां प्रवृत्ति ही पाहिजे असे आम्ही म्हणतों. ॥ २७६ ॥

बुद्धश्चेन्न बुभुत्सेत नाप्यसौ बुध्यते पुनः ।
अबाधादनुवर्तेत बोधो न त्वन्यसाधनात् ॥ २७७ ॥
ज्ञान झाल्यावर जिज्ञासा कशी राहील असे तो म्हणेल तर एकदां ज्ञान झाल्यावर पुन: ज्ञान कसचें असें आम्हीही विचारितों. ज्ञान स्थिर राहण्याला, तें निःसंशय झाल्यावर, दुसर्‍या साधनाची जरूर नाही. ॥ २७७ ॥

नाविद्या नापि तत्कार्यं बोधं बाधितुमर्हति ।
पुरैव तत्त्वबोधेन बाधिते ते उभे यतः ॥ २७८ ॥
या ज्ञानाची बाधा करण्यास अविद्याही समर्थ नाहीं, व तिचें कार्य जें जगत् तेंही समर्थ नाहीं. कारण पूर्वींच तत्त्वबोधाने त्या दोन्हींचाही समग्र नाश झालेला आहे. ॥ २७८ ॥

बाधितं दृश्यतामक्षैस्तेन बाधो न शक्यते ।
जीवन्नाखुर्न मार्जारं हन्ति हन्यात्कथं मृतः ॥ २७९ ॥
आतां हें बाधित द्वैत डोळ्यांना दिसले तर दिसेना बापडें. तेणेंकरून ज्ञानाला मुळीच धक्का नाहीं. जिवंत उंदीर जर मांजराला मारण्यास समर्थ नाहीं, तर मेलेला उंदीर त्याला कसा मारील ? ॥ २७९ ॥

अपि पाशुपतास्त्रेण विद्वश्चेन्न ममार यः ।
निष्फलेषुवितुन्नाङ्गो नङ्क्ष्यतीत्यत्र का प्रमा ॥ २८० ॥
जो पाशुपतास्त्राला देखील दाद देत नाही, त्याच्या अंगाला निष्फळ बाणांनीं काय होणार ? ॥ २८० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *