सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २०१ ते २२०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

भोक्ता स्वस्यैव भोगाय पतिजायादिमिच्छति ।
एष लौकिकवृत्तान्तः श्रुत्या सम्यगनूदितः ॥ २०१ ॥
अशा प्रकारचा भोक्ता पतिजायादि विषयांची जी इच्छा करितो ती केवळ आपल्या सुखाकरितां, अशी जी प्रसिद्धि आहे, तिचाच अनुवाद श्रुतीने केला. ॥ २०१ ॥

भोग्यानां भोक्तृशेषत्वान्मा भोग्येष्वनुरज्यताम् ।
भोक्तर्येव प्रधानेऽतोऽनुरागं तं विधित्सति ॥ २०२ ॥
असा अनुवाद करण्याचे कारण हेंच कीं, मनुष्याची विषयांवरील प्रीति जाऊन स्वतःवर बसावी. कारण पतिजायादि सर्व आपल्या सुखाची साधनें आहेत. ॥ २०२ ॥

या प्रीतिरविवेकानां विषयेष्वनपायिनी ।
त्वामनुस्मरतः सा मे हृदयान्माऽपसर्पतु ॥ २०३ ॥
याविषयीं पुराणांत एक वचन आहे तें असें कीं, “हे देवा, अविचार्‍यांची जशी विषयावर सदा प्रीति असते, तशीच तुजवर माझी सदा प्रीति असो. अशी एका भक्ताने प्रार्थना केली आहे. ॥ २०३ ॥

इति न्यायेन सर्वस्माद्‌भोग्यजाताद्विरक्तधीः ।
उपसंहृत्य तां प्रीतिं भोक्तर्येनं बुभुत्सते ॥ २०४ ॥
या न्यायानें विरक्त मुमुक्षु पुरुष सर्व भोगण्याचे विषयांपासून आपली प्रीति ओढून घेऊन आपल्यावर आणून ठेवतो, आणि आत्म्यास जाणण्याची इच्छा करितो. ॥ २०४ ॥

स्रक्चन्दनवधूवस्त्रसुवर्णादिषु पामरः ।
अप्रमत्तो यथा तद्वन्न प्रमाद्यति भोक्तरि ॥ २०५ ॥
जसा संसारी मनुष्य स्रक्, चंदन, वधू, वस्त्र, सुवर्णादिकांच्याठायी दक्ष असतो तसा मुमुक्षु भोक्त्याचेठायीं (आत्म्याविषयी) दक्ष असतो. ॥ २०५ ॥

काव्यनाटकतर्कादिमभ्यस्यति निरन्तरम् ।
विजिगीषुर्यथा तद्वन्मुमुक्षुः स्वं विचारयेत् ॥ २०६ ॥
व ज्याप्रमाणें सभा जिंकण्याच्या इच्छेनें पंडित लोक काव्य नाटक तर्कादि शास्त्रांचा निरंतर अभ्यास करतात त्याप्रमाणे मुमुक्षूनें स्वतःविषयी विचार करावा. ॥ २०६ ॥

जपयागोपासनादि कुरुते श्रद्धया यथा ।
स्वर्गादिवाञ्छया तद्वच्छ्रद्दध्यात्स्वे मुमुक्षया ॥ २०७ ॥
तसेच ज्याप्रमाणें कर्मठ पुरुष स्वर्गादिकांची वांच्छां धरून जपयज्ञउपासनादि कर्में मोठ्या श्रद्धेने करतो, त्याप्रमाणें मनामध्ये मुमुक्षा धारण करून साधकानें स्वतःवर श्रद्धा ठेवावी. ॥ २०७ ॥

चित्तैकाग्र्यं यथा योगी महायासेन साधयेत् ।
अणिमादिप्रेप्सयैवं विविच्यात् स्वं मुमुक्षया ॥ २०८ ॥
तसेच योगी हा आणिमादिक सिद्धींची इच्छा करून जसा हटानें चित्तनिग्रह करतो त्याप्रमाणे: साधकांने मुमुक्षा धारण करून स्वतःचें विवेचन करावें. ॥ २०८ ॥

कौशलानि विवर्धन्ते तेषामभ्यासपाटवात् ।
यथा तद्वद्विवेकोऽस्याप्यभ्यासाद्विशदायते ॥ २०९ ॥
त्या पंडितादिकाची आपापल्या विषयांमध्ये अम्यासबलानें जशी अधिकाधिक गति होते, त्याप्रमाणे साधकाचाही अभ्यासबलानें, देहादिकापासून मी निराळा आहें, असा विवेक अधिकाधिक स्पष्ट होत जातो. ॥ २०९ ॥

विविञ्चता भोक्तृतत्त्वं जाग्रदादिष्वसङ्गता ।
अन्वयव्यतिरेकाभ्यां साक्षिण्यध्यवसीयते ॥ २१० ॥
या विवेकाचा परिणाम शेवटीं, असा होतो कीं, भोक्त्याचें खरे स्वरूप जागृदादि तिन्ही अवस्थांमध्ये अन्वयव्यतिरेकांहींकरून निवडल्यानें, साक्षी हां असंग आहे असा निश्चय होतो. ॥ २१० ॥

यत्र यद्दृश्यते द्रष्टा जाग्रत्स्वप्नसुषुप्तिषु ।
तत्रैव तन्नेतरत्रेत्यनुभूतिर्हि संमता ॥ २११ ॥
ते अन्वयव्यतिरेक असे जाग्रत्स्वप्न सुषुप्ति यांपैकी ज्या ज्या दशेत जें जें साक्षीस दिसतें तें तें त्या त्या दशेपुरतेंच. म्हणजे जागृतींतील स्थूल दृष्टि जागृतींतच. स्वप्नांतील सूक्ष्म दृष्टि स्वप्नांतच. आणि सुषुप्तींतील अज्ञान सुषुप्तींतच. असा अनुभव सर्व लोकांस आहे. ॥ २११ ॥

स यत्तत्रेक्षते किंचित्तेनानन्वागतो भवेत् ।
दृष्ट्वैव पुण्यं पापं चेत्येवं श्रुतिषु डिण्डिमः ॥ २१२ ॥
याविषयीं श्रुतिचेंही प्रमाण आहे. “स यत्तत्रेक्षते” इत्यादिक श्रुतीचा अर्थ असा आहे कीं, त्या त्या अवस्थेत साक्षीच्या दृष्टीस जें जें पुण्य व पाप पडतें, त्यापासून तो अगदीं निराळा असतो. ॥ २१२ ॥

जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादि प्रपञ्चं यत्प्रकाशते ।
तद्‌ब्रह्माहमिति ज्ञात्वा सर्वबन्धैः प्रमुच्यते ॥ २१३ ॥
दुसरे प्रमाण. जाग्रत्स्वप्नसुषुप्तीचेठायी असणारा प्रपंच, ज्या ब्रह्माच्या योगाने प्रकाशित होतो, तें ब्रह्म मी असें ज्ञान झालें असतां, प्राणी सर्व बंधनांपासून तत्काल मुक्त होतो ॥ २१३ ॥

एक एवात्मा मन्तव्यो जाग्रत्स्वप्नसुषुप्तिषु ।
स्थानत्रयव्यतीतस्य पुनर्जन्म न विद्यते ॥ २१४ ॥
तिसरे. तिन्ही अवस्थांमध्ये एकच आत्मा आहे असें समजावे. तीनही अवस्थांपासून निराळा असणारा जो साक्षी त्यास पुनर्जन्म नाही. ॥ २१४ ॥

त्रिषु धामसु यद्‌भोग्यं भोक्ता भोगश्च यद्‌भवेत् ।
तेभ्यो विलक्षणः साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिवः ॥ २१५ ॥
चवथे. त्या तिन्ही अवस्थेंत भोग, भोक्ता आणि भोग्य या त्रिपुटीपासून निराळा चैतन्यरूपी साक्षी सदाशिव मी आहे. ॥ २१५ ॥

एवं विवेचिते तत्त्वे विज्ञामयशब्दितः ।
चिदाभासो विकारी यो भोक्तृत्वं तस्य शिष्यते ॥ २१६ ॥
याप्रमाणें आत्मतत्वाचें विवेचन केलें असतां, ज्याला विज्ञानमय अशी संज्ञा आहें असा जो चिदाभास तो विकारी असल्यामळे भोक्तृत्व त्यालाच लागू होते. ॥ २१६ ॥

मायिकोऽयं चिदाभासः श्रुतेरनुभवादपि ।
इन्द्रजालं जगत्प्रोक्तं तदन्तःपात्ययं यतः ॥ २१७ ॥
हा चिदाभास खोटा आह असें श्रुतिप्रमाणावरून व अनुभवानें सिद्ध होतें. कारण जग है इंद्रजालाप्रमाणें मिथ्या आहे, असें पूर्वीच सांगितलें आहे. आणि चिदाभासही जगापैकींच आहे, म्हणून तोही मिथ्या म्हटला पाहिजे. ॥ २१७ ॥

विलयोऽप्यस्य सुप्त्यादौ साक्षिणा ह्यनुभूयते ।
एतादृशं स्वस्वभावं विविनक्ति पुनः पुनः ॥ २१८ ॥
या चिदाभासाचा लय झालेला सुषुत्यादि अवस्थांमध्ये अनुभवास येतो. अशा विचारानें आपला खोटेपणा मुमुक्षु वारंवार समजने घेतो. ॥ २१८ ॥

विविच्य नाशं निश्चित्य पुनर्भोगं न वाञ्छति ।
मुमूर्षुः शायितो भूमौ विवाहं कोऽभिवाञ्छति ॥ २१९ ॥
याप्रमाणें आपला खोटेपणा समजून घेऊन आपला खचित नाश होणार आहे असें जाणून पुन: भोगाची इच्छा करीत नाही. ठीकच आहे, मरणास टेकलेला मनुष्य विवाहाची इच्छा कधीं तरी करील काय ? ॥ २१९ ॥

जिह्रेति व्यवहर्तुं च भोक्ताहमिति पूर्ववत् ।
छिन्ननाश इव ह्रितः क्लिश्यन्नारब्धमश्नुते ॥ २२० ॥
मग मी भोक्ता म्हणून पूर्वी जसा व्यवहार करीत होता तसा पुन: करण्याला, नाक कापलेल्या मनुष्याप्रमाणें तो लाजतो. आणि मनांत खंत बाळगून प्रारब्ध निमटूपणें भोगतो. ॥ २२० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *