सार्थ पंचदशी मराठी एकादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे योगानंदः श्लोक ४१ ते ६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

तर्हि साधनजन्यत्वात्सुखं वैषयिकं भवेत् ।
भवत्येवात्र निद्रायाः पूर्वं शय्यासनादिजम् ॥ ४१ ॥

निद्रायां तु सुखं यत्तज्जन्यते केन हेतुना ।
सुखाभिमुखधीरादौ पश्चान्मज्जेत्परे सुखे ॥ ४२ ॥
जाग्रद्‌व्यापृतिभिः श्रान्तो विश्रम्याथ विरोधिनि ।
अपनीते स्वस्थचितोऽनुभवेद्विषये सुखम् ॥ ४३ ॥
आत्माभिमुखधीवृत्तौ स्वानन्दः प्रतिबिम्बति ।
अनुभूयैनमत्रापि त्रिपुट्या श्रान्तिमाप्नुयात् ॥ ४४ ॥

तत्छ्रमस्यापनुत्यर्थं जीवो धावेत्परात्मनि ।
तेनैक्यं प्राप्य तत्रत्यो ब्रह्मानन्दः स्वयं भवेत् ॥ ४५ ॥
दृष्टान्ताः शकुनिः श्येनः कुमारश्च महानृपः ।
महाब्राह्मण इत्येते सुप्त्यानन्दे श्रुतीरिताः ॥ ४६ ॥
शकुनिः सूत्रबद्धः सन् दिक्षु व्यापृत्य विश्रमम् ।
अलब्ध्वा बन्धनस्थानं हस्तस्तम्भाद्युपाश्रयेत् ॥ ४७ ॥

जीवोपाधिर्मनस्तद्वद्‌धर्माधर्मफलाप्तये ।
स्वप्ने जाग्रति च भ्रान्त्वा क्षीणे कर्मणि लीयते ॥ ४८ ॥
श्येनो वेगेन नीडैकलम्पटः शयितुं व्रजेत् ।
जीवः सुप्त्यै तथा धावेद्‌ब्रह्मानन्दैकलम्पटः ॥ ४९ ॥
अतिबालः स्तनं पीत्वा मृदुशय्यागतो हसन् ।
रागद्वेषाद्यनुत्पत्तेरानन्दैकस्वभावभाक् ॥ ५० ॥

यावर दुसरी अशी एक शंका आहे कीं, ज्या, सुखास शय्यादिकांचे साधन लागतें तें आत्मसुख कसें होईल ? कारण, आत्ममुख स्वतःसिद्ध आहे. याकरिता तें सुख वैषयिकच असलें पाहिजे. तर आम्ही तरी नाहीं कुठे म्हणतो. श- म्यादि साधनापासूनहोणारे सुख वैषयिकच आहे. ॥ ४१ ॥
परंतु निद्रेमध्यें जें सुख आहे त्याला कोणच्याच साधनाची जरूर नाहीं. आधीं बुद्धीचें तोंड सुखाकडे, होऊन ती परममसुखात निमग्न होते. ॥ ४२ ॥
मनुष्य दिवसभर श्रम करून, दमून जेव्हा मृदु शय्येवर येऊन निजतो तेव्हां श्रमापासून झालेल्या दुःखाचे निवारण होऊन स्वस्थपणे शय्यादि विषयसुखाचा अनुभव घेतो. ॥ ४३ ॥
या विषयसुखाचा अनुभव घेण्यामध्ये देखील श्रमच आहेत. प्रण तो आधीं भासत नाहीं. मृदु शय्येवर निजल्यावर बुद्धि-वृत्ति अन्तर्मुख होऊन त्यामध्यें आत्मानंदाचें प्रतिबिंब पडतें. तोच विषयानंद एथेंही अनुभविता, अनुभाव्यआणि अनुभव अशी त्रिपुटी असल्यामुळें त्याला श्रमच होतो. ॥ ४४ ॥
तो श्रमही त्यास सहन न झाल्यामुळे त्याच्या निवारणार्थ जीव आत्मरूपाकडे धाव घेतो. मग त्याशीं ऐक्य पावून निद्रेमध्यें ब्रह्मानंदच होऊन राहतो. ॥ ४५ ॥
यानिद्रानंदास श्रुतीने पांच दृष्टांत दिले आहेत. एक शकुनीचा, दुसरा श्येनाचा, तिसरा बाळाचा; चवथा सार्वभौम राजाचा आणि पाचवा महाब्रामह्मण जे तत्त्ववेत्ते त्यांचा. ॥ ४६ ॥
शकुनि म्हणून एक पक्षी आहे त्याचे. पायास सूत्र बांधून त्याला उडावयास आकाशात सोडलें असता चोंहोकडे फिरून फिरून कोठेंही विश्रांतिस्थान न मिळाल्यामुळेच्या हाताने तें सूत्र धरले असेल त्या हातावर किंवा ज्या खांबास तें बांधले असेल त्या खांबावर पुनः येऊन विश्रांति घेतो. ॥ ४७ ॥
त्याप्रमाणें जीवोपाधिरूप मन पुण्य-पापाची फले जीं सुखदुःखे त्यांचा अनुभव घेण्याकरिता जाग्रतस्वप्नीं भ्रमण करून कर्मक्षय झाल्यावर आपलें उपादान जें अज्ञान त्यांत लीन होतें. ॥ ४८ ॥
ज्याप्रमाणें स्वेनपक्षी पुष्कळ उडून उडून दमला असतां त्याचें सर्व लक्ष आपल्या घरड्याकडे लागून त्यांत निजावयास तो जाऊ पाहतो, त्याप्रमाणें जीवही सर्व दिवसभर श्रम करून ब्रह्मानंदाविषयी उत्सुक होऊन निद्रेकडे धांव घेतो. ॥ ४९ ॥
अथवा ज्याप्रमाणें तान्हे मूल आईच्या आंगावर पिऊन मऊ हांतरुणावर हसत पडलेले असतें, तेव्हां रागद्वेषाची उत्पत्ति मनामध्ये अद्यापि झाली नसल्यामुळे तो केवळ आनंदाची मूर्तीच होऊन राहतो. ॥ ५० ॥

महाराजः सार्वभौमः संतृप्तः सर्वभोगतः ।
मानुषानन्दसीमानं प्राप्यानन्दैकमूर्तिभाक् ॥ ५१ ॥
महाविप्रो ब्रह्मवेदी कृतकृत्यत्वलक्षणाम् ।
विद्यानन्दस्य परमां काष्ठां प्राप्यावतिष्ठते ॥ ५२ ॥
मुग्धबुद्धातिबुद्धानां लोके सिद्धा सुखात्मता ।
उदाहृतानामन्ये तु दुःखिनो न सुखात्मकाः ॥ ५३ ॥
कुमारादिवदेवायं ब्रह्मानन्दैकतत्परः ।
स्त्रीपरिष्वक्तवद्वेद न बाह्यं नापि चान्तरम् ॥ ५४ ॥
बाह्यं रथ्यादिकं वृत्तं गृहकृत्यं यथान्तरम् ।
तथा जागरणं बाह्यं नाडीस्थः स्वप्न आन्तरः ॥ ५५ ॥

पितापि सुप्तावपितेत्यादौ जीवत्ववारणात् ।
सुप्तौ ब्रह्मैव नो जीवः संसारित्वासमीक्षणात् ॥ ५६ ॥
पितृत्वाद्यभिमानो यः सुखदुःखाकरः स हि ।
तस्मिन्नपगते तीर्णः सर्वान् शोकान भवत्ययम् ॥ ५७ ॥
सुषुप्तिकाले सकले विलीने तमसाऽऽवृतः ।
सुखरूपमुपैतीति ब्रूते ह्याथर्वणी श्रुतिः ॥ ५८ ॥
सुखमस्वाप्समत्राहं नैव किंचिदवेदिषम् ।
इति द्वे तु सुखाज्ञाने परामृशति चोत्थितः ॥ ५९ ॥
परामर्शोऽनुभूतेऽस्तीत्यासीदनुभवस्तदा ।
चिदात्मत्वत्स्वतो भाति सुखमज्ञानधीस्ततः ॥ ६० ॥

अथवा ज्याप्रमाणें सार्वभौम राजा आपणास सर्व विषयभोगाची प्राप्ति झाल्यामुळें तृप्त होऊन मानुषानंदाच्या शिखरी जाऊन मूर्तिमान आनंदच होऊन राहतो. ॥ ५१ ॥
किंवा ज्याप्रमाणें महाविप्र ब्रह्मवेत्ता विद्यानंदाची परम सीमा पावून कृतकृत्य होऊन स्वस्थ राहतो, त्याप्रमाणें सुषुप्तीचे ठायी जीवआनंदरूप होऊन राहतो. ॥ ५२ ॥
सुषुप्तीच्या आनंदाविषयीं अति बालादिक तिन्हींचा मात्र येथें इष्टांत देण्याचे कारण हेंच कीं, अज्ञान्यांमध्ये तान्हे मूल, प्रौढामध्यें सार्वभौम राजा, आणि विद्वानांमध्यें ब्रह्मवेत्ता इतके सुखी आहेत. बाकीच्या लोकांस सुख नाही. ॥ ५३ ॥
वरील दृष्टांतांत कुमारादिक जसे मूर्तिमान आनंदच आहेत त्याप्रमाणे हा जीवही ब्रह्मानंदैकतत्पर होऊन स्त्रीस आलिंगन दिलेल्या कामी पुरुषाप्रमाणे आत बाहेर कांहींच जाणत नाहीं. ॥ ५४ ॥
येथे बाहेर आंत जें म्हटलें, तें पुढील दृष्टांतावरून चांगले समजेल. ज्याप्रमाणें घराबाहेर रस्त्यावर होणारा लोकांचा गलबला व गाड्यांचा घडघडाट यास बाहेरचा वृत्तांत म्हणतात, आणि आतील गृहकृत्यांस आंतला म्हणतात. त्याप्रमाणें एथेंही जागृत अवस्था बाहेरील आणि नाडीमध्ये होणारी अवस्था आंतील ॥ ५५ ॥
सुषुप्तीत बापाचा बापपणा व लेकाचा लेकपणा राहत नाहीं अशा अर्थाची जी श्रुति आहे, तिजवरून त्यावेळी जीवत्वाचे निवारण होतें व तेव्हां संसारीपणाही नजरेस येत नाहीं. म्हणून निद्रेमध्यें जीव हा ब्रह्मरूपच असतो असें म्हणण्यास कोणची हरकत आहे ? ॥ ५६ ॥
कारण मी पिता मी पुत्र असा जो अभिमान तोच सर्व सुखदुःखाची खाण आहे. त्यांतच सर्व प्रपंच आहे. म्हणून तो नाहीसा झाला असतां हा जीव सर्व शोकापासून मुक्त होतो. ॥ ५७ ॥
सषुप्तिकाली सुख असतें याविषयी अथर्वश्रुतीचे प्रमाण आहे. सुषुप्तीच्या वेळीं सर्व जागृदादि प्रपंचाचा तमःप्रधान प्रकृतीत लय झाला असतां त्या तमाने आच्छादित जीव सुखरूप ब्रह्मच होऊन राहतो. ॥ ५८ ॥
आमचा नेहमीचा अनुभवही तसाच आहे. निद्रेतून जागा झाल्यावर मी इतक्या वेळ सुखाने निजलो होतों, व इतका वेळ मला कांहींच समजलें नाही असें निद्रेतील सुखाचे व अज्ञानाचे स्मरण आम्हांस होते. ॥ ५९ ॥
अनुभवावाचून स्मरण कधीच होत नाहीं. ज्याअर्थी जागे झाल्यावर सुखाचे व अज्ञानाचे स्मरण होते त्या अर्थी निद्राकालीं अनुभव आलाच पाहिजे. आतां अनुभवास इंद्रियादिक साधने पाहिजेत आणि तीं तर सुषुप्तीमध्ये नाहींत, मग अनुभव कसा आला ? अशी एक येथे शंका येण्याजोगी आहे. तर त्याचे समाधान इतकेंच कीं, सुख हें स्वप्रकाश चिद्रूप असल्यामुळें तें भासण्यास साधनाची जरूर नाहीं. आणि त्याचे जोरानेच अज्ञानही समजते. ॥ ६० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *