सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति पूरुषः ।
किमिच्छन्कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत् ॥ १ ॥
या श्रुतीचा अर्थ – हा आत्मा मी आहें असे आत्मज्ञान जीवास होईल तर इच्छेला विषय आणि इच्छेचे प्रयोजन ही दोन्हीही न राहिल्यामुळें तो शरीरास झालेलीं दुःखें आत्म्यास कधीही लावणार नाहीं. ॥ १ ॥

अस्याः श्रुतेरभिप्रायः सम्यगत्र विचार्यते ।
जीवन्मुक्तस्य या तृप्तिः सा तेन विशदायते ॥ २ ॥
या प्रकरणांत वरील श्रुतीच्या अभिप्रायाविषयीं आम्ही चांगल्या रीतीनें विचार करणार. त्यावरून जीवन्मुक्ताची जी तृप्ति श्रुतीमध्ये सांगितली आहे, तिचें स्वरूप स्पष्टपणे ध्यानांत येईल. ॥ २ ॥

मायाभासेन जीवेशौ करोतीति श्रुतत्वतः ।
कल्पितावेव जीवेशौ ताभ्यां सर्वं प्रकल्पितम् ॥ ३ ॥
आता वरील श्रुतींतील पुरुष या शब्दाचा अर्थ करूं. परंतु त्यास उपोद्धातादाखल ही दृष्टि कशी झाली हें पूर्वीं थोडक्यांत सांगितलें पाहिजे. मायेनें प्रतिबिंबेंकरून जीव आणि ईश या दोघांस प्रथम उत्पन्न केलें आणि त्या दोघांनी बाकी सर्व दृष्टि कल्पिली आहे. यांत माया शब्दाचा अर्थ चिदानन्दमय ब्रह्मप्रतिबिंबेंकरून युक्त जी त्रिगुणात्मक जगास उपादानभूत मूलप्रकृति ती असें समजावे. ॥ ३ ॥

ईक्षणादिप्रवेशान्ता सृष्टिरीशेन कल्पिता ।
जाग्रदादिविमोक्षान्तः संसारो जीवकल्पितः ॥ ४ ॥
जिच्या प्रारंभी ईक्षण आणि अंतीं प्रवेश अशी जी दृष्टि ती ईश्वराने कल्पिली. आणि ज्याच्या आरंभीं जागृति आणि अंतीं मोक्ष असा जो संसार तो जीवानें कल्पिलेला आहे. ॥ ४ ॥

भ्रमाधिष्ठानभूतात्मा कूटस्थासङ्गचिद्वपुः ।
अन्योन्याध्यासतोऽसङ्गधीस्थजीवोऽत्र पूरुषः ॥ ५ ॥
भ्रमाला अधिष्ठानभूत असंगचैतन्यरूपी जो कूटस्थ आत्मा तो अन्योन्याध्यासामुळें बुद्धीच्याठायीं प्रतिबिंबित झाला तोच जीव असें मागील प्रकरणीं सांगितलें आहे. तोच या श्रुतींतील पुरुष सभजावा ॥ ५ ॥

साधिष्ठानो विमोक्षादौ जीवोऽधिक्रियते न तु ।
केवलो निरधिष्ठानविभ्रान्तेः क्वाप्यसिद्धितः ॥ ६ ॥
मोक्ष स्वर्गादिकांच्या साधनाला नुसता प्रतिबिंबरूप जीवच अधिकारी होत नाही म्हणून अधिष्ठान जो कूटस्थ त्यासहितच तो घेतला पाहिजे. कारण, जीव हो कूटस्थावर केवळ भ्रांतिकल्पित आहे. आणि भ्रांतीची अधिष्ठानावांचून सिद्धताच होत नाहीं ॥ ६ ॥

अधिष्ठानांशसंयुक्तं भ्रमांशमवलम्बते ।
यदा तदाहं संसारीत्येवं जीवोऽतिमन्यते ॥ ७ ॥
जेव्हां भ्रम होतो तेव्हां एक अधिष्ठानाचा अंश आणि एक भ्रमाचा अंश असा दोहींचा संयोग तेथे असतो. जसे शिंपीवर भासते; यांत शिपीचा अंश आणि आरोपित रुप्याचा अंश हे दोन्ही असतात. त्याप्रमाणेच जीवाची स्थिति आहे. जेव्हां अधिष्ठानकूटस्थासहित भ्रमांश जो चिदाभास याचे अवलंबन जीव करतो; म्हणजे तेंच मी असें म्हणतो, तेव्हां मी संसारी असा अभिमान जीवास होतो. ॥ ७ ॥

भ्रमांशस्य तिरस्कारादधिष्ठानप्रधानता ।
यदा तदा चिदात्माहमसङ्गोऽस्मीति बुद्ध्यते ॥ ८ ॥
आणि जेव्हां भ्रमांश जो चिदाभास त्याचा तिरस्कार करून, म्हणजे मिथ्यात्वबुद्धीनें अनादर करून, केवळ अधिष्ठानालाच अवलंबून असतो तेव्हां मी चैतन्यरूपी असंगात्मा आहे. असें त्यास समजते ॥ ८ ॥

नासङ्गेऽहंकृतिर्युक्ता कथमस्मीति चेच्छृणु ।
एको मुख्यो द्वावमुख्यावित्यर्थस्त्रिविधोऽहमः ॥ ९ ॥
असंगाचे ठायीं अहंकार संभवत नाही. असें असून “मी असंग आहें” असें तो कसें समजतो ? असें जर कोणी म्हणेल तर अहंकाराचे तीन प्रकार आहेत, त्यांपैकीं एक मुख्य आहे, आणि दोन अमुख्य म्हणजे लाक्षणिक आहेत. ॥ ९ ॥

अन्योन्याध्यासरूपेण कूटस्थाभासयोर्वपुः ।
एकीभूय भवेन्मुख्यस्तत्र मूढैः प्रपूज्यते ॥ १० ॥
कूटस्थ आणि चिदाभास या दोहोंचें ऐक्य करून, म्हणजे भेद न समजून, अन्योन्याध्यासरूपानें अज्ञानी लोक ज्या अहं शब्दाचा प्रयोग करतात, तो अहं शब्द मुख्य असें समजावे. ॥ १० ॥

पृथगाभासकूटस्थावमुख्यौ तत्र तत्त्ववित् ।
पर्यायेण प्रयुङ्क्तेऽहंशब्दं लोके च वैदिके ॥ ११ ॥
आणि कूटस्थ व चिदाभास या दोहोंचा भेद ओळखून तत्त्ववेत्ता लौकिक व वैदिक व्यवहारांत अनुक्रमाने मी मी असे म्हणतो तेव्हां त्या प्रत्येक मी शब्दाचा अर्थ अमूख्य म्हणजे लाक्षणिक समजावा. ॥ ११ ॥

लौकिकव्यवहारेऽहं गच्छामीत्यादिके बुधः ।
विविच्यैव चिदाभासं कूटस्थात्तं विवक्षति ॥ १२ ॥
लौकिक व्यवहारांत “मी जातो” “मी करितो” असे जेव्हां हा तत्त्ववेत्ता म्हणतो तेव्हां कूटस्थापासून निराळा जो चिदाभास त्याला उद्देशून म्हणतो. ॥ १२ ॥

असङ्गोऽहं चिदात्माहमिति शास्त्रीयदृष्टितः ।
अहंशब्दं प्रयुङ्क्तेयं कूटस्थे केवले बुधः ॥ १३ ॥
तसेंच शास्त्रीयदृष्टीनें “मी असंग आहें” “मी चिद्‌रूप आहे” असे जेव्हां तो बोलतो तेव्हां कूटस्थालाच ठेवून तो बोलतो. ॥ १३ ॥

ज्ञानिताज्ञानिते त्वात्माभासस्यैव न चात्मनः ।
तथा च कथमाभासः कूटस्थोऽस्मीति बुद्ध्यताम् ॥ १४ ॥
येथें असा एक आक्षेप निघण्याजोगा आहे कीं, “मी असंग आहे” असें जें ज्ञान झालें, तें कूटस्थास की चिदाभासास ? कूटस्थास म्हणावें तर तो असंग चिद्‌रूप असल्यामुळे जाणते नेणतेपणा त्यास संभवत नाहीं; म्हणून तें चिदाभासालाच झालें पाहिजे. बरे तसे जर म्हणावें तर “मी कूटस्थ” असें ज्ञान चिदाभासास तरी कसें होईल ? ॥ १४ ॥

नायं दोषश्चिदाभासः कूटस्थैकस्वभाववान् ।
आभासत्वस्य मिथ्यात्वात्कूटस्थत्वावशेषणात् ॥ १५ ॥
तर यावर आमचें उत्तर. असें आहे की, चिदाभास हा दूरस्थाहून निराळी एक वस्तू आहे असें मुळींच नाहीं; तो कूटस्थाचें प्रतिबिंब असल्यामुळें म्हण्याचाच स्वभाव. त्याला आला आहे. आतां आभास हा मिश्याच आहे. तेव्हां बाकी राहिलेला कटूस्थ हा माल खरा म्हणून वरील शंका संभवत नाहीं. ॥ १५ ॥

कूटस्थोऽस्मीति बोधोऽपि मिथ्या चेन्नेति को वदेत् ।
न हि सत्यतयाभीष्टं रज्जुसर्पविसर्पणम् ॥ १६ ॥
तुमचा चिदाभास खोटा झाल्यानंतर “कूटस्थ मी आहे” असें जें त्याचें ज्ञान तेही खोटेच, असे जर कोणी म्हणेल तर आम्ही नाही कुठे म्हणतो ? रज्जुसर्प जर खोटा आहे तर त्याचे सर्पटणेंहि खोटेंच म्हटलें पाहिजे. ॥ १६ ॥

तादृशेनापि बोधेन संसारो विनिवर्तते ।
यक्षानुरूपो हि बलिरित्याहुर्लौकिका जनाः ॥ १७ ॥
परंतु अशा खोट्या ज्ञानाने संसारनिवृत्ति होत नाहीं असें मात्र समजूं नये. कारण जसें ज्ञान मिथ्या आहे तसा संसारही मिथ्याच आहे. जसा यक्ष तसा वली अशी जी लोकांत म्हण आहे तिचा भावार्थ असा की, पोर रडूं लागलें म्हणजे “बागुलबाबाचे स्वाधीन तुला करितो” असें त्यास भय घालतात. तेथे बागुलबाबा, आणि त्याचे स्वाधीन करणे, या दोन्ही गोष्टी जरी खोट्या झाल्या तरी त्यापासून मुलाचे रडणें बंद होते. ॥ १७ ॥

तस्मादाभासपुरुषः सकूटस्थो विविच्य तम् ।
कूटस्थोऽस्मीति विज्ञातुमर्हतीत्यभ्यधात् श्रुतिः ॥ १८ ॥
याकरिता चिदाभासाचें स्वरूप कूटस्थच असल्यामुळें पुरुष शब्दवाच्य कूटस्थासहित जो चिदाभास तो, त्या कूटस्थास आपणापासून निराळा करून “मीं कूटस्थ आहे” असें समजण्यास तो योग्य होतो. अशा अभिप्रायाने श्रुतीने “अस्मि” या शब्दाचा उपयोग केला. ॥ १८ ॥

असंदिग्ध अविपर्यस्त बोधो देह आत्मनीक्ष्यते ।
तद्वदत्रेति निर्णेतुमयमित्यभिधीयते ॥ १९ ॥
याप्रमाणें श्रुतींतील “पुरुष” आणि “अस्मि” या दोन पदांचा अभिप्राय सांगितला. आतां “अयं” शब्दाचा अर्थ सांगतो. जसें साधारण लोकांत “हा देह मी आहें” असें देहरूप आत्म्याविषयीं निःसंशय ज्ञान असतें, तसेंच ज्ञान आत्म्याविषयींही असावें, असा निर्णय करण्याकरितां “अयं” या सर्वनामाचा प्रयोग श्रुतीनें केला. ॥ १९ ॥

देहात्मज्ञानवज्ज्ञानं देहात्मज्ञानबाधकम् ।
आत्मन्येव भवेद्यस्य स नेच्छन्नपि मुच्यते ॥ २० ॥
वर ज्या प्रकारचें ज्ञान सांगितले तेंच मुक्तीला साधन आहे एतद्विषयीं आचार्यांचे पुढील वाक्य प्रमाण आहे. ( देहात्मज्ञानवज्ज्ञानं) याचा अर्थ असा कीं, “मी मनुष्य” असें साधारण लोकांस जसें दृढ ज्ञान आहे, तसे प्रत्यगात्म्याविशयीं “मी ब्रह्म आहें” असें ज्ञान ज्या पुरुषास झाले त्याला मोक्ष नको म्हटला तरी सुटत नाही. ॥ २० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *