सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २२१ ते २४०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
सार्थ पंचदशी सूची

असङ्गचिद्विभुर्जीवः सांख्योक्तस्तादृगीश्वरः ।
योगोक्तस्तत्त्वमोरर्थौ शुद्धौ ताविति चेच्छृणु ॥ २२१ ॥
असंग चिद्‌रूप आणि विभु असा सांख्यांनीं वर्णिलेला जीव आणि तसाच योगांत सांगितलेला ईश्वर हे दोन्हीही “तत्” आणि “त्वं” या दोन पदांचे जे तुम्ही अर्थ केले आहेत त्यापासून भिन्न नाहींत. मग त्यांस पूर्व पक्ष तरी कां म्हणावे असें जर कोणाचे म्हणणें असेल तर त्यावर आमचें असें उत्तर आहे कीं, ॥ २२१ ॥

न तत्त्वमोरुभावार्थावस्मत्सिद्धान्ततां गतौ ।
अद्वैतबोधनायैव सा कक्षा काचिदिष्यते ॥ २२२ ॥
त्यांनीं केलेले अर्थ आमच्या सिद्धांतापासून भिन्न आहेत. आतां आम्ही जे “तत्” आणि “त्वं” पदांचे अर्थ केले आहेत ते केवळ अद्वैताचा बोध व्हावा म्हणून. ॥ २२२ ॥

अनादिमायया भ्रान्ता जीवेशौ सुविलक्षणौ ।
मन्यन्ते तद्व्युदासाय केवलं शोधनं तयोः ॥ २२३ ॥
अनादि मायेने मोहित होऊन जीव आणि ईश हे निराळे आहेत असें लोक समजतात, ती समजूत काढून टाकण्याकरितां आम्हीं त्या दोन पदार्थांचे शोधन केलें आहे. ॥ २२३ ॥

अत एवात्र दृष्टान्तो योग्यः प्राक्सम्यगीरितः ।
घटाकाशमहाकाशजलाकाशाभ्रखात्मकः ॥ २२४ ॥
याकरितांच पूर्वी सांगितलेला, घटाकाश, महाकाश, जलाकाश व अभ्राकाश या चोहोंचा दृष्टांत येथें चांगला जुळतो. ॥ २२४ ॥

जलाभ्रोपाध्यधीने ते जलाकाशाभ्रखे तयोः ।
आधारौ तु घटाकाशमहाकाशौ सुनिर्मलौ ॥ २२५ ॥
यांत जलाकाश आणि अभ्राकाश ही दोन्ही जल आणि अभ्र या उपाधींवर अवलंबून आहेत. या उभय आकाशांना आधारभूत घटाकाश आणि महाकाश ही अत्यंत निर्मल आहेत. ॥ २२५ ॥

एवमानन्दविज्ञानमयौ मायाधियोर्वशौ ।
तदधिष्ठानकूटस्थब्रह्मणी तु सुनिर्मले ॥ २२६ ॥
त्याचप्रमाणें आनंदमय ईश आणिविज्ञानमय जीव हे उभयता क्रमेंकरून मायाआणि बुद्धि यांवर अवलंबून आहेत. आणि त्या दोहोंस अधिष्ठानभूत कूट आणि ब्रह्म हे अत्यंत निर्मल आहेत. ॥ २२६ ॥

एतत्कक्षोपयोगेन सांख्ययोगौ मतौ यदि ।
देहोऽन्नमयकक्षत्वादात्मत्वेनाभ्युपेयताम् ॥ २२७ ॥
एवढा तुम्हीउपयोग करून घेतला म्हणून तरी सांख्य व योग हे तुम्हाला मान्य आहेत कीं नाहींत असें जर कोणी पुसेल, तर आम्ही म्हणतों कीं सांख्य व योगच कां ? आम्ही अन्नमयकोशाचे वर्णन केल्याने देहात्मत्वसुद्धां स्वीकारलें असें होईल ॥ २२७ ॥

आत्मभेदो जगत्सत्यमीशोऽन्य इति चेत्त्रयम् ।
त्यज्यते तैस्तदा सांख्ययोगवेदान्तसंमतिः ॥ २२८ ॥
आत्मे निरनिराळे आहेत. जग सत्य आहे, आणि ईश्वर निराळा आहे. ह्या तीन गोष्टी जर वगळल्या, तर सांख्य, योग आणि वेदान्त ह्या तिहींची संमति होते. ॥ २२८ ॥

जीवासङ्गत्वमात्रेण कृतार्थ इति चेत्तदा ।
स्रक्चन्दनादिनित्यत्वमात्रेणापि कृतार्थता ॥ २२९ ॥
असंगत्वमात्रेंकरून जीव कृतार्थ आहे असें जर म्हणाल, स्रक्‌चंदनादि जे विषय आहेत त्यांच्या नित्यत्वेंकरूनही तो कृतार्थ होईल. ॥ २२९ ॥

यथा स्रगादिनित्यत्वं दुःसम्पाद्यं तथात्मनः ।
असङ्गत्वं न सम्भाव्यं जीवतोर्जगदीशयोः ॥ २३० ॥
परंतु स्रगादि विषयांचे नित्यत्व सिद्ध होणे अशक्य आहे, तसें जग आणि ईश हे प्रत्यक्ष असतांना जीवाचे असंगत्वही असंभाव्य आहे. ॥ २३० ॥

अवश्यं प्रकृतिः सङ्गं पुरेवापादयेत्तथा ।
नियच्छत्येतमीशोऽपि कोऽस्य मोक्षस्तथा सति ॥ २३१ ॥
जरी सांख्य ज्ञानाने तात्कालिक असंगता वाटली, तरी प्रकृतीच्या योगानें जीवास पुनः संग लागणारच. आणि पुनः त्याचें ईश्वर तर नियमन करतो; मग त्यास मोक्ष कोठून मिळणार ? ॥ २३१ ॥

अविवेककृतः सङ्गो नियमश्चेति चेत्तदा ।
बलादापतितो मायावादः सांख्यस्य दुर्मतेः ॥ २३२ ॥
जीवाचा संग आणि ईश्वराचे नियमन या दोहोंस कारण अविवेक आहे असें जर सांख्यवादी म्हणेल तर त्या कुबुद्धि सांख्यांच्या मतांत बळेंच मायावाद आला. ॥ २३२ ॥

बन्धमोक्षव्यवस्थार्थमात्मनानात्वमिष्यताम् ।
इति चेन्न यतो माया व्यवस्थापयितुं क्षमा ॥ २३३ ॥
आतां कोणी म्हणेल कीं, आत्मे जे निरनिराळे मानले ते केवळ बंधमोक्षाची व्यवस्था करण्याकरितां. तर त्यावर आमचे असें म्हणणे कीं, ती व्यवस्था करण्यास सांख्यशास्त्र कशाला पाहिजे ? एक आत्मा जरी मानला तरी ती व्यवस्था करण्यास माया समर्थ आहे. ॥ २३३ ॥

दुर्घटं घटयामीति विरुद्धं किं न पश्यसि ।
वास्तवौ बन्धमोक्षौ तु श्रुतिर्न सहतेतराम् ॥ २३४ ॥
दुर्घटाचीच मी घटना करते. असें विरुद्ध वाक्य तुम्ही पहात नाहीं काय ? एथें मोक्ष मायिक नव्हें असे समजू नये. बंधाप्रमाणेंच मोक्षालाही सत्यता देणे हें श्रुतीस अगदीं सहन होत नाहीं. ॥ २३४ ॥

न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः ।
न मुमुक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता ॥ २३५ ॥
नाश नाहीं, उत्पत्ति नाहीं, बद्ध नाहीं, साधक नाहीं, मुमुक्षु नाहीं आणि मुक्तही नाहीं हाच परमार्थ. ॥ २३५ ॥

मायाख्याया कामधेनोर्वत्सौ जीवेश्वरावुभौ ।
यथेच्छं पिबतां द्वैतं तत्त्वं त्वद्वैतमेव हि ॥ २३६ ॥
मायानामक कामधेनूचे जीव आणि ईश हे दोन वत्स आहेत. तिचे द्वैतरूप दुग्ध ते यथेच्छ प्राशन करोत बापडे. पण खरें तत्त्व जर म्हणाल तर अद्वैतच आहे. ॥ २३६ ॥

कूटस्थब्रह्मणोर्भेदो नाममात्रादृते न हि ।
घटाकाशमहाकाशौ वियुज्येते न हि क्वचित् ॥ २३७ ॥
कूटस्थ आणि ब्रह्म यांमधील भेद केवळ नांवाचा आहे, वस्तुतः भेदच नाहीं. जसें घटाकाश आणि महाकाश यांचा वियोग कधींच झालेला नाहीं, त्याप्रमाणें त्या दोहोंमध्यें वियोगच नाहीं. ॥ २३७ ॥

यदद्वैतं श्रुतं सृष्टेः प्राक्तदेवाद्य चोपरि ।
मुक्तावपि वृथा माया भ्रामयत्यखिलान् जनान् ॥ २३८ ॥
सृष्टीच्या पूर्वी जें अद्वैत होतें म्हणून श्रुतीत सांगितलें आहे तेंच आज आहे, आणि यानंतरही तेंच असणार; आणि तेंच मुक्तीनंतरही असणार. मायेनें सर्व लोकांस व्यर्थ भूमांत पाडलें आहे. ॥ २३८ ॥

ये वदन्तीत्थमेतेऽपि भ्राम्यन्तेऽविद्ययात्र किम् ।
न यथा पूर्वमेतेषामत्र भ्रान्तेरदर्शनात् ॥ २३९ ॥
प्रपंच खोटा आणि अद्वैत खरें असे जे बोलतात ते देखील संसार करतात, मग तुमचे ब्रह्मज्ञान घेऊन करावयाचें काय अशी शंका कोणी घेण्याचे कारण नाहीं. कारण, जरी त्यांनीं पूर्व कर्माच्या ओघानें संसार केला तरी त्यांस पूर्वीप्रमाणे भ्रांति नसते. ॥ २३९ ॥

ऐहिकामुष्मिकः सर्वः संसारो वास्तवस्ततः ।
न भाति नास्ति चाद्वैतमित्यज्ञानिविनिश्चयः ॥ २४० ॥
ऐहिक आणि पारलौकिक संसार खरा आहे, आणि अद्वैत भासत नाहीं इतकेच नव्हे तर तें मुळींच नाहीं असा अज्ञानी लोकांचा निश्चय असतो. ॥ २४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading