सार्थ पंचदशी मराठी अष्टमः परिच्छेदः- कूटस्थदीपः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

सन्धयोऽखिलवृत्तीनामभावाश्चावभासिताः ।
निर्विकारेण येनासौ कूटस्थ इति चोच्यते ॥ २१ ॥
या ज्या एका मागून एक वृत्ति निघतात त्यामधील संधी आणि त्या लीन झाल्यावर त्यांचा अभाव ज्या निर्विकार चैतन्याचे योगाने समजतात, त्याला कूटस्थ असें म्हणतात. ॥ २१ ॥

घटे द्विगुणचैतन्यं यथा बाह्ये तथान्तरे ।
वृत्तिष्वपि ततस्तत्र वैशद्यं सन्धितोऽधिकम् ॥ २२ ॥
ज्याप्रमाणें बाहेर घटाचेठायी एक घट मात्र समजविणारें चिदाभासज्ञान आणि दुसरें घटाची ज्ञातता समजविणारें ब्रह्मज्ञान अशी दोन ज्ञाने आहेत, त्याप्रमाणें शरीरांचे आतल्या बाजूसही दोन चैतन्ये आहेत; म्हणजे एक कूटस्थज्ञान आणि दुसरें चिदाभासज्ञान. त्यामुळें मधील संधीपेक्षां वृत्ती अधिक स्पष्ट भासतात ॥ २२ ॥

ज्ञातताज्ञातते न स्तो घटवद्वृत्तिषु क्वचित् ।
स्वस्य स्वेनागृहीतत्वात् ताभिश्चाज्ञाननाशनात् ॥ २३ ॥
आतां घटाचेठायीं एकदा अज्ञातता आणि एकदा ज्ञातता या जशा संभवतात तशा वृत्तीचेठायीं मात्र त्या संभवत नाहींत. कारण, त्या स्वप्रकाशक असल्यामुळें तेथें ज्ञानव्याप्तीची गरजच नाहीं. आणि येथें ज्ञानव्याप्तीची गरज नाहीं तेथें अज्ञानाचाही संभव नाही. ॥ २३ ॥

द्विगुणीकृतचैतन्ये जन्मनाशानुभूतितः ।
अकूटस्थं तदन्यत्तु कूटस्थमविकारितः ॥ २४ ॥
ही जी देहाच्या आंतील दोन चैतन्ये सांगितली तीं दोनही जरी स्वप्रकाशक असली तरी त्यांपैकीं एकास जन्मनाश आहेत असा अनुभव असल्यामुळें तें कूटस्थ नव्हे, आणि दुसरे अविकारी असें प्रत्यक्ष समजल्यामुळें तें कूटस्थ होय. ॥ २४ ॥

अन्तःकरणतद्वृत्तिसाक्षीत्यादावनेकधा ।
कूटस्थः एव सर्वत्र पूर्वाचार्यैर्विनिश्चितः ॥ २५ ॥
हें सांगणे आमचे पदरचे नव्हे. अंतःकरण तद्‌वृत्ति साक्षी चैतन्य विग्रह इत्यादि वचनांहींकरून पूर्वाचार्यांनी कूटस्थाचा निवाडा असाच केला आहे. ॥ २५ ॥

आत्माभासाश्च याश्चैवं मुखाभासाश्रया यथा ।
गम्यन्ते शास्त्रयुक्तिभ्यामित्याभासश्च वर्णितः ॥ २६ ॥
ज्याप्रमाणें मुख, आरसा व त्यांत पडलेले प्रतिबिंब या तीन वस्तु जगांत दृष्टीस पडतात, त्याप्रमाणें कूटस्थ चिदाभास आणि बुद्धि या तीन वस्तु देहांत समजाव्या. अशा रीतीनें वर्णन चिदाभासाचेही केलें आहे. ॥ २६ ॥

बुद्ध्यवच्छिन्नकूटस्थो लोकान्तरगमागमौ ।
कर्तुं शक्तो घटाकाश इवाभासेन किं वद ॥ २७ ॥
आतां असा एक पूर्व पक्ष आहे कीं, जसें घटद्वारा घटावच्छिन्न आकाशास जाणें येणे संभवते, तसा बुद्ध्यवच्छि कूटस्थालाही लोकांतरी जाणें येणे संभवते. मग आणखी चिदाभासाची निराळी कल्पना कशाला पाहिजे. ॥ २७ ॥

शृण्वसङ्गः परिच्छेदमात्राज्जीवो भवेन्न हि ।
अन्यथा घटकुड्याद्यैरवच्छिन्नस्य जीवता ॥ २८ ॥
याजवर आमचे असें उत्तर आहे कीं, केवळ षरिच्छेदानेच हा असंग कूटस्थ जीव होऊं शकत नाहीं. कारण, तसें जर होईल तर काष्ठपाषाणांहीं करून आच्छादिलेला कूटस्थ सर्वत्र असल्यामुळें सर्व जड पदार्थांत असलेत्या कूटस्थास जीव म्हणावें लागेल. ॥ २८ ॥

न कुड्यसादृशी बुद्धिः स्वच्छत्वादिति चेत्तथा ।
अस्तु नाम परिच्छेदे किं स्वाच्छ्येन भवेत्तव ॥ २९ ॥
तर आतां याजवरही अशी एक कोटी आहे कीं बुद्धि ही लकलकीत आहे पण भिंत तशी नाहीं. म्हणून भिंत आणि बुद्धि एकच म्हणणें बरोबर नाहीं. याजवर आमचे असें उत्तर कीं, स्वच्छत्वाच्या सबंधाने त्या दोहोंमध्ये जरी भेद आहे तरी परिच्छेदाच्या सबंधाने तीं दोन्हीही एकच आहेत. ॥ २९ ॥

प्रस्थेन दारुजन्येन कांस्यजन्येन वा न हि ।
विक्रेतुस्तण्डुलादिनां परिमाणं विशिष्यते ॥ ३० ॥
यास दृष्टांत धान्य मोजण्याची दोन मापे आहेत. एक लांकडाचें व दुसरें कांशाचें. या दोन्ही मापांनीं तंदुलादिक धान्ये मोजली असतां या मापामुळे धान्यांत मुळीच फरक नाहीं. ॥ ३० ॥

परिमाणविशेषेऽपि प्रतिबिम्बो विशिष्यते ।
कांस्ये यदि तदा बुद्धावप्याभासो भवेद्बलात् ॥ ३१ ॥
तर कांशाच्या मापाने मापांत जरी फेर पडला नाहीं तरी तें लकलकीत असल्यामुळें त्यांत प्रतिबिंब पडते एवड्गा भेद आहे. त्याप्रमाणें बुद्धीमध्येही ती स्वच्छ असल्यामुळ चिदाभासही तिजबरोबर असलाच पाहिजे. ॥ ३१ ॥

ईषद्‌भासनमाभासः प्रतिबिम्बस्तथाविधः ।
बिम्बलक्षणहीनः सन् बिम्बवद्‌भासते स हि ॥ ३२ ॥
प्रतिबिंब आणि आभास हे दोन्ही एकच आहेत. कारण, आभास म्हणजे नसून कांहीं वेळ भासणे, आणि प्रतिबिंब म्हणजे जें विंबलक्षणरहित असून चित्रासारखे भासते. ॥ ३२ ॥

ससङ्गत्वविकाराभ्यां बिम्बलक्षणहीनता ।
स्फूर्तिरूपत्वमेतस्य बिम्बवद्‌भासनं विदुः ॥ ३३ ॥
हें लक्षण चिदाभासास बरोबर लागू पडते. चिदाभास ससंग आणि विकारी असल्यामुळ बिंब जें ब्रह्म त्याच्या लक्षणाचा एथें अभाव झाला आणि चिदाभास स्फुरणरूप असल्यामुळे ते त्यावें बिंबाप्रमाणें भासणे होय. ॥ ३३ ॥

न हि धीभावभावित्वादाभासोऽस्ति धियः पृथक् ।
इति चेदल्पमेवोक्तं धीरप्येवं स्वदेहतः ॥ ३४ ॥
येथवर चिदाभास अवश्य आहे इतकें सिद्ध झालें. आतां कोणी म्हणेल बुद्धीच्या कल्पनेवर त्याची कल्पना जर अवलंबून आहे तर बुद्धीपासून चिदाभास निराळा घेण्याचे कारण नाहीं; तर त्यास आम्ही असें म्हणतो कीं, इतक्यावरच कां थांबावे ? त्या दृष्टीने पाहिले असतां देहापासूनही बुद्धि निराळी नाहीं असें म्हणावें लागेल. ॥ ३४ ॥

देहे मृतेऽपि बुद्धिश्चेच्छास्त्रादस्ति तथा सति ।
बुद्धेरन्यश्चिदाभासः प्रवेशश्रुतिषु श्रुतः ॥ ३५ ॥
यावर प्रतिवाद्याचें उत्तर येवढेंच कीं, देह नष्ट झाला तरी बुद्धि मागें राहते असें शास्त्रांत प्रमाण आहे. तर त्यावर आमचेही तसेंच उत्तर आहे कीं, जसे त्याविषयीं शास्त्रांत प्रमाण आहे, तसें बुद्धीपासून चिदाभास निराळा आहे अशाविषयीही प्रवेश श्रुतीत प्रमाण आहे. ॥ ३५ ॥

धीयुक्तस्य प्रवेशश्चेन्नैतरेये धियः पृथक् ।
आत्मा प्रवेशं सङ्कल्प्य प्रविष्ट इति गीयते ॥ ३६ ॥
हा जो चिदाभासाचा प्रवेश श्रुतीमध्यें सांगितला आहे तो बुद्धिसहित प्रवेश अशी कोणी शंका घेण्याचे कारण नाहीं, कारण ऐतरेय श्रुतींत बुद्धीपासून निराळा असा जो आत्मा तो प्रवेश करता झाला असें स्पष्ट सांगितलें आहे ॥ ३६ ॥

कथं न्विदं साक्षदेहं मदृते स्यादितीरणात् ।
विदार्य मूर्ध्नः सीमानं प्रविष्टः संसरत्ययम् ॥ ३७ ॥
त्या प्रवेश श्रुतीचा अर्थ असा आहे कीं, देहेंद्रियांसहवर्तमान हें जडजात मजवांचून कसें टिकेल, असा विचार मनांत आणून हा जीवात्मा कपालत्रयाचा मध्यभाग चिरून आंत प्रविष्ट होऊन संसार करतो. ॥ ३७ ॥

कथं प्रविष्टोऽसङ्गश्चेत्सृष्टिर्वास्य कथं वद ।
मायिकत्वं तयोस्तुल्यं विनाशश्च समस्तयोः ॥ ३८ ॥
आतां परमात्मा असंग असून त्यानें प्रवेश कसा केला अशी कोणाची शंका असेल, तर त्यास आम्ही .असें विचारतो कीं, त्यानें सृष्टि तरी कशी केली ? त्यानें सृष्टि मायेचे योगाने केली, तर प्रवेश तसाच केलाअसें म्हणण्यास कोणती हरकत आहे? दोन्ही गोष्टीस मायिकत्व आणि नाश ही समानच आहेत ॥ ३८ ॥

समुप्त्यायैव भूतेभ्यस्तान्येवानुविनश्यति ।
विस्पष्टमिति मैत्रेय्यै याज्ञवल्क्य उवाच हि ॥ ३९ ॥
औपाधिक रूपाला नाश आहे एतद्विषयी श्रुतीमध्ये याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीस स्पष्ट सांगितलें आहे. तें असें कीं, परमात्मा या पंचभूतात्मक शरीरापासून निघून जाऊन त्याबरोबर नाश पावतो ॥ ३९ ॥

अविनाश्ययमात्मेति कूटस्थः प्रविवेचितः ।
मात्रासंसर्ग इत्येवमसङ्गत्वस्य कीर्तनात् ॥ ४० ॥
त्याप्रमाणेंच हा आत्मा अविनाशी आहे. त्याचा देहादिकाशी मुळींच संसर्ग नाहीं असें कूटस्थाचे वर्णन श्रुतीमध्ये केलें आहे ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *