सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १४१ ते १६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

एवमादिषु शास्त्रेषु दोषाः सम्यक् प्रपञ्चिताः ।
विमृशन्ननिशं तानि कथं दुःखेषु मज्जति ॥ १४१ ॥
इत्यादि वाक्यांनीं शास्त्राचे ठायीं जे दोष सांगितले आहेत, त्यांचे नित्य मनन करीत असल्यावर मनुष्य कसा बरे दुखांत पडेल ? ॥ १४१ ॥

क्षुधया पीड्यमानोऽपि न विषं ह्यत्तुमिच्छति ।
मिष्टान्नध्वस्ततृड् जानन्नामूढस्तज्जिघत्सति ॥ १४२ ॥
मनुष्य क्षुधेने व्याकुळ झाला म्हणून विष खाईल काय ? मग मिष्टान्ने खाऊन ज्याची तृप्ति झाली आहे असा विवेकी पुरुष तें खाणार नाहीं हें सांगावयालाच नको. ॥ १४२ ॥

प्रारब्धकर्मप्राबल्याद्‌भोगेष्विच्छा भवेद्यदि ।
क्लिश्यनेव तदाप्येष भुङ्क्ते विष्टिगृहीतवत् ॥ १४३ ॥
प्रारब्ध कर्माच्या बलाने ज्ञान्यास भोगेच्छा होणार नाहीं असेही नाहीं. परंतु जरी कदाचित् झाली तरी वेठीस, धरलेल्या मनुष्याप्रमाणे तो त्या विषयांचा जुलमानें भोग घेतो. ॥ १४३ ॥

भुञ्जाना वा अपि बुधाः श्रद्धावन्तः कुटुम्बिनः ।
नाद्यापि कर्म न श्छिन्नमिति क्लिश्यन्ति सन्ततम् ॥ १४४ ॥
हे लोकांत नेहमी आढळते कीं, जे संसारी असून श्रद्धवान मुमुक्षू आहेंत ते “आमच्या कर्माचा क्षय केव्हा होईल” या चिंतेंतच नेहमी असतात. ॥ १४४ ॥

नायं क्लेशोऽत्र संसारतापः किन्तु विरक्तता ।
भ्रान्तिज्ञाननिदानो हि तापः सांसारिकः स्मृतः ॥ १४५ ॥
चिंतेत असतात असें म्हटलें येवढ्यावरून ते प्रपंचाची चिंता करितात असें समजू नये. “तर हा संसार माझा जाईल” अशी चिंता ते करतात. ही चिंता वैराग्यच ह्यटलें पाहिजे. कारण, संसारिक चिंता अज्ञानापासून उत्पन्न होते, परंतु या वैराग्यरूप चिंतेस ज्ञानच कारण आहे, ॥ १४५ ॥

विवेकेन परिक्लिश्यन्नल्पभोगेन तृप्यति ।
अन्यथानन्तभोगेऽपि नैव तृप्यति कर्हिचित् ॥ १४६ ॥
विवेकास्तव ज्याच्या मनांत क्लेश उत्पन्न झाला, तो केवळ जरूरीपुरता विषयोपभोग करून तृप्त होतो. परंतु विवेक नसेल, तर अनंत भोगांनींही मनुष्याची तृप्ति होत नाहीं. ॥ १४६ ॥

न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एव अभिवर्धते ॥ १४७ ॥
इच्छेची तृप्ति विषयोपभोगानें कधींही होणार नाहीं. तूप तेल घातल्यानें अग्नि कधीं तरी शांत होईल काय ? ॥ १४७ ॥

परिज्ञायोपभुक्तो हि भोगो भवति तुष्टये ।
विज्ञाय सेवितश्चौरो मैत्रीमेति न चौरताम् ॥ १४८ ॥
विषयाचा दोष जाणून त्याचे सेवन केलें असतां थोडक्यांतच तृप्ति होते; यास उदाहरण. अमुक मनुष्य चोर आहे असें समजून त्याची संगत केली असतां तो बाधक न होतां उलटा तो मित्रच होतो. ॥ १४८ ॥

मनसो निगृहीतस्य लीलाभोगोऽल्पकोऽपि यः ।
तमेवालब्धविस्तारं क्लिष्टत्वाद्‌बहु मन्यते ॥ १४९ ॥
योगाभ्यासेंकरून वश केलेल्या मनाला जरी अल्पभोग मिळाला तरी त्यांत क्लेश असल्यामुळें तोच पुष्कळ असा मानतो. ॥ १४९ ॥

बद्धमुक्तो महीपालो ग्राममात्रेण तुष्यति ।
परैर्न बद्धो नाक्रान्तो न राष्ट्रं बहु मन्यते ॥ १५० ॥
यास दृष्टांत. शत्रूंनीं एकाद्या राजाचा देश सर्व हिरावून घेऊन त्यास कांहीं दिवस कैदेत घालून नंतर त्याला मोकळा करून एक लहानसें खेडे जरी दिलें तरी त्यानें त्याची वृसि होते. परंतु परचक्राचा हल्ला ज्याला मुळींच माहीत नाहीं, त्याला राष्ट्रांची राष्ट्रे जरी मिळाली तरी तीं थोडीच. ॥ १५० ॥

विवेके जाग्रति सति दोषदर्शनलक्षणे ।
कथमारब्धकर्मापि भोगेच्छां जनयिष्यति ॥ १५१ ॥
दोषदर्शनरूप विवेक जागृत असून प्रारब्ध कर्मापासून भोगेच्छा उत्पन्न होते हें कसें ? अशी शंका कोणी घेऊं नये. कारण, ॥ १५१ ॥

नैष दोषो यतोऽनेकविधं प्रारब्धमीक्ष्यते ।
इच्छानिच्छा परेच्छा च प्रारब्धं त्रिविधं स्मृतम् ॥ १५२ ॥
प्रारब्ध कांहीं एकच प्रकारचे नाहीं. इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध असे याचे तीन प्रकार आहेत ॥ १५२ ॥

अपथ्यसेविनश्चौरा राजदाररता अपि ।
जानन्त एव स्वानर्थमिच्छन्त्यारब्धकर्मतः ॥ १५३ ॥
अपथ्य सेवन करणारा रोगी, चोरी करणारा मनुष्य आणि राजपत्‍नीचेठायीं रत असलेला जार, यांना आपणावर येणारा अनर्थ समजला असूनही प्रारब्ध कर्मामुळे दुष्कर्माची इच्छा होते. ॥ १५३ ॥

न चात्रैतद्वारयितुमीश्वरेणापि शक्यते ।
यत ईश्वर एवाह गीतायामर्जुनं प्रति ॥ १५४ ॥
हें प्रारब्ध कर्म निवारण करण ईश्वराचे देखील हाती नाहीं. कारण, गीतेमध्ये ईश्वरानेंच प्रत्यक्ष अर्जुनाला असें सांगितलें आहे कीं, ॥ १५४ ॥

सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ १५५ ॥
मनुष्य ज्ञानी जरी असला तरी आपल्या प्रकृतीस ( प्रारब्ध कर्मास) अनुसरून त्याच्या सर्व चेष्टा घडतात. सर्व जीवांची अशीच स्थिति आहे. मग अर्जुना, प्रारब्ध कर्मापुढें निग्रहाचे बळ कितीसें चालतें ? ॥ १५५ ॥

अवश्यं भाविभावानां प्रतीकारो भवेद्यदि ।
तदा दुःखैर्न लिप्येरन् नलरामयुधिष्ठिराः ॥ १५६ ॥
अवश्य होणार्‍या गोष्टीचें जर एकाद्या उपायानें निवारण करितां आले असतें तर मग, राम, युधिष्ठिर इत्यादिक महापुरुष इतकें दुःख कां भोगते ? तस्मात् प्रारब्धकर्म कोणासही चुकलें नाहीं. ॥ १५६ ॥

न चेश्वरत्वमीशस्य हीयते तावता यतः ।
अवश्यं भाविताप्ऽप्येषामीश्वरेणैव निर्मिता ॥ १५७ ॥
एवढ्यावरून म्हणजे ईश्वराचें सर्व ईश्वरत्व नष्ट होतें असें कोणी समजू नये. कारण की, प्रारब्ध कर्माचा नियमही ईश्वरानेंच निर्माण केला आहे. ॥ १५७ ॥

प्रश्नोत्तराभ्यामेवैतद्‌गम्यतेऽर्जुनकृष्णयोः ।
अनिच्छापूर्वकं चास्ति प्रारब्धमिति तच्छृणु ॥ १५८ ॥
हें इच्छारूपी प्रारब्ध कर्म झाले. आतां पुढे अनिच्छा प्रारब्ध सांगतो. तेंही कृष्णार्जुनाच्या संवादावरून स्पष्ट दिसून येतें. ॥ १५८ ॥

अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ १५९ ॥
हा मनुष्य जो आपल्या इच्छेविरुद्ध जुलमानें पापाचरण करतो तो कोणाच्या प्रेरणेने ? ॥ १५९ ॥

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्‌भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ १६० ॥
अशा अर्नुनाच्या प्रश्नावर भगवान म्हणतात. रजोगुणापासून उत्पन्न होणारा काम आणि त्याचा परिणाम जो क्रोध हे महाभक्षक, महापापी व मोठे वैरी आहेत असें समज. ॥ १६० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *