सार्थ पंचदशी मराठी चतुर्दशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे विद्यानन्दः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

युवा रूपी च विद्यावान्नीरोगो दृढचित्तवान् ।
सैन्योपेतः सर्वपृथ्वीं वित्तपूर्णां प्रपालयन् ॥ २१ ॥
सर्वैर्मानुष्यकैर्भोगैः सम्पन्नस्तृप्तभूमिपः ।
यमानन्दमवाप्नोति ब्रह्मविच्च तमश्नुते ॥ २२ ॥
मर्त्येभोगे द्वयोर्नास्ति कामस्तृप्तिरतः समा ।
भोगान्निष्कामतैकस्य परस्यापि विवेकतः ॥ २३ ॥

श्रोत्रियत्वाद्वेदशास्त्रैर्भोग्यदोषानवेक्षते ।
राजा बृहद्रथो दोषांस्तान् गाथाभिरुदाहरत् ॥ २४ ॥
देहदोषाश्चित्तदोषा भोग्यदोषा अनेकशः ।
शुना वान्ते पायसे नो कामस्तद्वद्विवेकिनः ॥ २५ ॥
निष्कामत्वे समेऽप्यत्र राज्ञः साधनसञ्चये ।
दुःखमासीद्‌भाविनाशादितिभीरनुवर्तते ॥ २६ ॥
नोभयं श्रोत्रियस्यातस्तदानन्दोऽधिकोऽन्यतः ।
गन्धर्वानन्द आशास्ति राज्ञो नास्ति विवेकिनः ॥ २७ ॥
अस्मिन्कल्पे मनुष्यः सन्पुण्यपापविशेषतः ।
गन्धर्वत्वं समापन्नो मर्त्यो गन्धर्व उच्यते ॥ २८ ॥
पूर्वकल्पे कृतात्पुण्यात्कल्पादावेव चेद्‌भवेत् ।
गन्धर्वत्वं तादृषोऽत्र देवगन्धर्व उच्यते ॥ २९ ॥
अग्निष्वात्तादयो लोके पितरश्चिरवासिनः ।
कल्पादावेव देवत्वं गता आजानदेवताः ॥ ३० ॥

तैत्तिरीय श्रुतींत असें सांगितलें आहे कीं, तरुण रूपवान्, विद्वान् निरोगी दृढमनाचा, ज्याच्या पदरी पुष्कळ सैन्य आहे, व जो संपत्तीने पूर्ण अशा पृथ्वीचे पालन करणारा सार्वभौम राजा, त्यास या सर्वे मानवी भोगांपासून जो आनंद मिळतो तो ब्रह्मवेत्त्यास प्राप्त होतो. ॥ २१-२२ ॥

शि ० -सार्वभौम राजा आणि ज्ञानी यांच्या विषयप्राप्तीमध्यें साम्यता मुळीच नाहीं असें असून दोघांची तृप्ति सारखी कशी म्हणतां ? गु० – मनुष्यभोगाची इच्छा दोघांनाही राहिली नाहीं. याकरितां या उभयतांचीही वृत्ति सारखीच आहे. एकाला भोगाने तृप्ति आणि दुसऱ्याला विवेकाने. ॥ २३ ॥
शि ० -तो विवेक कोणचा ? गु० – वेदशास्त्रांत सांगितले विषयभोगांतील दोष ज्ञानी पाहतो, हाच आम्ही म्हटलेला विवेक. बृहद्रथ राजाने मैत्रायणीय शाखेमध्ये या दोषाचे गाथारूपानें वर्णन केलें आहे ॥ २४ ॥
ते दोष कांहीं देहसंबंधी, व कांहीं चित्तसंबंधी आणि कांहीं विषयसंबंधीं असे वर्णिले आहेत. शि० – दोषदर्शनाने इच्छा कशी जाते ? गु० – कुत्र्याच्या ओकारीवर कोणाची इच्छा होईल काय ? त्याप्रमाणें विवेकी पुरुषास विषय वाटतात. ॥ २५ ॥
शि ० –दोघांचीही तृप्ति सारखी झाल्यावर राजापेक्षा ज्ञान्याची प्रतिष्ठा ती काय ? गु० -उभयतांची इच्छा तृप्ति जरी सारखी झाली तरी त्यामध्यें भेद आहे. राजाला साधने मिळविण्याचे दुःख आणि भावी नाशाचें भय असतें ॥ २६ ॥
परंतु ज्ञान्यास तीं दोन्हीही नाहींत. म्हणून ज्ञान्याची योग्यता राजापेक्षां अधिक समजली पाहिजे. शिवाय राजाला सार्वभौमानंद मिळाल्यावर गंधर्वानंदाची आशा राहिलीच, ती ज्ञान्यास नाही. ॥ २७ ॥
गंधर्वाचे दोन प्रकार आहेत एक मर्त्यगंधर्व आणि एक देवगंधर्व. या कल्पी मनुष्य असून कोण्या एका पुण्यपाकविशेषेंकरून गंधर्वत्व पावला असतां त्यास मर्त्यगंधर्व असें म्हणतात. ॥ २८॥
आणि पूर्व कल्पीं केलेल्या पुण्यपरिपाकेंकरून या कल्पाच्या आरंभीच गंधर्वत्व पावला असतां त्यास देवगंधर्व असें म्हणतात. ॥ २९ ॥

अग्निष्वात्तादिक जे पितर त्यांस चिरलोक पितर म्हणतात. आणि कल्पाच्या आरंभीच देवपद पावलेल्यास आजानदेवता असें म्हणतात. ॥ ३० ॥

अस्मिन्कल्पेऽश्वमेधादि कर्म कृत्वा महत्पदम् ।
अवाप्याजानदेवैर्याः पूज्यास्ताः कर्मदेवताः ॥ ३१ ॥
यमाग्निमुख्याः देवाः स्युर्ज्ञाताविन्द्रबृहस्पती ।
प्रजापतिर्विराट् प्रोक्तो ब्रह्मा सूत्रात्मनामकः ॥ ३२ ॥
सार्वभौमादिसूत्रान्ता उत्तरोत्तरगामिनः ।
अवाङ्मनसगम्योऽयमात्मानन्दस्ततः परः ॥ ३३ ॥
तैस्तैः काम्येषु सर्वेषु सुखेषु श्रोत्रियो यतः ।
निस्पृहस्तेन सर्वेषामानन्दाः सन्ति तस्य ते ॥ ३४ ॥
सर्वकामाप्तिरेषोक्ता यद्वा साक्षि चिदात्मता ।
स्वदेहवत्सर्वदेहेष्वपि भोगानवेक्षते ॥ ३५ ॥
अज्ञस्याप्येतदस्त्येव न तु तृप्तिरबोधतः ।
यो वेद सोऽश्नुते सर्वान्कामानितियब्रवीच्छ्रुतिः ॥ ३६ ॥

यद्वा सर्वात्मता स्वस्य साम्ना गायति सर्वदा ।
अहमन्नं तथान्नादश्चेति सामस्वधीयते ॥ ३७ ॥
दुःखाभावश्च कामाप्तिरुभे ह्येवं निरूपिते ।
कृतकृत्यत्वमन्यच्च प्राप्तप्राप्यत्वमीक्ष्यताम् ॥ ३८ ॥
उभयं तृप्तिदीपे हि सम्यगस्माभिरीरितम् ।
त एवात्रानुसन्धेयाः श्लोका बुद्धिविशुद्धये ॥ ३९ ॥
ऐहिकामुष्मिकव्रातसिद्ध्यै मुक्तेश्च सिद्धये ।
बहु कृत्यं पुरास्याभूत्तत्सर्वमधुना कृतम् ॥ ४० ॥

या कल्पाचेठायी अश्वमेधादि कर्मेंकरून त्यांची आजानदेवाकडून पूजा घेतली त्यांस कर्मदेवता असें म्हणतात ॥ ३१ ॥

यम, अग्नि हे मुख्य देव आहेत. इंद्र, बृहस्पती त हे तर प्रसिद्धच आहेत विराट् पुरुषासच प्रजापति म्हणतात. आणि जो सूत्रात्मा तोच ब्रह्मदेव. ॥ ३२ ॥
याप्रमाणे सार्वभौमापासून सूत्रात्म्यापर्यंत उत्तरोत्तर अधिक अधिक आनंद इच्छिणारे आहेत. या सर्वांहून आत्मानंद श्रेष्ठ आहे. कारण तो वाणीस व मनास अगोचर आहे.॥ ३३ ॥
कोणताही विषय पूर्णपणें प्राप्त झाला असतां मनुष्यास तो नकोसा होतो. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठास सार्वभौमादि आनंदाविषयी अलंबुद्धि असते. त्याअर्थी ते सर्व आनंद त्यास मिळालेच असें समजले पाहिजे. ॥ ३४॥
यालाच सर्वकामाप्ति असें म्हणतात. किंवा ज्याप्रमाणें स्वदेहाचेठायी आनंदाकार बुद्धिसाक्षित्वेंकरून ब्रह्मनिष्ठ आनंदी असतो त्याप्रमाणें इतर देहाचेठायीही ज्या सुखाकारवृत्ति होतात त्याचेही त्यास साक्षित्व असल्यामुळें तो सदा आनंदीच म्हटला पाहिजे. ॥ ३५ ॥
शि० – मग साक्षित्व अज्ञान्यास देखील असतें. म्हणून सर्वानंदात त्याला झाली असे म्हणता येईल कीं काय ? गु० – मी सर्व बुद्धीचा साक्षी आहें असें ज्ञान त्यास नसल्यामुळे त्यास ती प्राप्ति नाहीं. यो वेद सोऽश्नुते ( जो जाणेल त्याला मिळेल) असें श्रुतिप्रमाण आहे. ॥ ३६ ॥
अथवा आणखी एका प्रकारे सामवेदांनी सर्वकामाप्ति गायिली आहे. ती अशी ”अहमन्न तथान्नादः” ( अन्नही मीच व अन्न खाणाराही मीच) असें सार्वात्म्य वर्णिलें आहे. ॥ ३७ ॥
याप्रमाणे दुःखाभाव आणि सर्वकामाप्ति या दोन्हीचे निरूपण केलें. आतां कृतकृत्यत्व आणि प्राप्तप्राप्यत्व यांचा विचार करावयाचा.॥ ३८॥
या दोहींचा विचार आम्ही पूर्वी तृप्तिदीपांत विस्तारेंकरून केला आहे. तेच श्लोक वाचकांनीं वाचून पहावे म्हणजे समजेल. ॥ ३९ ॥

ज्ञात्याला तत्त्वज्ञान होण्यापूर्वी ऐहिक म्ह० यालोकीं सुखप्राप्ती आणि दुःखनिवृत्तिकरतां कृषि वाणिज्य इत्यादिक, व आमुष्मिक म्ह० स्वर्गलोकप्राप्तीकरतां यज्ञ व उपासनादिक व मोक्षसाधन जे ज्ञान त्याच्या प्राप्तीकरतां श्रवण मनन निदिध्यासनादिक; या प्रकारेंकरून बहुप्रकारचें कर्तव्य कर्म होतें. आणि आता तर त्यास संसारसुखाची इच्छा नाही म्हणून व ब्रह्मानंद साक्षात्काराचीही सिद्धी झाली आहे, म्हणून तें सर्व त्यानें केल्यासारखेंच आहे. आता त्याला काहीं कर्तव्य उरलें नाहीं. ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *