सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

मेघांशरूपमुदकं तुषाराकारसंस्थितम् ।
तत्र स्वप्रतिबिम्बोऽयं नीरत्वादनुमीयते ॥ २१ ॥
हे जे आकाशाचे चार प्रकार सांगितले त्यापैकी पहिले तीन तर स्पष्ट समजण्याजोगे आहेत. परंतु चवथे जें अभ्राकाश तें कसें समजावे ? कारण, जेथे मुळीं पाण्याचेच ज्ञान होण्याची पंचाईत, तेथें त्यांतील प्रतिबिंब कोठनू समजणार ? असें कोणी म्हणेल तर त्याविषयीची समजूत अशी – मेघ ही केवळ वाफ असल्यामुळें त्याचे घटकावयव उदकतुषारच आहेत. उदक म्हटलें म्हणजे त्यांत प्रतिबिंब पडलेंच पाहिजे. या नियमावरून पूर्वोक्त जें मेघप्रतिबिंबित आकाश, ज्यास आधीं अभ्राकाश असें नांव दिले, तें जरी स्पष्ट दिसले नाहीं, तरी तें तेथें आहे असें अनुमान होतें. ॥ २१ ॥

अधिष्ठानतया देहद्वयावच्छिन्नचेतनः ।
कूटवन्निर्विकारेण स्थितः कूटस्थ- उच्यते ॥ २२ ॥
याप्रमाणें दृष्टांतभूत आकाशाचे चार प्रकार सांगितले. तसेच, आतां चैतन्याचेही चार प्रकार स्पष्ट करून सांगतो. पंचीकृत स्थूल आणि अपंचीकृत सूक्ष्म अशा दोन शरीरांना आधारभूत असून ओतप्रो-त आत-बाहेर व्यापनू असणारा जो आत्मा त्यास कूटस्थ असें म्हणतात. यास कूटस्थ म्हणण्याचें कारण कूट म्हणजे पर्वताचे शिखर तें असें वादळादिकांच्या झपाट्याखालीं कांहीं विकार न पावतां जशाचे तसेंच रहातें, तसा आत्माही निर्विकार असतो. ॥ २२ ॥

कूटस्थे कल्पिता बुद्धिस्तत्र चित् प्रतिबिम्बकः ।
प्राणानां धारणाज्जीवः संसारेण स युज्यते ॥ २३ ॥
कूटस्थाचे ठायी कल्पित अशी जी बुद्धि तीत पडलेले जें चैतन्याचें प्रतिबिंब तोच जीव. हा प्राण धारण करतो म्हणून याला जीव हे नांव दिलें. या जीवालाच संसार आहे; कूटस्थाला नाही. ॥ २३ ॥

जलव्योम्ना घटाकाशोयथा सर्वस्तिरोहितः ।
तथा जीवेन कूटस्थः सोऽन्योऽन्याध्यास उच्यते ॥ २४ ॥
वरील दृष्टांतांत जे जलाकाश सांगितलें, त्यानें जसें खरें घटाकाश झाकून टाकले, त्याप्रमाणें येथेही जीवाने कूटस्थाला अगदीं झाकून टाकल्यामुळे खरा कूटस्थ प्रत्ययास येत नाहीं. हें जें जीवाचे ‘ नसून भासणे,’ आणि कूटस्थाचे ‘असून न दिसणे,’ यासच भाष्यकारादिक अन्योन्यध्यास असें म्हणतात. ॥ २४ ॥

अयं जीवो न कूटस्थं विविनक्ति कदाचन ।
अनादिरविवेकोऽयं मूलाविद्येति गम्यताम् ॥ २५ ॥
ह्या जीवकूटस्थामधील भेद जीवास मुळींच समजत नाहीं. हा अविवेक आजकालचा नव्हे, तर अनादि आहे. याला मूलाविद्या म्हणतात. ॥ २५ ॥

विक्षेपावृतिरूपाभ्यां द्विधाविद्या प्रकल्पिता ।
न भाति नास्ति कूटस्थ इत्यापादनमावृतिः ॥ २६ ॥
या अविद्येची रूपे दोन – एक विक्षेप आणि दुसरें, आवृति (आवरण) कूटस्थ भासत नाहीं, व मुळींच तो नाहीं ह्या व्यवहारास जें हेतु तेंच आवरण समजावे. ॥ २६ ॥

अज्ञानी विदुषा पृष्टः कूटस्थं न प्रबुध्यते ।
न भाति नास्ति कूटस्थ इति बुद्ध्वा वदत्यपि ॥ २७ ॥
अविद्या व तिजपासून झालेलें आवरण या दोहींचाही अनुभव लोकांत आहे, तो कसा म्हणाल, तर त्यास उदाहरण – एका अज्ञानी मनुष्यास एका विद्वानानें विचारले कीं, कूटस्थ तूं जाणतोस काय ? याजवर तो असें उत्तर देईल कीं, ”मला कूटस्थ ठाऊक नाहीं,” हा त्याचा अविद्यानुभव झाला, व जेव्हां तो असें उत्तर देतो कीं, “कूटस्थ मला दिसतं नाहीं, व तो नाहीं,” हा त्याचा आवरणानुभव झाला. ॥ २७ ॥

स्वप्रकाशे कुतोऽविद्या तां विना कथमावृतिः ।
इत्यादितर्कजालानि स्वानुभूतिर्ग्रसत्यसौ ॥ २८ ॥
आत्मा स्वप्रकाश असून त्याचे ठायीं अविद्या कशी आली ? कारण, प्रकाश आणि अंधकार यांचा एकत्र वास कसा संभवेल ! बरें, अविद्या नाहीं म्हटले तर मग तिने केलेले आवरण तरी कोठून येणार ? तें नाहीं तर विक्षेपही नाहीं, तेव्हां अर्थातच ज्ञान व्यर्थ झालें, व त्यामुळें तत्प्रतिपादक सर्व शास्त्रही निष्फळ, असे जे प्रतिपक्ष्यांचे नानातर्‍हेचे तर्क ते सर्व एका स्वानुभवानें नाहींसे होतात. ॥ २८ ॥

स्वानुभूतावविश्वासे तर्कस्याप्यनवस्थिते ।
कथं वा तार्किकमन्यस्तत्त्वनिश्चयमाप्नुयात् ॥ २९ ॥
आतां अनुभवावरही आमचा विश्वास नाहीं, असें कोणी म्हणेल, तर मग तर्काला आधारच राहिला नाहीं. तार्किक म्हणविणारास अनुभवावांचून तत्त्वनिश्चय तरी कसा व्हावा ? ॥ २९ ॥

बुद्ध्यारोहाय तर्कश्चेदपेक्षेत तथा सति ।
स्वानुभूतियनुसारेण तर्क्यतां मा कुतर्क्यताम् ॥ ३० ॥
तर्कावांचून समजूत पडत नाही, असें जर कोणी म्हणत असेल, तर अवश्य तर्काचे साहाय्य घ्यावें; परंतु जो तर्क करणें तो अनुभवास अनुसरूनच करावा. व्यर्थ कुतर्क कधीही करूं नये. ॥ ३० ॥

स्वानुभूतिरविद्यायामावृतौ च प्रदर्शिता ।
अतः कूटस्थचैतन्यमविरोधीति तर्क्यताम् ॥ ३१ ॥
आतां येथें तो अनुभव कोणता म्हणाल तर अविद्या आणि आवरण याविषयींचा वर सांगितलाच आहे; म्हणून कूटस्थ आणि अविद्या यांत विरोध नाहीं, असें म्हणण्यास कोणती हरकत आहे ? ॥ ३१ ॥

तच्चेद्विरोधि केनएयमावृतिर्ह्यनुभूयताम् ।
विवेकस्तु विरोधीस्यात्तत्त्वज्ञानिनि दृश्यताम् ॥ ३२ ॥
कारण, तसा जर विरोध असता, तर या आवरणाचा अनुभव कोणाला आला असता ? एवढ्यावरून या अविद्येस विरोधी कोणी नाहीं, असें मात्र समजू नये. हिला विवेकजन्य ज्ञानच विरोधी आहे. या गोष्टीचा अनुभव तत्त्वज्ञान्याच्याठायी पहावा. ॥ ३२ ॥

अविद्यावृतकूटस्थे देहद्वययुता चितिः ।
शुक्तौ रूप्यवदध्यस्ता विक्षेपाध्यास एव हि ॥ ३३ ॥
अविद्येने वेष्टिलेल्या कूटस्थावर, स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांनी युक्त असा चिदाभास शिंपीवरील रुप्याप्रमाणें केवळ भ्रमाने दिसतो. यालाच विक्षेपाध्यास म्हणतात. ॥ ३३ ॥

इदमंशस्य सत्यत्वं शुक्तिगं रूप्य ईक्ष्यते ।
स्वयन्त्वं वस्तुता चैवं विक्षेपे वीक्ष्यतेऽन्यगम् ॥ ३४ ॥
आरोपित रजतावर ज्याप्रमाणें शुक्तीचा ‘ इदं’ अंश आणि सत्यत्व दिसून येतें, त्याप्रमाणें आरोपित चिदाभासावर कूटस्थाचेठायी असणारी स्वयंत्व आणि वस्तुत्व ही दोन दिसून येतात. ॥ ३४ ॥

नीलपृष्ठत्रिकोणत्वं यथा शुक्तौ तिरोहितम् ।
असङ्गानन्दताद्येवं कूटस्थेऽपि तिरोहितम् ॥ ३५ ॥
शिंपीची निळी पाठ आणि त्रिकोण आकृति ही जशी शिंपीच्याठायी आच्छादित असतात, त्याप्रमाणें कूटस्थाचे असंगत्व आणि आनंदरूपता हे गुण त्याचेठायी झाकले जातात. ॥ ३५ ॥

आरोपितस्य दृष्टान्ते रूप्यं नाम यथा तथा ।
कूटस्थाध्यस्तविक्षेपनामाहमिति निश्चयः ॥ ३६ ॥
तसेंच ज्याप्रमाणें दृष्टांतामध्ये आरोपितास ‘रुपे’ हें नांव पडलें, त्याप्रमाणें कूटस्थाचेठायीं अध्यस्त जो विक्षेपरूप चिदाभास त्याला ‘ अहं’ असें नांव पडलें. ॥ ३६ ॥

इदमंशं स्वतः पश्यन् रूप्यमित्यभिमन्यते ।
तथा स्वं च स्वतः पश्यन्नहमित्यभिमन्यते ॥ ३७ ॥
दृष्टांतामध्यें शुक्तिशकल प्रत्यक्ष पहात असून त्याला मनुष्य रुपें असें म्हणतो. त्याचप्रमाणे दार्ष्टांतिकामध्ये स्वतःला पहात असून तो मी मी असे म्हणतो. ॥ ३७ ॥

इदंत्वरूप्यते भिन्ने स्वत्वाहन्ते तथेक्ष्यताम् ।
सामान्यं च विशेषश्चेत्युभयत्रापि गम्यते ॥ ३८ ॥
दृष्टांतांत इदंता आणि रूप्यता या जशा दोन्ही एकमेकांपासून भिन्न आहेत, त्याप्रमाणें दार्ष्टांतिकांतही स्वयंता आणि अहंता ह्या दोन्ही भिन्न आहेत. एक सामान्य आणि दुसरें विशेष हाच दोहोंमधील भेद. ॥ ३८ ॥

देवदत्तः स्वयं गच्छेत्त्वं वीक्षस्व स्वयं तथा ।
अहं स्वयं न शक्नोमीत्येवं लौके प्रयुज्यते ॥ ३९ ॥
स्वयं शब्दास सामान्यत्व आहे. यास उदाहरण – तो देवदत्त स्वतः जातो, तूं स्वतः पहातोस; आणि मी स्वतः करूं शकत नाहीं. असा लोकांमध्ये बोलण्याचा परिपाठ आहे. ॥ ३९ ॥

इदं रूप्यमिदं वस्त्रमिति यद्वदिदं तथा ।
असौ त्वमहमित्येषु स्वयमित्यभिमन्यते ॥ ४० ॥
हें रुपें, हें वस्त्र ह्यांमध्यें “इदं” जसे सामान्य आहे तसें हा मी, हा तूं, या दोनही पुरुषांमध्ये स्वयं हें सामान्य आहे. ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *